दुर्गवाडी
दुर्गवाडी
दुर्गवाडी अतिदुर्गम अस गाव, जेमतेम दीडशे - दोनशे च्या आसपास लोकवस्ती असलेलं गाव. गावात शैक्षणिक सुविधा नसल्याने आणि गावचा विकास पाहिजे तसा न झाल्याने आजही ते गाव अंधश्रद्धेच्या आहारी जाते. त्या गावाला लागूनच दुर्गवाडीचा फाटा आहे, जो शहरातील मुख्य रस्त्याला जंगलाच्या वाटेने सरळ हायवेच्या दिशेने जोडतो, त्यामुळे भरपूर अंतर कमी होते. पण त्या वाटेला शापचं आहे म्हणा, जो त्या वाटेने रात्री ८ वाजल्या नंतर प्रवास करतो, त्याला अमानवी शक्तींचा त्रास होतो किंवा अमानवी अदृश्य शक्ती त्या व्यक्तीला झपाटते, अस तिथल्या आजूबाजूला राहणाऱ्या गावकऱ्यांच म्हणणं आहे. त्यामुळे त्या वाटेने सायंकाळी ७ वाजल्यानंतर कोणी प्रवास करत नाही. दुर्गवाडीचा फाटा अख्ख्या पंचक्रोशीत भुताकडीची जागा म्हणून प्रसिद्धी आली होती.
त्याच गावात समीर शिंदे म्हणून एक तिशी पार केलेला तरुण मुलगा होता. जो शहरात नोकरीसाठी रोज त्याच्या बाईकने ये - जा करायचा. आज ऑफिसचं काम लवकर संपवुन समीरला घरी जायचं होतं त्यामुळे तो त्याची सर्व कामे भराभर करत होता. आज त्याचा वाढदिवस, त्यामुळे त्याच्या घरी त्याच्या परिवाराने त्याच्यासाठी छोटंसं सेलिब्रेशन ठेवलं होतं. सकाळी ऑफिस ला निघतानाच आईने त्याला आज संध्याकाळी ऑफिस मधून लवकर ये, अस सक्त बजावलं होत. त्यामुळेच तो घाई करत होता. पण दिवसभर ऑफिस ची कामे संपता संपेना आणि व्हायचा तो उशीर झालाच... संध्याकाळचे ७ वाजून गेले तरी समीरची कामे काही पूर्ण झाली नाही... शेवटी संध्याकाळी ८ वा. च्या सुमारास त्याने ठरवले की आजची उरलेली कामे उद्या सकाळी लवकर येऊन पूर्ण करू, म्हणून तो घरी जाण्यासाठी निघाला...
ऑफीस पासून घराचं अंतर तासाभराच... पण मेन रस्त्यापासून काही अंतरावर गेल्यावर दुर्गवाडी फाटा होता..तिथून एक रस्ता सरळ हायवे च अंतर कापून त्याला अर्ध्या तासातचं घरी पोहचू शकत होता... पण तो रस्ता जंगलातून असल्याने तिथे जंगली जनावर आणि चोरांची भीती होती. तर काही प्रमाणात तिथे अमानवीय शक्तींचा सुद्धा वावर होता, अस समीर ऐकून होता. रस्ता तसा डांबरीकरणाचा असल्याने वाहनांची वर्दळ कमीच होती शिवाय रस्त्यावर विजेचे खांब सुद्धा नव्हते, येता - जाता वाहनांच्या हेड लाईट चा जो काही प्रकाश फक्त तोच, त्यांनतर पुन्हा भयानक काळोख...
समीर ऑफिस मधून निघाला आणि बरोबर जंगलाच्या दिशेने जाणाऱ्या दुर्गवाडी फाट्याजवळ येऊन थांबला. मनात थोडीफार भीती होतीच, पण धाडसी वृत्ती असल्याने त्याने जंगलाचा मार्गाने जायचे असे ठरवले शिवाय त्याला घरी लवकर पण जायचे होते. त्याने क्षणभर थांबून जंगलाचा रस्ता धरला आणि आपली बाईक चालवू लागला..मनोमनी पूर्णपणे विचार केला होता की कोणीही मध्ये आलं तरी बाईक थांबायची नाही...
बाईक दुर्गवाडी फाट्यापासून आत शिरली.. सुरुवातीला वाहनांची वर्दळ होती त्यामुळे वाहनांचा पुरेसा प्रकाश रस्त्यावर पडत होता... समीर बाईक वर एकटाच हळू हळू जंगलाच्या दिशेने चालला होता...भलेही समीर मनातून किंचितसा घाबरला असेल पण तो हिम्मत करून बाईक चालवत होता... रस्ता डांबरी होता पण खड्डे बऱ्याच प्रमाणात होते त्यामुळे समीरला बाईक हळू हळू चालवावी लागत होती. वाटेवर विजेचे खांब नसल्याने आणि बाईकच्या हेड लाईट चा प्रकाश मंद असल्याने वाटेवर जास्त प्रकाश पडत नव्हता. एखादं मोठं वाहन जवळून गेलं की तेवढाच काय तो प्रकाश... आता हळू हळू त्या रस्त्यावर समीर ला वातावरणात गारवा जाणवू लागला.. वातावरणात बदल दिसू लागला... आतापर्यंत शांत असलेलं जंगल खाऊ की गिळू अस भासू लागलं... वड आणि पिंपळाची झाडे हवेच्या झोक्याने वाहू लागली, दुरून जंगली जनावरांच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. मिट्ट काळोख आणि त्या शांत असलेल्या त्या रस्त्यावरून समीर त्याच्या बाईकहुन एकटाच चालत होता..
पुढे काही अंतरावर गेल्यावर समीरला अस जाणवू लागला की त्याच्या बाईकचं टायर थोडस खाली दाबलं गेलं आणि मागची सीट थोडी खाली दाबली गेली आहे जणू काही त्याच्या मागे कोणीतरी बसलंय. समीर थोडा सावधान झाला अन तितक्यातच त्याच्या उजव्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला, हातात असलेल्या बांगड्यांचा आवाज त्याला येऊ लागला...शिवाय त्याला त्याच्या उजव्या कानाजवळ श्वासाची गरम ऊर्जा जाणवू लागली. आता मात्र समीर पार घाबरला. त्याच पूर्ण शरीर भीतीने गोठून गेलं. त्याच्याकडे कोणीतरी पाठीमागून नजर रोखून बघतंय, अस त्याला भासू लागलं.
अन ती नजर त्याला क्षणाक्षणाला भयभीत करून सोडत होती. त्याला आता कळून चुकलं होत की पाठीमागे जर त्याने पाहिले तर आपली काही खैर नाही त्यामुळे त्याने मागे न बघण्याचा विचार केला आणि बाईक चे दोन्ही आरसे उलटे करून ठेवले, जेणेकरून मागे जे काही आहे त्याची आणि समीर ची नजरानजर होऊ शकणार नाही...त्याला सडक्या मासांचा घाणेरडा कुंभट वास येऊ लागला..
समीरच्या खांद्यावर असलेल्या हाताने समीरच्या खांद्यावर जोरात दाब दिला अन समीरच्या कानाजवळ हळूच एक आवाज दुभंगला, " समीररररररर...! मागे बघ..." समीर आता बाईक जोरात पळवू लागला आणि त्याच्या कानाजवळचा गरम श्वास आता जोरजोराने वाढू लागले.. त्याच्या खांद्यावर असलेल्या हाताची हालचाल होऊ लागली...हातावर असलेला लाल चिकट द्रव समीर च्या शर्टावर लागला होता.. हाताची हालचाल आणि कानजवळचा गरम श्वासासोबत तो आवाज पण पुन्हा पुन्हा समीरच्या कानाजवळ गुंजू लागला, " समीर...! प्लिज एकदा मागे बघ..." त्या आवाजाने समीर बाईक आणखी जोरात पळवू लागला आता मात्र समीर जास्तच घाबरला कारण आता समीरच्या दोन्ही खांद्यावरून लांबसडक काळे केस पुढे आले होते. समीर पूर्णपणे घामाने ओलाचिंब झाला होता, कशीबशी बाईक थरथरत्या हाताने चालवत राहिला.
अर्धा तासात येणारा मुख्य रस्ता आता त्याला जवळ जवळ येताना दिसू लागला आणि एका ठराविक वेळेनुसार सगळं पूर्वरत होऊ लागलं, मागे असलेली बाईकची सीट पूर्वरत झाली, बाईकच वजन हलकं झालं... समीरच्या कानाजवळ येणारा तो श्वास आत नाहीसा झाला आणि खांद्यावर असलेला हात सुद्धा गायब झाला... समीरने सरळ बाईक घराजवळ येऊनच थांबवली आणि घडलेला सगळा प्रकार घरच्यांना सांगितला...
तिथे एक वृद्ध आजोबा होते त्यांनी दुर्गवाडी फाट्याबद्दल जमलेल्या सगळ्यांना सांगितले की तिथे असे बरेच प्रकार घडून आलेत, बऱ्याच जणांना जीव ही गमवावा लागला, समीर..! बाळा तुझं नशीब बळवंत, म्हणून तु सुखरुप घरी पोहचलास रे... पण त्यानंतर समीर पुढचे ३ दिवस खूप आजारी होता. प्रचंड ताप असल्याने तो बेडवरच होता, काही दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर समीर पूर्णपणे बरा होऊन घरी परतला आणि काही दिवसांनी ऑफिस सुद्धा जॉईन केलं. पण पुन्हा त्याने त्या दुर्गवाडी फाट्याच्या रस्त्याने प्रवास करण्याचे धाडस केले नाही...

