Rahul Maghade

Comedy Drama Others

4  

Rahul Maghade

Comedy Drama Others

आठवणींचा विरंगुळा

आठवणींचा विरंगुळा

37 mins
508


आपल्या होंडा शाईन च्या गाडीला राहुलने चावी लावून जोरात किक मारली हंहं.... हंहं हंहंहं हं ह गाडीच ऍक्सीलेटर ओढले... आणि मागे दिपक आणि आकाश दोघे येऊन बसले. आणि वेगात गाडी निघाली...आणि तिघेही गाडीवर बसून गुणगुणू लागले.

दिवसभराची धम्माल मस्ती व आदर्श रेस्टॉरंटमध्ये दुपारचं जेवण करून संध्याकाळच्या वेळी तिघेही मित्र घणसोली जवळच्या गार्डन मध्ये येऊन जुन्या आठवणींना उजाळा देत बसले. राहुल, आकाश आणि दिपक तिघेही शाळेपासूनचे जिगरी मित्र होते. तिघेही हुशार, खोडकर आणि बिनधास्त वृत्तीचे. 

आकाश आणि राहुल ची मैत्री इयत्ता ६ वीला असताना एका खासगी कोचिंग ( ओम साई कोचिंग क्लास ) मध्ये झाली. पण हीच मैत्री इयत्ता ७ वीच्या स्कॉलरशिप च्या स्पर्धेत अजून घट्ट झाली, इतकी की पूर्ण शाळेत सर असो वा मॅडम अक्षरशः सगळेच त्यांना भाऊ - भाऊ समजायला लागेल. अशी त्यांची भेट झाली.

दिपक आणि राहुल ची पहिली भेट तर एक किस्साच बनलीय. कुठेतरी लांब एका म्हशीच्या तबेल्याजवळ साधारण हाफ पॅंट आणि टी शर्ट घातलेला एका हातात शिऱ्याचा प्रसाद घेऊन एक मुलगा बसला होता. आणि येणाऱ्या जाणाऱ्याला जबरदस्तीने प्रसाद वाटत होता. हा तोच दिपक. इथेच पहिली भेट झाली दिपक अन राहुल ह्या दोघांची. थोडी किरकिरी झालीच त्यादिवशी पण असो...दिपक ने मार ही खाल्ला होता राहुल च्या हातचा त्या दिवशी...असो तेवढं चालतच मैत्रीत.

कांदिवली अनुदत्त विद्यालय इयत्ता ८ वी, तुकडी ब ....

आमची शााळा..अनुदत्त विद्यालय

शाळा जिथे आपलं भविष्य निर्माण होत असत, एकप्रकारे आपलं आयुष्य घडवण्याच मंदिरच म्हणा. आपलं बालपण शाळेमध्ये कस जात असत ना ? आपण शाळेमध्ये असताना कितीतरी मज्जा, मस्ती करतो. कितीतरी आठवणी, स्वप्न आपण इथे जगलेलो असतो. 

अस म्हणतात, शाळा म्हणजे विद्येच घर असत, पण का कुणास ठाऊक आमच्यासाठी ते आमचं दुसरं घर होत. गरज पडलीच तर क्लब सुद्धा . 


।। इयत्ता ८ वी तुकडी ब ।।

शाळेचा पहिला दिवस, आणि समोर तेच कालचं बेण अर्थात दिपक. पाहताच क्षणी राग आला पण आपण शाळेत आहोत ह्याच भान होत. असो जास्त वेळ नाही राहिला तो राग, थोडासा गैरसमज झालेला होता, जो आम्ही एकमेकांशी बोलून दूर केला आणि मैत्री झालीच.. खरतर त्यादिवसा पासून राहुल, आकाश आणि दिपक हे त्रिकुट ८ वी ब ह्या वर्गात खऱ्या अर्थाने फेमस झालं.

शाळेचा कोणता स्पोर्ट असो,मस्ती असो, डान्स असो वा आणखी कोणत्या ही गोष्टीत तिघे आवर्जुन सहभागी व्हायचे. शाळेतल्या मुलींशी बोलणं आणि मॅडम ला चोरून पाहण्यात एक वेगळीच मजा होती. त्यातल्या त्यात आम्हा मुलांच्या क्रश आमच्याच क्लास टिचर. म्हणजे सकाळी पहिल्या लेक्चर पासूनच मन प्रसन्न राहायचं आणि शिकायची गोडीही.

अभ्यासात आम्ही जेवढे हुशार होतो, त्यापेक्षा कितीतरी पटीने आम्ही तिघे मस्तीखोर होतो. मुलींच्या बाबतीत आम्ही खूप सभ्य आणि एक नियम पाळला होता की, स्वतःहून मुलींशी बोलायचं नाही किंवा त्यांना त्रास होईल असं कधी वागायच नाही.

आमच्या शाळेतले सगळेच शिक्षक तसे चांगले होते. अपवाद काही शिक्षक सोडले तर...त्यात एक शिक्षक होते, "सी. एस. पाटील" सर म्हणजे हे फक्त चांगलेच नव्हते तर मित्रासारखे होते आमच्या...मित्रासारखे . 

सी. एस. पाटील सर हे आम्हाला इंग्रजी विषय शिकवायचे. वेळप्रसंगी लय तोडायचे. हा माणूस आपल्याला लय आवडायचा. कारण ह्यांच्याकडे भेदभाव नव्हता, जेवढा मुलांना तोडायचा, तेवढाच मुलींनाही शिक्षा द्यायचा. हयगय करायचा नाही. आम्हा तिघांसाठी त्यांच ठरलेलं वाक्य होत, "नापास करिन". पण ते वाक्य कधीच अभ्यासा बाबतीत नव्हतं . आम्हा तिघांचे आवडते सर होते पाटील सर. पण त्या फेव्हरेटिसम मध्ये आम्हाला कधीच कन्सेशन नाही भेटलं. कारण ह्याची प्रचिती खूप वेळ त्यांनी आम्हाला वर्गात प्रसाद देऊन अनेकांच्या समोर दिलीय.

पाटील सर भारी होते, लास्ट लेक्चर असेल तर मुलींना घरी पाठवून मुलांना थांबवून ठेवायचे अन प्रत्येकाला स्वतःच्या लाईफ बद्दल विचारायचे. आणि मार्गदर्शन करायचे. मुलींना त्या सरांचा खूप तिरस्कार, काय माहीत काय कारण होत ? 

असो राहुल,दिपक अन आकाश शी मैत्री ही फक्त शाळेपूरती मर्यादित नव्हती. तर एकमेकांच्या घरी सुद्धा माहीत. राहुल आणि दिपक च घर जवळ त्या मानाने आकाश हा खूप दूर राहायचा. 

शाळेचा दिवस

दीपक ने आम्हा दोघांना सांगितलं की आज त्याच्या घरी जेवायला यायचं आहे कारण साधंच त्याच्या मम्मीचे संतोषी माता चे उपवास होते त्यानिमित्ताने. आणि स्पेशली त्याच्या आईने सांगितलं होतं की दोघांना सांग की आंबट पदार्थ खाऊ नका, देवी ला चालत नाही. मम्मीने तस सोप्या भाषेतच सांगितलं असणार, पण आमचा हा मित्र खूप महान आहे. त्याने त्याच्या भाषेत सांगितलं, 

दिपक - " मम्मी ने घरी बोलावलंय जेवायला, आंबट काही खाऊ नका नाहीतर, फक्त तिथे येऊन माझं तोंड बघावं लागेल तुम्हाला की मी कसा जेवतोय."

एका मिनिटात पाणउतारा करून टाकला ना राव आमच्या दोघांचा पण असो," वो दोस्ती ही क्या, जो बेईजत ना हो".

ठरल्याप्रमाणे आम्ही दिपक च्या घरी जायचं ठरवलं. अगदी त्याने सांगितल्या प्रमाणे आंबट काहीच खाल्ल नाही. दिपकच्या घरी आज आम्ही पहिल्यांदाच जाणार होतो आणि मम्मी ला भेटणार होतो.

स्थळ :- दिपकच घर

संतोषी माता ची आरती झालीच होती आणि आम्ही दोघे म्हणजे आकाश आणि मी (राहुल ) दिपकच्या घरी पोहचलो. मम्मी ला भेटलो, खरतर मम्मी ( दिपकच्या मम्मी ला आम्ही आजही मम्मीच बोलतो म्हणून मम्मी ) खूप डेंजर आहे.. बाकीच्यांसाठी. दिपक च्या घरात दिपकच्या मित्रांपैकी जर कोणाला एन्ट्री असेल तर ती फक्त राहुल आणि आकाशलाच. खरतर प्रत्येकाला एकाच आई असते पण राहुल, आकाश आणि दिपक आम्हा तिघांना तीन तीन आई होत्या. आणि ही काय कमी ग्रेट फीलिंग नाहीये मित्रानो.

त्यादिवशी पोटभर जेवून आम्ही घरी निघालो. पुन्हा एकदा शाळेत भेटण्यासाठी.....

दिपकच्या घरी जेवुन आम्ही घरी गेलो. दुसऱ्या दिवशी शाळेत भेटायला.

स्थळ : - शाळा ( वर्गात ) 

"इयत्ता आठवी च्या सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येत आहे की, यंदा १५ ऑगस्टला स्वतंत्र दिनानिम्मित लेझीम तालीम आयोजित केली आहे. तरीही ज्यांना कुणाला सहभाग घ्यायचा असेल त्यांनी आपल्या वर्गशिक्षकाकडे नावे नोंदवावी. "

सूचना समाप्त..

ही नोटीस घेऊन शाळेचा शिपाई दादा आला होता. जेव्हा पण हा यायचा ना तर नेहमी एक आनंद व्हायचा, तर का ? कारण नोटिशी मध्ये कधी एकदा अस लिहून येत, "उद्या शाळेला सुट्टी आहे", अन हे ऐकुन आम्ही मुलं नुसता धिंगाणा घालायला मोकळे. 

बरं असो..! नोटिस कळाली. लगेचच मी आणि आकाश आम्ही दोघांनी नावे दिली. खरतर आम्ही खूप उत्सुक होतो. ह्यासाठी नाही की लेझीम मध्ये सहभाग घेतोय. तर ह्यासाठी की सराव साठीचा वेळ हा मज्जा करायला भेटणार होता. एकप्रकारे शाळेच्या त्या बोरिंग लेक्चर पासूनची सुटलाच.

स्थळ :- शाळेचं मैदान

प्रॅक्टिस ला सुरुवात झाली, पण इथे आमचाच पोपट. आलो होतो लेझीम ला आणि खराटे सरांनी भोंगा दिला वाजवायला. सुरुवातीला मज्जा आली पण नंतर बाप रे आमच्या दोघांचे होठ सुजले होते. अस वाटलं होतं सगळ सोडून पळून जावं आणि एक - दोनदा पळून गेलो ही होतो. पण आम्हालाच टार्गेट तुम्हीच वाजवा, दुसऱ्या कोणाला तो भोंगा वाजवायला येतच नव्हता. मग काय इलाज नव्हता, घेतलं खराटे सरांचं नाव केला श्री गणेश...शेवटी कसाबसा कार्यक्रम हा खूप चांगल्या प्रकारे पार पडला.आणि खऱ्या अर्थाने त्यादिवशी पासून शाळेत चार लोक ओळखायला लागली आम्हाला. आणि हो सांगायचंच राहील, लेझीम तालीम ही चांगलीच खाली अन जिथे आम्ही म्हणजे आकाश आणि मी तो भोंगा वाजवत होतो आमच्या जोडीला आमचे परममित्र ही होते हा दिपक खूळखुळा वाजवत. खरतर आम्हीच खराटे सरांना सांगितलं होतं की दिपक ला खुळखुळा वाजवायला सांगा म्हणून आम्ही अडकलोय मग तो का नको. आखीर दोस्ती की हे निभानी तो पडेगी...

मला इथे आवर्जून सांगायला आवडेल की एक वेळ होती जेव्हा आकाश आणि दिपक एकमेकांसाठी अनोळखी होते अर्थात त्यांच्या भूतकाळातीलच आहे ही गोष्ट.

स्थळ : शाळा ( वर्गात )

मार, मार अजून मार, सोडु नकोस त्याला मी वर्गात येताना मला असे आवाज वर्गातुन बाहेर येत होते. आत मध्ये पाहिलं तर दृश्यच वेगळे हे दोन हरामखोर दिपक आणि आकाश एकमेकांसोबत मारामारी करत होते आणि बाकीचे त्यांना प्रोत्साहन देत होते. तस कारण खुप छोट फक्त बॅग ठेवण्यासाठीच्या जागेवरून बस आणि हे दोघे सुरु.

त्यात दुष्काळात तेरावा महिना पुढचं लेक्चर पाटील सरांच आणि तेवढ्यात सरांचं वर्गात आगमन झालं. आता आमच्या वर्गातल्या मुली खूप हुशार, अहिंसेच्या पालन करणाऱ्या. सरांना वर्गात आल्या आल्या आकाश आणि दिपक ने केलेल्या मारामारीचा इतिहास सांगत सुटल्या. आणि मग जस की आपण सर्वाना माहीतच आहे. बच्चा बच्चा जानता है कि अब सिर्फ खेल होगा.

दिपक आकाश और राहुल के साथ.

तुम्हाला वाटत असेल आता राहुल ला उगाचच का शिक्षा त्याची काय चुकी.... अहो मार खाण्यासाठी कारण नसत.

ये आन रे लवकर....

तीन लाकडी पिवळ्या कलरच्या पट्ट्या.


अगं आई ग....!......पण काही ही म्हणा, इयत्ता आठवी ह्या वर्गात शिकत असताना जीवाला जीव देणारे असे हे दोन मित्र मला भेटले. आकाश आणि दिपक. त्यादिवशीच्या भांडणानंतर ते दोघे कधीच एकमेकांशी भांडले नाही, आणि आजपर्यंत ती मैत्री त्यांनी टिकून ठेवली. मैत्री म्हणजे काय ह्याच जिवंत उदाहरण म्हणजे आम्ही तिघे..


।। इयत्ता ९ वी तुकडी ब ।।

ऐ मालक तेरे बंधे हम,ऐसे हो हमारे करम.... 

आम्ही मुलांनी आमच्याचं आवडत्या सरांना केलेली विनवणी. ती पण मनातल्या मनात. इयत्ता ९ वीत शाळेच्या पहिल्याच दिवशी एक आश्चर्याचा धक्का देणारी गोष्ट घडली, ज्या सरांची आम्हा मुलांना भीती वाटायची तेच सर आमचे वर्गशिक्षक म्हणून येणारे होते. हो बरोबर ओळखलंत.

इंग्रजीचे सम्राट, शाळेची शान, ढ मुलांचा आसरा, टपोरी मुलांचा कर्दनकाळ आणि गपचुप आम्हाला (परीक्षेत ) हेल्प करणारे "सी. एस. पाटील सर".

असा एकही दिवस नव्हता की ह्यांनी मला आणि आकाश ला मारलं नसेल. हे ही म्हणू शकता की आम्हाला मारल्याशिवाय ह्यांचा दिवस सुरूच होत नव्हता. कधी कधी आम्हाला वाटायचं की आम्ही विद्यार्थी नसून मंदिर मधला घंटाच आहे

आपल्या सर्वांना तर माहीतच आहे की वर्गात सर नसल्यावर वर्ग कंट्रोल करण्यासाठी एका मॉनिटर ची गरज लागतेचं. तसच आमच्या वर्गात सुद्धा एक मॉनिटर निवडलेला होता.आणि प्रत्येक शाळेत मॉनिटर ह्यासाठी निवडलेला असतो, की तो वर्ग शांत रहावा म्हणून पण आमचा मॉनिटर आम्ही ह्यासाठी निवडला होता की आम्हाला बोलता यावं, वर्गात मस्ती करता यावी म्हणून . आणि आमचा जो मॉनिटर होता.. तो होता नव्हता, तो होती होता. पण ती एकप्रकारे होता सारखीच होती...वैशाली.

वैशाली... आमच्या तिघांची जवळची मैत्रीण. तिला स्वतः ला मॉनिटर झाल्यावर जेवढा आनंद झाला नसेल तेवढा आम्हाला झाला कारण आता कितीही मस्ती करा मॉनिटर तर आपलाच माणूस आहे ना. आम्ही तिघे (आकाश, राहुल, दिपक ) कधी बोलत किंवा मस्ती करत असू ना, तेव्हा ती बाकीच्या मुलांना दाखवण्यापुरतं आमचं नाव फळ्यावर लिहायची पण सर वर्गात येण्याच्या आत आमच्या तिघांची नाव पुसून टाकायची. अस करून तिने आम्हाला कितीतरी वेळा वाचवलयं त्या पाटील सरांच्या तावडीतून. बाप रे..! आठवुणच छाती धडघडायला लागते. तसा आमचा मित्र परिवार चांगला होता, आम्ही एकमेकांना कोणत्याही कामात अगदी मनापासून सपोर्ट करायचो. बहुतेक त्यामुळेेचं आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र अजूनही आहोत आणि आजही आम्ही सर्वजण सोबत आहोत.

शाळेत असताना मज्जा तर येतेच पण जास्त मज्जा ही रिसेस म्हणजे आपल्या शाळेतच्या भाषेत मधली सुट्टी मध्ये जास्त येते. असाच एक किस्सा आहे. 

स्थळ : - शाळा + समोसेवाला

मधली सुट्टी झाली. दहावी पर्यंत मी आणि आकाश दररोज न चुकता टिफिन घेऊन यायचो. दिपक ह्याला अपवाद होता. त्याने कधी टिफिन आणला असेल असं मला तरी कुठे आठवत नाही. आम्ही त्याला बोलायचो सुद्धा की सोबत जेवूया, खूप जबरदस्ती करून त्याला आमच्या सोबत जेवायला बसवायचो.

बरं असो..! त्यादिवशी मी आणि आकाश ने पण टिफिन नाही आणला म्हणून आम्ही तिघे पण मधल्या सुट्टीत बाहेर समोसा खायाला गेलो. आमच्या शाळेच्या जवळच एक समोसे विकणारा भैय्या होता. काय टेस्टी समोसे बनवायचा तो.आता नाव काढलं तरी तोंडाला पाणी आलं. त्यावेळी तो २.५० रुपये ला एक समोसा विकायचा. नेहमीप्रमाणे माझ्याकडे आणि आकाशाकडे सुद्धा पैसे नव्हते, बर आम्ही तिघे सोबत असलो की खूप कमी वेळा किंवा नाहीच म्हणा हवं तर पण नेहमी दिपकच खर्च करायचा. त्यादिवशी ही त्याने तेच केलं. समोसा खाऊन पोट भरल्यानंतर वर्गात जाण्यासाठी निघालो अन नको तो घोळ झाला. मधली सुट्टी भरण्याची बेल वाजली. आणि आमच्या डोक्याची बेल सुद्धा वाजली कारण की मधली सुट्टी नंतरचा लेक्चर आमच्याच माणसाचा म्हणजेच पाटील सरांचा. त्यांनी एक नियमच बनवला होता जो उशीरा येईल तो फटके खाईल. वाऱ्याच्या वेगाने वर्गाकडे आम्ही तिघेजण पळत सुटलो. वर्ग भरला होता, धापा टाकत का होईना पण आम्ही तिघे वर्गाजवळ येऊन पोहचलो ह्याच समाधान झालं.

स्थळ : - शाळा ( वर्गात) 

दरवाज्यातूनच आत डोकावलं, पहिल्याच बाकावर आमच्या मैत्रिणी उषा, रेश्मा, राधिका ह्या बसल्या होत्या. पण आश्चर्याची बाब म्हणजे ह्या मस्तीखोर मुली आज शांत का बसल्या होत्या म्हणून आम्ही थोडे चकित झालो.तरी उषा आम्हाला डोळ्याने काहीतरी खुणवण्याचा प्रयत्न करत होती.पण आम्ही म्हणजे आम्ही सरळ वर्गात घुसलो, स्वतःच्या जागेवर जाऊन बसलो आणि एवढ्यावरच थांबलो नाही तर त्यांना विचारायला लागलो की तुम्ही सर्वजणी शांत का आहात ? तितक्यात शेवटच्या बाकावरून ओळखीचा आवाज ऐकू आला. हो त्यांच्याच आवाज...! माननीय श्री. सी. एस. पाटील सरांचा.

सी. एस. पाटील सर : - बेेटेहो.. चांगलंच तावडीत भेटलातं. आज तुम्हाला नापासचं करतो, तुम्ही तिघे पुढे या स्टेज वर आज तुमचा सत्कार करावाचं लागेल.


आम्ही तिघे चुपचाप समोर येऊन उभे राहिलो, आता आम्हाला क्षमा नाही हे आम्हाला सुद्धा कळून चुकलं होत.


आकाश : - आता काय करायचं ?

राहुल : - आता आपण काय करणार, जे करणार ते सरचं करणार आहेत. ते पण खूप भयानक अस काहीतरी...!

खरतर दिपक आमच्यात थोडा जास्त स्ट्रॉंग होता तेव्हाही आणि आता ही .

दिपक : - अबे...होईल ते होईल बघुन घेऊ. फक्त १, २ पट्टी 

 मारेल ना, मारून तर नाही टाकणार ना ...!

आकाश - राहुल सोबत : - मित्रा..! मारून नाही टाकणार रेे, पण पट्टी तुटेपर्यंत मारणार यार. 

आता मात्र दिपक पण घाबरला पण चेहऱ्यावरचे हावभाव दिसू द्यायचे नाही. नाहीतर क्या इज़्ज़त रहेगी भाई की. 

लेक्चर संपल्याची बेल वाजली. 

लेक्चर संपलं सर निघून गेले..............हो हो सांगतो आमचं काय झालं ते,खूप घाई आहे बाबा ह्यांना. काय होणार लेक्चर संपल्यावर सर निघून गेले आणि आम्ही पण आमच्या जागेवर जाऊन बसलो पण त्यांनी वापरलेल्या तीन पट्ट्यांचे निशाण हे आमच्या हातावर चांगलेच उमटलेले होते. त्या दिवशी पासून आमचं खूप प्रेम आहे आमच्या सरांवर, खूप म्हणजे खूप आवडते सर आहेत ते आमचे अगदी आजपर्यंत. आणि त्या मुली तर खूप आवडतात ज्यांनी ह्या प्रसंगी सरांना पट्टी दिली होती .

आकाश आणि मी आम्ही पहिल्या बाकावर बसायचो आणि दिपक, संदेश आमच्याच उजव्या बाजूच्या दुसऱ्या बाकावर बसायचे हे आमचं रोजच ठरलेलं होत. बर आमच्या डाव्या बाजूला रेश्मा, मनाली,पुढे उषा, राधिका तर मागे वैशाली, पूनम ह्या सगळ्या जणी होत्या. पहिला लेक्चर आवडीच्या सरांचा तर होताच पण मंदिरात एखाद्याला जसा प्रसाद भेटतो तसा आम्हा दोघांना दररोज न चुकता पाटील सर प्रसाद देऊन जायचे. म्हणून तर तो लेक्चर आमचा आवडत्या हुन नावडता झाला होता. पण जास्त मज्जा त्याच लेक्चर ला येत होती. हे ही तितकंच खरं आहे.

तसे वर्गात सर्वच जण मस्तीखोर असतात असं नाही की फक्त मुलंच मस्ती करतात. तस बिलकुल नसतं..! आमच्या वर्गात मुलांपेक्षा जास्त मस्ती तर मुलीच करायच्या. ज्यात पहिला नंबर हा लाडु चा होता. लाडु म्हणजे उषा,मुलींचा गुंडा, वर्गाचा टॉम बॉय. तशी ती आमची एवढी पण चांगली मैत्रीण नव्ह्ती, पण आम्ही केलेल्या मस्तीखोरी मध्ये असो किंवा प्रत्येक सरांना त्रास देतांना केलेल्या हेल्प मध्ये ती नेहमी आमच्या सोबत असायची. मग आता तुम्हीच बघा की आमच्यासाठी ती एक चांगली मैत्रीण पेक्षाही ती आमच्यासाठी खूप खास आणि जवळची मैत्रीण म्हणून जास्त प्रिय होती. 

आम्ही कधीच तिला तिच्या नावाने हाक मारायचो नाही नेहमी तिला लाडू ह्याच नावाने बोलवायचो. आमच्यामुळेच लाडु खुप प्रसिद्ध झाला होता.


स्थळ :- शाळा ( वर्गात )

वर्ग भरला, नेहमीप्रमाणेच पहिला लेक्चर हा पाटील सरांचा. सर त्यादिवशी इंग्रजी व्याकरण शिकवत होते. आम्ही मुलं अभ्यासात मग्न होतो आणि तितक्यात आकाशची नजर लाडु वर पडली. लाडु पहिल्या बँच वर बसायची अन सर त्याच बँच वर खडु आणि डस्टर ठेवायचे. आकाश ने मला हाताची कोण्ही मारून इशारा केला.

आकाश : - राहुल, अरे ही काय डोक्यावर पडली आहे का ? 

राहुल : - जाऊदे, बहुतेक हिची जगायची इच्छा संपलीये.☺️ आणि तिच्याकडे बघु पण नको, नाहीतर सरांना अस वाटेल की आपणच सांगितलंय तिला हे असं करायला.

आकाश : - ( थोडा घाबरून ) हा ना यार, तो भाई तर रेडीच असतो, आपल्याला धुवायला.

आणि तिकडे लाडु, खडुंचा चुरा करून सरांच्या पॅंटवर उडवत होती. हे एवढं सर्व करून सुद्धा तिने कधी मार नाही खाल्ला राव सरांचा.आणि सरांना सुद्धा कळायचं नाही. 

कधी कधी अस वाटायचं की सर मुला - मुलींमध्ये भेदभाव तर नाही करत ना..! म्हणजे फक्त मुलंच मार खाणार आणि मुलींना सर्व गुन्हे माफ. पण दुसऱ्याच क्षणाला आमचा हा जो काही गोड गैरसमज होता तो दुर होणार होता. 

सरांनी सगळ्यांना शब्दार्थ पाठ केले का ? असा प्रश्न केला. अन जस की प्रत्येक शाळेत होतं, मुलींकडून मोठ्याने प्रतिसाद आला "हो सर झाले" आणि मुलांकडून हळू आवाजात "हो ...सर". आणि मग सरांच्या आवडीचा छंद किंवा खेळच म्हणा हा, तीन लाकडी पिवळ्या कलरच्या पट्ट्या, पूर्ण ताकदिशी मारायच्या. त्यामुळे आपलं उत्तर चुकणार नाही ह्याची सगळेजण जर जास्तच काळजी घ्यायचे.त्यात आम्ही सरांचे आवडते विद्यार्थी त्यामुळे पहिला मान हा आमचाचं होता. 

पाटील सर : - राहुल तू पाठ केलेस का शब्दार्थ ?

राहुल : - हो सर थोडेफार.. ( घाबरून ) 

पाटील सर : - ठीक आहे, सांग स्पेलिंग { Wristwatch } ची

राहुल : - सर... W - r - i - s - t - w - a - t - c - h.

पाटील सर : - बरोबर गुड बॉय ( निराश होऊन )

राहुल : - वाचलो. ( खुश होऊन )

पाटील सर : - ओके आता अर्थ सांग . 

राहुल : - बाप रे..! ते....

पाटील सर : - ( एकदम खुश ). Devil smile 

तेवढ्यात एक आवाज येतो 

रेश्मा : - सर, मनगटी घड्याळ.

पाटील सर :- राहुल, तू बस खाली. रेश्मा तू उभी रहा. खुप हौस ना मित्रांना मदत करायची. 

मग काय त्यानंतर जे तोडलय ना रेश्मा ला सरांनी बाप रे...! आणि त्याच बरोबर आमचा जो गैरसमज होता, मुलांमुलींमध्ये सर भेदभाव करतात तो ही दूर झाला. 

रेश्मा आमची चांगली मैत्रीण होती, बिचारीने माझ्यासाठी सरांचा जरा जास्तच मार खाल्ला. ती अभ्यासात खुप हुशार होती.शाळेत ती हातरुमालामध्ये घरून पॉवडर घेऊन यायची अन वर्गात लेक्चर संपल्यानंतर चेहऱ्यावर लावायची.त्यानंतर आम्हा तिघांना म्हणजेच मला, आकाश ला आणि लाडू ला विचारायची.

रेश्मा : - कशी दिसतेय मी ? पॉवडर जास्त लागली नाही ना चेहऱ्यावर.

आणि आम्ही बिचारे तिची खोटी स्तुती करायचो.

"अरे मस्त दिसतेस रेश्मा, बिलकुल कमी नाही पॉवडर एकदम परफेक्ट लावलं आहेस तू".

एकदा तर गणिताच्या लेक्चरला कहरच झाला. मला वैयक्तिकरित्या डांगे सर अगदी मनापासुन खूप आवडतात. ते आमच्या शाळेत गणित हा विषय खूप उत्तम शिकवायचे, आणि त्यांची गणित शिकवण्याची पद्धत खुप आगळी वेगळी होती. आज मी जे काही गणित ह्या विषयात हुशार आहे तो फक्त डांगे सरांमुळेच. तर झालं असं होतं की आमचा गणिताचा लेक्चर सुरू होणार होता आणि अजून डांगे सर आले नव्हते. रेश्मा तिच्या नेहमीच्या सवयीनुसार चेहऱ्यावर पॉवडर लावत होती अन तेवढ्यात सर आले. आता रेश्मा पुढेच असल्यामुळे ती सहजच सरांना दिसली अन तिला बघून सर अगदी सहजच तिला बोलले.

डांगे सर : - अगं ये पोरी..! तुझ्या तोंडाला खडु लागलाय.

हे वाक्य जस आम्ही ऐकलं आम्हाला खूप हसायला आलं होतं. क्योंकि...सच्चाई तो सिर्फ हमे ही मालुम थी ना...

सरांनी गणिताचा तास आटोपला अन निघून गेले. अन त्यानंतर वर्गात फक्त हसण्याचं वातावरण..


फुर फुरर ssssssर रर... शाळेत शिट्टीचा आवाज म्हणजे एखाद्या मुलाने मुलीसाठी केलेला इशारा अथवा पी.टी च्या सरांनी विद्यार्थ्यांना मारलेली हाक. हे एक समीकरणचं बनलं होत, असं म्हणायला काही हरकत नाही.खराटे सर एकदम मनमौजी, आमचे सर्वांचे लाडके, आवडते व्यक्तीमत्व, दिलखुलास माणूस,चेहरा नेहमी हसरा, प्रत्येक विद्यार्थ्यांचा अगदी जवळचा मित्र वाटावा असा सरांचा स्वभाव.

बरं सरांना मुलांना मारायला आवडत नव्हतं, बहुतेक मुलांना मारणं हे त्यांच्या तत्त्वात बसत नसावं. त्यांनी कधी कोणत्या मुलांवर हात उगारला असेल असं मला अजून तरी आठवत नाही. आम्हा मुलांना सरांच्यामुळेच शाळेतर्फे क्रिकेट खेळण्याची संधी भेटली होती. मागच्या लेखात जस सांगितलं की लेझीम साठी सरांनीच आम्हाला प्रोत्साहन दिलं होतं. म्हणून आकाश ,मी अन दिपक तयार झालो होतो. एकप्रकारे त्यांनी आमच्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण केला होता. ज्याची मदत आम्हा मुलांना पुढे भविष्यात झाली.

स्थळ :- शाळा ( वर्गात )

आकाश : - राहुल, तुला काहीतरी सांगायचं आहे. 

राहुल : - हा बोलना, काय झालं ?

आकाश :- अबे हे बघ !

कोणाची नजर पडु नये म्हणून त्याने बॅंच च्या खालुन माझ्या हातात एक कागद दिला. ( कागद कसला लव्ह लेटर होत ते ) शाळेतल्या एका मुलीने ह्याला लव्ह लेटर दिलं होत आणि गंमत म्हणजे लव्ह लेटर ह्याला दिलंय अन हाच घाबरला होता. त्याच्यासोबत मी पण थोडासा . पुढे काय मग ते लेटर आम्ही फाडून फेकून दिलं, ह्यासाठी की जर सरांना हा प्रकार कळलाचं तर मार आम्हालाच भेटेल.कारण मुलींना थोडी असे प्रकार माहीत असतात, वाईट तर मुलंच असतात ना...! 

शाळा सुटल्यानंतर झालेला सर्व प्रकार आम्ही दिपक ला सांगितला, आम्ही त्याला हे ही सांगितलं की ते लेटर आम्ही फाडून टाकलं. आमच्या ह्या निर्णयावर त्याने फक्त होकारार्थी मान डोलावली. आज आम्हाला दिपकच्या घरी जायचं होतं कारण तेवढंच महत्त्वाचं होत. वाढदिवस

हो आज दिपकचा वाढदिवस होता. बरं तुम्हाला माहीत नसेल पण मी सांगतो दिपक खुप सुगरण आहे. त्याच्या वाढदिवशी त्याने आम्हा मित्रांसाठी पोह्याचा बेत ठेवला होता.

स्थळ: - दिपकचं घर 

आकाश :- भाई तेरे हाथ मे जादू है यार.

दिपक : - थैंक्यू भाई 

राहुल :- तुला एवढा चांगला स्वयंपाक जमतो कसा यार. 

दिपक : - आईचे उपकार 

बाकीचे सगळे मित्र पोह्यांचा आस्वाद घेत होते. दिपक ने केलेल्या पोह्यांची चव अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळतेय. मला अजून सुद्धा आठवतंय पोहे कम चिवडा ह्या पद्धतीने त्याने केलेले होते. पोहे क्लास होते एकदम मजा आ गया. 

शाळा सुरू होऊन दोन महिने झाले होते, एव्हाना सप्टेंबर महिना देखील सुरू झाला होता.आणि आम्ही मुलांनी अजूनही क्लासेस जॉईन केले नव्हते. माझा आणि आकाश चा विचार होता की दिपक ने जिथे क्लास जॉईन केला आहे तिथेच जावं. आणि आम्ही एकमताने निर्णय घेतला. आज दिपक जातो तिथे क्लास जॉईन करायचाच.

स्थळ :- शाळा ( वर्गात ) 

शाळेचा पहिला लेक्चर 

गुड मॉर्निंग सर....

आज सरांचा मुड नव्हता शिकवायचा म्हणून सर मुलांच्या घोळक्यात येऊन बसले. अगदी आमच्याच शेजारी मग काय इकडच्या तिकडच्या गप्पा, अभ्यासबद्दल बोलू काही ..! नंतर महत्त्वाचा मुद्दा.

पाटील सर :- काय रे, क्लास ला जाता का तुम्ही कुठे ? 

आकाश आणि मी : - नाही सर अजून, पण आजपासून जाणार आहे दिपक जातो त्या क्लास मध्ये.

पाटील सर : - किती फी आहे तिकडे.

सरांना आम्ही फी आणि बाकीची डिटेल्स दिली अन समोरून उत्तर आलं.

पाटील सर : - ठीक आहे मग आज शाळा सुटल्यावर माझ्याकडे या क्लास ला, आपला एवढा क्लास असून तुम्ही बाहेर जाता. बरोबर वाटत का हे.

आकाश : - अहो सर पण ते...( दचकून )

पाटील सर : - अहो - गिहो काही नाही, संध्याकाळी क्लासला यायचं, नाहीतर नापास करिन हा.. 

राहुल : - सर अस वाटतंय तुम्ही आम्हाला धमकी देताय.

पाटील सर : - हवं तर तस समजा.. माझ्या लाडक्या मित्रांनो.

आम्ही दोघे हताश झालो. ये कोनसा जबरदस्ती वाला क्लास है. पण नंतर विचार केला जाऊया रे सरांकडे निदान सर आपल्याला मारणार तर नाही. ह्याच गोष्टीला धरून आम्ही शेवटी क्लास जॉईन केला. पण आम्ही एकट्यानी नाही हा पूर्ण फलटणचं घेऊन गेलो. सलीम, सुशील, मी, आकाश, संदेश, अशोपाल ( अव्या ), फिरोज असे बरेच जण होतो. त्यात दुसऱ्या वर्गातल्या मुली सुद्धा होत्या

आता क्लास ला गेलो आम्ही तर तिथे ही भांडण. आमच्या मित्र अव्याच क्लास मधल्या एका मुली सोबत भांडण झालं. आता अवि हा शरीरयष्टी ने मजबूत सहज एका - दोघांना आरामात मारू शकेल, इतका पहेलवान गडी. भांडण करत असताना त्याने त्या मुलीला एक वाक्य रागातच बोलला पण ते वाक्य ऐकल्यावर आम्हालाच हसायला आलं की हा एवढा अवाढव्य असून असा कसा बोलू शकतो.

अवि : - हे बघ..! तू स्वतःला जास्त शहाणी समजू नकोस, नाहीतर मी तुला घाण घाण शिव्या देऊन पळून जाईल.. 

अरे..! एवढा बलाढ्य मुलगा मारून पळून जाईल बोलतो, हे ऐकूनच आम्ही हसत सुटलो. आणि भांडणाच रूपांतर हास्यात केव्हा झालं कळलंच नाही.


दुसरा दिवस उजाडला.

आज मी आणि आकाश खुष होतो कारण आम्ही सरांचा क्लास जॉईन केलाय म्हणजे सर आता थोडी आम्हाला मारणार. पण तुम्ही सगळे विसरत आहात, आम्ही तर मंदिर चा प्रसाद आहोत, तो कसा चुकेलं तो तर रोज भेटलाच पाहिजे ना.


स्थळ : - शाळा ( वर्गात )

शाळेचा पहिला लेक्चर

गुड मॉर्निंग सर....


पाटील सर : - इंग्रजीच पुस्तक कोणी आणलं नाही आणि आमच्या दोघांचा हात वर ...

मग काय सुरू झाला सरांच्या आवडीचा छंद अथवा खेळ असंही म्हणून शकता, तीन लाकडी पिवळ्या कलरच्या पट्ट्या...

अगं आई ग....!


स्थळ :- शाळा ( मधली सुट्टी )

"मी जाणार नाही पाण्याची बॉटल घेऊन पाणी आणायला, तु जा" असं बोलुन मी आणि आकाश आम्ही दोघांनी एकमेकांची कॉलर पकडली. 

(मधल्या सुट्टीत आम्ही दोघे वैशालीच्या पाण्याची बॉटल भरायला कोण जाणार ह्यावरून भांडत होतो. वैशाली ने आम्हाला लेक्चर सुरू असताना सांगितलं होतं, मधल्या सुट्टीत पाणी भरून आणा. )

आम्हा दोघांना बघून वैशाली आमच्याकडे धावत आली अन आम्हा दोघांना ओरडु लागली.

वैशाली : - तुम्ही दोघे पागल आहात का ?

आकाश : - वैशाली, तू ह्याला बोलली होती ना पाणी भरून आणायला. मग हा गेला पाहिजे तर मला सांगतोय ?

राहुल :- वैशाली आमचं ठरलंय, एक दिवस मी जाणार, एक दिवस हा. काल मी गेलो होतो तर आज ह्याचा नंबर आहे.

आकाश : - अगं पण मी काल जाणार होतो तर हाच बोलला मला तु थांब मी जातो. ह्यात माझी काय चुक.

राहूल :- हा मग मी काल गेलो होतो ना तर आज तुला जावं लागेल, नाहीतर ह्याला पाणी द्यायच नाही.

आकाश :- अरे तू कोण लागुन गेला रे...

आणि पुन्हा आम्ही भांडायला सुरुवात केली, शेवटी वैशाली ने पुढाकार घेत स्वतःच बोलली.

वैशाली : - अरे गाढवांनो..! थांबा एवढे चांगले मित्र आहात अन एवढ्या क्षुल्लक कारणांवर भांडता. मीच आणते पाणी, नका वाद घालत बसु.

एवढं बोलून वैशाली पाणी आणायला निघून गेली. आणि आम्ही दोघे मित्र एकमेकांच्या खांद्यावर हात ठेऊन मधली सुट्टीची मज्जा करायला गेलो.बिचारी वैशाली तिला तर आजपर्यंत माहीतच नव्हतं की तेव्हा आम्ही खोट खोट भांडत होतो.

आमची एक मैत्रीण होती, तिच्यासोबतची ओळख ही पाटील सरांच्या क्लास मध्ये झालेली, तिलाच भेटायला आम्ही दोघे तिच्या वर्गाकडे चाललो होतो. ती भेटली, क्लास मध्ये थोडे भांडण झाले होते म्हणून तिला मनवण्यासाठी आम्ही तिला भेटणार होतो.

ती : - तुम्ही इथे काय करताय ?

आकाश : - अगं..! तेच ते क्लास मध्ये आम्ही तुझ्याशी भांडलो त्यासाठी आम्हाला माफ करना.

राहुल :- हो ना एवढं काय त्यात, मैत्री मे तो इतना चलता ही हे.

ती : - मला तुमच्या दोघांशी बोलायच नाहीये कळलं निघा आता. ( थोडासा पण खोटा भाव खाऊन )

अस बोलुन ती पुढे पुढे चालू लागली अन आम्ही तिच्या मागे मागे तिची समजूत काढत होतो. पण काय आघाव होती राव..ऐकायला तयारच नाही.

ती : - अरे बाबा निघाना, मला नाही बोलायच तुमच्याशी..( पुन्हा पुढे पुढे चालू लागली )

आता मात्र आम्हाला पण राग आला एवढा म्हस्का मारतोय अन ही आपल्याला घास पण टाकत नाही, "अरे असा काय गुन्हा केला आम्ही". अस बोलून आम्ही तिच्यावर पुन्हा मोठ्याने ओरडलो पण ह्यावेळेस प्रतिक्रिया भेटली आम्हाला फरक फक्त एवढाच होता की ती प्रतिक्रिया तिच्याकडून नव्हती तर आमच्या मागे आमची कॉलर पकडुन आली होती.

बिरादार सर :- काय रे..! शाळेमध्ये मुलींना छेडता. चला आता स्टाफ रूम मध्ये बघतोच तुम्हाला.

आम्ही दोघे प्रचंड घाबरलो होतो आणि काय माहीत अश्या वेळेस तोंडातून आवाज का नाही निघत. बोलण्याचा प्रयत्न तर करत होतो पण आवाज बाहेर निघेल तर ना... 

( दबक्या आवाजात )

आकाश : - सर ती आमची बहीण आहे. थोडे भांडण झाले होते म्हणून तिला समजवायला आलो होतो.

राहुल : - हो सर, आमची बहीण आहे. हवं तर तिला विचारा.

आकाश : - अबे..! ती रागात आहे ती जर पलटली ना तर आपण उलथलो. हे सर नाही सोडणार रे आपल्याला.

राहुल : - हो रे बघना पूर्ण तयारीशी आलेत.

बिरादर सर: - बहीण.. आणि तुम्हा दोघांची.. थांबा. ये मुली इकडे ये कोण आहेत हे अन काय चाललं होतं, तू घाबरू नकोस ह्यांना बिनधास्त सांग, तुला त्रास देत होते का हे दोघे.

(आम्ही दोघे आपआपसात कुजबुजत होतो. सर ती काय घाबरणार, इथे आम्हीच घाबरलोय.)

आता सगळं तुच्या उत्तरावर होत अन ती उत्तरली.

ती :- हो सर माझे भाऊ आहेत हे आणि आम्ही असच मस्ती करतो नेहमी.

आता कुठे मोकळा श्वास घेतला आम्ही दोघांनी. सरांनी ही आम्हाला सोडून दिलं. आणि सूचना केली की, "हे असं वागायचं नाही बहिणीसोबत कळलं". अन सर निघून गेले. आता आम्ही तिघे एकमेकांच्या तोंडाकडे बघून हसू लागलो आणि आम्ही दोघे तिचे आभार मानू लागलो.

" अगं बर झालस वेळेवर राग सोडलास अन खर बोललीस तु सरांना, नाहीतर आज आमचं काही खर नव्हतं".

ती : - बघितलंत बच्चु...! ह्यापुढे मला त्रास दिला ना तर आजसारख पुन्हा नाही वाचवणार कळलं. 

" होय माते..! ह्यापुढे आम्ही दोघे तुला त्रास नाही देणार म्हणजे आज आम्हाला सूट आहे". अस बोलून आम्ही दोघांनी तिची वेणी ओढली अन पळून गेलो.

खरच खूप चांगली अशी मैत्रीण कम बहीणीसारखी होती ती, आता माहीत नाही कुठे आहे काय करते.पण जिथे ही असेल तिथे ती खुश असावी.


दोन दिवसानंतर

स्थळ : - शाळा ( वर्गात )

शाळेचा पहिला लेक्चर

गुड मॉर्निंग सर....

पाटील सर : - बसा, माझ्या मित्रांनो ( आज ना छोड़ेंगे तुझे दम दमा दम) आकाश आणि राहुल सोडून सगळे बसा.

आमच्या पाटील सरांना जुने गाणे म्हणायची खूप हौस त्यामुळेच वर जे होत आणि ते आम्हालाच चांगलं माहीत असणार ना कारण आम्ही सरांचे खास.

आम्ही दोघेही एकसुरात, " सर आम्ही काय केलं" ? 

पाटील सर : - काल शाळेत का आला नाहीत. 

दोघांनी आपआपली कारणं सांगितली पण सरांना आमचं उत्तर न पटण्यासारखचं कारण एकाच दिवशी आम्ही दोघे गैरहजर. योगायोग हो दुसरं काय पुढच्या भागात कळेलच आमच्या दोघांचा योगायोग.

सध्या साठी तरी सरांच्या आवडीचा छंद अथवा खेळ खेळूया तीन लाकडी पिवळ्या कलरच्या पट्ट्या आमची वाट बघत होत्या.

अगं आई ग....!

शाळेत असताना एक योगायोग माझ्या आणि आकाश च्या बाबतीत नेहमीच होत राहायचा. मी ज्या दिवशी शाळेला सुट्टी मारली नेमकं त्याच दिवशी तोही शाळेत नाही यायचा. क्लासेस च सुद्धा आमचं तसच होत असे. ज्या दिवशी तो क्लास ला नाही यायचा तेव्हा मी सुद्धा अपसेन्ट. पाटील सरांनी तर आम्हाला राम - श्याम ची उपमाच दिली होती. 


स्थळ : - शाळा ( वर्गात )

पाटील सरांच व्याकरण शिकवून झालं अन थोडा वेळ उरला होता लेक्चर संपायला अन आमच्या बाजूला येऊन बसले. खरतर आम्हाला सरांचा रागच आला होता, " काल सुट्टी घेतली म्हणून मारलं आपला माणूस आहे ना यार. थोडी तरी दया दाखवा". 

पाटील सर :- काय रे, काय करताय

दिपक : - सर त्यांना तुमचा राग आलाय, तुम्ही त्यांना मारलतं ना म्हणून.

पाटील सर :- अरे काय तुम्ही आपली पोर आहात, रागावताय काय. खोट खोट फक्त वर्गात दाखवायला.

" अहो सर..! पण आम्हाला खरखरं लागलं हो, तीन पट्ट्या घेऊन अस कोण वागत खोट खोटं ". आम्ही दोघे सोबतच बोललो.

लेक्चर संपलं अन सर निघून गेले. 

"आज ना छोड़ेंगे तुझे दम दमा दम" आमच्या समोर दिपक गाणं बोलू लागला तसही राग तर आलाच होता आम्हाला काढला त्याच्यावरच...

राहुल : - च्याआयला आधी ते गाणं बंद कर.

आकाश : - असा नाही ऐकणार हा ह्याची पान वाटायला घे रे.

दिपक : - ठीक आहे ना यार एवढं काय, बाय दि वे काल आला का नाही शाळेत तुम्ही दोघे.

आम्ही आपआपली कारणं दिली त्याला अन तो पुढे बोलू लागला.

दिपक : अरे तुम्हाला एक न्युज द्यायची होती. ह्यावर्षीच्या आपल्याला वार्षिक स्नेहसंमेलनात ( Annual Day ) डान्स परफॉर्म करायचा आहे 

राहुल : - नको यार... मागच्या वर्षी ( आठवीला ) पण आपण डान्स बसवलेला तरीपण आपल्याला घेतलच नाही त्यापेक्षा नकोच.

आकाश : - हो रे राहुल बरोबर बोलतोय. उगाचच पुन्हा पोपट नको.

दिपक : - अरे बाबांनो ऐका..टीम तयार आहे मस्त ग्रुप डान्स आहे, मुलं मुली एकत्र आहेत मज्जा येईल एक ताई आहे ती शिकवतेय. आणि आम्ही काल गेलो होतो, प्रॅक्टिस साठी म्हणून आज तुम्ही चला. 

आकाश : - ठीक आहे बघुया, गाणं कोणतं निवडलं आहे.

दिपक : - अरे गाणं कंगना वरून आहे काहीतरी पण स्टेप्स मस्त आहे डोळ्याची वैगेरे...

राहुल : - ठीक आहे बघू आज जाऊन काय ते.


पुढचा लेक्चर होता हिंदी

हिंदी विषय सोप्पा आणि परीक्षेत स्कोअरिंग वाला विषय होता. आमच्या शाळेत मुळे मॅडमह्या आम्हाला हिंदी हा विषय शिकवत होत्या. दिसायला त्या सुंदर होत्याच पण त्यांच्या आवाज ही सुरेख होता. त्या कविता जेव्हा शिकवायच्या ना तर खुप मस्त अशी चाल लावुन शिकवायच्या जेणेकरून आम्हा मुलांना कंटाळा येणार नाही व कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त शिकायला भेटेल. 

जेव्हा आम्हाला दिपकने ग्रुप डान्स साठी सुचवलं होत तेव्हापासून अथवा त्याच्या आधीपासूनच मुळे मॅडम च्या डोक्यात मी आणि आकाश एका नाटकासाठी जबरदस्तीने निवडून सुद्धा गेलेलो. ज्याची आम्हाला कल्पना सुद्धा नव्हती. त्याला कारणंही तसच..

आम्ही आठवीला असताना मुळे मॅडम आमच्या वर्गशिक्षिका होत्या आणि त्यावेळेस आम्ही मुलांनी एड्स वर नाटक बसवलं होत आणि त्यात आम्ही म्हणजे आकाश आणि मी लीडला होतो. कदाचित तेच पाहून त्यांनी ह्यावेळेस नवीन संकल्पना घेऊन ह्या वर्षी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सहभाग ह्यायच ठरवलं.

स्थळ : - शाळा ( वर्गात ) 

दिपक : - राहुल, आकाश तयार आहात ना तुम्ही आज शाळा सुटल्यावर आपल्याला जायचं आहे डान्स साठी माहीत आहे ना.

आम्हाला तसा काही इंटरेस्ट नव्हता आम्ही सहजच बघायला जाणार होतो की बघुया दिपक एवढा आपल्याला फोर्स करतोय तर बघून येऊ.

दिपकला आम्ही होकारार्थी मान डोकावली अन मागच्या बाकावर जाऊन बसलो जिथे लाडु, रेश्मा बसलेली होती.

पुढचा लेक्चर हा गणिताचा होता अन आम्ही तिघे म्हणजे मी आकाश आणि लाडु चिंगम खात होतो. तेवढ्यात डांगे सर वर्गात आले. सरांना आमच्याकडे बघुनच कळलं की आमच्या तोंडामध्ये काहीतरी आहे त्यांनी लगेचच आम्हाला सांगितलं," तोंडात जे काही आहे, ते फेकून द्या". 

आकाश आणि मी आम्ही चिंगम आमच्या पायाजवळ फेकलं. पण ह्या मूर्ख मुलीने लाडूने रेश्मा च्या अंगाला लावलं. ज्यामुळे बिचारीचा शाळेचा युनिफॉर्म खराब झाला. रेश्माला कळल्यानंतर तिने सर गेल्यावर लाडु ला खूप मारलं. अस वाटत होत की मुलींची WWF सुरू आहे ते पण लाईव्ह. तसही आमच्या रुपात तिथे प्रेक्षक तर हजर होतेच.

शाळा सुटली आणि दिपक ने सांगितल्या प्रमाणे आम्ही डान्स साठी त्या मुलीच्या घरी जायचं ठरवलं. काही ओळखीचे होते काही अनोळखी, त्यात ओळखीचे उज्वला, वैशाली, सलीम, सुशील, आकाश, शिवा, योगेश असे बरेच होते. दिपकला एक महत्त्वाच्या कामासाठी अचानक घरी जावं लागलं त्यामुळे तो नाही आला सरळ घरी गेला. मनात विचार आला एवढ्या सगळ्यांना घेऊन डान्स करायला चाललोय की गावच्या जत्रेत खेळणी विकायला. ( Jokes a part ) खेळणी घ्या, खेळणी ....

बर असो...जिच्या घरी जायचं होतं तिथे पोहचलो.एखाद्या कंपनी मध्ये जॉब साठी जशी मुलाखत घेतली जाते तशी आमची मुलाखत ( Practice ) घेण्यात आली. काही निवडले, काही वगळले गेले त्यात आमचा मित्र दिपक पण बाहेर निघाला.

मित्र रिजेक्ट झालाय याचा शोक करावा की आम्ही सिलेक्ट झालोय त्याचा आनंद सेलिब्रेट करावा, हेच कळत नव्हतं

काल आम्ही डान्स साठी सिलेक्ट झालो पण आमच्या मित्राला मात्र वगळण्यात आलं. दिपकला ह्याची कल्पना नव्हती कारण त्याला काल घरी काम होत म्हणून त्याला तिथे यायला जमल नाही. आज आम्ही शाळेत जाऊन दिपक ला सांगणार होतो.स्थळ : - शाळा ( वर्गात ) 

दिपक : - काय मित्रानो, केलं का तुम्हाला सिलेक्ट.

आम्ही दोघे मित्रासाठी थोडस निराश होऊन,

राहुल : - हो झालो रे पण त्या ताई ने तिथेच चार मुलं - चार मुली सिलेक्ट केली. त्यात तुझं नाव नव्हतं.

आकाश : - हो ना.

दिपक : - ( खुश होऊन ) अरे मग झाल ठीक आहे ना यार तुम्ही दोघे सिलेक्ट झालात म्हणजेच मी झालो. Am Happy For U....

त्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहून आम्ही दोघे ही खुश झालो. हा आहे दिपक, आमच्या खुशी मध्ये स्वतःला खुश मानणारा, आमच्या साठी आजही काहीही करणारा, वेळप्रसंगी मोठ्या भावासारखा सपोर्ट करणारा, आमच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवणारा. आमच्यासाठी मैत्रीचं उत्तम अस उदाहरण म्हणजे दिपकच. 

खरतर दिपक सारखा मित्र खूप कमी जणांना मिळतो. दिपक ने त्याच्या आयुष्यात कधीच कोणाचं ऐकलं नाही आणि स्वतः समोर कोणाचं चालू ही दिल नाही. आम्ही तिघे जेव्हा सोबत असतो ना तेव्हा आमची फ्रेंडशिप ही वेगळ्या लेव्हलवर असते जिथे कोणी पोहचू ही शकणार नाही.

बरेच जण विचारतात की तुम्ही तिघे अजूनही बेस्ट फ्रेंड आहात का ? तर त्यांच्यासाठी मी आज इथेच उत्तर देतो की, नाही आम्ही बेस्ट फ्रेंड नाहीये. आम्ही शाळेत असताना बेस्ट फ्रेंड होतो आता आम्ही त्यापेक्षाही पुढे गेलोय त्यामुळे हे बेस्ट फ्रेंड, खरा मित्रा, जवळचा मित्रा किंवा क्लोज फ्रेंड हे सगळं धोतांड वाटत. आमची मैत्री आता ही फक्त मैत्री राहिली नसून एकप्रकारे आमच्या परिवाराच्या आणि एकेमकांच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक बनली आहे. असू शकत का ह्यापेक्षा सुंदर अस मैत्रीचं नातं.

बरं असो आमच्या तिघांच्या मैत्रीवर वर जर लिहीत राहिलो तर शब्द अपुरे पडतील.

पुढचं लेक्चर सुरू होणार होत. पुढचा विषय खरतर मला आता आवडायला लागलाय पण खरंच मित्रांनो शाळेत असताना अक्षरशः झोप येत होती. तुम्हा सर्वांना कळलंच असेल कोणतं लेक्चर.

विषय : - इतिहास

सर : - खरात सर..!

खरात सर इतिहास विषय छान शिकवायचे पण का कुणास ठाऊक आम्हा मुलांना त्यांच्या लेक्चरला खूप आळस यायचा अन सर शिकवत असताना कधी आम्हाला पेंग यायची ते कळायचंच नाही. सरांची शिकवायची पद्धत खूप हटके होती. म्हणजे एका हातात पुस्तक बाकावर ठेवलेलं असायचं आणि दुसऱ्या हातात एक बारीक वेताची निळी चिकटपट्टी लावलेली काठी. आता ती काठी ह्यासाठी होती, सर शिकवताना पहिला सूर जोरात धरायचे मग हळू हळू आवाज एक लेव्हल ला आणून स्टेबल राहायचे अन मध्येच थांबून कोणत्याही एका विद्यार्थ्यांला उठवून प्रश्नाचं उत्तर विचारायचे. जर उत्तर चुकलं तर त्याच काठीने शिक्षा. सर तसे मनाने चांगले होते कोणाला त्यांनी कधीच विनाकारण मारलं अथवा ओरडल नाही.

मला आकाशचा एक किस्सा आठवतोय जो मला लाडु ने स्वतःहा सांगितला होता. पावसाळ्यात आमच्या शाळेची इयत्ता नववी ची पिकनिक ( सहल ) गेली होती, पिकनिक ला मी गेलो नव्हतो. 

पिकनिक एका रिसोर्टला गेली होती, तिथे मस्त जेवण, स्विमिंग पूल, स्लाइडस होत्या आणि ह्यां सगळ्यांनी ही मस्त मज्जा केली होती. तर झालं असं होत की आमच्या वर्गातील सगळे जण स्विमिंग पूल मध्ये मस्त पोहत होते. आणि तिथेच गृप मध्ये एक टपोरी मुलगा होता जो आमच्या एका चांगल्या मैत्रीच्या मागे मागे लागून तिला त्रास देत होता. बिचारी ती मुलगी रडकुंडीला आली होती आणि हे लांबुन पोहताना आकाश ने पाहिलं. मग काय आमचे परममित्र आकाश खूप संस्कारी, मुलींना अस संकटात पाहिल्यावर त्यांना काय करू नि काय नाही असं होतं. ताबडतोब आकाश तिच्यापाशी गेला आता समोरचा जो मुलगा होता हा आकाश पेक्षा ताकदवान पण नेहमीच ताकद कामाला नाही येत त्यासाठी अक्कल पण पाहिजे. युक्ती करून आकाश ने तिला त्याच्यापासून दूर ठेवले ते ही पिकनिक संपेपर्यंत. आणि हा सगळा प्रकार लाडु ने पाहिला.

पिकनिकच्या दुसऱ्या दिवशी

लाडु : - आकाश, जरा बोलायच आहे तुझ्याशी.

आकाश : - हा बोलना लाडु.

लाडु : - अरे काल पिकनिक मध्ये जे केलस ना तू खरच यार खूप छान केलंस.

आकाश : - आभारी आहे पण खरंच ग, काही मुलं असे का असतात काय माहीत. मुलींना संधी नाहीतर जबाबदारी म्हणून का बघत नसतील ना .

लाडु : - सगळेच मुलं तुझ्यासारखे नसतात रे. खरच तुम्ही तिघे वेगळेच आहात. ( आकाश, राहुल, दिपक ) आणि तुम्ही माझे मित्र आहेत ह्याचा मला अभिमान आहे.

दोघांचही बोलणं झाल्यानंतर लाडुने मला काल घडलेला सगळा प्रकार सांगितला, हे ऐकून मनाला खुप समाधान वाटलं.

थोड्या वेळाने शाळा सुटणार होती अन तेवढ्यात वैशालीने आवाज दिला.

वैशाली :- राहुल, आकाश तुमच्या दोघांच्या लक्ष्यात आहे ना आज आपल्या सगळ्यांना डान्स प्रॅक्टिस ला जायचं आहे.

आम्ही दोघांनीही होकारार्थी माना डोलावल्या. शाळेची बॅग भरून आम्ही दोघे एकदम रेडी झालो होतो. आणि एकदाचे त्या मुलीच्या घरी पोहचलो डान्स प्रॅक्टिस साठी....आता पहिलाच दिवस असल्याने नावापासून सुरुवात.

डान्स मास्टर, आम्ही सगळे तिला ताईचं बोलायचो. आम्ही सर्वानी आपआपली नावं सांगितली. मला अजून ही आठवतय त्या ताईच आणि माझं संभाषण.

ताई : - तुझं नाव काय ?

मी : - माझ नाव राहुल.

ताई : - "राहुल" हे नाव माझं फेवरेट नाव आहे.

एखाद्या मुलीकडून अचानक आलेला प्रतिसाद होता आणि आम्ही लहान असल्यामुळे त्यावर काय प्रतिक्रिया देणार त्यामुळे

मी : - निःशब्द 

त्यानंतर आमची डान्स प्रॅक्टिस सुरू झाली.


कंगना तेरा नी सानू कर इशारे,कंगना तेरा नी सानू कर इशारे..

आमची डान्स प्रॅक्टिस खुप चांगल्या प्रकारे सुरू झाली. दिवसंदिवस आम्ही डान्स मध्ये खुप तरबेज झालो. ह्यावर्षी आमच्या वर्गातुन दोन डान्स ग्रुप भाग घेणार होते. एक तर आम्ही आणि दुसरा ग्रुप लाडु चा. आम्हाला आमच्या ग्रुप पेक्षा लाडु च्या ग्रुप मध्ये जायची जास्त इच्छा होती कारण ही तसच होत तिच्या ग्रुप मध्ये मुलीच मुली होत्या.

शाळेत असताना मला आणि आकाश ला एक मुलगी आवडायची. आवडायची म्हणजे फक्त ती दिसायला छान होती म्हणूनच, तर तशी एक होती आणि नेमकी ती मुलगी एकदा आमच्या डान्स प्रॅक्टिस च्या ठिकाणी सहजच डान्स बघायला येणार होती. 

स्थळ : - डान्स प्रॅक्टिसच ठिकाण ( ताईच घर ) 

आम्ही नेहमीप्रमाणे डान्स ची तयारी करत होतो आणि ती मुलगी ही तिथे आमचा डान्स पाहत होती. आम्ही दोघे आतल्या आत खुश, का तर ती आलीय ना म्हणून बाकी काहीच नाही आणि आम्ही दोघे ही मग तिच्यापुढे मुद्दाम स्टाईल मारायला लागलो. आता हे अस करताना वैशाली ने आम्हाला पाहिलं.

वैशालीने आम्हाला धडा शिकवायचा विचार केला म्हणून तिने मुद्दाम, हो मुद्दामचं सर्वांसमोर त्या मुलीचा आम्हाला भाऊ बनवला . काय सांगू किती वाईट वाटलं आमचा सगळा मूड उतरला. झालं असं होतं की डान्स प्रॅक्टिस संपली आणि आम्ही घरी जाण्यासाठी निघालो ती मुलगी दूर राहायची अन एकटी जायची.

वैशाली : - अगं, तू एकटी कशी जाणार आता.

ती : - अगं वैशु डोन्ट वरी मी जाईन मला सवय आहे.

वैशाली : - नाही थांब,

आमच्याकडे पाहून वैशाली ने आवाज दिला,

" अरे ही एकटी घरी चालली आहे, तिच्यासोबत तुम्ही जाता का ? तुमच्या बहिणी सारखीच आहे ती". ( गालात हसून ) 

त्यावर ती सुद्धा उदगारली, " हो आहेच ते माझ्या भावासारखे". आणि इट्स ओके, मी जाईल बाय...!

आणि ती निघून गेली.

असा राग आला होता ना पण काय करणार वैशु वर कस ओरडणार. ती मुलगी गेल्यानंतर खूप हसली आमच्यावर वैशाली...

इकडे लाडु च्या ग्रुप ची पण जोरदार तयारी सुरू होती.त्यांनीही मस्त डान्स बसवला होता. एका छोट्या कारणांमुळे आमच्यात आणि लाडुच्या ग्रुप मध्ये भांडण झाले होते पण फक्त दोन दिवसात ते निवळले. 

स्थळ : - शाळा ( वर्गात ) 

आम्हाला एक दिवस पाटील सरांसमोर डान्स प्रेसेंट करायचा होता त्यासाठी आम्ही तयार होतो अन तितक्यात मुळे मॅडम आल्या.

मुळे मॅडम : - राहुल, आकाश चला आपल्याला ह्यावर्षी नाटक बसवायचं आहे मागच्या वर्षी सारख तुम्ही दोघे लीड ला आहात.

आम्ही दोघे :- अहो मॅडम ह्यावर्षी आम्ही डान्स मध्ये भाग घेतलाय त्यामुळे आम्हाला नाही जमणार हो.

मागोमाग गुरव सर पण आले.

पाटील सरांनी अक्षरशः वर्गातून आमच्या दोघांची हकालपट्टीच केली. कारण आमच्या मुळे लाडूचा ग्रुप डिस्टर्ब होत होता. 

शेवटी आम्ही मुळे मॅडम आणि गुरव सरांसोबत निराश होऊन निघून गेलो. आमच्या डान्स ग्रुप ला एकदमच आश्चर्याचा धक्का बसला की आता पुढची प्रॅक्टिस कशी आणि कोणाला सोबत घेऊन करायची.

दुसऱ्या वर्गात : - नाटक 

।। आम्ही राजाचे नोकर नि  बंदुक ठेवलीया कमरेवर ।।

ही आमच्या नाटकातील गाण्याची आणि नाटकाची सुरुवात होती. हे गाणं बोलतच आम्ही नाटकाची प्रॅक्टिस सुरू केली पण काही केल्याने तो मोहोल आम्हाला बनवता येत नव्हता. कारण नाटक हे सांस्कृतिक, वैचारिक पद्धतीच होत आणि आम्ही गेल्या दोन आठवड्यापासून वेस्टर्न गाण्यांवर स्वतःचा जम बसवुन होतो त्यामुळे तो मोहोल बनतचं नव्हता. 

मुळे मॅडम आणि गुरव सरांचं आमच्यावर लक्ष नसेल तर आम्ही कितीतरी वेळा नाटक सोडून पळून आलोय आणि ते आम्हाला प्रत्येक वेळी शोधुन काढून पुन्हा नाटकाच्या प्रॅक्टिस साठी घेऊन जायचे. आता त्यांना सुद्धा कळुन चुकलं होत की ह्याचं मनंच नाहीये नाटकांसाठी त्यामुळे त्यांनी आम्हाला नाटकातून मुक्त करून टाकलं आणि त्यांनी ही नाटकाचा नाद सोडला.

पुन्हा आम्ही आमच्या डान्स प्रॅक्टिस ला पूर्वीसारखी आणि नव्या उमीदने सुरुवात केली. शेवटी तो दिवस उजाडला आणि आमच्या वर्गातल्या दोन्ही ग्रुप ने उत्तम डान्स सादर केले. त्या दिवसाचा एक क्षण म्हणून आम्ही त्यावेळी ग्रुप फोटो काढला होता तो आजही माझ्याकडे व्यवस्थित सांभाळून आहे.


दोन दिवसानंतर...


वार्षिक स्नेहसंमेलन तर संपलं पण आमच्या मैत्रीतल्या स्नेह ला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. डान्स ग्रुप मधले आम्ही अनोळखी मित्र आज एकमेकांचे खुप जवळचे मित्र बनलो होतो. फक्त उज्वला ला वगळता कारण उज्वला ही माझ्या बालपणापासूनची मैत्रीण, अगदी पहिल्या वर्गापासून ते तिच्या शेवटपर्यंत.बरं आमचा डान्स खुप चांगला झाला होता त्यामुळे उज्वलाने तिच्या घरी आम्हा सगळ्यांसाठी सिवयाची खीर पार्टी म्हणुन आयोजित केली होती. मग काय जिथं कमी तिथं आम्ही, अशी म्हणचं आहे. 

उज्वला बद्दल थोडंस,

मला अजूनही आठवतंय, आम्ही चौथीच्या वर्गात होतो.ती खूप हुशार, सुंदर अक्षर, सतत बडबड अशी आणि मी लाजाळू, मुलींशी कमी बोलणारा. खरंतर लहानपणापासून आपल्या शाळेत रक्षाबंधनाच्या आधल्या दिवशी लाईन मध्ये जाऊन राखी बांधुन घ्या असा कार्यक्रम चालायचा.

उज्वला ही माझ्या मैत्रीण कम बहिणी सारखीच होती. त्यात सुुद्धा जोपर्यंत मी तिला चॉकलेट नाही देत तोपर्यंत मला राखी बांधत नसायच्या आणि दुसर्याना सुद्धा बांधत नव्हती. केसांचा बॉयकट करून मला येऊन सांगायची की, "मी माझ्या केसांमध्ये हवा भरली आहे ". ती सगळ्या मुलींपेक्षा खूप वेगळी होती. शाळेपासून ते अगदी तिच्या शेवटच्या घटकापर्यंत मी तिच्या प्रत्येक सुखदुःखात सोबत होतो. 

बरं ते असो, तर उज्वला च्या घरी खीर खायला जायचं होतं. शाळा सुटल्यानंतरची वेळ ठरवून आम्ही तिच्या घरी जाण्यासाठी निघालो. 


स्थळ : - उज्वलाचं घर 

आकाश, सुशील आणि सलीम च्या बाजूला मी, आम्ही मुलं असे बसलो होतो तर बरोबर माझ्यासमोर वैशाली बसली होती जास्त नाही फक्त दोन हाताचं अंतर असेल. आणि ज्या गोष्टीची आम्ही सगळे वाट पाहत होतो ते आमच्या समोर आलं "खीर ". आम्ही सगळी मुलं खीर वर तुटून पडलो आणि आमच्या गप्पागोष्टी सुरू झाल्या.

सर्वजण आपआपल्या धुंदीमध्ये होते, मी आणि वैशाली सुद्धा एका विषयावर बोलत होतो. तितक्यात माझ्या बाजूला बसलेल्या सलीम ने मस्त जोक मारला आता माझ झालं असं की माझ्या तोंडात खीर चा घास होता आणि मला हसण्याच थांबवता आलच नाही, मी माझ्या तोंडावर हात सुद्धा ठेवला पण जे नाही झालं पाहिजे तेच झालं माझ्या तोंडातली खीर माझ्या समोर बसलेल्या वैशाली च्या चेहऱ्यावर उडाली आणि तिने ही कशाचाही मागचा पुढचा विचार न करता स्वतःसमोर पाण्याने भरलेला तांब्या माझ्या डोक्यावर फेकला. अंघोळ तर झालीच पण डोक्यावर आयुष्यभरासाठीच निशाण उमटलं. नंतर कुणीतरी टॉवेल दिला आणि माझ्या डोक्यावर धरला जास्त नाही पण थोडंस खरचटलं होत. तर अशी गंमत झाली होती उज्वला च्या घरी, आज ही हा प्रसंग आमच्यासाठी एक अविस्मरणिय प्रसंग आहे.

इयत्ता नववी पासून खऱ्या अर्थाने आम्हाला मित्र मिळाले. आम्हा मित्रांचा चांगला ग्रुप बनला होता, ज्यात दिपक, आकाश, सलीम, सुशील, संदेश, अव्या, उज्वला, सुदर्शना, वैशाली, लाडु, मनाली, रेश्मा, प्रभा, राधिका, पुनम, प्रेमलता असे बरेच जण जोडले गेले. आता आमच्या सर्वांच्या आयुष्यात येणार होता महत्त्वाचा टप्पा..

दहावी

नववीमध्ये खूप धमाल मस्ती सोबत अभ्यास करून आम्ही सगळे दहावीत पोहचलो. पण शाळेच्या पहिल्याच दिवशी मन उदास झालं कारण ही तितकंच निराशाजनक होत. काही जण वेगवेगळ्या तुकडीमध्ये विभागले गेले त्यात माझे मित्र आकाश आणि दिपक सुद्धा होते. त्यामुळे दहावी तशी तितकी मजेशीर नाही गेली काही महत्त्वाचे आणि विलक्षण क्षण सोडले तर. दिपक आणि आकाश हे वेगळ्या तुकडीत तर मी, संदेश आणि राज आम्ही वेगळ्या तुकडीत विभागले गेलो. बाकी ज्या ज्या मुलींचे नाव मी नमुद केले होते त्या सगळ्या माझ्याच वर्गात होत्या. आकाश आणि दिपक जरी वेगळ्या वर्गात गेले असले तरी आम्ही शाळेच्या मधल्या सुट्टीत एकमेकांना न चुकता भेटायचोच, तसा दिपक चा जास्त समावेश नसायचा. तसही वेगळ्या वर्गात आकाश आणि दिपक ने सुद्धा खुप धमालमस्ती केलीच. काही नवनविन आणि अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी दिपकने आकाशला शिकवल्या ज्या भविष्यासाठी खुप उपयुक्त ठरल्या .

दहावीत आल्यानंतर माझा गणित हा विषय खूप जास्त पक्का झाला होता अर्थात हे सगळं श्रेय डांगे सरांचं. गणिताच्या तासाला सर शिकवत असताना गणित सोडवण्यासाठी वर्गात माझा हात आधी वर उठायचा, एवढा तो विषय माझ्यासाठी पक्का झाला होता. तिकडे त्या दोघांच्या ( आकाश, दिपक ) वर्गात ही परिस्थिती काय वेगळी नव्हती. ते दोघे ही गणितात खूप पक्के झाले. जेवढं माझ्या गणितासाठीच श्रेय मी डांगे सरांना देतो, तेवढंच ते दोघेही त्यांनी जे काही गणित शिकलं त्याच सगळं श्रेय हे त्यांचे दहावीचे वर्गशिक्षक आणि गणित विषयाचे सर "देशमुख सर" ह्यांनाच देतात.

देशमुख सर .... दहावी / क ह्या वर्गाचे गणित विषयाचे वर्गशिक्षक होते. माझा कधी प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलण्याचा काही योग आला नाही किंवा त्यांच्या लेक्चर ला बसायची संधीही भेटली नाही. पण सरांविषयी मी जे काही ऐकलं होतं ते फक्त दिपक आणि आकाश यांच्याकडुनचं. सर स्वभावाने खूप शांत आणि मितभाषी होते. कधी कोणत्या विद्यार्थ्यांला त्यांनी मारलं असेल असं कधीच मला ह्या दोघांनी सांगितलेलं आठवत नाही. त्यांची गणित शिकवण्याची पद्धत इतर सरांपेक्षा वेगळी होती म्हणूनच हे दोघे गणितात अग्रेसर झाले होते आणि त्यांच्या वर्गात गणिताचे हुशार विद्यार्थी म्हणून एकमेकांसोबतच स्पर्धा लावायचे की पाहिलं गणित कोण सोडवणार. फार कमी सर आहेत जे आकाश आणि दिपक ला आवडतात, त्यात देशमुख सर यांचा समावेश होता पण ह्याच्या अर्थ हा नाही की बाकीचे सर नावडते होते तर तस मुळीच नाही. 

इथे मी आणि माझे नवीन मित्र अभ्यासात जरा जास्तच लक्ष देत होतो पण धमालमस्ती ला दुर्लक्ष करून कस चालेलं.

स्थळ : - शाळा ( वर्गात ) 

दोन नंबरच्या बाकावर आता मी, संदेश आणि राज आम्ही तिघे बसायचो आणि गंमत म्हणजे आम्ही तिघेही डावखुरे. हा निव्वळ योगायोग होता. दहावी ला गेल्यावर अभ्यासाचा ताण हा वाढलाच पण त्यापेक्षा जास्त शिकण्याची आवड आम्हाला जास्त निर्माण झाली, वर्गात फावल्या वेळेत मी, संदेश आणि रेश्मा आम्ही गणितातील ड गटातील गणित सोडवायचो. 

एकदा डांगे सरांनी समोर फळ्यावर आलेख काढून प्रश्नांची उत्तरे हा कार्यक्रम घेण्याचा बेत केला. सर्वांची तयारी तशी झालीच होती सोबत माझी ही आणि गणित म्हंटल तर आपलं एक पाऊल पुढेच. 

डांगे सर : - तु उठ.

सर फळ्यावर प्रश्न लिहिणार अन मी उत्तर देण्याचा टायमिंग सेम झाला, सरांनी प्रश्नचं बदलला.

डांगे सर :- अरे आधी प्रश्न तरी बघ काय आहे.

मी थोडा ही न डगमगता मनातल्या मनात, " सर तुम्हीच शिकवल आहे आम्हाला गणितं त्यामुळे तुम्ही कोणताही प्रश्न सांगा माझ्याकडे उत्तर तयार आहे".

प्रश्न फळ्यावर होता, उत्तर मनात होत लगेचच सरांना उत्तर देऊन जागेवर बसलो. सर पण खुश झाले, शेवटी त्यांनी घेतलेल्या मेहनतीचं फळ होत ते. 

दहावी ला असताना वैशाली जरा जास्तच नजर ठेवून होती, कोणत्या मुलीला बघायचं नाही, कोणत्या मुलीशी जास्त बोलायच नाही हे अस. एक दोन मुली होत्या ज्यांचा तिला स्वभाव पटायचा नाही त्यामुळेच कदाचित ती त्यांच्यापासून मला लांब ठेवायची. मला हे आवडायचं, त्यातून एका मोठ्या बहिणीची आपल्या भावाप्रती असलेली काळजी दिसून यायची. अशीच एक आठवण आहे, विज्ञान प्रदर्शन.

आमच्या शाळेपासून जवळच एका ठिकाणी विज्ञान प्रदर्शनी आयोजित केली होती आणि आम्ही ते बघायला जाणार होतो. आम्ही आमच्या ग्रुप सोबत निघालो आकाश ही नंतर आम्हाला येऊन भेटला. झालं असं होतं की जिथे प्रदर्शन होत तिथे आम्ही पोहचलो. आता विज्ञान प्रदर्शन बघायला तिथे सगळे मुलं मुली आलेल्या होत्या. त्यात काही मुली दिसायला छान होत्या म्हणून आम्ही म्हणजे आकाश आणि मी सहजच त्या मुलींकडे पाहिलं आता आम्हाला हे माहीत नव्हतं की आम्हाला ही कोणीतरी पाहत आहे. हो बरोबर वैशालीच. काय सांगू नंतर तिने आम्हाला जे काही सुनावलं आहे ना ते आम्ही शब्दात सांगु नाही शकतं. ती विज्ञान प्रदर्शनी आयुष्यभरासाठी लक्षातचं राहिली.

मी माझ्या संपुर्ण शालेय जीवनात नववी पर्यंत एकदाही शाळेतल्या पिकनिक ला गेलो नव्हतो. पण ह्यावर्षी मला काय माहीत काय वाटलं मी स्वतःहून शाळेच्या शेवटच्या वर्षी अर्थात दहावीच्या पिकनिक साठी तयार झालो. या वर्षी मी आणि दिपक आम्ही दोघेच होतो. कारण आकाश त्याच्या क्लासेस च्या पिकनिक साठी गेला होता. 

पिकनिकचा दिवस 

बसेस संपुर्ण भरलेल्या होत्या काही मुलं अजूनही बाहेरच आणखीन बसची वाट बघत उभे होते त्यात मी आणि दिपक सुद्धा होतो. फक्त शेवटची बॅच राहिली होती त्यात मराठी माध्यमाचे काही मुलं तर हिंदी माध्यमातल्या मुली उरल्या होत्या. शेवटची बस आली, चांगली ऐसपैस बस होती एक रो मध्ये मराठी आणि एक रो मध्ये हिंदी माध्यमांचे विद्यार्थी बसवले, त्याच बस मध्ये मी, दिपक, संदेश, सुशील, सलीम, अव्या आम्ही सगळे होतो. मी आणि संदेश एक सीट वर तर दिपक आमच्या मागच्या सीटवर होता आणि काही टपोरी मुलांचा ग्रुप होता तो शेवटच्या सीट वर होता.

बस काही अंतरावर गेल्यावर बस मध्ये संदेश ला सिगरेटचा वास येऊ लागला म्हणून तो शिव्या देतच उभा राहिला पण झालं असं की त्यातले काही मुलं हे त्याच्याच ओळखीचे निघाले त्यामुळे तोच गप्प राहून खाली बसला आणि बॅग मध्ये आणलेलं सफरचंद खाऊ लागला.

स्थळ :- पिकनिक स्पॉट ( रॉयल रिसॉर्ट, नालासोपारा )

रिसॉर्ट ला पोहचल्यावर सगळ्यात आधी आम्ही सकाळचा नास्ता करून स्विमिंग पुल मध्ये पोहण्यासाठी उतरलो. मुलामुलींमध्ये स्विमिंग पुल दोन भागात वाटला गेला आणि लक्ष्मणरेषा म्हणून सोबत आलेले आमचेच सर होते. रिसॉर्ट मध्ये लागलेल्या डीजेच्या आवाजात सगळेजण मस्त मज्जा करत होते आणि पुलाच्या बाहेर एकच व्यक्ती होता जो दिलखुलासपणे एकदम मनमोकळ्या मनाने त्या गाण्यांचा आनंद लुटत होता. तो व्यक्ती म्हणजे आपले सर्वांचे लाडके आणि अत्यंत जवळचे असे,

सी एस पाटील सर .....

सरांना त्या अवस्थेत पाहून आम्ही सुद्धा स्वतःला रोकू नाही शकलो आणि गेलो मग सरांना साथ द्यायला. तिथे गाणं बदललं तर इथे सरांची स्टेप बदलायची, त्यादिवशी सर्वांनी खुप धमाल केली, सगळे सर आमच्यासोबत एक दिवस आमचे मित्र म्हणून जगले.

महिन्याभरात बोर्डाच्या परीक्षा येणार होत्या. सगळ्याची अभ्यासाची जोरदार तयारी सुरू झाली होती. काही वर्गात तोंडी परीक्षा सुरू होत्या तर काही वर्गात मुलं प्रयोगवह्या पूर्ण करण्यात व्यस्त होते. परीक्षेचा मोहोल किती मस्त असतो ना सर्व ठिकाणी फक्त अभ्यास, अभ्यास आणि अभ्यासच.

म्हणतात दहावीचं वर्ष खूप लवकर सरत. आम्हाला सुद्धा कळलंच नाही, की वर्ष आलं कस नी गेलं कसं. दहावीच्या विध्यार्थ्यांना अभ्यासासाठी सॅण्डऑफ नंतर सुट्ट्या भेटतात. आम्हा दहावीच्या मुलांचा सॅण्डऑफ झाला, कोणाला माहीत होत आजचा हा दिवस सर्वांच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असणार होता. एका क्षणातच मनात असंख्य प्रश्न तयार झाली,

"पुन्हा आम्ही सगळे एकमेकांना भेटू शकेल का ?पुन्हा ह्या आठवणी जगता येतील का "?

शाळेतले किस्से, मित्रासोबतची मस्ती, मुल शिकताना लक्ष नाही देत म्हणुन सरांनी मारलेला खडु, वेळप्रसंगी बवलेली बहीण, खोट भांडण, मुलींशी गप्पा, बॅच वर कर्ककटकने कोरलेली नाव अजूनही तिथे असतील का ? 

वर्षभर आदराने वागवलेले डांगे सर, कधीही आमच्यावर हात न उचललेले खराटे सर आणि अर्थात आमच्या आवडीचे आणि जवळचे आम्हाला कधीही मारायला न चुकणारे सी एस पाटील सर ह्या सगळ्या सरांची खूप आठवण येईल.

( ह्यात काही सर आणि मॅडम ह्यांची नाव राहिली आहेत त्यासाठी माफी असावी पण सगळेच जण शाळेत आम्हा विध्यार्थ्यांना उत्तम असे मार्गदर्शक होते आणि त्यांची जागा ही फक्त शिक्षक दिन पुरती मर्यादित नसून ती आम्हा विद्यार्थ्यांच्या हृदयात कायमची कोरलेली आहेत.) 

आम्हा सगळ्या विध्यार्थ्यांसाठी परत त्याच शाळेत जाऊन आम्ही बसलेल्या बाकावर पुन्हा बसून आयुष्याचे धडे शिकण्याचा आनंद हा नक्कीच अविस्मरणीय असेल.

इयत्ता आठवी पासुन ते दहावी पर्यंत आम्हा मुलांच्या ज्ञानात ज्या ज्या सरांमुळे भर पडली त्या सर्व सरांचे आम्हा विद्यार्थ्यांकडुन मनापासुन आभार.


आणि माझ्या शाळेतल्या सगळ्या मित्रांसाठी,


चला पुन्हा शोधूत्या निरागस बालपणाला जिथे स्वप्न सजले होते जेथे बालपण घालवले गेले झाडांच्या त्या सावलीत कुठे कच्चे घर बनवले होते..



Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy