शिक्षक दिन विशेष
शिक्षक दिन विशेष
खास शिक्षक दिन निम्मिताने,
आमची शााळा " अनुदत्त विद्यालय", शाळा जिथे आपलं भविष्य निर्माण होत असत, एकाप्रकारे आपलं आयुष्य घडवण्याच मंदिरच म्हणा. आपलं बालपण शाळेमध्ये कस जात असत ना ? आपण शाळेमध्ये असताना कितीतरी मज्जा, मस्ती करतो. कितीतरी आठवणी, स्वप्न आपण इथे जगलेलो असतो.
आज ५ सप्टेंबर शिक्षक दिन, शिक्षकांचा दिवस. शाळेत असताना आपल्या आवडीचा विषय निवडायचा आणि ह्या दिवशी स्वतः शिक्षक बनुन अर्थात आपल्या शिक्षकांच्या परवानगीने वर्गातल्या मुलांना तो विषय आवडीने शिकवायचा. अजूनही ही आठवण डोळ्यासमोरून जात नाही.
आज आपण सर्व यशाच्या ज्या शिखरावर, ज्या ठिकाणी आहोत, त्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या शाळेतील शिक्षकांचा नक्कीच सिंहाचा वाटा आहे, हे बोलणं वावग ठरणार नाही. कारण आई वडिलांनंतर जर आपल्याला कोणी मार्ग दाखवतो तर ते म्हणजे आपले शिक्षक होय. शालेय जीवनात आपला अर्धा दिवसच शाळेत जातो आणि त्या दिवसाचा, त्या वेळेचा सदुपयोग हे आपले शिक्षक आपल्याकडून करून घेऊन योग्य ते मार्गदर्शन करतात.
आज आपल्याला असेही काही मुलं भेटतील जे बोलतील की, आपल्या शाळेने, शाळेतील शिक्षकांनी आपल्यासाठी काय केलंय ? खरतर अश्या मुलांची मला कीव येते, अश्या मुलांकडे दुर्लक्ष केलेलंच बरं, कारण त्यांना शिक्षक आणि त्यांनी शालेय जीवनात विद्यार्थ्यांना केलेलं मार्गदर्शन म्हणा अथवा सहकार्य म्हणा हे त्या मुलांना कळलेलंच नसत. असो..!
आमच्या शाळेतले सगळेच शिक्षक चांगले होते. मी आज माझ्या दृष्टीकोनातुन पाहिलेल्या माझ्या शिक्षकांबद्दल थोडंफार सांगणार आहे.
१) "सी. एस. पाटील" सर हे फक्त चांगलेच नव्हते तर आमच्या मित्रासारखे होते. माझ्या आवडत्या वर्गशिक्षकांपैकी एक होते. हे आम्हाला इंग्रजी विषय शिकवायचे. वेळप्रसंगी लय मारायचे पण हा माणूस आपल्याला लय आवडायचा. कारण ह्यांच्याकडे भेदभाव नव्हता, जेवढं मुलांना मारायचे, तेवढचं मुलींनाही शिक्षा द्यायचे, हयगय करायची नाही.
पाटील सर खूप भारी होते, एकदम क्लास होते. जर कधी आमचा लास्ट लेक्चर असेल, तर मुलींना घरी पाठवून मुलांना थांबवून ठेवायचे अन प्रत्येकाला स्वतःच्या लाईफ बद्दल विचारायचे आणि मार्गदर्शन करायचे. काही दिवसांपूर्वीच आमचं फोनवर बोलणं झालं, मस्त वाटलं सरांशी बोलून.
२) " डांगे सर " मला वैयक्तिकरित्या डांगे सर अगदी मनापासुन खूप आवडतात. त्यांच्याबद्दल मला त्यावेळेस आणि आता सुद्धा प्रचंड आदर आणि भीती आहे. ते शाळेत गणित हा विषय खूप उत्तम शिकवायचे, आणि त्यांची गणित शिकवण्याची पद्धत खुप आगळी - वेगळी होती. आज मी जे काही गणित ह्या विषयात हुशार आहे तो फक्त डांगे सरांमुळेच.
३) " मुळे मॅडम " तसा हिंदी विषय सोप्पा आणि परीक्षेत स्कोअरिंग वाला विषय होता. शाळेत " मुळे मॅडम" ह्या आम्हाला हिंदी हा विषय शिकवत होत्या. दिसायला त्या सुंदर होत्याच पण त्यांच्या आवाज ही सुरेख होता. त्या कविता जेव्हा शिकवायच्या, तर खुप मस्त चाल लावुन शिकवायच्या जेणेकरून आम्हा मुलांना कंटाळाही येणार नाही व कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त शिकायलाही भेटेल. बर मॅडम मुळे मला एकदा आठवी मध्ये असताना नाटक सादर करायला भेटलं होत, त्यासाठी मी मॅडमचा नेहमी आभारी असेल.
४) " खराटे सर " एकदम दिलखुलास, आमचे सर्वांचे लाडके, आवडते व्यक्तीमत्व,चेहरा नेहमी हसरा, प्रत्येक विद्यार्थ्यांचा अगदी जवळचा मित्र वाटावा असा सरांचा स्वभाव. बरं सरांना कधी मुलांना मारायला आवडत नव्हतं, बहुतेक मुलांना मारणं, हे त्यांच्या तत्त्वात बसत नसावं. त्यांनी कधी कोणत्या मुलांवर हात उगारला असेल असं मला अजून तरी आठवत नाही.
आम्हा मुलांना सरांच्यामुळेच शाळेतर्फे क्रिकेट खेळण्याची संधी भेटली होती. माझ्या एका लेखात मी सांगितलं होत की लेझीम साठी सरांनीच आम्हाला ( मला आणि माझ्या मित्रांना ) प्रोत्साहन दिलं होतं. सरांनी आमच्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण केला होता. ज्याची मदत आम्हा मुलांना पुढे भविष्यात झाली. नुकतचं माझं आणि सरांचं फोनवर बोलणं झालं, फार बर वाटल.
५) "देशमुख सर " दहावी - क ह्या वर्गाचे गणित विषयाचे वर्गशिक्षक होते. माझा कधी प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलण्याचा काही योग आला नाही किंवा त्यांच्या लेक्चर ला बसायची संधीही भेटली नाही. पण सरांविषयी मी जे काही ऐकलं होतं ते माझ्या जवळच्या मित्रांकडून जे त्यांच्या वर्गात दहावीला शिकत होते. सर स्वभावाने खूप शांत आणि मितभाषी होते. कधी कोणत्या विद्यार्थ्यांला त्यांनी मारलं असेल असं कधीच मला ह्या दोघांनी सांगितलेलं आठवत नाही. सर शाळा सुरू झाल्यावर नक्कीच आपण भेटू.
६) "खरात सर" इतिहास विषय छान शिकवायचे. सरांची शिकवायची पद्धत खूप हटके होती. म्हणजे एका हातात पुस्तक बाकावर ठेवलेलं असायचं आणि दुसऱ्या हातात एक बारीक वेताची निळी चिकटपट्टी लावलेली काठी. आता ती काठी ह्यासाठी होती, सर शिकवताना मध्येच थांबून कोणत्याही एका विद्यार्थ्यांला उठवून प्रश्नाचं उत्तर विचारायचे. जर उत्तर नाही देता आलं किंवा उत्तर चुकलं तर त्याच काठीने शिक्षा द्यायचे. सर तसे मनाने खुप चांगले होते कोणाला त्यांनी कधीच विनाकारण मारलं अथवा ओरडल नव्हत. हल्लीच कळलं की आज ते आपल्यासोबत नाहीत. 🙏 त्यांना विनम्रपणे अभिवादन करून पुढे लिहायला घेतो.
७) " मिलिंद जाधव " सर इतिहास शिकवायचे ते पण चित्र काढून, विचार करा किती मस्त. इतिहास शिकताना जिथे मुलांना आळस यायचा, तो फक्त सरांमुळे नाहीसा झाला होता. मला आज ही आठवतंय सरांनी मला एकदा चुकून कानाखाली मारली होती. नंतर सरांनी तेवढ्याच प्रेमाने मला जवळ घेतलं. खूप कमी विद्यार्थी असतील जे जाधव सरांना ओळखत नसतील. काही दिवसांपूर्वीच माझं आणि सरांचं खूप चांगल्या प्रकारे आणि वेगवेगळ्या विषयांबद्दल फोनवर चर्चा झाली. सर पुन्हा तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊन फार आनंद झाला, असेच नेहमी सोबत राहा.
खरंतर ती शाळा, ते शिक्षक आणि ती वेळ जीवनातील खूप चांगले वाईट अनुभव शिकवून गेले त्यात आमचे शिक्षक नेहमीच आमचे मार्गदर्शक म्हणून आम्हाला सहकार्य करत राहिले.
वर्षभर आदराने वागवलेले " डांगे सर", कधीही आमच्यावर हात न उचललेले "खराटे सर" आणि अर्थात आमच्या आवडीचे आणि जवळचे आम्हाला कधीही मारायला न चुकणारे "सी एस पाटील सर" ह्या सगळ्या सरांची खूप आठवण येईल.
( ह्यात काही सर आणि मॅडम ह्यांची नावे ही राहिली आहेत त्यासाठी माफी असावी, पण सगळेच जण शाळेत आम्हा विद्यार्थ्यांना उत्तम असे मार्गदर्शक होते आणि त्यांची जागा ही फक्त शिक्षक दिन पुरती मर्यादित नसून ती आम्हा विद्यार्थ्यांच्या हृदयात कायमची कोरलेली आहेत.)
आम्हा सगळ्या विध्यार्थ्यांसाठी परत त्याच शाळेत जाऊन आम्ही बसलेल्या बाकावर पुन्हा बसून आयुष्याचे धडे शिकण्याचा आनंद हा नक्कीच अविस्मरणीय राहील.
शेवटी सर्व विद्यार्थ्यांकडून अनुदत्त विद्यालय मधील सर्व शिक्षकांना " शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"
