Sanjay Phadtare

Children

3  

Sanjay Phadtare

Children

ठिगळ

ठिगळ

2 mins
43


किसनला त्याचा नातू मंगेशच्या रड्याचं आज थोडं अप्रुपच वाटलं.कारण खेळायला जातांना हा ड्रेस नको म्हणून त्याचं सुनेकडे रडणं सुरु होतं.शेवटी समोरचे दोन तीन ड्रेस सोडून पाहिजे तोच ड्रेस घातल्यावर गडी रडायचा थांबला होता.'चल बेट्या,काय रडतोस' असं म्हणत किसन त्याला खेळायला घेऊन गेला.सोसायटीच्या डाव्या बाजूला घसरगुंडी,पाळणा, सी सॉ अशा बऱ्याच खेळण्यावर बरोबरच्या पोरात मंगेश लागलीच रमूनही गेला.किसनच्या लहानपणी हे सारे खेळ फक्त त्यानें चित्रात पाहिलेले होते. नातवावर नजर ठेवत बाजूच्या बाकावर किसननं बैठक मारली.

  किसनचा मुलगा प्रकाशचा हा मंगेश थोडासा उशिरा झालेला एकुलता एक मुलगा.पोरगं अन सून दोघेही इंजिनिअर त्यामुळे मंगेशचे लाडकोड जरा जास्तच होत होते.

    किसनने प्रकाशला जेमतेम परिस्थिती असली तरीपण जिकिरीने शिकवलं होतं.तोही परिस्थितीचं भान ठेवून निगुतीने शिकला.इंजिनिअर झाल्यावर नवरा बायकोच्या पगारात फ्लॅट घेऊन आता बऱ्यापैकी स्थिरस्थावर झालाय.

   बाकावर बसून मंगेशवर लक्ष ठेवता ठेवता किसनला त्याचं बालपण आठवू लागलं. शिवणी गावात आई वडीलांनी मोलमजुरी करत किसन व धाकटया भावाला शिकवलं होतं.१९७२ च्या दुष्काळात येरळा नदीच्या पात्रात खोदलेल्या विहिरीत देखील पाणी नव्हतं.मग कुठलं शेत अन कुठलं उत्पन्न.आई वडिलांनी रोजगार हमी योजनेत कामावरून आणलेली सुकडी त्यानं आवडीने खाल्ली होती.गावांत शाळा असली तरी चौथी,सातवीला तडसरच्या केंद्र शाळेत परीक्षा देत तो म्याट्रिक झाला.शाळेसाठी पांढरा शर्ट व खाकी चड्डी व गांधी टोपी असा एकच ड्रेस असायचा.शाळेचा एकमेव हा ड्रेस शनिवारी धुवून सोमवार पासून पुन्हा अंगात तोच घालायला लागायचा.पावसाळ्यात कधी कधी चड्डी न वाळल्यास तव्यावर तापवून किंवा कमरेला थोडीशी ओलसर असली तरी घालून जायला लागायची. बऱ्याचदा थोरल्या भावाची त्याला कमरेत बारीक झालेली पण जीर्ण चड्डी त्याला घालायला मिळायची. शाळेतून आल्यावर दिवाळीत घेतलेला बिस्कोट शर्ट व चड्डी अंगात घालायची.अंगात बनियान निकर घालायची तर पद्धतच नव्हती. त्यामुळं कितीही जपलं तरी चड्डी टिरीवर हमखास जीर्ण व्हायची. पण ती तशीच घातल्याशिवाय इलाज नव्हता.दुसरी चड्डी घ्या म्हणून हट्ट केला तरीही कोणी ऐकून घेत नव्हतं.येऊन जाऊन आई त्याला ठिगळ लावून द्यायची.मग तीच चड्डी थोडी बहुत मजबूत व्हायची; पण ठिगळ दिसू नये म्हणून ते शर्टच्या मागच्या पंख्याखाली लपवायचा प्रयत्न किसन करायचा.त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणून कधी खिळ्याचा खोम्बारा लागुण अगदी काटकोनात शर्ट किंवा चड्डी फाटली तर आणखीच पंचायत व्हायची.पण कपडे अगदी जपून अन जीर्ण होईपर्यंत घालण्याशिवाय पर्याय नसायचा.कालांतराने अशी चड्डी घालायची जणू सवयच त्याला लागली होती.मात्र भले आता परिस्थिती बदलली पण आजच्या पिढीस ठिगळाची चड्डी सोडा पण जीर्ण झालेलं कपडेही घालायचं माहीत नाही. मुलुख महाग कपड्याचा नुसता ढीग असतोय.कसलीच कोणाला ददात नाही की कपड्याचे कौतुक उरले नाही.ठिगळाची कपडे घातलेला शोधून सापडायचा नाही. काही दिवसांनी घरातला सुई दोरा अन त्याचा वापर देखील कालबाहय होईल असंच किसनला वाटायला लागलंय.मनसोक्त खेळून झाल्यावर मंगेशच्या हाकेने किसन भानावर आला.मात्र नवीन पिढीला काकटकसरीचं जाणीव होत नाही याची खंत त्याच्या मनाला सतावू लागली.



Rate this content
Log in

Similar marathi story from Children