वायरस
वायरस


गेल्या आठवड्यापासून दर एक दिवसा आड मी तिला फोन करत होते, तर आपलं 'यह नंबर स्विच्ड ऑफ है!' आज सकाळ पासून तर मनात नाही त्या शंका येत होत्या. तीन महिने झाले होते भेटून. माझ्या प्रोजेक्ट मुळे मी तिला भेटू शकले नव्हते. आणि फोन ही करु शकले नव्हते. शेवटी पर्स उचलली आणि बस स्टॉप गाठला.
दारावरची बेल वाजवली तर तिनेच दार उघडलं. "हुश्श! काय तू? घाबरवलंस! फोन करतेय तर स्विच्ड ऑफ!"
"अगं हो हो! दमानं! आत ये, बस! मी निमुटपणे आत गेले. सोफ्यावर बसल्यावर तिनं पाणी आणून दिलं. "त्या दिवशी तुझ्या घरून परतताना बस स्टॉप वर उतरत असता पर्स पडली, रस्त्यावर पाणी साठलं होतं ना?त्यात! मोबाईल खराब झाला. नंबर सेव्ह करायला गेले तर आठवेचना. पण आलीस बरं झालं.आता रहायचं. " तो हुकूम होता.
दारावरची बेल जोरात वाजत होती. आम्ही रात्रभर गप्पा मारून पहाटे झोपलो होतो त्यामुळे डोळे उघडत नव्हते. मी मीनलला हाक मारली पण वाॅश रुम मध्ये पाणी सोडल्याचा आवाज येत होता. मी डोळे चोळत दार उघडलं तर बॅग घेऊन मीनलची आई उभी! दोघींच्याही चेह-यावर आश्चर्याचे भाव!
"तू घरात कशी आलीस?"
"दारातून!"
"कुणी उघडलं?"
"मीनल नं!"
"नाही! " त्यांच्या डोळ्यातून पाणी वहात होतं. "ती सोडून गेली! "
मी जुळवाजुळव करू लागले. मीनल नं रात्री तिच्या बाॅयफ्रेंड बद्दल सांगितलं होतं. "काकू, मला तिच्या बाॅयफ्रेंड बद्दल माहित आहे.काल रात्री सांगितलं तिने मला. पण ती सोडून जाणार नाही. तुम्हाला समजावणार म्हणाली होती.
बोलता बोलता माझ्या लक्षात आलं वाॅश रुम मधून पाण्याचा आवाज ऐकू येत नव्हता. काकूंनी मला घट्ट मिठी मारली. "तीन महिन्यापूर्वी तुझ्या घरून वाढदिवसाची पार्टी करून रूम वर येण्यासाठी बसमध्ये बसली. तो ही होता. दोघेही बस स्टॉप वर उतरले. रात्र बरीच झाली होती. रस्त्यावर लाईट नव्हते. दोघांची झडप तिला जाणवली असेल. कदाचित, तिला ओरडण्यास वेळ ही मिळाला नसेल... तो आणि त्याचा मित्र..... दुस-या दिवशी सकाळी रस्त्यावर ती छिन्न विछिन्न पडलेली दिसली लोकांना! तिच्या पर्स मधील कागद पत्र फाडूनफाडून फेकले होते. मोबाईलचे तुकडे केले होते. पोलिसांना मोबाईल कव्हर वर दोन नंबर दिसले, *ईमरजन्सी* असं लिहिलं होतं. एक नंबर त्याचा होता. सूत्र जमवून त्याचा माग काढला, त्याला व त्याच्या मित्राला पकडलं. त्यांनी कबूल केलं. ईन्टरनेट वरची ओळख ती काय! पण माझ्या मुलीच्या आयुष्यावर वायरस आला!" आणि त्या हमसून रडायला लागल्या.
"इन्स्पेक्टर जाधव नी दुस-या नंबर वर ही फोन केला होता पण काही कळलं नाही." मला आठवलं दोन महिन्यांपूर्वी जाधव नावाने काॅल आला होता, मी इतकं म्हणून कट झाला होता. पुन्हा रिंग झाली पण *अननोन* काॅल म्हणून मी कट केला.