Jyoti gosavi

Classics Inspirational

3.8  

Jyoti gosavi

Classics Inspirational

वाचू आनंदे

वाचू आनंदे

3 mins
184



बरं झालं देवा !आमच्या काळामध्ये मोबाईल आणि टीव्ही नव्हते. 

नेटवर्क इतकंच जाळ नव्हतं,,नव्हे नव्हतच. 

ही अशी प्रलोभने नसल्यामुळे, आपोआपच मनोरंजनाचे साधन म्हणून पुस्तक जवळ केली गेली. 


त्यातूनही आम्ही इतक्या खेडेगावांमध्ये वावरत होतो, जेथे लायब्ररी नावाचा प्रकार देखील नव्हता. परंतु आमचे शाळेतील सर आम्हाला पुस्तके वाचायला देत असत. आमच्या शाळेची लायब्ररी खूप छान होती. आणि रोटेशनने पुस्तके वाटली जात असत. 

शिवाय घरात देखील सारे पुस्तक प्रेमी, त्यामुळे अक्षर ओळख झाल्यापासूनच" र ट फ "असे शब्द जोडत रस्त्यावरच्या पाट्या वाचणे हा वाचनाचा पहिला छंद. बर गावात इन मीन तीन दुकाने, एखादी पतपेढी,  दूध डेरी आणि एक स्वस्त धान्याचे दुकान, पण त्यावरचे अक्षरे वाचत वाचत कधी त्या अक्षरांच्या प्रेमात पडलो तेच कळले नाही. सारेच घर पुस्तक प्रेमी असल्यामुळे, आम्हाला शाळेमधून आमचे सर ऐतिहासिक कादंबऱ्या वाचायला देत असत. त्यामध्ये झेप, झुंज, राऊ, मंत्रावेगळा, अशा शिवाजी महाराजांवर ती आणि पेशवाई वरती अनेक कादंबऱ्या वाचल्या. मृत्युंजय छावा, युगंधर, श्रीमान योगी हे देखील वाचले. .

कोणतंही पुस्तक  वर्ज्य नव्हतं. 

कुमार चांदोबा इत्यादी पासून ते अगदी ना. स. इनामदार ,ना सी फडके शिवाजी सावंत, बाबा कदम ,देवदत्त पाटील, योगिनी जोगळेकर आणि कितीतरी लेखक वाचले असतील ज्यांची नावे आठवत नाहीत. 

इतकेच काय बाबुराव अर्नाळकर यांच्या डिटेक्टीव दुनियेमध्ये रमून गेले . आठवी नववीत गेल्यानंतर चंद्रकांत काकोडकर आवडू लागले. 

घरात कुठून आणि कशी पुस्तके येत होती माहीत नाही, कारण पुस्तके विकत घेणे एवढी आर्थिक परिस्थिती मुळीच नव्हती. पण तरीही एक मोठी लाकडी पेटी पुस्तकांनी भरलेली होती. 

आजोळी गेल्यानंतर तेथे अनेक अध्यात्मावरची, धर्मावरची, पुस्तके वाचायला मिळत असत. "गीत रामायण" या पुस्तकाची प्रथम मला तेथे ओळख झाली, आणि मी त्याचे पारायण करत बसले.  बालपणी कुमार, चांदोबातल्या कथा, तरुणपणी बाबुराव अर्नाळकर यांच्या डिटेक्टिव कथा ,चंद्रकांत काकोडकर यांच्या रोमान्स ने भरलेल्या कादंबऱ्या, त्या त्या वयात सोबती झाले होते. ऐतिहासिक कादंबरी तर आमच्या घरात ,अभि वाचनासारखी वाचली जाई. तेव्हा याला "अभिवाचन" वगैरे म्हणतात ते माहित नव्हते. शाळेची पुस्तके लवकर द्यायची असायची, त्यामुळे ज्याला जसा वेळ मिळेल, तसे मोठ्यांदा सामुहिक वाचन केले जायचे. मला आजही ते दृश्य डोळ्यासमोर दिसतय. वडील शिलाई मशीन वर बसलेले असायचे, आई स्वयंपाकघरात काहीतरी करत असायची, आणि बरोबर जो मोठा मधला उंबरा होता, त्यावरती बसून कधी मी, कधी मोठी बहीण, कधी मधली बहीण, आम्ही मोठ्याने कादंबऱ्या वाचत असू, जेणेकरून सर्वांचेच वाचन पूर्ण होईल. 

त्या आई वडिलांचे देखील धन्यवाद मानले पाहिजेत, ज्यांनी आमच्यावर ती वाचनाचे संस्कार केले. पुस्तक वाचनाने खरोखर आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात, बऱ्याच माहीत नसणाऱ्या गोष्टी तेव्हा आपण आयुष्यात न बघितलेल्या गोष्टी, निव्वळ पुस्तकाने माहीत होतात. लहानपणी "ग्रंथ हेच गुरु" हे ऐकले होते ,त्यावर निबंध लिहिले होते. पण ते नुसते गुरु नाहीतर सोबती देखील आहेत .

आज खरोखर वाचनसंस्कृती लोपलेली आहे .मुलांना मोबाईल मधून पुस्तकांकडे जायला वेळ नाही. 

त्याकाळात आपणास मार्कांची, पर्सेंटेज यांची भाग दौड नव्हती, मार्कांची, नंबरची होड नव्हती. 

शिवाय मुलांना मल्टी टॅलेंटेड बनवण्यासाठी, नुसता अभ्यास करून चालत नाही, तर हा क्लास, तो क्लास, एक्स्ट्रा क्लास, त्यामुळे अक्षरशा त्यांचं बालपण करपून ,कोमेजून जातंय .

त्यांना स्वतःचे छंद जोपासता येत नाहीत. 


    दिवाळीमध्ये दिलेले गृहपाठ पूर्ण केले की आपण पुस्तक वाचायला मोकळे होतो. 

शिवाय उन्हाळ्याची सुट्टी तर हक्काची, सकाळी मस्ती, हुंदडणे ,सगळे प्रकार झाले, की संध्याकाळी पुस्तक वाचनाला मोकळीक. 

मी तर अगदी आईने वाळत घातलेल्या सांडगेपापडांची, कुरड्यांची राखण करता करता, अनेक पुस्तके वाचली आहेत. 

गुलशन नंदाच्या देखील कटी पतंग सारख्या आधी कादंबऱ्या वाचल्या, आणि नंतर खूप वर्षांनी पिक्चर पाहिला..


आता बोलणे सोपे आहे की, "मुलांना पुस्तकांची गोडी लावा." पण प्रत्यक्षात कठीण आहे. 

 ,कारण आता मूल जन्माला आल्यावर सगळ्यांना पहिले दर्शन देते मोबाईल वरून, 


 मी माझ्या हॉस्पिटलला कित्येक आयांना, मुलांच्या हातात तासन्तास मोबाईल देताना बघितलेला आहे. त्यांना मी ओरडत देखील असते. 

मोबाईल पाहून पाहून डोळ्याला सोडावॉटर सारखी झापडे लागलेली आहेत. 

पण "आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?आपल्या मागची जी एक पिढी झाली, जी आता चाळीशीत आहे. 

त्यांनाच वाचनाची आवड नाही, तर त्यांच्या मुलांना कुठून येणार ?तरीपण आता जी मंडळी, आजी-आजोबा आहेत. 

त्यांनी आपल्यापरीने प्रयत्न करावे? मुलांना वाढदिवसाला चॉकलेट, कपडे ,पैसे देण्याऐवजी, पुस्तके प्रेझेंट द्यावीत. 

भले इंग्लिश मिडीयम ची नातवंडे असतील, तर इंग्लिश मीडियम ची पुस्तके द्या, अर्थात आपली मातृभाषा सोडू नका, ती पण द्या. 

त्यांना पुन्हा एकदा पुस्तकांची गोडी लावा. शेवटी आपण आपले प्रयत्न करत राहायचे कुठेतरी यश येतेच. 



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics