आईच्या मायेचं गहिरं आभाळ
आईच्या मायेचं गहिरं आभाळ
जन्मास आल्यावर बाळ
दुरावते जरी आईपासून नाळ
आयुष्यभर सोबतच असते
आईच्या मायेचं गहिरं आभाळ
बापानं दिला जीव कंटाळून
उघड्यावर पडली पोरं न बाळं
शेतीसह सर्वांना घेतेयं सांभाळून
आईच्या मायेचं गहिरं आभाळ
सावकारानं उचलून नेलं सारं
भुकेने पोटात उसळलायं जाळ
सगळ्याला पुरून उरणारं एकच
आईच्या मायेचं गहिरं आभाळ
येउ देत कितीही संकटं
कितीही दाटले मळभ ढगाळ
तारून नेतं या सगळ्यातून
आईच्या मायेचं गहिरं आभाळ

