Deepa Vankudre

Inspirational

3.5  

Deepa Vankudre

Inspirational

प्रवास माझ्या लेखनाचा

प्रवास माझ्या लेखनाचा

2 mins
93


शाळेत असताना मामा, मावशी, मोठी भावंडं यांना डिस्को गाण्यांच्या ठेक्यावर नाचताना, गाताना बघत, ऐकत असे. असे सोपे आणि लयीत म्हणता येणारे शब्द आपल्यालाही लिहिता येतील असे वाटायला लागले आणि मनातले शब्द कागदावर उतरवायला सुरूवात केली. लय येण्यासाठी ओळीचे शेवटचे अक्षर सारखे असायला हवे, चाल लावली तर ती कडवी गाता यायला हवीत, असे मनात धरून लिहू लागले. पण त्या ओळींमध्ये यमक, गेयता, कडवी असतं ते कशाला म्हणायचं हे अजिबात माहित नव्हतं. अलंकार, छंद, किंवा इंग्रजीतील मीटर वगैरेची काहीच कल्पना नव्हती. एकंदरीत आपण कविता लिहितोय ही माहिती, कविता लिहायला सुरुवात केली तेव्हा अगम्यच होती.

हे सर्व सांगितले माझ्या "मातामह" म्हणजे आईच्या वडिलांनी! ते नाटककार होते. त्यांनी त्यांच्या काळातील अलंकार, व्याकरणावरील पुस्तकं वाचायला दिली. मोरोपंतांच्या केकावलीपासून, केशवसुत, कुसुमाग्रज, बालकवी, ते इंदिरा संत, वि. स. खांडेकर, मंगेश पाडगावकर, यांच्यापर्यंत प्रत्येकाची एक तरी कविता वाचण्याचा आदेशच दिला म्हणायला हरकत नाही. 

हळूहळू आजोबांचा गद्य लेखनाचा पिंडही माझ्यात उतरला. मी इंग्रजी माध्यमातून शिकलेली असूनही शाळेत, नंतर काॅलेज मध्ये हिंदी, मराठी भाषेत मला वरचढ गुण कसे मिळतात याचं माझ्या नातेवाईकांना आश्चर्य वाटायचं. (आणि नंतर ऑफिसमध्ये सहकर्मचा-यांना!). याचं सर्व श्रेय आईला जातं. माझं भाषा ज्ञान बळकट करण्याचे संपूर्ण परीश्रम तिचे आहेत. मला आई नेहमी म्हणायची, "इंग्रजी माध्यमातून शिकल्याने पुढच्या शिक्षणासाठी किंवा आर्थिक कारकीर्दीसाठी त्याच्या तुला उपयोग होईल, पण मातृभाषा व राष्ट्रभाषा अजिबात कच्ची पडू द्यायची नाही!" तिला व बाबांना वाचनाची आवड! घरात भरपूर पुस्तकं. माझे पितामह, प्रोफेसर. आजी (बाबांची आई) आमच्याकडे रहायला आली किंवा मी गावी गेलो की रोज रात्री झोपताना गोष्टी सांगत असे. मोठी झाल्यावर मला कळले त्यातल्या ब-याच गोष्टी तिने स्वतः रचलेल्या होत्या! आज मला त्या आठवत नाहीत याची खंत वाटते! याप्रमाणे आई व वडिल यांच्याकडून व त्यांच्या आई- वडिलांकडून लेखन, वाचनाचा वारसा मिळाला!

श्री. पु. ल. देशपांडे हे माझे साहित्यातील आराध्य दैवत बनले. (याचंही श्रेय आईला!) मी शाळेत-काॅलेजमध्ये असताना, माझ्या निबंधांवर, लेखांवर, पुलंच्या लेखन शैलीची छाप असे. त्यांच्या पुस्तकातील उतारे पुस्तकात न बघता, मी व माझी मैत्रीण शाळेतून, नंतर काॅलजमधून घरी येईपर्यंत रस्त्यात म्हणत येत असू. एकमेकींच्या वाढदिवसाला पुलंचे पुस्तक भेट म्हणून देत असू! कविता लिहिणे चालू होतेच!

कोरोना आधीच्या काळात आई आजारी पडली आणि माझे विश्व उलटे- पालटे झाले. पण कोरोना काळात घरी असताना (तेव्हा ऑफिसचं कामही बंद होतं) एक शब्दांची छोटीशी ज्योत पेटली आणि त्याचा दीप प्रज्वलीत होऊन, मिळालेला वारसा पुन्हा उद्दीप्त झाला! लेखणी कामाला लागली, ते काम आजपर्यंत अविरत सुरू आहे. आज साहित्यीक कारकीर्दीत कविता, लोक साहित्य, कथा, लेख वगैरे बरेच प्रकार जमा आहेत. हे सर्व आई व आजोबांमुळे. मी गेल्या जन्मी काय पुण्याई केली माहित नाही पण मला हे वरदान प्राप्त झालंय ते आई-आजोबांमुळे! त्यांचे आशिर्वाद सदैव पाठीशी रहावेत व हा प्रवास माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत चालू रहावा ही श्री चरणी प्रार्थना!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational