आधार मी देणार
आधार मी देणार
किलमीश ठेवू नका मनात
कटकट मानू नका जीवनात
आई-बाबा, येवू द्या ना मलाही या जगात !!
बालपण माझे बघा
वात्सल्यसरीत भिजणार
तारुण्याच्या उंबऱ्यावरी
नावास तुमच्या मी जपणार
सुसंस्काराच्या मार्गानं करीन
दोन्ही कुळांचा उध्दार !!
ज्ञान घेवून शिक्षणाचं
उच्चपद मी गाठणार
साऱ्या साऱ्या क्षेत्रांमधे
आघाडीवर मी राहणार
कमी मला लेखू नका
करणार सार्थक जीवनाचं !!
उमलुनी काट्यांवरी
गुलाब कसा हासतो
जीवनमार्ग माझा तुम्हाही
काटेरी का हो भासतो ?
काटे सारे दूर सारुनी
फुलवीन नंदनवन जीवनाचं !!
नाही जरी दिवा तरी
इवलिशी पणती होणार
स्नेहभावाच्या तेलानं
कर्तव्यज्योत प्रकाशणार
म्हातारपणाची काठी होवून
देईन वंशाच्या दिव्याचा आधार !!
किलमीश ठेवू नका मनात
कटकट मानू नका जीवनात
आई-बाबा येवू द्या ना
मलाही या जगात
मलाही या जगात !!