आई
आई
काय लिहू माते । शब्द न एवढे।
कोष अर्धा पडे । लिहावया॥१॥
ठेवी नऊ मास । पहीलाच शब्द ।
माय निर्विवाद । आला असे ॥२॥
संस्कारी चांदण्या।ह्रदयी कोरल्या।
गोंदूण भरल्या । तन भरे ॥३॥
माया ममतेच्या। नाही कुठे शाळा।
कोठून जिव्हाळा। शिकलीसे ॥४॥
वेदना अंतरी । प्रथम आरोळी ।
येई वेळोवेळी । मुखातून ॥५॥
पावसात छत्र । ऊब थंडीतली ।
छाया उन्हातली । धरलीसे॥६॥
थांबला न मृत्यु।अटळ ते कर्म।
वाटली न शर्म । यमासही ॥७॥
गेली माझी माय । देवाचीया द्वारी।
ओस पडे सारी । माहेरची ॥८॥
शिकले मी बहू।कामी नाही आले।
व्याधिचे न चाले। उपचारा ॥९॥
येग आई त्वरा। एकली पडले।
मन हे उडले ।वार्यावर ॥१०॥
आई आर्त हाक।आता मारू कुणा।
कोणता हा गुन्हा। घडलासे॥११॥
तुझ्या चरणात । ठेवते अभंग ।
रूदनाचा संग ।जडवला॥१२॥
