आला वसंत
आला वसंत
सडा प्राजक्ताचा दारी पडला
मनोमनी असा वसंत फुलला
जाईजुई न् चमेली गंधाळल्या
पळसाचा बहर दारी खुलला
वसंतात पानगळ दिसते रानी
धुंद करी मोहर आम्रवृक्षाचा
फांद्यांवरती कोवळी पालवी
ऐकू नाद कोकिळ कुजनाचा
टांगला झोका वडाच्या फांदी
हिंदोळता सयींसंगे हा अंगणी
माहेराच्या वाटेवर त्या गोळा
बालपणीचे निघती आठवणी
चैत्रमासाचा सोहळा गुढीचा
बंधुराजा न्याया येतो सासरी
भेटता मायबापा दादा वहिनी
सुख सांडतेय सखीचं माहेरी
लेकीबाळा साऱ्याच माहेरी
भेटती प्रेमाने सणावाराला
झिम्माफुगडी खेळ अंगणी
तव वसंत मनोमनी फुलला
उन्हाळ्याचे दिस येता करू
लोणची सांडगे पापड शेवया
दारी घातलेले वाळवण सारें
डब्यांत भरु पापड कुरडया
येता वसंतऋतू वाजतगाजत
भेगाळली भूई सारें शेतरान
तहानेले पशुपक्षी मुके जीव
कशी भागवावी त्यांची तहान
