आता इकणार हाय
आता इकणार हाय
शेतातून फिरत व्हती
तवा ऐकू आलं काय
काळी माय रडत व्हती
निसती धाय धाय
आंजारून गोंजारून इचारले
झालं तरी काय?
म्हणली माह्याबद्दल कोणाले
मायाच उरली नाय
विलेक्शन, पैसाअडका
लोकाले सत्ताच हवी हाय
उघड्या डोळ्यानी बघत राह्यती
म्या करु तरी काय?
अवकाळी वारा पाऊस
गारांनी घातलं थैमान
थय थय नाचून गेला
आडवं पाडलं रान
हिथं ह्याच झाडाले
लेकरानं घेतली फाशी
बघुनश्यान सारं हे
उगी राहू तरी कशी
परवा पडलं कानावर
त्ये येगळच हाय
लई मोठ्ठ कर्ज झालं
लेकरं खातील तरी काय?
तुकडं तुकडं आता ती
माहे करणार हाय
बाजारभावानं मले ती
आता इकणार हाय
