अतूट नातं
अतूट नातं
" गैरसमज " फक्त पाच अक्षरी शब्द... पण एखादं नातं तोडण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. मग ते नातं प्रियकर - प्रियसीच असो, आई वडिलांच असो, सासू सुनेच असो वा, भावा बहिणीचं असो...पण इथे गैरसमजामुळे आमच नातं ... तुटलं नाही म्हणता येणार, फक्त आम्ही एकमेकांना स्पेस दिला, नात्यांची कटुता दूर करण्यासाठी. शेवटी काय तर भावा बहिणीचं नातं हे असंच असत, एक रुसला तर दुसरा मनवत नसतो, तो पण रुसतो.
आयुष्यातला अत्यंत कठीण काळ म्हणजे २०११ हे वर्ष, कारण काही गैरसमजांमुळे आम्ही बोलत नव्हतो.
" निलेश " माझा भाऊ... ! जस भावा - बहिणींच्या नात्यांत कुरबुरी होतात, तसच काहीसं आमचं झालं होतं ...! पण १३ ऑगस्ट २०११ ला मी तुझी खूप आतुरतेने वाट पाहत होते. मला वाटत होते की तुझा कॉल नक्की येईल पण तूही कॉल केला नाहीस आणि माझी ही हिम्मत झाली नाही. अन त्यादिवशी मला कळून चुकले की, मी माझ्या आयुष्यातला माझा हितचिंतक, माझा रक्षक हरवून बसले.
घरी सगळेजण सारख सारख तुझ्याबद्दलच बोलत होते रे.. " निलेश ..! का नाही आला ? " आणि मी त्यांच्या प्रश्नांची उत्तर न देता फक्त शांत होते पण डोळ्यात आसवांचा पूर आला होता. मन भरून आले होते.
न राहून शेवटी मी आजीला बोलले, " आजी..! निलेश कामात खूप बिजी आहे, पण मग मी आणलेल्या राखीच काय करू ..? " आजीनेही माझ्या डोळ्यातील भावना समजून घेऊन मला जास्त काही न विचारता सांगितले, श्रीकृष्ण आहेत ना ! आपले, बांध त्यांना कित्येकांचे रक्षणकर्ते आहेत ते ..! आजीचं ऐकून मी लगबगीने घरातल्या देव्हाऱ्यात गेले. हात जोडून श्रीकृष्णाला वंदन केले.
राखी बांधताना मनातून फक्त हेच म्हणत होते, हे कृष्णा ..! तुझ्यात आणि माझ्या निलेश मध्ये काहीच फरक नाही, मी नेहमी तुलाच राखी बांधेन. आणि निलेश ...! मग मी तुझ्या आठवणीमध्ये धुंद होऊन कृष्णाला तुझ्या नावाने राखी बांधली.
पण आज ही माझे पाझरलेले डोळे तुझ्या येण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. कधीतरी तु येशील आणि म्हणशील, " बस आता, मी आलोय मला राखी बांध ती.."
***
