Rahul Maghade

Horror Action Thriller

4.2  

Rahul Maghade

Horror Action Thriller

वारसदार भाग १

वारसदार भाग १

29 mins
247


चॅप्टर १ : - गेट टू गेदर

" खरंच भुतं असतात का ? जर देव आहेत तर भुतं ही असतीलच..." अस महादेव ग्रुपमधील सर्व मित्रांकडे बघून बोलत होता. महादेव, सरिता, प्रिया, निशा, अजिंक्य आणि सुनील हे सर्वजण शाळेपासूनचे जिगरी मित्र, पुढे कॉलेजमधील शिक्षण पण सोबत पूर्ण केलं. नुकतंच कॉलेज संपलं होत, त्यामुळे शेवटच्या दिवशी सर्व मित्रांनी मिळून शहराबाहेर कुठेतरी दूरवर एक रात्र मुक्काम प्रवासाच्या सहलीला जावं म्हणून तश्याप्रकारे नियोजन करायला सुरुवात केली. त्यांनी मोठं अस प्रशस्त पाच बेडरूमचं अस फार्महाऊस चं बुक केलं. त्यात इनडोर - आउटडोर गेम, स्विमिंग पूल, व्हेज - नॉन व्हेज जेवण, सकाळचा नास्ता, चहा, कॉफी, आजूबाजूला प्रशस्त असा बगीचा आणि त्यात शोभा वाढवण्यासाठी फार्महाऊस च्या लगतचं वाहत असलेलं नदीच पाणी. ह्या अश्या निसर्गरम्य वातावरणात रात्रीच्या वेळी मध्यभागी शेकोटी करून व प्रत्येकाच्या हातात चहा अन कॉफीचा आस्वाद घेत सर्व मित्र - मैत्रिणी शेकोटी भोवती गोलाकार बसून भुताखेतांच्या गप्पा गोष्टी करत बसली होती. 


" महादेव खरंच असतील का भुतं ? सरिता म्हणाली. तिला रोखून प्रिया बोलू लागली, " अगं..! खरच भूत असतात आणि शक्यतो भुतं ही अमावस्येच्या रात्री दिसतात, ते ही फक्त मनुष्यगण असलेल्या व्यक्ती ला, असे माझे बाबा सांगत होते. " आता प्रिया चे बाबा म्हणजे नाशिकचे पंडित, अत्यंत हुशार, वेद पुराणाची चांगली माहिती असणारे व्यक्तिमत्त्व होते. सध्या सत्तरी ओलांडली होती, अन त्यात तब्येत ही काही प्रमाणात खालावलेली असते म्हणून प्रवास टाळतातच. 


अमानवीय शात्रानुसार मनुष्य तीन गणामध्ये विभागला गेला आहे. देव गण, ह्यांना भूत दिसत नाही पण त्रास होतो. राक्षस गण, ह्यांना भूत दिसतही नाही आणि त्रासही होत नाही. मनुष्य गण, ह्यांना भूत दिसतात अन त्रास ही होतो. तर अश्याप्रकारे हे शास्त्र असत. प्रियाचे बाबा विद्वान त्यामुळे त्यांच्याकडून थोडीफार माहिती प्रियाला ही मिळाली होती. 


शेकोटीवर हात शेकत निशा तिच्या गावचा किस्सा सांगू लागली की, रोज रात्री त्यांच्या अख्या गावावर प्रत्येकाच्या घरच्या छतावर दगड फेकायचा आवाज येतो अन तो आवाज अजूनही येतो, तुम्हाला जर हे अमानवीय कृत्य बघायचं असेल तर माझ्या गावी तुम्ही येऊ शकता. हे ऐकून सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. थोडावेळासाठी भयाण शांतता पसरली अन त्याच शांततेचं औचित्य साधून मध्येच अजिंक्य ने त्याच्या गावचा किस्सा सांगायला सुरुवात केली, त्याच्या घरी सर्व जण झोपल्या नंतर रात्रीची हळूच त्याची आजी उठते आणि बाहेरच्या झोत्यावर जाऊन बसते आणि अजिंक्य च्या आजोबांशी गप्पा मारते, जे आज हयात नाही, ४ -५ वर्षांपूर्वीच सोडून गेले. आणि मुख्य म्हणजे त्याचे आजोबा रोज येतात, आजी शी गप्पा मारतात ते ही घराचा उंबरठा न ओलांडता. आणि आजी सुद्धा हाकेच्या अंतरावर बसून त्यांच्याशी गप्पा मारते आणि कधी आजोबा बोलता बोलता नाहीसे होतात कळत सुद्धा नाही. हे ऐकुन तर आता सर्वांची चांगलीच टरकली. 


" ये गप बसा रे, त्यापेक्षा आपण दुसऱ्या विषयांवर बोलू " अस म्हणत सरिता ने विषय बदलला. पण बाकीच्या मुलांना हाच एक मौका मिळाला मुलींची टिंगल उडवण्याचा त्यामुळे सर्वचजण भुतांच्या गोष्टींसाठी आग्रही झाले. " अरे सुनील आणि मी तर रस्त्यांवर पडलेलं नारळ, हळद - कुंकू लावलेलं, टाचण्या टोचलेलं लिंबू पायाने उडवलं आहे त्यामुळे मनात आणू नका, काही होत नाही. घाबरून राहीलं, तर भीती ही वाटणारच," महादेव म्हणाला. " अरे मित्रांनो काही होत नाही, एवढं लक्ष द्यायचं नसत, मी नाही घाबरत ह्या अश्या गोष्टींना ", आता सुनील लाही जोर आला. त्यावर सरिता म्हणाली, अरे सुनील, पण निशा आणि अनिश ह्यांच्या सोबत घडलेला किस्सा ते काय आहे मग. आपले मित्र आपल्याला खोट तर नाही सांगणार. त्यावर सुनील ने उत्तर दिले की आपण स्वतःच्या डोळ्याने नाही पाहिलं आहे आणि राहिला प्रश्न त्यांनी सुद्धा तो अनुभव स्वतः नाही घेतला आहे. मी हे नाही बोलत की ते खोट बोलत आहे, पण फक्त ऐकीव गोष्टींवर आपण तरी विश्वास नको ठेवावा. आपण २१ व्या शतकातले मुलं आहोत. आज मेडिकल सायन्स किती पुढे गेलं आहे. सुनील च बोलण सर्वांना पटलं. दोन दिवस मज्जामस्ती करून सर्व जण परतीच्या वाटेला निघाले. मनात एक होतच की पुन्हा लवकर भेट होणं नाही. 


वर्षभरापूर्वीच मि. मोहितेंच्या मोठ्या मुलीचं सुरेखाच लग्न झालं होतं. शहरापासून थोड अंतरावर असलेल्या कोळशेवाडी ह्या छोट्याशा गावातल्या प्रतिष्ठित आणि नावाजलेल्या घरात तिचा संसार सुरू झाला होता. माहेरची सुरेखा मोहिते आणि आता सासरची सुरेखा सरपोतदार झाली होती. लेकीचं लग्न झाल्याने मि. मोहिते अगदी आनंदी आणि निर्धास्त झाले. डोक्यावरचा खूप मोठा ताण कमी झाला. आता फक्त एक मुलगा आणि एक मुलगी. त्यांना चांगलं शिक्षण देऊन योग्य तो करिअर निवडून लग्न करून देऊ व त्यांच्यासाठी जमवलेली सेविंग त्यांना देऊन गावी शेती करायचा त्यांचा विचार होता. मोठी मुलगी सुरेखा जीच आताच लग्न झालं होतं, त्यांनतर धाकटी मुलगी अपेक्षा मोहिते आणि सर्वात लहान म्हणजे सुनील मोहिते जो नुकताच कॉलेज पूर्ण करून कॉलेजच्या मित्रांसोबत सहल एन्जॉय करून आला होता. पण हसत खेळत असलेल्या कुटुंबाला कोणाची तरी नजर लागतेच ना ...! तसचं काहीसं ह्या परिवारासोबत झालं.


दोन वर्षांनतंर...


टेलिफोनची बेल वाजते.. ट्रिंग... ट्रिंग...हॅलो प्रिया आहे का ? हा प्रिया बोलतेय आपण. 


( अत्यंत गंभीर आवाजात )


सुनील : - मी सुनील बोलतोय. 


प्रिया : - हे, हाय सुनील कसा आहेस. घरी सगळे कसे आहेत. आणि आपले बाकीचे मित्र भेटतात की नाही.


प्रियाचं बोलणं मध्येच मोडून सुनील बोलू लागला, मला तुझ्या बाबांशी थोडं महत्त्वाचं बोलायच आहे. प्लिज त्यांना देतेस का ? 


प्रिया : - काय झालं रे अचानक ? आणि बाबा सध्या घरी नाहीत, बॉडी चेक अपसाठी तालुक्याच्या दवाखान्यात गेले आहेत. झालं काय आहे ते सांग, तुझा आवाज एवढा गंभीर का येतोय. 


सुनील : - ते फोनवर सांगता येणार नाही, भेटून सांगतो आणि येताना सर्वांना सोबत घेऊन ये, आपल्या नेहमीच्याच ठिकाणी... अस बोलून सुनील ने फोन ठेवला... 


***


नुकतंच जन्मलेलं चार - पाच दिवसाचं बाळ. त्यात बाळाच्या आईची ही अशी अवस्था, बाळाला उचलून दूध सुद्धा पाजू शकत नव्हती ती, एवढी हतबल झाली होती. पण करणार काय. नियतीपुढे कोणाचं काही चालत नाही. घरचे तर अक्षरशः रडकुंडीला आले होते. आज बरोबर महिना होऊन गेला होता पण शेवटी अपयशच हाती येत होतं.अस वाटत होतं सर्व मार्ग बंद झाले आहेत. 

कधी त्या बाळाला मायेचा स्पर्श जाणवेल ? कधी त्या आई अन बाळाची भेट होईल ? 

कधी त्या विधात्याला मायेचा पाझर फुटेल ? 

.

.

.

.

कधी...... 


खि खि खि... किन्नरी आवाजातलं ते अतिशय भयानक हसु मध्येच पुरुषी आवाज घेत, त्याची शक्ती किती अफाट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करीत होत. त्याच्या अवतीभवती काही माणसं बसून त्याच्याकडे अगदी रागाने तर कधी भावुक होऊन बघत होती. आणि तो किन्नरी आवाज एखाद्या जंगली श्वापदा प्रमाणे सगळीकडे आपली भयानक नजर टाकत होत. हे सगळं रात्री एखादं भयानक स्वप्न पडावं अस काहीस विचित्र दृश्यासारख दिसत होत. सगळीकडे नजर फिरवून शेवटी एखाद्या हिंस्र प्राण्यांच्या आवाजात एकदम जोरात आवंडा गिळत तो तिच्या मुखातून बोलला, नाही नाही अगदी किंचाळलाच, " मी बोललो होतो ना बघतोच मी..! बाळाची पाचवी कशी पूजता ते "..


हाहाहाहहहह... खिई खि खि खि .... 



चॅप्टर २ : - कोळशेवाडी




गुरुजी...! तब्येतीची काळजी घ्या आणि शक्यतो प्रवास टाळा, डॉ. सापळे, पंडित अमित जोशी ( गुरुजी ) जे प्रियाचे बाबा आहेत, त्यांना बोलत होते. गुरुजी सत्तरी पार त्यामुळे रुटीन चेक अप साठी नेहमी प्रिया सोबत जायची पण आज तिला घरी काम असल्याने तिचा लहान भाऊ मयंक जो यंदा ग्रॅज्युएशन च्या शेवटच्या वर्षाला शिकत होता. तो गुरुजींसोबत डॉ. सापळेंच्या क्लिनिक मध्ये आला होता. डॉक्टर आता वय झालंय, आतापर्यंतच सर्व आयुष्य फक्त सत्कार्यासाठी खर्ची घातलंय, आता आणखी काही नको मला. मी माझं आयुष्य छान जगलो आहे, अस म्हणत गुरुजी आणि मयंकने डॉ. सापळेंचा निरोप घेतला. घरी आल्यानंतर प्रियाने बाबांना रुटीन चेक बद्दल विचारलं, तब्येतीची विचारपूस करत त्यांना तांब्याच्या पेल्यात घोटभर पाणी आणून दिले. गुरुजींनी पाणी पिऊन हलकेच पलंगावर आरामसाठी पडले. सत्तरी ओलांडलेले वृद्ध ते, शरीर साथ देत नव्हते पण इच्छाशक्ती अगदी तरुणाई ला लाजवेल अस. बाबांना ह्या अवस्थेत बघून प्रियाने विचार केला की, सुनील बद्दल बाबांशी बोलावं का ? पण मनात आलेला प्रश्न मनाशीच ठेवून आधी सुनील ला भेटून खरी परिस्थिती काय आहे ? ते बघूया, नंतर मग ठरवूया. 

***


ये राकेश..! ती अकाऊंट ची फाईल दे, मी सगळी बिल चेक केली आहेत. तु फक्त सरांच्या कॅबिन मध्ये फाईल ठेव, मला आज घरी लवकर जायचं आहे. सरिता खूप घाईघाईने ऑफिसची सर्व कामे आटपून फाईल ऑफिस बॉय राकेश कडे सोपवून घरी निघायची तयारी करत होती. सरिता खूप हुशार आणि अगदी शिस्तबद्ध, तिच्या लहानपणीच तिच्या वडिलांना देवाज्ञा झाली, त्यामुळे घरची सगळी जबाबदारी तिच्यावर येऊन पडली. घरी आई असते. ती पण आजारी त्यामुळे आईचं औषध पाणी आणि घरची पूर्ण जबाबदारी तीच्यावर येऊन पडली. ती नेहमी बोलते, मी मुलगी आहे अन ही माझी कमजोरी नाही, तर ताकद आहे.


ट्रिंग ट्रिंग .... सरिता ला फोन द्या, मी प्रिया बोलतेय. रिसेप्शनिस्ट निंबाळकर मॅडम नाकावरचा चष्मा वर सरकवत सरिता ला आवाज देतात. सरिता मॅडम, प्रिया चा फोन आहे.


सरिता : - काय ग...! आज अचानक ऑफिस मध्ये कॉल केलास, सर्व ठीक ना. 


प्रिया : - हो ग..! तुला काही तरी सांगायचं आहे, मला काल सुनील चा कॉल आलेला. खूप गंभीर आणि त्याच्या मनात कसलं तरी दडपण होत. त्याला आपल्याला काहीतरी सांगायच आहे त्यामुळे त्याने मला सांगितलं आहे की, आपण सर्वजण नेहमीच्या ठिकाणी भेटू, ग्रुपमध्ये कॉल करून सांग.


सरिता : - हो चालेल भेटून बोलूया आपण. मी निघते, तु बाकीच्यांना कॉल कर.. 


प्रिया : - ( थोडं लाजून ) ऐक ना तु अजिंक्य ला कॉल कर ना, मी बाकीच्यांना कॉल करते. 


सरिता : - तुझं तर बाई वेगळंच आहे. अग शाळा संपली, कॉलेज संपलं आता तरी तुझ्या मनात काय आहे ते त्याला सांग. नाहीतर वेळ निघून जाईल आणि तु बसशील अशीच. 


प्रिया : - गप ग ..! तु कर त्याला कॉल. 


सरिता : - ओके, मी त्याला कॉल करते. भेटू त्याच ठिकाणी. 


***


क्वा क्वा क्वा ..... " कोणाचं बाळ रडत हाय ग, आग धुरपदा बाई...! ते बाळ आपल्या सुरेखा च हाय, आग पण सुरेखा कुठंय, येडी का खुळी तु, तुला माहीत नाही का ? सुरेखा कुठं हाय ते..! का कुणास ठाऊक ह्या कोळशेवाडी ला कुणाची नजर लागली ते..! आक्ख गाव दिवसाढवळ्या बी, भसाड अन ओसाड वाटू लागलंय ". गावातल्या बायकां नदी काठावर कपडे धुत धुत एकमेकांजवळ कुजबुजत होत्या. हे तेच गाव होत, कोळशेवाडी. ज्या गावातील सकाळ ही गुरढोरांच्या हंबरडा फोडून व्हायची. पक्ष्यांच्या किलबिलाट अन घरोघरी येणाऱ्या वासुदेव ने होत होती. सूर्याची पिवळी किरणं, वाहत असलेलं नदीचं मंजुळ पाणी, मंदिरात मोठ्याथोरांचे भजन, अभंगवाणी, लहान मुलांची भांडण, खेळणं अश्या विविधतेने नटलेले होत, कोळशेवाडी... 


दिवस मावळतीला झुकत होता. शेतीसाठी गेलेली माणसं घराकडे परतत होती, अन थोड्यावेळापूर्वी नदीजवळ कपडे धुणाऱ्या बायकांची घरी जाण्यासाठी लगबग सुरू झाली. चला ग सयानो...! आवरा बिगिबिगी, सायंकाळ व्हतं हाय, मटकन निघा इथून आपल्याला घरी पोहचायच आहे. धुरपदा बाई च ऐकून सगळ्या बायका घाई करू लागल्या. अस काय होत जे संध्याकाळ होत आहे कळताच सगळ्या जणी घरी जाण्यासाठी घाई करू लागल्या. खरचं कोळशेवाडी ला कोणाची नजर लागली होती का ? की फक्त ही एक अवफा होती..! 


***


हे बघ..! अजिंक्य, तु आताच गावाला नको जाऊस रे, मागच्या वेळी जसे आपण सगळे फार्महाऊस ला गेलो होतो, तसा आणखी एक प्लॅन करूया नंतर तु जा गावी. महादेव अजिंक्यला फोनवर सांगत होता. महादेव स्वभावाने बिनधास्त होता, कुणाची निंदा करायला त्याला अजिबात आवडत नव्हते. जे असेल ते तोंडावर बोलून मोकळा होणार आणि वेळप्रसंगी चूक कबूल करणारा. कॉलेजनंतर त्याला कुठे जॉब करायची गरज नव्हती. कारण वडिलोपार्जित धन, दौलत होतीच. आजपर्यंत वडील एकटेच त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय चालवत होते आता महादेव ही त्यांना व्यवसायात मदत करत होता. एकंदरीत, पैसा आणि वेळ त्याच्याकडे भरपूर होता पण ह्याचा त्याला जरा ही घमंड नव्हता. मैत्री साठी तर नेहमी एका पायावर काही ही करायला तयार होता. शिवाय अजिंक्य आणि सुनील त्याचे बालपणापासूनचे मित्र, अगदी जिगरीच म्हणा. त्यांच्यासाठी तर काहीपण. अजिंक्य स्वभावाने थोडासा लाजळू. पण हिम्मत खूप जास्त एवढी की त्याच्या बोलण्याने ही समोरच्या व्यक्तीचा आत्मविश्वास झपाट्याने वाढेल. शाळेपासूनच त्याला लिखाणाची आवड, त्यामुळे सगळ्यांना वाटत होतं की तो पुढे जाऊन मोठा नामवंत लेखक बनतो की काय पण अगदीच तस नाही झाल, एका नामांकित कंपनीत तो इंजिनिअर म्हणून काम करत होता आणि जमेल तसं त्याचा आवडता छंद म्हणजे लिखाणाचा हे ही त्याने मनापासून जोपासलं होत. अजिंक्य ला त्याच्या गावच्या जत्रेसाठी जावं लागणार आहे तेच सांगण्यासाठी त्याने महादेव ला फोन केला होता. 


अजिंक्य : - महादेव, प्लान नंतर बनवू रे, आधी गावची जत्रा आहे तिथे जाऊन येतो नंतर बघू आणि गावी मोबाईल ला रेंज नसेल त्यामुळे तुला कॉल केला. त्या सुनील चा काय फोन लागत नाही. त्याला पण सांग. 


महादेव : - ठीक आहे बाबा जा ह्यावेळेस पण लवकर ये आपण मस्त प्लॅन करू..


हो नक्की...! महादेव, चल मी ठेवतो फोन माझी ट्रेन आली आहे. बाय बोलून अजिंक्य ने फोन कट केला.


***


डोळे मिटून 


ओम नमः नमाय नमो.. 

ओम नमः नमाय नमो.. 

ओम नमः नमाय नमो.. 

स्वःहहहहहह.... 


" बोल, कोण आहेस तू..? काय हवंय तुला ...? बोल लल्लल्लल्लल .... डोक्यावर केशरी कपडा गुंडाळून, तोंडावर पांढऱ्या रंगाच्या रेषा ओढलेला चेहरा, भुवयाच्या बरोबर मध्यभागी गडद काळ्या रंगाचा टीका, हातात वेताची काठी अन काळ्या रंगाचा पेहराव करून अण्णा दीर्घ श्वास घेऊन कठोर आवाजात त्या मिश्कीलपणे हसणाऱ्या व्यक्ती कडे बघून बोलू लागला. पन त्यांच्या प्रश्नाला काहीच प्रतिसाद आला नाही. पुन्हा अण्णा ने हातातल्या वेताच्या काठीने रागातचं वार करत त्याला डिवचले. पण त्याला काहिच फरक पडला नव्हता. उलट रागाच्या आवेशाने तो अण्णा कडे नजर रोखून पाहू लागला अन चवताळलेल्या नजरेने अगदी घोगऱ्या आवाजात तो बोलू लागला. " ये भटा..! माझ्या मध्ये येऊ नकोस, तुझी शक्ती मर्यादित आहे पण मी असिमीत आहे त्यामुळे मला दिवचू नको...हाहाहाहहहह... खिई खि खि खि .... 


तु असशील रे कोणीही पण मी तुला इथून बाहेर काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.. अण्णा रागातच बोलले आणि डोळे मिटून काहीतरी पुटपुटू लागले. पण अचानक पणे त्यांना काही आठवत नव्हते, अस वाटू लागलं की ते काहीतरी विसरत आहेत अन अचानक घरातली वीज चालू बंद होऊ लागली, खिडक्यांची आपोआप उघडझाप होऊ लागली, ये म्हाताऱ्या अजून पण सांगतोय, जीव प्यारा असेल तर निघ इथून, नाहीतर उगाच प्राणाला मुकशील, पुन्हा तोच घोगरा आवाज उद्गारला. अण्णा ध्यान लावण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना व्यत्यय येत होता. अन जे नको व्हायला पाहिजे तेच झालं त्याने डाव साधला, अण्णाला त्याने त्याच्या सैतानी शक्तीने उचलून घराच्या बाहेर फेकले, तो हादरा एवढा जोरदार होता की त्यामुळे अण्णांचा आवाज गेला आणि त्याच सोबत डोक्याला जबर मार ही लागला. त्यांना ताबडतोब जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. इकडे पुन्हा तेच गुरगुरन, तेच सैतानी हसू, तेच हाहाहाहहहह... खिई खि खि खि .... 


***


ग्रॅज्युएशन नंतरच्या पुढील शिक्षणासाठी निशा शहरातील एका मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशनसाठी खटपट करत होती. बर निशा एकदम शार्प, न घाबरणारी, आरे ला कारे म्हणून उत्तर देणारी, तिला तिच्या आयुष्यात स्वतःच अस वेगळं अस्तित्व निर्माण करायच होत त्यामुळे ती खूप शिकून स्वतःहाचा व्यवसाय सुरू करणार होती. त्यासाठी तिने कॉलेज काळातच व्यवसाया संबंधीत बरेचसे सेमिनार्स पण अटेंड केले होते. निशा आणि महादेवचं कॉलेज पासूनच एकमेकांवर प्रेम जडलं होतं पण महादेव श्रीमंत परिवारातून येतो अन आपले आई वडील हे खेड्यात राहतात आणि आपण तर इथे फक्त मामा मामींकडे शिक्षणासाठी राहतोय. हे दोन्ही परिवार आपल्या प्रेमाला सहमती देतील का ? हाच प्रश्न तिला नेहमी भेडसावत होता. कित्येकदा तर महादेव नेच पुढाकार घेऊन तिच्या आई बाबांना भेटून आपल्याबद्दल सगळं सांगतो म्हणून दर्शवल. पण नेहमीप्रमाणे निशा चा स्वाभिमान आड येत होता, तीच म्हणणं हेच होत की आधी मला स्वतःच्या पायावर उभ राहू दे त्यानंतर आपण आपापल्या घरी सांगूया. आणि त्यासाठी महादेव ही तिच्या सोबत नेहमी असायचा. 

ट्रिंगsss... ट्रिंगsss.. 


हा बोल प्रिया ...! तिकडून प्रियाने सरिताला जे काही सांगितलं होत, अगदी जसच्या तस निशाला सांगू लागली. आणि येताना महादेव ला ही सोबत घेऊन ये, म्हणून फोन ठेवून दिला. 


सगळ्यांना कॉल करून झाले होते, त्यात अजिंक्य अपवाद होता, कारण प्रिया अजिंक्यला वारंवार कॉल करत होती पण त्याचा फोन आऊट ऑफ रेंज येत होता. इथे सगळ्यांच्या मनात एकच चक्र सुरू होत, की सुनील ने अचानक सर्वांना भेटायला का बोलवलं असेल ? काही झालं तर नसेल ना ? तो ठीक असेल ना ? सर्वजण आपापल्या परीने अंदाज बांधू लागले. असंख्य प्रशांची उत्तर ही उद्याच भेटणार होती. 


***


डॉक्टर रूम नंबर ०४ चे पेशंट शुद्धीवर आले आहेत, डॉ. सापळेंच्या केबिन मध्ये येऊन नर्सने ही बातमी दिली. तिथे डॉक्टर सोबत मि. मोहिते ही होते. लागलीच दोघांनी तिकडे धाव घेतली. अण्णा ला काहीतरी सांगायचं होत पण धक्का एवढा जबर होता की त्यामुळे त्यांची वाचा बंद झाली होती म्हणून ते हातवारे खुणावत होते. डॉक्टरांना अण्णांच म्हणणं कळायला काहीच मार्ग नव्हता. अण्णा फक्त मि. मोहितेंकडे पाहत होते आणि पुन्हा पुन्हा हातवारे करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. डॉक्टर ह्यांना लवकरात लवकर बर करा, ह्यांच्याकडूनच आपल्याला पुढील गोष्टींचा सुगावा लागेल, अस बोलून मि. मोहिते तिथून निघून गेले. 


***


कुल्पि घ्या, कुल्पि sss ... जिलेबी वाले, भजे घ्या...घ्या, कोणी गोड शेव विकत होतं, कोणी लहान मुलं वाजवतात त्या पिपाण्या विकत होतं. तर दुसरीकडे काही बायका कानातले, रंगबिरंगी काचेच्या बांगड्या, बिंदी, पाकिटावरच्या टिकल्या, डोक्यावर बांधायच्या गुलाबी कलरच्या रिबिनी घेत होत्या. कोपऱ्यात मटण, चिकन चे स्टॉल एका लाईनीत लावले होते. थोड्या अंतरावर गावच्या वेशीवर गावच्या कुलदैवतेच भलंमोठं अस जूनं मंदिर होत. त्याच कुलदेवतेची ही जत्रा होती. जी वर्षातून एकदा भरते. पहिल्यांदाच अजिंक्य गावच्या जत्रेला आला होता. अजिंक्य चे आजोबा कायमच त्याला ह्या जत्रेसाठी येण्यास त्याच्यामागे तगादा लावत होते. एकंदरीत जत्रेचं स्वरूप, सगळीकडे असलेला हा गजबजाट त्यालाही हवाहवासा वाटू लागला, पण का कुणास ठाऊक त्याला हे सर्व आपलेस वाटू लागलं. म्हणजे ज्या गावी तो कधी गेला नाही ज्या जत्रेत तो कधी वावरला तर सोडाच पण कधी पाहिली सुद्धा नाही ते सगळं त्याला ओळखीचं वाटू लागलं. 


***


अलार्म वाजला सकाळचे ६ वाजले होते. तस तर अलार्मची गरजचं नव्हती कारण अलार्म आपण सकाळी लवकर उठण्यासाठी लावतो पण इथे तर डोळ्याला डोळाच लागत नाही, ह्याच विचाराने सुनील अंथरुणावरून उठतो. बेडरूममधुन हॉल वर एक नजर फिरवून सुनील फ्रेश होण्यासाठी घाई करू लागला, आज सर्वांना भेटायचं आहे, मित्रांना सगळं सांगून टाकतो म्हणजे डोक्यावरच टेन्शन आणि काहीतरी मार्ग निघेल ह्या विचाराने तो घाई करू लागला. 


फोनवर जमवाजमवी सुरू झाली, निशा, महादेव, प्रिया, सरिता हे सगळे जमले. अजिंक्य गावी असल्याने तो येऊ शकणार नव्हता हे महादेव ने सर्वांना सांगितले. आता सगळे जण सुनील ची वाट बघत होते. त्याचं नेहमीच्या ठिकाणी त्यांच्या कॉलेजच्या बाहेर थोडं अंतरावर एक चहाची टपरी होती. तिथेच ते सर्वजण कॉलेज सुटल्यावर भेटायचे.


***


बाबा मी जाऊन येते, माझा मित्र आहे ना सुनील त्याला आज आम्हा सर्वांना भेटायचं आहे काहीतरी काम आहे म्हणे...! अस बोलून लगबगीनं प्रिया तिच्या बाबांना सांगून निघतच होती. तितक्यातच गुरुजींनी तिला अडवलं आणि विचारलं. त्याला सगळं नीट विचार, मी तयारी करून ठेवतो आणि अस म्हणतंच गुरुजींनी देव्हाऱ्यातला धागा प्रियाच्या उजव्या हाताच्या मनगटावर बांधला आणि आणखी पाच धागे तिच्या हातावर ठेवत, पुढे ते बोलले, की हे धागे तुम्ही जेव्हा एकमेकांना भेटणार तेव्हा सर्व मित्रांनी उजव्या हाताच्या मनगटावर बांधून घ्या, उपयोगी पडेल. एवढं बोलून ते आत देवघरात संध्याकाळच्या पूजेसाठी गेले. प्रिया विचारातच पडली की, बाबांना अचानक मध्येच हे काय सुचलं, मुळात त्यांना काय माहीत ? की सुनील आम्हाला काय सांगणार आहे ते. पण तिने जास्त विचार न करता गुरुजींनी दिलेले धागे एका कागदामध्ये गुंडाळून तो कागद पर्स मध्ये टाकून सर्वांना भेटायला निघाली. आजच्या जनरेशन ची मुलगी ती, तिला काय कळतंय. ज्योतिषशास्त्रानुसार, उजव्या हाताच्या मनगटावर धागा बांधणे म्हणजे वाईट शक्तींपासून दूर राहणे, अडकलेली कामे होणे, शिवाय, वाईट नजर लागत नाही. पण हे आजकालच्या तरुण पिढीला रुचत नाही. असो....! 


***


किती वेळ झाला यार, कुठे राहिला हा सुनील..! निशा जरा वैतागूनच बोलली. कारण वेळेचं बंधन न पाळणारे तिला बिलकुल आवडत नाहीत. सर्व जण सुनीलची वाट पाहतच होते अन तितक्यात सुनील तिथे पोहचला. त्याला पाहून सर्वजण थक्क झाले. त्याची ती अवस्था, ग्रुप मध्ये सर्वात हँडसम असलेला सुनील, नेहमी आत्मविश्वासाने भरलेला, शरीरयष्टी पण धस्टपुस्ट, व्यायामाची सवय असल्याने पिळदार शरीर होत त्याच. पण हे काय आता तर तो पूर्णपणे वेगळ्याच अवतारात आला होता. शरीर बारीक, डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे, गाल आत गेलेले, त्यात त्याचा चेहरा अगदी हतबल झालेला दिसत होता. साधारण दोन वर्षांनी सुनील त्याच्या ग्रुप ला भेटला होता. ह्या दोन वर्षात त्याच्या सोबत काय झालं होतं हे त्याचं त्यालाच माहीत. मित्रांना एवढ्या दिवसांनी बघितल्यावर त्याने महादेव ला घट्ट मिठी मारली आणि काही न बोलता अगदी ठसाठसा रडू लागला. अस वाटत होतं कित्येक दिवसांचं दुःख त्याने त्याच्या मनात साचून ठेवलं होतं. त्याची अशी अवस्था बघून सर्वांच्यांचं डोळ्यात पाणी आलं. शेवटी मैत्री च मोल फक्त त्यांनाच जाणवू शकतं ज्यांना त्या मैत्रीची कदर आहे. सुखात सगळेच साथ देतील पण फक्त दुःखात जो साथ देईल तोच खरा मित्र... ही तीच गॅंग होती, जी शाळेत असो वा कॉलेजमध्ये पण एकमेकांसाठी जीव ओवाळून टाकायची. एकमेकांच्या सुख दुःखासाठी हवं ते करण्याची धमक होती ह्या मित्रांमध्ये. आणि ह्या सर्व ग्रुपला बांधून ठेवण्याचं सगळं श्रेय जात ते अजिंक्य ला... पण आज सुनीलच्या ह्या कठीण प्रसंगात तो नाही शिवाय त्याला ह्याबद्दल काही कल्पनाच नाही. 


अरे सुनील..! झालं तरी काय आहे आणि तु येऊन रडतोयस का ? आम्हाला एकदा नीट सांग, आणि काही प्रॉब्लेम असेल तर आपण सगळेजण मिळवून सोडवूया. शाळेत, कॉलेज मध्ये असताना आपण एकमेकांना एवढं सहकार्य केलंय. आणि आता खऱ्या आयुष्यात आम्ही साथ नाही देणार तर कोण देणार..? सरिता, निशा आणि प्रिया ह्या तिन्ही सोबतच सुनील ला समजावू लागल्या. पण सुनील च डोकं अजूनही महादेवाच्या खांद्यावर होत. रडण्याच्या हुदक्यांचा आवाज काही कमी होत नव्हता. त्याला महादेव ने कसबस शांत केलं आणि त्याला सर्वजण सविस्तरपणे विचारू लागले... 

.

.


चॅप्टर ४ : - चाहूल


हॅलो ..! मि. मोहिते बोलत आहेत का ...? डॉ. सापळेंच्या क्लिनिक मधून वॉर्ड बॉय ने फोन केला होता. बोला मी...! मि. मोहिते बोलतोय, तस तो वॉर्ड बॉय घाईतच बोलला, तुम्हाला डॉक्टरांनी ताबडतोब क्लिनिक मध्ये बोलवलं आहे, अन त्यांनी फोन ठेवला. खरंतर डॉ. सापळे हे मोहित्यांचे फॅमिली डॉक्टर वजा मित्र होते, त्यामुळे सुख दुःखात त्यांची साथ ही कायमच मोहितेंसोबत असायची. घरची परिस्थिती बघून सकाळीच मोहिते क्लिनिक कडे निघाले. पण जाताना त्यांनी मिसेस मोहित्यांना सतर्क राहायला सांगितले. तस तर मोहितेंची थोरली मुलगी सुरेखा हीच्या लग्नानंतर घरात जेमतेम चार जणच उरले होते. मि & मिसेस. मोहिते, धाकटी मुलगी अपेक्षा मोहिते आणि धाकटा मुलगा सुनील मोहिते. पण काही महिन्यांपासून घरात जे काय सुरू आहे त्यामुळे मिसेस मोहितेंची मोठी बहीण आणि त्यांचा परिवार पण इथेच वास्तव्याला आला होता. 


***


अरे सुनील..! सांग ना काय झालं आहे, तु जर असाच रडत राहशील तर आम्हाला कस कळेल, ये महादेव बोलना रे त्याला, काळजीपोटी सरिता अगदी विव्हळून म्हणाली. महादेव च्या खांद्यावरून डोकं बाजूला सरकवत सुनील ने सरिता चा हात हातात घेतला आणि तिला बोलू लागला, तु काळजी करू नकोस, मी ठीक आहे सरु... सरिता आणि सुनील कॉलेजपासून एकमेकांच्या प्रेमात होते... तोच पुढे सरसावत, महादेव म्हणाला, सुनील अस कोणतं दुःख आहे, जे तुला एवढं त्रास देतंय, मला फक्त एकदा सांग मित्रा, तुझा त्रास मुळापासून संपवून टाकेन मी. मैत्रीची किंमत काय असते आज सुनील प्रत्यक्ष बघत होता. त्या सर्वांना एकत्र बघून त्याचा आत्मविश्वास थोडासा वाढला. इकडे तिकडे नजर फिरवून सुनील ने अजिंक्य बद्दल महादेवला विचारले. अजिंक्य गावी जत्रेसाठी गेला आहे आणि गावी रेंज नसते त्यामुळे आपल्या ह्या भेटीबद्दल त्याला काहीच माहीत नाही, महादेव बोलला. त्यावर सरिता बोलली, म्हणूनच त्याचा फोन लागत नाहीये, मी त्याला पण भेटीसाठी कॉल करत होते. अजिंक्य गावी गेला आहे हे कळल्यावर प्रियाचा जीव कासावीस झाला. आता मात्र सुनील बोलू लागला. तुम्हाला तर माहीत आहे मित्रांनो, कॉलेज संपल्यानंतर आपण सगळेजण आपापल्या कामात गुंतलो. मी पण बाबांसोबत ( मि. मोहिते ) त्यांच्या ऑफिसमध्ये कामाला लागलो. सगळं सुरळीत होत. काही महिन्यांनी सुरेखा दीदीच पण लग्न अगदी थाटामाटात झालं.... सगळेजण त्याचा एकूण एक शब्द ध्यान देऊन ऐकत होते. 


लग्नानंतर ती गरोदर राहिल्याने तिला आपल्या घरी आणलं. आम्ही सगळे खूप खुश होतो, कारण आमच्या घरी पहिल्यांदा लहान बाळाचा वावर होणार होता, घरभर दुधाचा वास, गालावर लाळ, शी - शी घरभर पसरणार, बाळाचा बोबडा आवाज हे सगळं आठवुनच आम्ही सगळे खूप आनंदी होतो. अगदी मी मामा होईल इथपर्यंत सगळा विचार केला होता. पण एका मध्यरात्री दिदि मध्येच उठून बसली. मी सहजच पाणी पिण्यासाठी बेडरूम मधून बाहेर पडून किचन कडे गेलो, हॉल मध्ये आई बाबा झोपले होते पण दीदी भिंतीवरच्या तिच्याच सावली कडे एकटक बघत होती. मी जरासा किचनमधुन कानोसा घेत, तिच्या डोळ्यांकडे पाहिलं, तर ती अगदी नजर रोखून एकटक तिथेच बघत होती, जराही पापण्यांची उघडझाप होत नव्हती आणि एकटक पणे ती भिंतीवरच्या तिच्या सावली कडे पाहतच होती. मी तिला आवाज दिला, दीदी...! काय झालं, का उठलीस..? तर तिने अगदी सहजपणे मला उत्तर दिलं. अरे अचानक जाग आली, किती वाजलेत, आणि तु काय करतोय..? मला जरा पाणी दे, तहान लागलीय खूप..मी किचनकडे पाणी घेण्यासाठी वळलो, पाण्याचा पेला भरून तिला दिला आणि बोलू लागलो, अगं दीदी...! रात्रीचे २ वाजलेत, आणि मला पण तहान लागली होती म्हणून मी उठलो होतो. चल झोप तु लवकर खूप उशीर झाला आहे. तिला गुड नाईट बोलून मी बेडरूममध्ये गेलो. दिवसभर कामाच्या धावपळीमुळे मला पटकन झोप लागली आणि थेट उठलो ते पहाटेच. सकाळी मी नाश्ता करताना रात्रीचा प्रसंग दीदी ला विचारायचं म्हंटल पण तिनेच मला आधी विचारलं की, तु रात्री किचनमध्ये काय करत होता. हे ऐकून तर मी अचंबितच झालो, एकवेळ मला हे वाटलं की तिला रात्रीच आठवत नाहीये की, ती मुद्दाम करतेय. मीच मनाशी विचार केला की कदाचित मला भास तर झाला नसेल कारण दिवसभराच काम आणि त्यात दोन दिवसांपासून झोप पण नीटशी झाली नव्हती. त्यामुळे तो विषय मी दुर्लक्ष केला. 


***


खिई खि खि खि ... हिहीहीहीहीही.शशशशशश... बोललो होतो, कोणाला काही सांगू नका, पण जगायची ईच्छाच नसेल तुम्हाला तर रक्ताचे सडे पडल्याशिवाय राहणार नाही मी............हिहीहीहीहीही....शशशशश गुरगुरतच त्या रानटी सैतानाने भिंतीवर जोरात हात मारला आणि कर्णकर्कश आवाजात बोलू लागला..... मरणार तु.... मरणार hahahaahahaha.... माझ्या ह्या मार्गातली पहिली आहुती ही तुझ्याच रक्ताने द्यावी लागेल मला, खि खि खि ... कोणाची शिक्षा कोणाला भेटणार.... खि खि खि ... तुझं मरण जवळ आल, त्याशिवाय तुम्ही गप्प नाही बसणार...... अस बोलून तो जंगली आवाज नाहीसा झाला. 


***


अहो मोरोपंत.... अहो मोरोपंत... अहो इकडे मागे बघा, मी आहे राघव शास्त्री. मागे वळून जेव्हा अजिंक्यने पाहिलं, तर त्याला अंगावर पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले, कपाळावर चंदनाचा गंधक आणि होंठावर असलेल्या भारदार पिळ दिलेल्या मिश्या असलेला एक पन्नाशी पार केलेला वृद्ध दिसला. अजिंक्य पुढे सरसावून बोलू लागला, माफ करा पण मी आपल्याला ओळखलं नाही. त्यावर प. शास्त्री बोलू लागले, मी पंडित राघव शास्त्री..! मी चूक करत नसेल तर तुम्ही आचार्य. श्री. गंगाधर मोरोपंत यांचे नातू आहात ना..! राघव शास्त्रींनी अजिंक्यला अचूक ओळखले. आपले आजोबा श्री. गंगाधर मोरोपंत ह्यांचा मी शिष्य, पंडित राघव शास्त्री. त्यावर अजिंक्य ने त्यांना हात जोडून नमस्कार केला, हो मीच आहे अजिंक्य मोरोपंत.. आणि तिथेच बाजूच्या ओसरीवर बसून ते दोघे बोलू लागले.


राघव शास्त्री : - तुमचे आजोबा ज्योतिषशास्त्रात अगदी निपुण होते. त्यांनी कित्येकांना त्यांची अमूल्य विद्या शिकवली आहे. पण विद्या शिकवत असताना त्यांची फक्त एकच अट असायची की, ह्या विद्येचा वापर फक्त सत्कार्यासाठीच झाला पाहिजे. वाईट गोष्टींसाठी ही विद्या उपयोगी येणार ही नाही. 


अजिंक्य तर शास्त्री बुवांकडून आजोबांच्या गोष्टी ऐकून दंगच झाला. म्हणजे त्याने आजोबांबद्दल ऐकलं होतं, की आजोबा गावच्या भल्यासाठी वाटेल ते करायचे पण त्यांची दुसरी बाजू ही चमत्कारिक होती हे त्याला आज राघव शास्त्रींकडून कळलं...त्यांच्या चांगल्या तासभर गप्पा रंगल्या होत्या, निरोप घेताना राघव शास्त्रींनी अजिंक्यला तु शहरात जाताना एकदा मला भेटून जा, अस सांगून ते निघून गेले व अजिंक्य ही तिथून निघून गावच्या जत्रेकडे वळला. 



***


अरे मग काय झालं, दीदी ला आली असेल रात्रीची मध्येच जाग त्यात काय एवढं विचार करण्यासारख, सरिता म्हणाली.. हो मला ही तेच वाटलं पण दुसऱ्या दिवशी मी मुद्दाम ह्यासाठी उठलो, की मला काल झालेला भास तर नव्हता ना..! सुनील म्हणाला... मग काय पाहिलस तु दुसऱ्या दिवशी, महादेव थोडं गंभीर स्वरात बोलला. 


सुनील बोलत होता, मी पाहिलं, हळूच किचन मध्ये गेलो, तसच दृश्य मला पुन्हा दिसलं, पण ह्यावेळेस थोडं विचित्र दीदी भिंतीवरच्या तिच्या सावलीत तिच्या पोटावर हात फिरवत सावलीकडे अगदी विक्षिप्तपणे पण हळूच हसत होती आणि तिची नजर अगदी तीक्ष्ण.. ते दृश्य बघून तर माझी बोबडीच वळली आणि मी गपचूप जाऊन बेडरूममध्ये झोपलो. 


***


नर्स लवकर..! पेशंट खूप सिरीयस होत चालला आहे, लवकर इंजेक्शन आना, ऑक्सिजन मास्क लावा, ओ.. नो.. ऑक्सिजन लेव्हल कमी होत चालला आहे, डॉ. सापळे त्यांच्या परीने पूर्ण प्रयत्न करत होते. पण पेशंट ची प्रकृती खुप बिघडत चालली होती. टेबलावर असलेली मशीनची बीप बीप ppppppppp पण आता हळू हळू कमी होत चालली होती. 


हुश्श..sssss 


डॉ. सापळे : - मि. मोहिते...! या बसा आय एम सॉरी, मी तुमच्या ( अण्णा ) पेशंटला वाचवू शकलो नाही, थोड्याच वेळापूर्वी पोस्टमार्टेमचे रिपोर्ट आलेत, त्यात त्यांना हृदयाचा अतितीव्र धक्का बसल्याने जीव गेला, अस आढळल आहे. 


मि. मोहिते डोक्यावर हात ठेवून विचार करू लागतात, डॉक्टर, तुम्हाला पण माहीत आहे हे कशामुळे झालं आहे ते. आमच्या घरी जे काही घडत आहे त्याचे तुम्ही एकमेव साक्षीदार आहेत.आता तुम्ही काहीतरी पर्याय सांगा. डॉ. सापळे बोलू लागले, खरतर मेडिकल सायन्स कडे सुद्धा ह्याच उत्तर नाही पण बाप म्हणून मी तुम्हाला एका गुरुजींशी भेट घडवून देऊ शकतो, बघा तिथून काही मदत झाली तर ...! पण त्याने दिलेल्या सूचना आपल्याला आणखी एक दिवस पाळाव्या लागतील. माहीत आहे ना तो काय बोलला होता ह्याची वाच्यता पुढचे दहा दिवस कुठेच होता कामा नये. ओहह... शीट...! मि. मोहितेंना अचानक लक्षात आलं की, त्यांचा मुलगा, सुनील आज त्याच्या मित्रांना भेटायला जाणार होता आणि त्याच्या मित्रांकडून काही मदत होतेय का ? पाहणार होता... 


***


बाप रे ...! दीदीमध्ये अचानक हा बदल कसा झाला, निशा बोलली. महादेवाने सुनील ला सोबत आणलेल्या बॉटल मधील पाणी पाजलं. प्रिया मनातल्या मनात विचार करू लागली, हा असा काहीसा प्रकार असेल, हे बाबांना आधीच जाणवलं असेल, म्हणून त्यांनी आम्हा पाच जणांना देव्हाऱ्यातला धागा दिला आहे. लागलीच तिने पर्समधील कागदामध्ये गुंडाळून ठेवलेला धागा बाहेर काढला आणि सर्वांना उजव्या हाताच्या मनगटावर बांधायला सांगितला, सर्वांनी तीच त्याक्षणा पुरतं का होईना पण ऐकलं...! सरिता ला तर सुनील ची अवस्था बघवत नव्हती. 


कसबस सुनील ने स्वतःला सावरल आणि तो पुढे बोलू लागला पण तेवढ्यातच त्याचा फोन वाजला. फोनवर कुजबुजून संपल्यावर त्याने लगेचच मित्रांना सांगितलं. गाईज, आपल्याला ताबडतोब डॉ. सापळे काकांच्या क्लिनिक मध्ये जायचं आहे... इट्स अन इमर्जन्सी...कम ऑन गाईज... फास्ट...! सगळेजण सुनील सोबत डॉ. सापळेंच्या क्लिनिकला जाण्यासाठी निघाले. 


***


मध्यरात्रीच्या सुमारास एका उंच माळरानावर दोन डोंगराच्या मध्ये कोणाची तरी पाठमोरी अशी भलीमोठी आकृती निद्राव्यस्थेत बसली होती, गडद अंधार असल्याने नीटस दिसत नव्हतं. पण अस भासत होत की ती आकृती दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये डोकं ठेवून शांतपणे कोणालाही, कसला ही त्रास न देता झोपली होती. शिवाय तिच्या उजव्या हातात एक लहानसा लेकरू होत, ज्याला त्या आकृतीने घट्ट पकडून ठेवलं होतं. आणि त्याच डोंगराच्या पलीकडच्या बाजूने अगदीच धूसर, काळ्या रंगांची दुसरी आकृती होती, जी त्या लहान बाळाला आपल्या कडे ओढत होती. बाळ जस जस त्या काळ्या रंगाच्या आकृती कडे खेचलं जात होतं, तस बाळ हळू हळू रडत होत, पण पाठमोरी बसलेली आकृतीने थोडासाच म्हणजे अगदीच थोडा जोर लावून बाळाला स्वतःकडे ओढून घेतले, आता बाळा शांत होतं. पण ती काळ्या रंगाची आकृती डोळे मिचकवत हळू हळू बाळाला स्वतःकडे ओढून घेण्यासाठी पुढे येत होती. ह्यावेळेस मात्र पाठमोऱ्या आकृतीला तिचा राग आला आणि झोपेतून उठून तिने त्या काळ्या आकृती ला जोरात लाथ मारून बाळाला स्वतःजवळ अगदी कुशी मध्ये सामावून घेतलं. 


बाप रे ...! काय भयानक स्वप्न होत, काय होत हे, ह्या स्वप्नाचा अर्थ काय असेल ? हुश्श ... कपाळावरचा घाम पुसत अजिंक्य बिछान्यावरून उठला. हे अस विचित्र स्वप्न मला का पडलं असेल...? ह्या स्वतःशीच पुटपुटत अजिंक्य फ्रेश होऊन गावात फेरफटका मारण्यासाठी निघाला.


***


बाबा ...! धापा टाकत सुनील आणि सगळी मुलं डॉ. सापळेंच्या क्लिनिकमध्ये पोहचली. बाबा...! काय झालं आहे, अण्णा ला ..! तुम्ही एवढ्या घाईत का बोलवलं मला ? काही प्रॉब्लेम झाला आहे का ? एका दमातच सुनील बोलला. सुनीलच्या वडिलांना समोर बघून सरिता स्वतःला चाचपडू लागली, की ती ठीक दिसतेय ना ...! सुनील ला शांत करून टेबलवर ठेवलेला पाण्याचा ग्लास देऊन मि. मोहिते बोलू लागले की, सुनील..! अण्णा आपल्याला सोडून गेले, डॉक्टरांच्या रिपोर्ट मध्ये अस दाखवत आहे की, हृदयाच्या तीव्र धक्यामुळे त्यांचा जीव गेला. सुनील तु अजून कोणाला काही सांगितलं आहेस का ? डॉ. सापळेंनी त्याला प्रश्न केला. हो..! त्याने आम्हाला थोड्यावेळापूर्वी सगळंच नाही म्हणता येणार, पण थोडस सांगितलं आहे ज्यामुळे आम्हाला व्यवस्थित अस काहीच कळलं नाही. अस बोलून महादेवने डॉ. सापळेंच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. व पुढे होऊन त्याने स्वतःची आणि इतरांची ओळख सांगितली, आम्ही सगळे सुनीलचे जिवलग मित्र आहोत, मी महादेव आणि ही सरिता, निशा, प्रिया...! डॉ. सापळेंनी सगळ्यांसाठी चहा मागवला. चहा पित असताना मि. मोहितेंनी सुनील सांगितले की, घरी अण्णा बद्दल कळलं नाही पाहिजे. सुनील होकारार्थी मान हलवली. चला डॉक्टर आम्ही निघतो, चला रे पोरांनो..! मि मोहिते सर्वांना घेऊन क्लिनिकच्या बाहेर आले. 


एक मिनिटं सुनील आणि मोहिते काका, हा सगळा काय प्रकार आहे ? हे काय चाललं आहे ? आणि हे अण्णा कोण आहे, i mean कोण होते ? ह्या सारखी असंख्य प्रश्न सगळी मुलं मिळून त्या दोघांना विचारू लागली. बाळांनो मी आता काहीच सांगू शकत नाही, संध्याकाळचे ५ वाजलेत त्यामुळे मला घरी जावं लागेल. सुनील बाळा चल पटकन, अस बोलून मि. मोहिते निघू लागले. पण महादेवने त्यांना अडवलं, काका..! हे बघा, आम्हाला काय ते कळलं पाहिजे, कदाचित आम्ही तुमची काही मदत करू शकू, आणि काही मजबुरीच असेल तर ठीक आहे नका सांगू, मग आम्हाला सर्वांना तुमच्यासोबत घरी येऊ द्या. आज नको महादेव...! प्लिज, सुनील बोलू लागला. आज शेवटचा दिवस आहे त्याचा, आज फक्त मी तुम्हाला भेटायला आलो तर त्याने अण्णाला मारून टाकलं जर तुम्ही घरी आलात तर नाही, ( स्वतःशीच पुटपुटत ) ... नको, महादेव आज नाही प्लिज हट्ट नको करुस म्हणून सुनील त्याला विनवणी करू लागला. सुनीलच्या विनवणीला बघून महादेवला बघवत नव्हते, सुनील अरे काय रे, बरं नाही येत आम्ही, ठीक आहे. आम्ही उद्या येऊ चालेल ना ... म्हणून महादेव बोलला. त्यावर सुनीलने होकार दर्शवला. 


ट्रिंग ssss... ट्रिंग sss.... प्रिया आताच्या आता घरी ये, पलीकडून गुरुजींचा आवाज होता. हो बाबा, आम्ही सुनील च्या घरी जाणार आहोत, त्यानंतर मी घरी येते..प्रिया ग्रुपमधून बाजूला होऊन फोनवर बोलत होती. नाही...! पोरी तिकडे नको जाऊस, तु आधी घरी ये, मी सगळं सांगतो तुला आणि सध्या त्या पोराला काही विचारूही नकोस ग पोरी... कृपया ह्या म्हाताऱ्याचं ऐक... गुरुजींच्या शब्दांचा प्रियाच्या मनावर जबरदस्त आघात झाला. गाईज, मला घरी जावं लागले. थांब प्रिया, आपण सगळेच निघुया आता आणि आपण उद्या सुनील च्या घरी जाऊया, महादेव बोलला. सगळेजण आपापल्या वाटेने निघाले, पण महादेव आणि निशा हे प्रिया सोबत तिच्या घरी गेले. सरिताची आई घरी आजारी असते त्यामुळे तिच्या औषधांची वेळ झाली होती म्हणून ती घरी गेली. 


***


वाह...! शहरांपेक्षा गावातील सकाळ तर मनाला अगदी प्रसन्न करते आणि त्यात हा नैसर्गिक वारा तर शरीरासाठी फायदेशीरच ठरतोय, अगदी फ्रेश सकाळ वाटतेय, स्वतःचीच पुटपुटत अजिंक्य खिश्यात दोन्ही हात घालून गावात फेरफटका मारत होता. चालता चालता तो एका वाड्या पाशी येऊन थांबला. कौलारू छत होती, जुनंच बांधकाम होत पण मजबूत होत, पण वाडा अतिशय पाहण्याजोगा होत. अजिंक्य पुढे जाणार तितक्यात त्याची नजर वाड्याच्या दारावर गेली त्या दारावर नावाचं फलक होतं आणि त्या फलकावर ठळक अक्षरात लिहिलं होतं, " पंडित राघव शास्त्री निवास ". अजिंक्य ला लगेच आठवलं, अरे हे तर शास्त्री बुवा आहेत जे काल मला जत्रेत भेटले होते, माझ्या आजोबांचे शिष्य, अच्छा म्हणजे शास्त्री बुवांचा आहे तर हा वाडा. आता इथे आलोच आहे तर एकदा त्यांना भेटून घेतो म्हणून अजिंक्य वाड्याच्या दिशेने चालू लागला. तिथे पोहचल्यावर त्याने लाकडी दरवाज्यावर थाप दिली, कोणी आहे का ? मी अजिंक्य आहे, तो बोलला. दरवाजा उघडण्याचा आवाज आला आतून फिक्कट तांबूस रंगाच्या नऊवारी साडीमध्ये, कपाळावर भलंमोठं अस लाल कुंकू लावलेली एक बाई आली. वय जेमतेम पन्नास च्या जवळपास असेल, कदाचित त्या शास्त्री बुवांच्या पत्नी गोदाबाई शास्त्री होत्या. त्यांना अजिंक्य ने त्याची ओळख सांगितली आणि जत्रेमध्ये शास्त्री बुवांसोबत झालेली भेट ही सांगितली. गोदाबाईंनी अजिंक्यला आत बोलवले आणि त्याला पाणी दिले व त्या बोलू लागल्या, अरे अजिंक्य बाळा...! आमचे हे तर तालुक्याला गेलेत थोड्यावेळा पूर्वीच काहीतरी काम होत त्यांचं म्हणून आता सरळ संध्याकाळीच येतील. तुझं काही काम होत का त्यांच्याकडे ? अजिंक्य म्हणाला, नाही मावशी..! माफ करा पण मी तुम्हाला मावशी म्हंटल तर चालेल ना, गोदाबाईंनी होकारार्थी मान हलवली. मी सहजच सकाळीच घराबाहेर गावचा फेरफटका मारायला निघालो होतो तर वाटेत तुमचा वाडा दिसला म्हणून विचार केला की शास्त्री बुवा असतील तर त्यांना भेटतो, त्यामुळे सहजच ह्या दिशेला आलो होतो. चला आता मी निघतो, गावची जत्रा सुरू आहे, मला तिथे जायचं आहे. गोदाबाईंना निरोप देत अजिंक्य जत्रेच्या वाटेला निघाला. 


***


प्रियाच्या घरी महादेव, प्रिया, निशा आणि प्रियाचे बाबा ( गुरुजी ) चहा घेत बोलू लागले. बाबा...! तुम्ही मला फोन करून अस का बोललात की, सुनील च्या घरी जाऊ नका आणि त्याला काही विचारूही नका, प्रिया म्हणाली. त्यावर गुरुजींनी आधी सर्वांकडे बघून विचारलं, मी प्रियाकडे एक धागा दिला होता तो सर्वांनी मनगटावर बांधला का ? तिघांनी होकारार्थी मान डोलवली. गुरुजी पुढे बोलू लागले, हे बघा पोरांनो...! तुमचा मित्र सुनील, त्याच्या सोबत अथवा त्याच्या परिवाराच्या एखाद्या व्यक्तीसोबत काहीतरी विपरीत घडलं आहे पण काहीतरी आहे ज्याचा धोका तुम्हालाही झाला असता म्हणून मी प्रियाला तातडीने घरी ये बोललो. विपरीत म्हणजे अस काय गुरुजी, महादेव बोलला. ते काय मला ह्या क्षणाला नीटस सांगता येणार नाही पण तुम्ही सावध रहा, अर्थात तुम्हाला काही होणार नाही, मी तुम्हाला सुरक्षारक्षक म्हणून धागा दिला आहेच, गुरुजी म्हणाले व हातातली रुद्राक्ष माळ घेऊन देव्हाऱ्यात गेले. तेव्हड्यात निशाला काहीतरी आठवलं, गाईज, गुरुजी जे सांगत आहेत, म्हणजे जे काही विपरीत घडलं असेल, ते कदाचित सुनीलच्या दीदी सोबत तर घडलं नसेल ना ..? कारण सुनील तिच्या दीदी बद्दलच आपल्याला सांगत होता आणि पुढे तो सांगणारच होता पण अचानक त्याचा फोन वाजला त्यानंतर आपण सगळे डॉ. सापळेंच्या क्लिनिक मध्ये गेलो. त्यामुळे सुनील च बोलणं अर्धवटच राहील. हो बरोबर बोललीस तु निशा, तुला काय वाटत महादेव, प्रिया म्हणाली. 


पण, महादेव वेगळ्याच विचारात पडला, सुनीलचं आम्हाला दीदी बद्दल येऊन सांगणं, अन त्याच वेळेला क्लिनिक मधून फोन येणं, सुनीलच्या ओळखीचे अण्णा त्यांचा जीव जाण, मोहिते काकांचा आपल्या प्रश्नांना टाळाटाळ करणं, शिवाय गुरुजींनी आम्हाला तातडीने घरी बोलवून घेणं ह्या सगळ्यांचा काहीतरी एकमेकांशी संबंध आहेच, आणि ते काय आहे ह्याचा शोध घेतलाच पाहिजे. लहानपणाचा जिगरी दोस्त होता सुनील, आणि त्याची ही अशी अवस्था नाही बघू शकत. महादेव ने निश्चय केला की जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींच्या मुळापाशी जातं नाही, तोपर्यंत तो स्वस्थ बसणार नाही. निशा ने महादेवला हाताची कोण्ही मारली, हा...! बरोबर बोलताय तुम्ही, तंद्रीतून बाहेर पडून महादेव बोलला. चल प्रिया आता आम्ही पण निघतो, निशा ला घरी सोडून मी सुद्धा घरी जातो, अस बोलून महादेव व निशा दोघेही प्रियाला बाय करून निघाले. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror