आजचा बळिराजा
आजचा बळिराजा
काळी आईच त्याची माय,
अन तीच त्याचा बाप,
तिच्यावरच सारा त्याच्या, जीवनाचा भार
संघर्षाचं बी पेरून, त्याला घामाचं खत घालतो,
उन्हातान्हात काळ्या आईची, सेवा करण्यात तो रमतो...
कमावलेलं सारं त्याचं, परत मातीतच मुरतं,
पण भरायचं असतं, पोट साऱ्या जगाचं,
म्हणून त्याला त्याचं, घरदार गहाण टाकावं लागतं...
अन त्यातूनही गाठलं, जर दुष्काळानं त्याला,
उरत नाही पर्याय फास लावण्याबिगर गळ्याला...
मग, कोवळ्या वयात पडतात, त्याच्या लेकीवर अक्षदा,
कारण, पाठीमागं उभा नसतो, बाप तिचा खमका...
त्याला आस असते, ती फक्त कष्टाच्या धान्याची,
आपल्याला तर साधी जाणिवही नसते,
‘त्याच्या, या जगात असण्याची...’
फक्त म्हणायला उरलंय, ‘हे सरकार आहे शेतकऱ्यांचं’,
कारण, स्वत:च्या राज्यात ठोठवावं लागतंय, दार त्याला मरणाचं...
आता तरी जाग येईल का या निर्दयी सरकारला?
अजून किती शेतकऱ्यांना मुकावं लागेल, त्यांच्या स्वत:च्या जीवाला?