आठवणीतील माहुली
आठवणीतील माहुली
शेतीसाठी आवश्यक पाणी पुरवठा उपलब्ध झाल्याने सांगली जिल्ह्यातील माहुली बागायती झाल्याचे मी ऎकुन आहे.वास्तविक शालेय शिक्षणानंतर चाळीस वर्षात माहुलीला जाऊ न शकल्याने बागायती माहुली कशी दिसत असेल याचे चित्र मी मनात रंगवत असतो.गेल्या चाळीस वर्षात गावाचा सर्वांगीण विकास होऊन चेहरा मोहरा बदलणे स्वाभाविक आहे.दुकाने,सिमेंटची घरे,बंगले वाढली असणार हेही खरं आहे.
मात्र माझ्या नजरेसमोर येत असते ती माझ्या शालेय जीवनातीलच माहुली.कोरडवाहू शांत व छोट्याश्या या गावात मराठी शाळेच्या समोर डीडोनियाच्या हिरव्यागार कुंपणासह छोटेसे पटांगण होते.डाव्या बाजूस रहाटाने पाणी काढावयाचा आड होता. समोर मुख्याध्यापक शिवाजीराव माने गुरुजींचे घर.पूर्व-पश्चिम रस्त्यावर शाळेच्या उजव्या बाजूस एक घर सोडून ऐसपैस अंगण व परसदार असलेल्या घरात आम्ही रहात होतो.गावात लाईट होती पण आमच्या घरात मात्र लाईट व्यवस्था नव्हती.पश्चिमेला रस्त्याच्या उजव्या बाजुस भगवान मानेचे घर तर डाव्या बाजूस ज्ञानदेवशेठ यांचे कापड दुकान,जहांगीरची पान टपरी त्याच्या जवळ गावातील सर्वात मोठे किराणा दुकान होते.लिंबाच्या झाडाखाली लहान हॉटेल अन शहाजीच्या उर्फ सेज्याच्या वडिलांचे सायकल दुकान तर चितळी रस्त्याला सुखदेव टेलरच्या दुकानात सतत रेडिओ सुरु असायचा.गावातून येणाऱ्या जुन्या पण डांबरी रस्त्याला देशमुखांच्या वाडयालगतच वैजनाथ मानेचे किराणा दुकान,कासार दुकान तर समोर बारसिंग,फाळके भावकीची घरे आणि ओढ्यालगत रमाकांत मानेचे घर होते.ही सारी त्यावेळची घरे नजरेसमोर येतात.ओढ्याला पूल नसल्याने गावाबाहेरुन पुलावरुन सर्व वाहतुक व्हायची.डोक्याला पिवळसर फेटा असलेल्या पोलीस पाटलांच्या घरासमोरच्या रस्त्यास मारुती मंदिर, देवीचे मंदिर अन एक पुरातन भग्न आवस्थेतील मोठे मंदिर होतें;ज्याचे आता जतन पुरातन खाते करत असले बाबत ऐकून आहे.गावात बाजार किंवा जत्रा भरायची नाही.रविवारी मायणीचा बाजार तर मे महिन्यात टुरिंग टाकी,तमाश्या फडासह मोठी यात्रा भरायची.परीक्षा संपलेल्या असल्याने यात्रेत यथेच्छ मजा लुटता यायची.गावाबाहेर डीएड कॉलेजच्या वसतिगृहाशेजारी गोडावूनलगत एसटी थांबा होता.रस्त्याने उत्तरेस जाताना डावीकडे सरकारी दवाखाना व जरा आतील बाजूस जनावरांचा दवाखाना होता.मायणी रस्त्याला हायस्कूलची मोठया पटांगणातील विहिरीसहित अमोर-समोर मोठी इमारत.विटा ते मायणी रस्त्याच्या दुतर्फा पिंपर्णीची झाडे.पावसाळ्या नंतर आम्ही त्याला पीकलेली टेंम्बरे खात असू.सारेजण करमणूक म्हणून स्टँड जवळच्या वसतिगृहा समोर हॉलिबॉल खेळत असू. बऱ्याचदा मराठी शाळेच्या आयताकृती पटांगणात हुस्के-सुरपाट्या खेळ रंगायचा.कोरडवाहू क्षेत्र असल्याने सकाळी सर्वांचा अडाचे पाणी भरण्याचा कार्यक्रम ठरलेला असायचा.सर्वाना महाविद्यालयीन शिक्षणासाठी विटा,कराड,सातारा येथे जावे लागे. प्रामुख्याने परराज्यात सोना-चांदी गाळणे किंवा हिऱ्यांना तास पाडणारे सर्व माहुलकर दिवाळीस आवर्जून हजेरी लावत.तत्कालीन स्थानिक परिस्थितीमूळे सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाशिवाय तरणोपाय नव्हता.त्यामुळेच जवळपास सर्व शिक्षण क्षेत्रात येथील मुले शिक्षण घेत होती.अशी ही चाळीस वर्षापूर्वीची कोरडवाहु माहुलीच माझ्या स्मरणात आहे.शालेय जीवनात मनात घर केलेली पण कायापालट झालेली माहुली मला पुन्हा पहायचा योग कधी जुळून येतोय ते पाहतोय.
