आभास
आभास
सुखी संसार स्वप्नाची,
मना लागली होती आस,
वाटले संसारी पद पडता,
होईल स्वर्ग सुखाचा भास ।
रात्रंदिवस केले कष्ट,
नाही कामात आळस,
चढुनी यशाची पायरी,
हळूच गाठला कळस ।
सुखी संसार वेलीवर,
उमलली फुले दोन,
मन म्हणाले आनंदे,
लाख लाभलं हे सोनं ।
दिले शिक्षण , संस्कार,
संगोपिले तया छान,
बाळे विद्वान होऊन,
आम्हा देतील सन्मान ।
वाटे कष्ट अता संपले,
होतो सुखावलो मनी,
परी पाखरा पंख फुटले,
घेतली उंच भरारी गगनी ।
सुखातल्या या संसारी,
उरला उभयतांचा वास,
कळो आले मिथ्या होता,
सौख्य-प्रपंच आभास ॥
