Nagesh S Shewalkar

Comedy

3  

Nagesh S Shewalkar

Comedy

वसुली: कशी जिरली...

वसुली: कशी जिरली...

18 mins
216


    दुपारचे दोन वाजले होते. वीज वितरणच्या मुख्य कार्यालयात विविध भागातील मुख्य अधिकारी, वसुली अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे काही प्रतिनिधी आणि इतर महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या. एक उच्चपदस्थ व्यक्ती म्हणाली, 

"गेले चार तास आपण वीज थकबाकी वसुलीवर चर्चा करीत आहोत. परंतु अजूनही आपणास म्हणावा तसा पर्याय सापडला नाही. मला वाटते चर्चेमध्ये अजून थोडा मोकळेपणा यावयास हवा. काहीही करून आपणास आपल्या मंडळास तोट्यातून बाहेर काढावयाचे आहे." 

"सर, तोटा भरून काढण्यासाठी आपण नेहमीप्रमाणे प्रति युनिट दहा रुपये वाढीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवू या. म्हणजे किमान पाच रूपये वाढीची परवानगी नक्कीच मिळेल."

"सध्या तरी अशी परवानगी सरकार देणे शक्य नाही. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना शासन कोणतीही रिस्क घेणार नाही."

"मला काय म्हणायचे, राजकीय पक्षांना आपण अशी विनंती केली... नाही तरी प्रत्येक राजकीय नेता निवडणुकीत नाना प्रकारची प्रलोभनं मतदारांना देतच असतो. हा सारा पैसा अनाठायीच जातो. त्यापेक्षा राजकीय पक्षांनी ग्राहकांची थकलेली वीज बिलं भरली तर महावितरणाचा आणि पर्यायाने सरकारचा फायदा होईल." 

"त्यापेक्षा नेत्यांनी स्वतःची थकबाकी भरली तरी गंगेत घोडे न्हातील." 

"हा पर्याय परिणाम करेल असे वाटत नाही. अगोदरच वेळोवेळी सरकारने वीजमाफी करून ही वेळ आणलेय. दरवाढ करताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, दरवाढीचा बोजा हा केवळ नियमितपणे वीज बिल भरणाऱ्यांवरच पडतो. जे ग्राहक काल बिल भरत नव्हते, आज भरत नाहीत आणि कदाचित ते उद्याही भरणार नाहीत त्यांचे काय ? दरवाढ केली काय नि न केली काय त्यांना काहीही फरक पडणार नाही." 

"अहो, मग अशा ग्राहकांची वीजतोडणी का बंद होत नाही?"

"ते उघड सत्य आहे. थकबाकीदारांमध्ये मोठमोठी प्रस्थं आहेत. त्यांच्या जोडणीला हात लावायची ताकद वीज मंडळाजवळ नाही."

“एखाद्या व्यक्तिची जोडणी तोडण्यासाठी जाण्यापूर्वीच कुणाचा तरी दूरध्वनी येतो आणि मग आमची मोहीम 'स्वीच ऑफ' होते."

"वीज चोरी ही आपल्याकडे लागलेली भयानक कीड आहे. सायंकाळी तारांवर तार टाकून उघडपणे वीज चोरी होते. शहरेसुद्धा याला अपवाद नाहीत."

"अनेक ठिकाणी दिवसा मीटर चालू असते, मात्र बंद होते... रात्री !"

"पण आता तर इलेक्ट्रीक मीटर्स...." 

"एखादी योजना अंमलात येण्यापूर्वीच त्यावरील रामबाण उपाय बाजारात येतो. आपल्या साऱ्या योजना कुचकामी ठरवून घरोघरी प्रकाश उजळतो.'

"महत्त्वाचं म्हणजे यासाठी आपले कर्मचारीच मदतगार ठरतात." 

"अहो, मग अशा कर्मचाऱ्यांना शोधून घरी पाठवा ना."

"संघटना! साहेब, अशी कार्यवाही करताना संघटना आडव्या येतात. शिवाय तो कर्मचारी कुणा ना कुण्या मोठ्या नेत्याचा पिट्टू असतो. दूरवरचा नातेवाईक असतो. आपण कार्यवाहीचा केवळ विचार करीत असतो, तितक्यात तो नेता आडवा येतो."

"अहो, मग वसुलीचे काय ? काही समजत नाही. कितीही प्रयत्न केला तरी वसुली पस्तीस टक्क्यांच्या वर जात नाही."

"इतर कार्यालयातील भ्रष्टाचारापेक्षा आपली आकडेवारी सुखदायी आहे. दुसरीकडे सरकार जेव्हा एक रूपया मान्य करते तेव्हा त्याचा लाभांश केवळ पंधरा पैसेच असतो." 

"पण त्यामुळे आपले अपयश झाकले जात नाही."

"कसे आहे. अनेक ठिकाणी आपले कर्मचारी वसुलीसाठी जातात तेव्हा घरातला पुरूष समोर येतच नाहीत. उलट घरातील एखादी स्त्री समोर येवून खांबाला टेकून उभी राहते. "

"एका गावातील एका स्त्रीने वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्याने विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली. आज ते तीन कर्मचारी तुरुंगात सडताहेत."

"कर्मचाऱ्यांची हीच तक्रार आहे की, कर्मचाऱ्यांवर जेव्हा अशी 'अनधिकृत वीज' पडते तेव्हा वितरण कंपनी आमच्या मागे उभे न राहता कर्मचाऱ्यांवर कारवाई करते." 

"कर्मचाऱ्यांसाठी बक्षीस योजना जाहीर केल्या तर वसुली वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही."

"काहीही फरक पडणार नाही. कारण रिडींग कमी दाखवणे, थकबाकी न भरण्याची मुभा मिळणे, मिटरची रिडींग मागे फिरवणे इत्यादी प्रकारांमधून कर्मचारी भरपूर मलिदा मिळवताहेत." 

"एक सुचवतो, थकबाकी पूर्ण भरणाऱ्या धारकाचा सत्कार एखाद्या सिलेब्रिटीच्या हस्ते किंवा नटीच्या हस्ते ठेवला तर ?" 

"बरोबर आहे. पंचवीस हजारापेक्षा अधिक थकबाकी असणारांनी खाते निरंक केल्यास बिपाशा... राखी किंवा अशाच एखाद्या प्रसिद्ध नटीसोबत जेवणाचा कार्यक्रम ठेवल्यास फरक पडेल."

"अहो, पण अशा नट्या का केवळ जेवणासाठी येणार आहेत. त्यांच्या मानधनाचे काय ? ते का महावितरणास परवडेल ? तेलही गेले, तूपही गेले.... अशी अवस्था होवू नये."

"मग करायचे काय ?" एका अधिकाऱ्याने विचारताच काहीक्षण सर्वत्र शांतता पसरली असताना एका सामाजिक संघटनेची एक स्त्री प्रतिनिधी म्हणाली, 

"सर, आगामी तिमाहीमध्ये आपणास सध्याच्या वसुलीमध्ये किती टक्के वाढ अपेक्षित आहे?"

त्यावर कुणी पाच टक्के, दहा टक्के, कुणी पंधरा टक्के वाढ व्हावी असे सुचविले.

"पन्नास टक्के वसुली झाली तर ?" प्रतिनिधीने विचारले.

"का? शंभर टक्के नको ? आपण सकारात्मक, आशावादी असायला हवे. आपण सुरुवातीलाच पन्नास टक्क्यांचा विचार केला तर वसुली पस्तीस टक्क्याच्याही खाली येईल. बोला मॅडम, आपण काय सुचवणार आहात ?" एका अधिकाऱ्याने विचारले.

"आपण सारे म्हणत आहात ते बरोबर आहे. पण सुरुवातीलाच फार आशादायी होणेही योग्य नाही. कारण त्यामुळेच नैराश्याचा धक्का अधिक तीव्र बसतो. मी म्हणजे आमची सामाजिक संस्था वसुली चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक करण्याचा प्रयत्न करीन. पण माझ्या कामात मंत्री, पदाधिकारी, अधिकारी कुणाचाही हस्तक्षेप नसावा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी ही योजना माझ्या विभागात प्रायोगिक तत्त्वांवर राबवीन. वसुली चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक झाली तर महावितरणांकडे मी चाळीस टक्केच रक्कम भरीन. बाकी वसूल झालेली रक्कम मी चालविलेल्या अभियानाचा खर्च असेल. शिवाय हे सारे अधिकार लिखित स्वरूपात मिळायला हवे."

"आणि समजा तुमच्या पराकोटीच्या प्रयत्नातूनही चाळीस टक्यांपर्यंतत पोहचलीच नाही तर ?" एका अधिकाऱ्याने विचारले.

"हेच असे नकारात्मक विचार आपल्या खात्यावर अशी वेळ आणण्यासाठी पुरेसे आहेत. होऊ द्या ना एखादा नवीन प्रयोग! काय हरकत आहे ? मॅडम, यू मे प्रोसीड! तुम्हाला पूर्ण अधिकार आहेत पण आपली योजना आहे तरी काय?"

"सर, दोन दिवसात माझ्या योजनेस अंतिम स्वरुप देऊन आपणास प्रोजेक्ट सादर करते."

"ओके. कामाला लागा." वरिष्ठ अधिकारी म्हणाले...

   तिसऱ्या दिवशी त्या महिला प्रतिनिधीच्या विभागातील अनेक थकबाकीदारांचे दूरध्वनी खणाणले...

"हॅल्लो... नितीनभावोजी आहेत का ?" एका स्त्रीचा मधुर, मधाळ, नखरेल आवाज ऐकून वीज मंडळाच्या त्या ग्राहकास आश्चर्याचा धक्का बसला.

"मीच बोलतोय. पण आपण कोण? मी नाही ओळखले." 

"कसे ओळखणार? आपण अजून भेटलो नाहीत ना." 

"भेटलोच नाहीत ? मग माझा क्रमांक अगदी नावासह कुठून मिळाला?"

"हे... हो काय भाऊजी? आजकाल काय अशक्य आहे ? शिवाय असे प्रश्न विचारून मजा का घालवता.... भाऽऊ, जी..." 

"बरे...बरे. बोला ना काय काम आहे ?"

"आधी एक सांगा.... आमची ताई.... तुमची मिसेस हो. घरात आहे का हो?" 

"न. न... नाही. मुलांना सुट्टी असल्यामुळे ती माहेरी गेलीय." 

"म्हणजे तुम्ही घरी एकटेच आहात तर? वॉऽ व! हाऊ लवली अँड रोमांटिक! भाऽऊजी, मला की नाही तुम्हाला भेटायचं..."

"क. क... कशासाठी ?" बसलेल्या मदमस्त धक्क्याने बोबडी बसलेल्या नितीनभाऊजींनी विचारले.

"भाऊजी! असे हो काय करता? एवढे भोळे आहात का तुम्ही? एका पुरूषाला... म्हणजे भाऊजीला त्याची साली तीही नटखट, बोल्ड, ब्युटीफुल मेहुणी घरात कुणीही नसताना का भेटायचे म्हणते ?" 

"अहो, भलतेच काही तरी बोलू नका. मी... मी..प्रामाणिक, चारित्र्यवान माणूस आहे हो." 

"मी कुठे नाकारते ? सहज भेटूया, बोलूया. झालेच तर... जाऊ द्या. भावोजी, मला सांगा आपल्यामध्ये निखळ मैत्रीचा धागा गुंफला जावूच शकत नाही का?"

"अहो, पण माझे घर भरवस्तीत आहे हो." 

"दुपारी सारे वातावरण शांत असताना मी येईन हो. कुणी पाहणार नाही हो. प्लीज भाऊजी, नाही म्हणून नका हो. भाऊजी, दुपारी तीन वाजता येते. बाय, भावोजी !" बोलत-बोलत त्या मदमस्त आवाजाच्या तरूणीने फोन बंद केला...

  दुसऱ्या एका थकबाकीदाराचा लँडलाइन खणाणला. फोन त्या घरातल्या स्त्रीने विचारले, 

"हॅलो, कोण बोलते?" 

"राघवदादा आहेत का ?" पलीकडून उलट प्रश्न आला.

"कोण म्हणालात ? राघवदादा ? अच्छा! अग बाई, हे आमचे 'हे' ! माझे पतीराज ! पण मी आपणास नाही ओळखले !" 

"बरोबर आहे. तशी मीही आपणास किंवा राघवदादास प्रत्यक्ष ओळखत नाही, वहिनी."

"तरीही राघवदादा काय, वहिनी काय ? बरे. काय काम आहे?"

"मला दादांना भेटायचे आहे."

"अरे वा! मान ना मान, आप मेरे भाईजान !" 

"मला की नाही, त्यांना राखी बांधायची आहे !"

"काऽय ? राखी ! का ? यांना भाऊ मानता ? यांनी तुला काही त्रास दिलाय.... म्हणजे विनयभंग, तुमचा पाठलाग, इशारे किंवा फोनवर संदेश, बोलणे वगैरे..."

"वहिनी, तुम्ही की नाही फारच पुढे जाता बाई, आमची एक एमएसईबी नावाची संस्था आहे."

"एमएसईबी ? वीज मंडळ ? तुमच्याकडे गिऱ्हाइकांना भाऊ म्हणून संबोधण्याएवढी प्रगती कधी झाली ?"

"तसे नाही हो वहिनी. एमएसईबी हे योगायोगाने साधर्म्य असे नाव आले. कसे आहे, बघा... एम फॉर मालती, एस फॉर सरोज, इ फॉर एकता आणि बी फॉर बेबी म्हणजे एमएसईबी ! आमची ही एक सामाजिक संस्था आहे. शहरात अनेक सामाजिक उपक्रम आमची ही संस्था राबविते आहे. त्यासाठी निधी जमा करत..."

"अशी एमएसईबी का ? मला वाटले वीजमंडळ ! कसे आहे नणंदबाई...आता तुम्ही माझ्या नवऱ्यास दादा आणि मला वहिनी म्हणतात ना त्या अर्थाने नणंदबाई! तर त्याचे काय आहे, तुम्ही एमएसईबी हे नाव घेतलं आणि मला की नाही फार मोठा शॉक बसला हो. गेली सहा महिने आम्ही लाईट बिलच भरले नाही हो." 

"बाप रे ! सहा महिने ? वहिनी, कम्माल आहे हं ! तुमची लाईन बरी तोडली नाही हो."

"वो बहुत मजबुत जोड है! त्याचं काय आहे कुणी वीज तोडायला आले की त्याच्यासमोर पाच-पन्नास रुपयाचा तुकडा फेकताच तो माणूस निघून जातो. बिल भरणारच आहे मी. पण कसं आहे. सध्या निवडणुका तोंडावर आहेत. एखाद्या वेळी पुन्हा आपलेच सरकार यावे म्हणून मायबाप सरकारने वीज बिल माफ करायचा निर्णय घेतला तर आपले नुकसान होईल ना किंवा विरोधी पक्षही असाच काही निर्णय घेवू शकतो."

"काय विचार आहे हो तुमचा. वहिनी, असे किती बील आहे ?" 

"वन्सबाई, काय विचार आहे. नाही म्हटलं, दादाचे बिल भरता की काय ?"

"न भरायला काय झाले ? सहज विचारले हो वहिनी. " 

"असेल सात-आठ हजार."

"बरे ते जाऊ देत. राघवदादा, घरी केव्हा असतात. कसे आहे, ते बाहेर गेलेले असताना मी आली तर उगाच..."

"ते सकाळी दहा वाजता जातात आणि सायंकाळी सातच्या आत घरात..."

"बाई गं ! वहिनी, फारच धाकात ठेवले हो. बरे येईन मी." म्हणत वहिनीच्या नणंदबाईंनी फोन ठेवला...

     "हॅलो, कोण वसंतभावोजी का ?" फोनवर अत्यंत लडिवाळ असा स्त्रीचा आवाज आला.

"हो, हो. बोलतोय. आपण?" वसंतरावांनी विचारले. 

"मला तुमची मेहुणीच समजा ना, 'या भाऊजी, बसा भाऊजी कशी मी राखू तुमची महरजी...' प्रमाणे ! दाजी, एक सांगा ना, आता तुम्ही घरी एकटे आहात की, आमच्या बहिणबाई आहेत म्हणजे कुठे बाहेर गेल्या नाहीत ना?"

"तेवढे कुठले आमचे नशीब. सदासर्वकाळ माझ्यावर नजर ठेवून असते. इकडचा डोळा तिकडे झाला म्हणजे चुकून एखाद्या बाईकडे पाहिलं ना की असे आकांडतांडव करते ना विचारूच नका. आता स्नानाला गेलीय म्हणून सांगा नाही तर आतापर्यंत फोन चालू असताना सतराशे साठ प्रश्न विचारले असते आणि समाधान झाले नाही म्हणून फोन हिसकावून तुमचीही खरडपट्टी काढली असती. बरे, तुमचे काय काम आहे ?"

"मला की नाही भाऊजी, तुम्हाला भेटायची इच्छा आहे हो." 

"का...य ? ना बाबा, ना. हे जर हिला समजले ना तर कच्चं खाईल हो मला. अहो, भेटायचे सोडा पण तुमचा फोन आला हे जरी तिला नुसते समजले ना तर माझी खैर नाही. नको, नको." 

"भाऊजी, असे काय हो करता? मी एवढे प्रेमाने भेटायचे म्हणते आणि तुम्ही आहात की नन्नाचा पाढा वाचताय. दुसरा एखादा असता तर त्याने आतापर्यंत पुढचे सारे ठरवले असते..."

"अहो, हे काय भलतेच. मी एवढे नको म्हणतोय. बरे ठेवू का ? बहुतेक तिचे स्नान झालेय."

"घाबरू नका हो भावोजी. असे करा, दुपारी पाच वाजता महानगरपालिकेच्या बागेत या. तिथे मी लालभडक साडी, तसाच ब्लाऊज घातलेला असेल. चेहऱ्यावर गुंडाळलेला रूमालही लाल रंगाचाच असेल, कपाळावरचे भलेथोरले कुंकू, हातातल्या बांगड्या आणि हातातली पर्सही साडीशी परफेक्ट मॅच असेल. हे झाले माझे. तुमच्याकडे छत्री असेलच ना..."

"आता भर हिवाळ्यात छत्री कशाला?"

"हिंदीतल्या सिनेमाप्रमाणे पाऊस आला तर एकाच छत्रीखाली... तुम्ही की नाही भाऊजी... माझ्यासारखी लालपरी तुम्ही ओळखाल पण तुमची ओळख कशी पटणार? उगीच दुसऱ्याच पुरुषाने माझ्यावर.. म्हणजे मला जाळ्यात ओढले तर... म्हणून माझी तुम्हांस ओळख पटताच छत्री उघडून डोक्यावर धरा. ओ. के. ? मी तिकीट खिडकीजवळ उभी असेल."

"अहो, न..न..नाही हो. माझा संसार उघड्यावर येईल हो..." 

"असे कसे नेभळट हो तुम्ही? भाऊजी, का मी येऊ तुमच्या..."

"बाप रे! असे काही करू नका. येतो मी. ठेवतो आता. हिचे स्नान झालेय असे वाटते..." असे म्हणत वसंतरावांनी फोन बंद केला. अशाच आशयाच्या निवेदनाचे दूरध्वनी अनेक थकबाकीदार ग्राहकांच्या घरोघरी केल्या गेले.

    त्यादिवशी दुपारी दोन वाजता नितीन यांच्या दारावरील घंटी सुमधुर आवाजात किणकिणली. चाळीसवर्षीय एका इसमाने दार उघडले. समोर उभ्या असलेल्या आगंतुक व्यक्तिला पाहताच त्याचे डोळे गरगरायला लागले. जणू समोर कुणी व्यक्ती नसून त्यांनी स्वतःच विजेच्या तारास हात लावला होता. दारात वीस-बावीस वर्षांची एक अत्यंत सुंदर तरुणी उभी होती. ती जेवढी सुंदर होती तेवढीच ती तारुण्याने मुसमुसलेली आणि अत्यंत कमी कपडे परिधान केलेली होती. तिच्या शरीरावर असलेल्या टॉपवर अगदी मधोमध दोन्ही बाजूस दोन प्रकाशमान बल्बचे चित्र होते. दोन्ही बल्बच्या बाजूस 'हाय होल्टेज' असे लिहिले होते. तरुणीस अनेकवेळा आपादमस्तक न्याहाळत नितीनने विचारले, 

"क..क..कोण पाहिजे?"

"तुम्ही नितीनभावोजी का ?" तरुणीने डोळ्यांना मनमोहक हालचाल करीत विचारले. 

"म... म...म्हणजे... हो, आलात काय ?" 

"भाऽऊऽजी, असे हो काय? दारातच सारे करणार आहात? म्हणजे विचारपूस हो. घरात घ्याल का नाही ?" 

"हो... हो..., या... या." म्हणत नितीन बाजूला झाला. ती त्याला खेटून मदमस्त चालीने नितीनकडे नशिल्या नजरेने पाहात शिरली आणि नितीनने दार ओढले. 

 "भाऽऊऽजी, भारीच गडबड झालीय की, मी कुठे पळून जाणार आहे? दार लावलेत..."

"ना... नाही. तसे काही नाही हो. कुणी पाहु नये म्हणून दार लावले."

"एवढे भिता तुम्ही शेजाऱ्यांना ?" तरुणीने डोळे मोठे करीत विचारले.

"इज्जतीला भ्यावे लागते. मध्यम वर्गीयांजवळ दुसरे असतेच काय? ब....बसा ना."

"हो. पाणी मिळेल का ?" त्या तरुणीने ओठांची दिलखेच हालचाल करीत विचारले.

"अ.... आणतो..." म्हणत नितीन आत गेला. त्या तरुणीने शोधक नजर खोलीत फिरवली. टेबलावर बरीच कागदं पडली होती. तिच्या नजरेस तिला हवा असलेला कागद पडताच तिने तो उचलला. नितीन पाणी घेवून आला. तिच्या हातातला कागद पाहताच तो म्हणाला, 

"ब.... बिल... लाईट बिल आहे."

"हो ना. पण भाऊजी, दिसता-बोलता तेवढे भोळे नाही आहात तुम्ही. बरेच चालू..."

"हे काय बोलता तुम्ही ? मी काहीच तर केले नाही." 

"इज्जतीचा धोशा लावताय आणि एवढी थकबाकी? वीस हजार पाचशे रुपये...!"

"राहूनच गेले हो.."

"भाऊजी, फेडा ना हो लवकर...." 

"का... काय.. काय फेडा...."

"कसं असते भाऊजी, पटापट कामे करून मोकळे व्हावं. थकबाकी म्हणजे वीजमंडळाचे कर्जच झाले ना! कर्ज लवकर फेडून मोकळे व्हा म्हणते..."

"कर्ज फेडा म्हणता होय.... मला वाटले..." 

"अग बाई, भाऊजी तुम्हाला काय कपडे वाटले..."

"नाही हो. तुम्ही एकदम फेडा म्हटलात ना...."

"आता कुणाची वाट पाहताय?" 

"उद्या-परवा भरीन म्हणतो."

"दाऽजी..." मधाळ आवाजात ती तरुणी पुढे म्हणाली, "कसे आहे, कल करे आज कर, आज करे सो अभी कर..."

"पण कसे शक्य आहे ?"

"का नाही ? समजा आत्ता असं म्हटलं की मला दहा हजार द्या. मी... मी... तुमच्यासोबत

"प्रेम ? कसं शक्य आहे ?" 

"का नाही ? तुम्ही तरुण, मी सुंदर स्त्री, एकांत... ते बॉबी चित्रपटातले गाणे... ऋषी कपूर आणि नीतू सिंग..."

"ती नीतू सिंह नव्हती. डिम्पल होती." 

"खरेच का. सिनेमाची बरीच आवड आहे म्हणायची. त्यातले ते गाणे हो...."

"हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए..." म्हणताना नितीनच्या शरीरात वेगळाच प्रवाह संचारला.

"ये हुई बात! वा ! 'दिसतोय भोळा नि लपून खातो लोण्याचा गोळा' अशी अवस्था आहे, भाऊजी तुमची. बरे, मी काय म्हणते ती वीज मंडळाची थकबाकी फेडून टाका ना आत्ता..."

"म्हणजे?"

"असे हो काय करता भाऊजी ? मी महावितरणकडून आलेय. सध्या आमची वसुली मोहिम सुरु आहे. प्लीज, द्या ना गडे..."

"ते ठीक आहे. पण आता माझ्याजवळ पैसे नाहीत हो." 

"खरेच नाहीत का ?" तिची ती अदा नितीनला घायाळ करीत होती.

"मला सांगा एवढी रक्कम का कुणी हातावर ठेवते काय ?"

"चेक सुद्धा चालेल भाऊजी मला..." तरुणी नितीन जवळ येत त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली.

"सध्या मला पैशाचे काम होते हो." 

"मलाही... म्हणजे महावितरण सध्या महाअडचणीत आहे हो. कसेही करून एवढे एकदा करा ना हो, भाऊजी." 

"बरे. ठीक आहे..." म्हणत नितीन आत गेला. 

काही क्षणात तो बाहेर आला. हातातील चेकबुक दाखवत त्याने विचारले, 

"कुणाच्या नावे लिहू ?" 

"माझ्याच नावावर लिहा. बँकेत शिल्लक आहे ना? चेक बाऊन्स झाला तर काय होते..."

"होणार नाही. पैसे आहेत. घ्या..." असे म्हणत नितीनने तो चेक तिच्या हातात दिला.

"धन्यवाद ! भाऊजी ! 'आले भाऊजी, काम झाले भाऊजी, आता निघते भाऊजी ! तुम्ही राखली माझी महरजी... " अत्यंत कामुक आवाजात म्हणत ती तरुणी मदमस्त चालीने निघाली. चार-दोन पाऊले पुढे जाताच ती थबकली. नितीनकडे तिरपी मान करत तिने टॉप हलकेच वर केला आणि तो चेक आत ठेवत हाताने 'बाय' करत निघाली...

      सायंकाळचे चार वाजत आले होते. राघवदादा यांच्या दारावरील घंटी त्या तरुणीने दाबली. परंतु आतमध्ये झालेला तिचा निनाद तिला ऐकू आला नाही म्हणून तिने पुन्हा दार वाजवले. काही क्षणात आतून आवाज आला. 

"आले, आले..." दरवाजा उघडणाऱ्या बाईने दारात उभ्या असलेल्या सुंदर युवतीकडे अनोळखी नजरेने पाहिले. तशी ती युवती गोड आवाजात म्हणाली,

"नमस्कार ! मी सकाळी फोन केला होता..." 

"अच्छा ! नणंदबाई का ? या... या. पण वन्स, तुम्ही 'हे' म्हणजे तुमचे दादा घरी असताना येणार होतात ना?"

“वहिनी, बरोबर आहे तुमचे. पण कसे आहे, म्हटले अगोदर आपल्या भावजयीशी गप्पा माराव्यात म्हणून आले." 

"छान केले. मला आवडला तुमचा स्वभाव. तुम्ही फार लाघवी आहात. बसा. पाणी आणते." 

"होईल हो चहा-पाणी ! अगोदर गप्पा मारु या. ही मिठाई घ्या ना. कसे आहे, पहिल्यांदाच भाऊ-भावजयीला भेटायला जाताना रिकाम्या हाताने कशी येवू ?"

"बरोबर आहे तुमचे. पण वन्स, आजकाल कोण रीतीरिवाज पाळते हो?"

"दोन दिवसांपूर्वीच राखीपौर्णिमा झाली. मला भाऊ नाही शिवाय कुटुंबापासून खूप दूर राहते म्हटलं तुमच्याशी नाते जोडावे..." ती तरूणी बोलत असताना पुन्हा दारावरची घंटी वाजली. 

'आता कोण आले?' असे बडबडत बाईंनी दार उघडले. 

दारात दोन-तीन माणसे आणि दोन स्त्रिया उभ्या होत्या. 

"राघवजी आहेत का ? वीजमंडळाची सतरा हजार थकबाकी आहे. आम्ही वसुलीसाठी आलो आहोत." 

"पण हे घरात नाहीत."

"ते आम्हाला माहिती नाही. सारेच वीजचोर, बिलबुडवे असेच म्हणतात. तुम्ही काय पाहताय, या बाईंना बाजूला करा म्हणजे आम्ही घरात शिरून कुणी माणूस घरात आहेत का ते शोघतो..." एकजण सोबतच्या महिलांकडे पाहत म्हणाला. तशा त्या दोघी पुढे झाल्याचे पाहताच सौ. राघव दारातून बाजूला झाल्या. तसा तो जत्था आत शिरला. ती दोन माणसं इतर खोल्यांमध्ये शिरणार तोच तिथे असलेली नणंदबाई विचारती झाली.

"कोण आहात तुम्ही? असे घरात कसे घुसू शकता?"

"आम्ही वीज मंडळाचे कर्मचारी आहोत. यांच्याकडे सतरा हजार रुपये थकबाकी आहे..."

"अहो, घरात एकट्या बाईच आहेत. पुरुष माणूस कुणीच नाही."

"वीज काय एकटा पुरुष वापरतो काय ? बाई वीज वापरत नाही ? उलट बाईलाच वीज जास्त लागते. नवरा घरी नसताना पंखे, लाईट, कुलर, मिक्सर, टी.व्ही. दिवसभर कोण वापरते ? बाईच ना? मग बिल भरण्याची जबाबदारी बाईने का घेवू नये ? दहा वेळा आम्ही येऊन गेलो. ह्यांचे साहेब कधीच भेटत नाहीत. आम्ही काय रात्री-बेरात्री यावे की आमच्या सुट्टीच्या दिवशी यावे? ते काही नाही आज एक तर वसुली नाही तर वीज तोडणी..."

"सात वाजता राघवदादा येतात तेव्हा त्यांच्याशी..." 

"नाही. तेवढा वेळ नाही. अजून पंचवीस घरांची वसुली किंवा वीज तोडणी करायची आहे. बोला बाई, बोला. काय करावे ?"

"मी काय सांगू बाई. माझ्याजवळ तर एवढे पैसे नाहीत..."

"एक मिनिट वहिनी, इकडे या..." म्हणत ती तरुणी सौ. राघव यांना घरात घेऊन गेली आणि म्हणाली, "वहिनी, हे लोक ऐकतील असे वाटत नाही. शहरात सर्वत्र सक्तीची वसुली चालू असल्याचे

वर्तमानपत्रातून वाचलेय. त्यामुळे शे-पाचशे तोंडावर फेकून मोकळेही होता येत नाही."

"वन्स, आता काय करायचे हो?" वहिनीने काकुळतीने विचारले.

"वहिनी, तुमच्याजवळ आता किती पैसे असतील ?" 

"नक्की माहिती नाही. परंतु यांच्या पश्चात म्हणजे यांनीच सामान आणण्यासाठी दिलेल्या पैशातून बाजूला काढलेले, यांना नकळत यांच्या खिशातून काढलेले पंधरा हजार तरी नक्की असावेत..." 

"ते घेऊन या. मी बाहेर जावून एखादा तुकडा फेकून त्यांना पटवायचे बघते..."

"वन्स, पण आता जर बिल भरले तर हे माझे पैसे मला परत..."

"वहिनी, आत्ता पैसे जमा करणे महत्त्वाचे आहे की, वीज न तोडता लाज वाचविणे गरजेचे आहे. आज जर वीज तोडली गेलीच तर गल्लीत...शिवाय उद्या पेपरात नाव आल्यावर केवढी छी! थू! होईल..."

"पेपरात नाव येईल ? गल्लीतल्या बाया तर टपूनच बसल्या आहेत. आजवर त्यांना कधी संधी मिळाली नाही आणि आता तर त्यांच्या हातात कोलितच पडेल. ठीक आहे. तुम्ही त्यांना पटवायचं बघा तोवर मी पैसे घेवून येते." 

ती तरूणी दिवाणखान्यात आली. तिने त्या लोकांना 'थम्सअप्' केले. काही क्षणात वहिनी बाहेर येत असल्याचे पाहून ती तरुणी म्हणाली,

"हा तुमचा ॲप्रोच बरोबर नाही. पुरुष माणूस घरी नसताना तुमची ही दांडगाई निषेधार्ह आहे. मी मीडियाला बोलवीन." 

"कुणालाही बोलवा. अभियान चालू असल्यामुळे तुमच्यावर आणि त्या तुमच्या मीडियावर वसुलीकामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवून सर्वांना अंदर करीन..."

"मी काय म्हणते, नेहमीप्रमाणे पाच-पन्नास रूपये घेवून..."

"लाच? अक्षम्य गुन्हा करताय मॅडम. लाच घेण्यापेक्षा लाच देणे हा फार मोठा अपराध आहे. तुम्ही हे जे बोललात ना ते सारे टेप झालेय. लाच देण्याचा प्रयत्न केला म्हणून तुम्हालाच खडी..."

"अहो, नको, नको. ती पाहुणी आहे."

"पाहुणी असो का मेहुणी, विजेपुढे एकाच माळेचे मणी..." 

"हे बघा वन्स, हे घ्या. मोजा सारे पैसे आणि द्या त्यांना." वहिनीने सारी रक्कम तरुणीकडे दिली. काही क्षणात ती चोळामोळा झालेली, वाकड्या-तिकड्या, अव्यवस्थित घड्या पाडलेल्या नोटा व्यवस्थित लावून नंतर ती तरुण म्हणाली, 

"सोळा हजार पाचशे आहेत. पाचशे टाकू का माझ्याजवळचे..." 

"नको, नको. मेहुणीचे पैसे घ्यायला वीज मंडळ तेवढे डबघाईला आले नाही. ही घ्या सोळा हजार पाचशे रुपयाची पावती..." म्हणत तो जत्था निघून गेला...

"वन्स, थँक्स हं ! आज तुम्ही होता म्हणून आमची वीज आणि लाज दोन्ही वाचले हो. नाही तर दोन क्षणामध्ये घामाघूम झाले असते. वीज तोडली असती तर शेजारणीच्या हातात कोलित सापडले असते ते वेगळेच. बरे, वन्स, पाच वाजताहेत. तुमचे दादा येतील तासाभरात तेव्हा जेवूनच जा ना. " 

"वहिनी, आज जेवणाचा घाट नको. आता नाते निर्माण झालेच आहे तर येईन पुन्हा नक्की. बरे, ही राखी. राघवदादा आल्यावर माझ्यावतीने तुम्हीच बांधा. सॉरी ! तुम्हाला बांधता येणार नाही. असे

करा, एखाद्या शेजारणीस बोलावून घ्या बांधून. तुमच्या संसारावरचा धोका टळेल...."

"अय्या वन्स, अगदी माझ्या तोंडातले बोललात हो. शेजारची ती भवानी की नाही यांच्यावर लाईन मारत असल्याचे माझ्या अनेकदा लक्षात आलेय. मी समर्थ आहे म्हणून यांचा बल्ब लागत नाही. पण उद्या गावाला गेल्यावर मी महत्प्रयासाने न जोडू दिलेले कनेक्शन जुळायला किती वेळ लागणार हो? तसे झाले ना वन्स तर माझ्या घरात असा अंधार होईल म्हणून सांगू... अहो, तुमचा हॅलोजन लावला ना तरी मी चाचपडतच राहीन हो. गुड आयडिया ! आजच करते त्यांची राखीपौर्णिमा ! ते जावू द्या. वन्सवाई, तुम्ही फोनवर ती एमएसइबी... सामाजिक संस्था... निधी..."

“वहिनी, ते जावू द्या. बघू. पुढच्या भेटीमध्ये." वन्स म्हणाल्या आणि वहिनींच्या हातचा चहा घेऊन आनंदाने निघाल्या...

    सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वसंतभावोजींनी नगरपालिका उद्यानात प्रवेश केला. त्यावेळी ऊन, पाऊस, ढग नसताना त्यांच्या हातातली छत्री पाहून पाहणाऱ्यांना विजेचा धक्का बसत होता. तिकडे दुर्लक्ष करुन वसंतभावोजींनी तिकीटविक्री खिडकीकडे बघितले. तिथे आपादमस्तक लालभडक पोशाख असणाऱ्या लालपरीस पाहताच त्यांनी थरथरत्या हातांनी छत्री उघडली. तशी ती तरुणी मदमस्त चालीने आणि आव्हानात्मक नजरेने पाहत निघाली. दोघेही समोरासमोर येताच ती तरुणी हात पुढे करुन म्हणाली, 

"वसंतभावोजी ? मीच फोन केला होता."

तरुणीच्या त्या स्पर्शाने शरीरात वेगळेच कंपन सुरु झालेल्या अवस्थेत वसंतराव म्हणाले, 

"म.. म... मीच वसंत...."

"या भाऊजी, बसा हिरवळीवर, करुया..."

"अहो, पण..."

"हे हो काय भाऊजी, मी एवढी आतुरतेने तुम्हाला भेटायला आलीय, तुमच्या सहवासासाठी अशी तळमळतेय जणू वीज गेल्यानंतर गर्मीने तळमळणारी प्रेयसी ! आणि तुम्ही की नाही...." बोलता - बोलता त्या तरुणीने भावोजींचा हात धरला आणि भाऊजींना जणू सणसणीत विजेचा झटका बसला. काही पावले जाताच थबकून डोळे गरगर फिरवत, मान हेलावत, ओठांचा चंबू करुन म्हणाली, 

"दाऽजी ! असे हो कसे तुम्ही ? जनावराला ओढल्यासारखे तुम्हाला ओढावे लागते आणि तुम्ही भलतेच हे आहात हो... अहो, आता छत्री बंद करा ना... सिनेमात नट -नट्या प्रेक्षकांना त्यांचा लवसीन दिसू नये म्हणून छत्री लावतात तसा तर काही तुमचा विचार नाही ना?"

"न... न.... न.... स.... सॉरी हं!" गडबडलेल्या अवस्थेत भाऊजी म्हणाले आणि त्यांनी छत्री बंद केली. काही क्षण चालत गेल्यानंतर एका झाडाखाली ती तरुणी बसली. तिच्यापासून अंतर राखून भाऊजी बसले. ती सौंदर्यवती पायाच्या अंगठ्याने गवताशी खेळत वसंतरावांच्या डोळ्यात डोळा घालून म्हणाली, 

"काही तरी करा ना गडे, भाऊजी..."

"आँ? म...म...मी..."

"भाऊजी, किमान बोला तरी..."

"काय बोलू? मी असा नाही हो. अहो, बायकोसोबत यायचे तर सोडा पण कधी सामाजिक स्थळी... अगदी नातेवाईकांसमोरही बायको सोबत अंतर ठेवूनच वागत आलो हो. असं... तुमच्यासोबत पाहिलं ना तर नसती आफत ओढवेल हो."

"सरळ मुद्दयावरच येवू का?"

"म्हणजे? क... क... काय..."

"तुम्ही फारच घाबरता बुवा, दाजी ! बरे, तुमच्या मोबाईल.." 

"आहे की. देऊ का ?" असे विचारत वसंतरावांनी गळ्याच्या मार्गातून खिशात विसावलेला मोबाईल काढला.

"भाऊजी, फारच जुने मॉडेल आहे हो.. तुमचे.. मोबाईल ! बरे तुमच्याकडे आधार कार्ड, पॅनकार्ड आहे का हो ?" त्यांच्याकडे सरकत म्हणाली.

"काढलेत की. सारे कंपलसरीच केलेय ना. इच्छा नसताना काढावे लागते, जवळ बाळगावे लागते. अगदी एटीएम कार्डही ! बघा..." असे म्हणत वसंतरावांनी पाकिट काढले आणि सारे कार्ड बाहेर काढले.

"अरे वा! सगळेच आहे की, तुमची आर्थिक स्थितीसुद्धा चांगलीच असणार. सहज विचारले हो..." "हो. तशी ठीकठाक आहे. कुणाचे कर्जबिर्ज नाही."

"छान आहे. तरीही बावीस हजाराची उधारी... थांबा. असे दचकू नका. भाऊजी, वीज वितरणची थकबाकी आता भरा ना गडे.." 

"आता कसे शक्य आहे ?"

"भरा ना हो भाऊजी.... प्लीज... माझ्यासाठी..."म्हणत तिने केस मोकळे सोडले. पदराला लावलेल्या पिनेला हात लावताच भाऊजींनी घाबऱ्याघुबऱ्या स्वरात विचारले,

"हे..हे.... काय करता?" 

"तुम्ही आता विजेचे बिल भरणार नसाल तर मी केस आणि साडी अस्ताव्यस्त करून सर्वांना ओरडून सांगेन...." 

"प... प... पण हे खोटे आहे."

"तुमच्यावर कोणी विश्वास ठेवेल का ते पाहायचे का?"

"न....न... नको. मी... मी उद्या भरतो." 

"उद्या? आज... आत्ता.... ताबडतोब..."

"इथे कसे ? एवढे पैसे सोबत आणले नाहीत हो."

"एटीएम कार्ड आहे ना ? समोर एटीएम मशीन आहे. जा ना भाऊजी प्लीज..." तरुणीने गळ घालताच वसंतभाऊजी मशीनकडे निघाले... पाठोपाठ लालपरी ! वसंतराव पैसे घेवून येईपर्यंत त्या तरुणीने इशारा करताच दोन-तीन माणसे बहुधा ते वीजमंडळाचे कर्मचारी होते तिथे पोहचले. वसंतरावाकडून बावीस हजार रूपये घेवून त्यांना रीतसर पावती देवून त्या कर्मचाऱ्यांसोबत निघालेली तरूणी वसंतरावांकडे दिलखेच कटाक्ष टाकून म्हणाली, 

"थँक्स, भाऊजी ! भेटूया पुन्हा... बाय !" 

    त्या तीन महिन्यांमध्ये त्या विभागातील अनेक शहरांमधून कमी जास्त प्रमाणात असेच प्रकार घडत होते. मंडळाची वसुली भरभक्कम होत असली तरीही काही ठिकाणी वसुलीसाठी गेलेल्या तरूणीवर बिकट प्रसंग ओढवले मात्र त्या तरूणींनी सोबत आलेल्या परंतु त्यांच्यापासून दूर उभे असणाऱ्या कर्मचाऱ्यांना इशाऱ्याने बोलावून घेतले आणि पुढील अनर्थ टळला. दरम्यान अनेक वाहिन्या आणि वृत्तपत्रांनी मंडळाच्या त्या आगळ्यावेगळ्या वसुली अभियानासह वीज मंडळ आणि सरकारवर टीकेची झोड उठवली. परंतु त्यांनी 'वेट ॲण्ड वॉच !', 'नो कमेंटस्' अशी सोईस्कर भूमिका घेतली... 

   तीन महिन्यानंतर वसुली अभियानाच्या आढावा बैठकीत एक आनंददायी बातमी पुढे आली, की संपलेल्या तीन महिन्यात वीज मंडळाची वसुली पस्तीस टक्क्यांवरुन ऐंशी टक्क्यांपर्यंत गेली आहे. मात्र दुसऱ्याच क्षणी त्या आनंदावर विरजण पाडणारी धक्कादायक माहिती पुढे आली की, झालेल्या दोन कोटी रूपयांच्या वसुलीपैकी एक रूपयाही महावितरणच्या खात्यावर जमा झाला नाही. अत्यंत शॉक देणारी गोष्ट म्हणजे त्या आढावा बैठकीस अभियानाच्या प्रमुख असलेल्या संस्थेच्या प्रमुख मॅडम किंवा एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. पंधरा-वीस दिवसांपासून त्या बाई कुणाच्या संपर्कातही नव्हत्या. 

"म... म... म्हणजे मॅडम सारी वसुलीची रक्कम घेवून पसार माल्या की काय ?" एका अधिकाऱ्याने विचारताच सर्वांची अवस्था वीज गुल झाल्याप्रमाणे झाली... जणू तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाची वीज जोडणी तोडण्यात आली होती.

         ००००


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy