Deepa Vankudre

Inspirational

2  

Deepa Vankudre

Inspirational

एकांताचा प्रवास

एकांताचा प्रवास

2 mins
60


'पुरे आता! किती तेच तेच रोज! सकाळी ऑफिसला जा, घरातली कामं तेच ते, विकेन्ड्सचा पण कंटाळा' असं म्हणता म्हणता, काळाने एक दिवस कलाटणी खाल्ली आणि सारे दृश्य बदलले. 


सोशल डिसटन्सींग, क्वॅरेन्टाईन, लाॅकडाऊन, कधी न ऐकलेले शब्द, न पाहिलेले किस्से, अनुभव, डोकं गरगरून गेलं. 


आता वेळच वेळ! सकाळी लवकर उठण्याची घाई नाही, रात्री लवकर झोपायची घाई नाही, डब्याला काय याचा विचार नाही, लोकल ट्रेन पकडायचा त्रास नाही! पण तरीही काहीतरी खटकत होतं. कारण महामारीची भीती! सुरूवातीला गर्दीत जाणं नाही, हे बरं वाटलं, पण नातेवाईक, मित्र मंडळी, कुणीच नाही? बाहेर ही नाही अन आत ही नाही, अशी परिस्थिती. धावपळीला ब्रेक लागला तरी विचारांना नाही लागला. ते तर दुप्पट गतीनं धावत आहेत. शरीराला आराम मिळाला, मनाचं काय? 


याचं उत्तर मला तरी, ध्यानात मिळालं. मोजून २० मिनिटे. मी फक्त माझ्यापाशी, माझ्यासाठी! तेव्हा 'मला काही करायचं नाही, मला काही नको (त्या २० मिनिटात तरी) आणि मी कुणी नाही', एवढं स्वतःशी बोलून बसलं की 'एकांत' म्हणतात तो हाच, याची प्रचिती येऊ लागली. 


मनातल्या एका अगाध विश्वापासून स्व कढे जाण्याचा प्रवास म्हणजे एकांत! खरे-खोटे, नाती, सुख-दुख, राग, द्वेष, लोभ, मत्सर, सर्व मनातून सुरू होतो आणि मनातच संपतं. पहिल्या ते शेवटच्या श्वासापर्यंत हे सर्व घडतं आणि आपण म्हणतो 'जीवन'. 


पण थोडसं मनातल्या गुहेत, त्या अंतरात गेलं की तिथं एक अफाट अंतरीक्ष सापडतं. दिवसातून एकदा हा २० मिनिटांचा प्रवास बरंच काही देऊन जातो. आणि सर्वात महत्वाचं देतो ते वर्तमान! इंग्रजीत 'गिफ्ट' ला 'प्रेझेंट' असा शब्द आहे. प्रेझेंट मराठीत म्हणजे वर्तमान. आत्ता, या क्षणात जगण्याचा उपहार देतो हा एकांत. जगण्याचे स्वातंत्र्य देतो हा एकांत.


सुनीताबाई देशपांडे म्हणतात, 'आहे मनोहर तरी, गमते उदास'. मराठी चित्रपट, 'अनोळखी' मधले एक सुंदर गाणे, 'धुंद एकांत हा'. एकाकीपणाची भावना आणि प्रेमात हवा हवासा वाटणारा एकांत! आपला नेहमीच एकांत आणि एकाकी मध्ये गोंधळ होतो.  


आपण स्वतःला खरंच १००% ओळखतो का? तसं असतं तर बरेच वेळा स्वतःविषयी माहित नसलेल्या गोष्टी हातून घडतात. आणि जर स्वतःविषयी स्वतःलाच माहिती नाही, तर दुस-यांनी समजून घ्यावं अशी अपेक्षा का करतो? थोडं थांबून, स्वतः बरोबर राहून हा विचार करायला हवा, असं वाटतं एकटे म्हणजे स्वतः बरोबर असताना. म्हणून एकांत कधीतरी हवाच! फक्त तनासाठी नाही मनासाठी ही!


तुम्हाला काय वाटतं?


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational