तुझ्यासारखा तूच दुर्दैवी
तुझ्यासारखा तूच दुर्दैवी


जन्म दिला तिने,
माया केली त्याने.
शोधण्यास चंद्र भाकरीचा,
मरमर केली त्याने.
मांडीच्या पाळण्यात झोपवून तुला,
भुईला आलिंगन दिले तिने.
पायात देऊन चप्पल तुला,
स्वत:साठी कातड्याचेच जोडे शिवले त्याने.
फणफणला तापाने तू,
रात्र उशाशी तुझ्या जागून काढली तिने.
देऊन तुला गाडी,
स्वत:साठी पायाचेच वाहन केले त्याने.
सदैव सुखात असावास तू,
म्हणून देवासमोर हात जोडले तिने.
शिक्षण चांगलं व्हावं तुझं,
म्हणून गाढव कामही केले त्याने.
शिकवून सवरून तुला,
पायावर उभा स्वत:च्या केल
ा.
डोळ्यावरच्या झापडांनी तुला,
तुझा बापही नाही दिसला.
जेव्हा रागावले जरी शिक्षक तुला,
सारी शाळा डोक्यावर ज्याने घेतली.
एवढा निर्दयी निघालास तू,
की वेळ भिक मागण्याची आणली.
सुरक्षित साऱ्या जगातील जागेत,
उदरात नऊ महिने वाढवलं जिने.
तिच्याच घरात कर्माने तुझ्या,
मुश्कील केले जगणे तिचे.
जेवल्याशिवाय तू,
ती जेवत नसायची.
तू तर सवयच लावली,
तिला उपाशी राहायची.
छोट्यातला छोटा हट्ट तुझा,
पूर्ण त्यांनी केला.
तुझ्यासारखा दुर्दैवी दुसरा,
फक्त तूच या जगातला.....