वानराचं अवधान
वानराचं अवधान
वडिलांच्या नोकरीमुळे आटपाडी तालुक्यातील श्री सिद्धनाथचे जागृत देवस्थान असलेल्या खरसुंडीत जन्मापासून अगदी १९७१पर्यंत माझं बालपण मजेत गेलं.कोरडवाहू क्षेत्र असलेल्या त्या गावात सिद्धनाथाच्या चैत्र व पौष महिन्यात मोठया यात्रा भरायच्या.दगडी शिखर असलेल्या भव्य मंदिरामागे देवाची बाग आहे. तिथे असलेल्या विहिरीच्या पाण्यानेच देवाला आंघोळ घातली जायची.मंदिराच्या प्रवेशद्वारात चौथऱ्यावरच्या दगडी उभ्या मारुतीचे दर्शन आम्ही घ्यायचो.सभोवताली उंच दगडी अनेक दिपमाळा व बंदिस्त आवारातलं हे मंदिर सर्वांचे श्रद्धास्थान आहे.यात्रेत नखशिखांत गुलालाने माखलेल्या भक्तांच्या जयघोषात गुलाल खोबऱ्याची उधळण करीत सासनकाठी निघायची.यात्रेत जातीवंत खिलार कालवड, गाई,खोंड व बैलांची खरेदी-विक्री व्हायची.याशिवाय दर रविवारी अन पौर्णिमेलाही पंचक्रोशीतील भक्त गुलालाची उधळण करीत सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गर्दी करत. दिवसभर सिध्दनाथाच्या नावानं चांग भलं.. जुगाईच्या नावानं चांग भलं...असा भक्तिमय जयघोष कानावर पडायचा.दिवसातून दोन वेळा सेवेकऱ्याच्या ढोल वादनासह दीपआरती (आम्ही दुपारती म्हणायचो)निघायची.रात्री शेजारतीने मंदिर बंद व्हायचे.रविवारी किंवा पौर्णिमेला गुरवांच्या घरोघरी भक्तांचा देवासाठी पुरणपोळी, भांगेचा नैवेद्य तयार करायची लगबग सुरु असायची.मंदिर अन सारी पेठ अगदी गुलालानं न्हाऊन निघायची. रस्त्यावर गुलालांन रंगलेल्या नारळाच्या केसराचे साम्राज्य असायचं.
आम्ही मंदिरालगत डवरी गल्लीत रहात असल्याने घंटानादा सोबत आरती, दुपारती आणि शेजारती कानावर पडायची.आम्ही बच्चेकंपनी शाळेला जातांना हिरु कळवात व उत्तम पुजारीच्या किराणा दुकाना समोरून पेठेतून रमत गमत जायचो.पौर्णिमा व रविवारी बाजाराच्या दिवशी साऱ्या पेठेत नारळ, गुलाल, उदबत्त्या,पितळी घोडे,मूर्ती विक्रीची दुकाने थाटलेली असायची. रस्त्यालगत व्हरांड्याच्या सावलीत काका परीट यांचा कोळश्याच्या ईस्त्रीचा टेबल असायचा.सडपातळ बांध्याचा हाफ चड्डी व अंगात पोटावर खिसा असलेली बंडी घातलेले आणि बिडी ओढून काळपट दात-ओठ असलेले पण हसतमुख असे ते व्यक्तिमत्त्व होते. सोमवारी शाळेत जातांना ते हमखास आमच्या टोपीला आनंदाने फुकट इस्त्री करून घ्यायचे.पेठेत पुढे बैठकीसाठी गाद्या अंथरलेले माडगूळकरांचे कापड दुकान होते. समोर दादा उडप्याचे हॉटेलात कांदा भजी,खारीबुंदी,शंकरपाळी खायला झुंबड असायची.पेठेतच शाळेचे मुख्याध्यापक शंकर देशपांडे गुरुजींचे घर होते.गंगुबाईची खानावळ, मुरलाआण्णाचे हॉटेल व पुढे जुगाई मंदिराजवळ एसटीचा थांबा होता.पेठेच्या पश्चिमेला सरकारी दवाखान्यासमोर आमची कौलारु शाळा होती.प्रार्थनेआधी शाळेचा परिसर झाडून लगतच्या आडाचे रहाटाने पाणी शेंदायचे अशा कामास आमची चढाओढ असायची. कोरडवाहू भाग असल्याने ठीक ठिकाणी पिंपरणी,लिंब,चिंच अशी झाडे होती.त्यावरून उड्या मारत चढ उतार करणारी वानरं बघतानां मजा वाटायची. एखाद्या धाडसी मुलांने हातात शेंगा धरून खायला बोलावताच काही वानरं झाडावरून सरसर खाली येत शेंगा उचलून खात झाडावर परतायची.मधल्या सुट्टीत पिंपरणीच्या पानाची पिपाणी तर पिकलेली टेंबरे,चिंचा खाण्यात आम्ही दंग असायचो.
असेच एकदा मधल्या सुट्टीनंतर शाळेत जाताना मला राजाभाऊ तांबोळी यांच्या सायकल दुकानाजवळ नाव्ही जालिंदर यादवाच्या दुकानाच्या पत्र्यावर एक वानर बसलेले दिसले.ते जाणीवपूर्वक घाबरत खाली येत दुकानातील लोकांना हाताचा पंजा दाखवत होते. दुकानातील लोकांनी याकडे सुरवातीला दुर्लक्ष केले.पण वानर पुन्हापुन्हा घाबरत खाली येत पंजा दाखवत होते.काहीजणांना ते भुकेले असेल म्हणून शेंगा किंवा भाकरीचा तुकडा त्याला देऊन पाहिले.पण काही केल्या ते न घेता किंवा न खाता पुन्हा वर जात होते.ही सारी गंमत बघायला आम्ही काहीजण सभोवती जमलो होतो.थोड्या वेळात ते पुन्हा पंजा दाखवत येऊ लागले.त्यामुळे दुकानात असलेल्या एका वयस्कर व्यक्तिने दुकानदार जालिंदरला त्याच्या हाताला जखम वगैरे झाली काय? ते बघायला सांगितले.मग जालिंदरनीही काहीसे घाबरत वानराचा पंजा हातात घेऊन पहाण्याचा प्रयत्न केला.आता वानर देखील त्याचा पंजा निर्धास्तपणे बघू देत होते.जालिंदरला त्याच्या पंजात एक बाभळीचा काटा मोडून रुतल्याचे दिसले.त्यासरशी ते वानर केवळ काटा काढून घेण्यासाठीच व्याकुळ व हतबल झाल्याचे त्यानी जानले होते.लागलीच त्याने नाचक्यान अन चिंमट्याने हळूवारपणे पंज्यातला काटा काढला.तसे वानराला देखील हायसं वाटलं अन पंजा झाडत आणि काटा काढलेली जागा दाताने चावत उड्या मारत वर निघून गेलं.
एकूणच तो सारा प्रकार आम्हाला नवीन पण केविलवाणा वाटला.अशा प्रसंगात त्या वानराने मनुष्य प्राण्यांची धाडसाने मदत घ्यायचे जे अवधान दाखवले याचे मला नवल वाटले.त्याला येथे हातातला काटा काढून दिला जाईल अशी समज कशी आली असेल कोण जाणे. शिवाय दुकानात बसलेल्या त्या वयस्क व्यक्तीस समयसूचकतेने वानरास जखम झाली असेल याचा अंदाज बांधला याचे देखील मला कौतुक वाटले.मुक्या प्राण्यांची हतबलता वेळीच समजून त्याला मदत कशी केलीच पाहिजे याचाच धडा मला त्यावेळी मिळाला होता.
