विषय व आशय
विषय व आशय
मानवी जीवनात प्रत्येक कलाकृतीने परमोच्च आनंद दिलेला आहे. प्रत्येक पिढी म्हणते असे गाणे होणार नाही, असे नाटक होणार नाही, अशी कलाकृती होणे नाही. कलाकृतीच्या संदर्भात आज थोडा नैराश्य आलेलं आहे. परिश्रम न घेता प्रत्येकालाच मोठें व्हायचं आहे. जीवनाची इतिकर्तव्यता म्हणजे पैसा आणि प्रसिद्धी. पूर्वी मानसिकसमाधानासाठी कलाकृती अवतरत होत्या, त्याच्यामागे केवळ पैसा, प्रसिद्धी या गोष्टी नव्हत्यांच, पण ते आपोआप चालून येत होतं.
प्रत्येकालाच वाटतं की मी ओळखलां जावं प्रसिद्धीमुळे, झटपट श्रीमंती मुळे त्याच्यामुळे नको त्या गोष्टीत नको तितकं पाणी घालणं चालू आहे.
वाचन नाही म्हणून चांगलं लेखन नाही व चांगलं लेखन नाही म्हणून चांगली कलाकृती नाही. काही प्रकार तर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, अशा प्रकारचे संगीत होते,अशा प्रकारचं नृत्य होतं हे लोक आता विसरत चाललेले आहेत. चित्रपट, संगीत, नृत्य कोणत्याही कलाकृतीने आम्हाला काय दिलं? कलाकृतीने आम्हाला जगणं दिलं, जीवन दिलं, जीवनाच्या आशा पल्लवित केल्या, प्रेरणा दिली, मोहरून टाकलं. एकेक पिढीला जीवनाची दिशा, जीवनाची शिदोरी मिळाली.
आपलं घराणं माहीत नसलेल्या पिढीला संगीताचा घराणं काय माहित असणार? उस्ताद म्हणजे काय माहित असणार? त्यांची चूक नाही कारण त्यांच्या समोर फार भयानक येत आहे आणि त्यांना संस्कृती माहीतंच नाही, व माहीत करून घ्यायची नाही. अभिजात संगीत ऐकण्याची संधी पण नाही व ऐकायची इच्छा पण नाही, कसं कळणार? दादासाहेब फाळके कोण माहीतच नाही. ज्यांनी पहिला चित्रपट प्रदर्शित केला 'राजा हरिश्चंद्र' त्यासाठीचे कष्ट काहीच माहित नाही.
पूर्वीच्या पिढ्यांचा संघर्ष आजच्या पिढीला माहीतच नाही आणि संघर्ष जेंव्हा माहीत नसतो तेव्हां नवां इतिहास घंडत नाही. टोकाचा संघर्ष केलेली पिढी अस्तंगत झाली,आता टोकाचा हर्ष आहे. पूर्वी व्यसनाचा शिरकाव न होण्यात धन्यता मानली जायची,आता व्यसनांवर जीवन चाललंय. फसवणूक व कामजीवनाचा अतिरेक चालु आहे. पूर्वीच्या शब्दकोशातील बरेच शब्द आता नाहिसें झाले आहेत. निष्ठा, प्राणप्रतिष्ठा, विश्वास, कसोटी,श्रमप्रतिष्ठा हे शब्द हद्दपार झाल्यात जमा आहेत. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. त्यामुळे म्हणी सुद्धा आता कालबाह्य झाल्या आहेत.
ज्या म्हणींनी जीवनाचा अर्थ शिकवला त्या अस्तंगत झाल्या. दर्दभऱ्या गाण्यांनी लोकांनी आपलं सांत्वन करून घेतलं, आनंदी गाण्यानें आशा पल्लवित केल्या. समीकरण बदललं की गणित बदलतं, गणित बदललं की उत्तर बदलतं. अंगाई गीत गेलं, वासुदेव गेला, आईची कुस,आजी-आजोबांची मांडी, गोष्टी या गोष्टी दुर्मिळ झाल्या. मुलं चार भिंतीत वाढत आहेत, जिथे तोंड उघडण्याची संधी मिळत नाही.लहान मूल संवादाने बोलायला शिकतं. शब्द संवाद नाही तिथे फक्त वाद आणि अपवादच आहेत.
अनेक शब्दांना अर्थ राहिलाच नाही, निसर्गाच्या ऱ्हासामुळे खळखळाट मुलांना कुठून शिकवणार? संबोध कसें समजवणार? शब्द वाचायचे नाहीत त्याच्यामुळे शब्दांच्या पलीकडे कसे जाणार? वैभव जगणारी पिढी, समाधानात जगणारी पिढी, संतुष्ट आयुष्य जगणारी पिढी पण यशस्वी जीवन जगणारी पुढे आता फक्त असंतुष्ट आत्महत्या जवळ करणारी, पुढे जाणारी पिढीच राहिली आहे. यश सुद्धा आजच्या पिढीला पचवता येत नाही. पैशाच्या नादात त्यांची इतकी दमछाक होते की प्रत्यक्ष आयुष्य जगणं त्यांना कठीण जातंय, करण समाधानाच्या थांब्यावर ते थांबतच नाहीत.
अफाट पैसा कमवायचा तो फक्त नशेत राहण्यासाठी जीवनाची नशा काय असते जीवनाचा आनंद काय असतो त्यामुळे ते कळतच नाही. जीवनात ही घडी अशीच राहू दे असं आपल्याला वाटतच नाही ,कारण प्रत्येक वेळेस नवीन घडी विस्कटत पुन्हानवीन घडी बसवली जात आहे. मूल्य आणि संस्काराचं रोपण करावं लागतं ते खिळा घट्ट मारल्यासारखे लावता येत नाहीत. स्वतःहून स्वतःतून उमलणं हे मुलांना माहीतच नाही, सगळे सूत्र पालकांनी हातात घेतली आहेत. आपल्या ब्ल्यू प्रिंट प्रमाणे मुलं घडवणारे पालक आहेत.
इच्छांचे लगाम जेव्हा दुसऱ्यांच्या हातात जातात तेव्हा प्रवास आपला राहत नाही. नको त्या व्यक्तिमत्त्वाच्या साच्यात मुलांना घातलं जात आहे, आवड वेगळी निवड वेगळी, अभिनयकौशल्य डॉक्टर किच्या साच्यात घातलं जातं. डिप्रेशन हा शब्द सुद्धा मागच्या पिढीला माहीत नव्हता 'ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान' तुकारामांनी म्हंटले, पण तुकारामच माहित नाही.
आशयापासून दूर असलेली पिढी आशय समृद्धी कशी देईल? आशय आणि विषय याचा उत्तम मिलाफ कलाकृतीत व्हायला हवा. मालिका सुरू झाल्या. अभिनय सुरू झाले. माणसं जवळ येऊन बोलायला लागले, वागायला लागले पुन्हा तेच तिरस्कार तेच छळ. पण हे सर्व आभासी. घरातली माणसे तशीच जखडून, अव्यक्त. मालिकेत माणसांना प्रवेश आहे. आमच्या असंख्य काम करणाऱ्या, स्वयंपाक करणाऱ्यांना घरात प्रवेश नाही. गावातल्या गावात नातेवाईकाकडे,लग्नाला प्रवेश नाही. अंत्यविधीला, मित्रांकडे प्रवेश नाही. निवृत्ती धारक, एकटे राहणारे यांच्याकडे कसलीच सोय नाही. एखाद्या मदत केंद्र, फोन नंबर की जिथे यांची सोय होऊ शकेल असं कुठे आहे?. त्यांच्याकडे पैसा आहे पण मनुष्यबळ नाही, बाहेर जाता येत नाही, कोणी आणून देऊ शकत नाही. असंख्य लोक ज्यांचा उदरनिर्वाह भाजी, स्टॉल, वर ते चालवत आहेत. भिकारी, असहाय्य, वाहन नसलेले यांचं काय? मध्यमवर्गीयांना व्यक्त करायला समाज माध्यमे आहेत. सामान्यांचे काय?
सामान्यांचीही दखल घ्यायला हवी दखल.
दखल सौंदर्याचीच घेतली जाते.
दखल यशाचीच घेतली जाते.
दखल असामान्याचीच घेतली जाते.
सामान्य ही दखलपात्र असतात.
सामान्यात ही वेगळेपण, यशोगाथा असतात.
माणसे जेव्हा बेदखल होतात तेव्हा अंधश्रद्धा, आत्महत्या हात जोडून तयार असतात.
खोटा अभिनय करणाऱ्यांना लाखो लाईक्स मिळतात.
