STORYMIRROR

Sanjay Phadtare

Others

3  

Sanjay Phadtare

Others

किल्ले पन्हाळगड भ्रमंती

किल्ले पन्हाळगड भ्रमंती

4 mins
200

नातीसह जोतीबाला जायचं मी ठरवत होतो.त्या दरम्यान मी कृषी विद्यापीठ सेवेत असलेल्या कोल्हापूर येथील १९९०-९२ कृषी पदविका ब्याचचे विद्यार्थी श्री मोरेनी त्यांचे गेट टूगेदरला उपस्थित रहाणे बाबत मला विनंती केली.अनायासे मीही त्यांना होकार दिला व लागलीच दोन दिवसाकरिता पन्हाळा येथील रिसॉर्टचे बुकिंगही केले.

  नियोजनानुसार कोल्हापूर येथील इतर कामे करून सायंकाळी जोतिबा डोंगरावर श्री जोतिर्लिंग व यमाई देवीचे दर्शन घेतले.उन्हाळा असूनही सायंकाळी थंडगार हवेच्या झुळकेत बिनगर्दीत शांतपणे दर्शन घेऊन पन्हाळा गडावर मुक्कामी पोहोचलो.

   सकाळी बाजीप्रभू देशपांडे पुतळ्या नजीक बरेच गाईड होते. पन्हाळा गडाचा इतिहास माहीत असला तरी गडावरील प्रेक्षणीय स्थळांनुरुप माहिती व्हावी म्हणुन निलेश गायकवाड या गाईडला सोबत घेतले.त्याने साधारण दोन तासात आम्हाला सर्व स्थळांची सविस्तर माहिती दिली.

   पन्हाळागड किल्ला हा राजा भोज यांनी सन १०५२ ते ११५२ याकाळात बांधला गेला.समुद्रसपाटी पासून ३५०० फूट उंचीवर चारशे एकरात हा किल्ला आहे.गडा सभोवताली ९ किमी भक्कम तटबंदी असलेला हा बळकट किल्ला बाराव्या शतकात देवगिरीच्या यादवांनी ताब्यात घेतला.नंतर चौदाव्या शतकात विजापुरच्या आदिलशहाकडे हा किल्ला गेला.मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या शतकात (१०नोव्हेंबर १६५९) प्रतापगड येथे अफजल खानाचा वध करताच केवळ १८ दिवसानी म्हणजे २८ नोव्हेंबर १६५९ रोजी हा किल्ला जिंकला.तदनंतर १७ व्या शतकात महाराणी ताराराणी यांनी येथील गादी चालवली.पण अठराव्या शतकात (१८४४) इंग्रजांनी या किल्ल्याचे पूर्व प्रवेशद्वार म्हणजेच चार-दरवाजा उध्वस्त करून गडात प्रवेश केला.गाईडकडून अशी माहिती ऐकत आम्ही गड पहात होतो.

   सर्वात प्रथम धान्य कोठारास भेट दिली. साधारण १२ फूट रुंद दगडी अजस्त्र भिंतीत तीन गोदामांचे केलेले बांधकाम आजही जसेच्या तसे उभे आहे.चारीबाजूने हवाबंद दगडी गोदामाच्या पृष्ठभागास पूर्वेच्या दिशेने तीव्र उतार दिलेला आला आहे.गोदामास छताच्या बाजूने झरोक्यातून आत भात ओतण्यात येत असे.या गोदामात पाच लाख पोती म्हणजेच २५ हजार खंडी भात साठवण क्षमता आहे.वैशिष्ट्य पूर्ण बांधकामामुळे धान्य किडत नसे. किमान सहा महिने गडावरील सर्व जनता व सैनिकांना पुरेल एवढा धान्य साठा असायचा.गोदामातील धान्याचा दबावामुळे पृष्ठभागाच्या उताराने जमिनीलगत मोरीतून विनासायास भात बाहेर काढला जायचा.या गोदामालगत नाचणी,वरी साठवणीसाठी दोन गोदामे आहेत.

   अफजल खानाच्या वधानंतर छ. शिवाजी महाराज पन्हाळा गडावर असताना आदिलशहाच्या सिद्धी जोहरने लाख भर सैनिकासह वेढा दिला होता.गडावरची रसद कमी होऊ लागतात भर पावसात रात्रीच्या काळोखात महाराजानी ४८ किमी दूर विशाळगडाकडे केवळ ९०० मावळे व बाजीप्रभू समवेत पायी कूच केली.गडाच्या पश्चिम बाजूने तीन दरवाजा येथून महाराज पायउतार झाले म्हणूनच त्यास 'राजदिंडी' दरवाजा असेही म्हणतात.त्या दरम्यान शिवा काशीदचा त्याग व बाजीप्रभू देशपांडे यांची वीरलढाई हा इतिहास आपणास माहीत आहेच.

   पन्हाळगडास ३८ टेहळणी बुरुज आहेत.त्यापैकी दोन्ही बाजूने चढ उतार करता येणारा 'दुतोंडी बुरुज' तर पूर्वेकडे 'पुसाटी बुरुज' व काळ्या पाषाणातील 'काली बुरुज' अशी विविध नावे दिलेली आहेत.

    या गडावर गोपनीय खलबत,चर्चा व बैठकीसाठी सज्जा कोठी बनवली आहे.येथेच १२ जुलै १९६० ला महाराज व संभाजीराजे यांची दोन दिवस भेट घेऊन इथेच त्यानी उत्तर दिग्विजय करण्याचे नियोजन केले होते.गडाच्या पूर्व दिशेलगत पावनगड आहे यालाच प्रति पन्हाळा असेही संबोधले जाते.तेथे तुपाची विहीर होती.ज्याचा उपयोग जखमी सैनिकांना उपचारासाठी वापर केला जायचा.

    चार दरवाजा नजीक सोमेश्वर तलाव आहे.ज्याचा वापर गडावर शेतकऱ्यांकडून येणारे धान्य वहातुक करणाऱ्या रेड्याना पाणी पिण्यास केला जायचा. जवळच रेड्याचा तबेलाही आहे.शिवाय तेथेच धर्मकोठी आहे जेथुन गोरगरिबांना धान्य वाटप केले जायचे.

   नाच गाण्यासाठी नाईकिनीचा सज्जा असून त्याची मात्र पडझड झाली आहे.त्याकाळी पाणी पुरवठ्यासाठी गडावर ४० विहिरी,३ तलाव तयार केले होते.उंचावर गड असूनही केवळ पाच फुटांवर पाणी साठा होता.अजूनही तीन दरवाजा येथिल विहिरीत जीवंत पाणी साठा आहे.तसेच शत्रूकडून विहिरीत विष कालवून दगाबाजी होऊ नये म्हणून गुप्त व बंदिस्त विहीर म्हणजे 'अंधारबाव' आजही जशीच्या तशी आहे.सन १६७३ मध्ये आदिलशाहच्या ताब्यात असलेला हा किल्ला केवळ ६० मावळ्यांसोबत हिरोजी फर्जन यांनी जिंकून ताब्यात घेतला.गडावरचा महाराणी ताराराणी यांचा महाल आजही सुस्थितीत आहे.पायऱ्या उतरून गर्द झाडीत पक्ष्यांच्या आवाजात तबक उद्यानात फिरतांना फार मजा येते. 

  साधारणपणे महाराष्ट्रात इतर गडावर चार चाकीने जाता येत नाही.तरीही बऱ्याच गडाची पडझड झाली आहे.मात्र पन्हाळा हा एकमेव किल्ला आहे ज्याचे १८ व्या शतकात मुख्य प्रवेशद्वार म्हणजे चार दरवाजा इंग्रजांनी पाडल्याने गडावर चार चाकीने जाता येते.या गडावर पूर्वीपासून मानवी वसाहत असून आजमितीला तेथील लोकसंख्या चार हजार पर्यंत आहे. गडावर वर्दळ असूनही किल्ल्यावरील सर्व वास्तू जश्याच्या तश्या सुस्थितीत आहेत.येथील थंडगार हवेमुळे मिनी महाबळेश्वर मध्ये फिरल्याची अनुभूती मिळते.येथे घरगुती उत्कृष्ट जेवण उपलब्ध असून पर्यटकांची गर्दी वाढत आहे.सर्व स्थानिक गडाची योग्य स्वच्छता राखतात.

  स्वतःच्या जीवाची आहुती देणाऱ्या शिवा काशीद,वीर बाजीप्रभू व असंख्य मावळ्यांच्या बलिदानाने पवित्र झालेल्या मातीस मी मनोमन नतमस्तक झालो. इतिहासाची साक्ष देणाऱ्या बुलंद छत्रपती शिवाजी राजे,संभाजी राजे,महाराणी ताराराणी यांच्या कर्तृत्वांने पावन झालेल्या गडास माझा त्रिवार मुजरा.

    दुपारी मी विध्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात सहभागी झालो.विद्यार्थ्यांनी माझा यथोचित सत्कार केला.त्यानंतर करमणूक कार्यक्रमात विद्यार्थ्यांना गायन व नृत्याला मनमुरादपणे दाद दिली. स्नेहसंमेलनाचे एकूणच नियोजन नेटके करण्यात आले होते.पन्हाळगड भेट व स्नेहसंमेलनाच्या सुखद आठवणी जपत परतीच्या प्रवासाला लागलो.


এই বিষয়বস্তু রেট
প্রবেশ করুন