तिची जागा
तिची जागा
आज त्याला एकीने प्रेमाची कबुली दिली... मनात दाबून ठेवलेली मैत्री आज प्रेमाच्या रूपाने तिच्या हृदयातुन बाहेर आली.. समोरून उत्तराच्या अपेक्षित असलेली ती, पूर्ण खात्रीशी होती, की उत्तर हे तिच्या समर्थानातच येईल..
तो पार गोंधळला होता, अचानक एवढ्या दिवसांनी त्याला मागे ओढल्यासारख झालं.. त्याला त्याच्या भूतकाळातील प्रेयसीची आठवण आली.. ठराविक कारणांमुळे सोबत नव्हती ती... पण नवीन मुलीने केलेल्या प्रपोज मुळे त्याला त्याची प्रेयसी आठवली... मनातलं कोंडून ठेवलेलं वादळ उसळू लागलं.. पण त्याने स्वतःला शांत केलं.. इकडे ती अजूनही उत्तराच्या अपेक्षेत होती..
पण त्याच्या डोक्यात मात्र सगळं फिट्ट होत, उत्तर त्याने लगेचच तिला नकार म्हणून दिल ही होत.. आणि त्या मागची कारणेही त्याने तिला समजावून सांगितली.. पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.. हुंदके देऊन रडत होती.. तो तिला भविष्य आणि खऱ्या परिस्थितीची जाणीव करून देत होता.. आपल्या मध्ये असलेलं मैत्रीचं नातं हे किती गोड आणि पाण्यासारख पारदर्शक आहे, ह्याच महत्व तिला पटवून देत होता.. ती त्याच्या सगळ्या गोष्टीला दुजोरा देतच होती.. तो समजावून थकला होता.. शेवटी एका वळणावर येऊन त्याने तिला आयुष्याच गमक सांगितलं...
हे बघ मैत्रीण ..! आता आपण एकमेकांना ज्या हक्काने भांडू शकतो, मारू शकतो, ओरडू शकतो किंवा एकमेकांना त्रास देऊ शकतो पण तेच आपलं मैत्रीचं नातं बदलून, जर एका वेगळ्या नात्यांच्या चौकटीत आलं, तर आपल्याला ह्या सर्वांची तडजोड करावी लागेल. तुला आता मी जसा आवडतोय तसा वेळेनुसार आवडणार नाही.. आता तू प्रेमात आहेस, म्हणून तुला माझ्या चुका शिवाय माझे दोष ही दिसणार नाहीत पण ह्याच गोष्टींचा तुला नंतर त्रास होईल.. हे सगळं मी समजू शकतो कारण जास्त पावसाळे पाहिलेला मी, हे सगळं माहीत असून ही, तुझं आयुष्य उध्वस्त करण्याइतपत मी मुर्ख नाही.
तु चांगली आहेस... एक मैत्रीण म्हणून..! तु निर्मळ आहेस..एक स्त्री म्हणून..! आणि तु नेहमी खुश रहावीस.. एक व्यक्ती म्हणून, असच मला नेहमी वाटत....बाकी भूतकाळातली त्याची प्रियसी जी कधीकाळी त्याची होती पण आज कुठेतरी हरवून गेली आहे.. त्याला क्षणभरासाठी पुन्हा ती आठवली...
त्याचे सगळे शब्द तिला कळले, त्याने आयुष्याचा सगळा सार किती मोजक्या शब्दात मांडला होता.. म्हणून त्याच्याकडे ती कौतुकाने पाहत होती.. आता तीच रडणही थांबलं होत.. तिला त्याच्या भूतकाळातील प्रेयसी बद्दल सगळं माहित होत.. तिला एक गोष्ट मात्र कळून चुकली होती की त्याच्या हृदयात असलेली त्याच्या प्रेयसीची जागा ही कोणीच घेऊ शकत नाही... अजूनही तो मूव्ह ऑन झाला नव्हता... चेहऱ्यावर हसूच आव आणून ह्या खोट्या जगात वावरणारा तो, मुळात मनातून अजूनही एकटाच होता... त्याच्या प्रेयसीच्या आठवणीत...
निघताना तिने त्याला सॅल्युट केलं आणि बोलली, मला तू नेहमी आवडत होतास, माझं तुझ्यावर नेहमीच प्रेम असेल पण ... मी तुझ्या भूतकाळातील प्रेयसीला हरवू शकले नाही... मी तिची जागा घेऊ शकले नाही... तुझं अजूनही तिच्यावरच जीवापाड प्रेम आहे.. तु मान्य कर अथवा नको करुस पण हे तु मला नकार देऊन सिद्ध करून दाखवलंयस....
खरच यार.. प्रेम म्हणजे काय असते, मला माहीत नाही पण जेव्हाही प्रेमाचा विषय निघेल, मला फक्त तूच आठवशील... आयुष्याभरासाठी...अन ती त्याला मिठी मारून निघून गेली...
तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून त्याच्या भूतकाळातील प्रेयसीच्या विचारात पडला, खरच मी अजूनही तिच्या आठवणीत आहे का ? आज ३ वर्ष होऊनही मी मूव्ह ऑन झालोच नाही का ? ह्याची उत्तरे भलेही त्याला माहित नसतील पण ती जाताना बरोबर बोलून गेली की, हृदयात असलेली ती जागा फक्त तिचीच... तिथे दुसरं कोणी होणे शक्यच नाही...कारण तिने ती जागा कमावली आहे.
सातजन्मासाठी...
#lovelanguage

