प्रिय सायकल.....
प्रिय सायकल.....
IIश्री II
प्रिय सायकल,
सप्रेम नमस्कार वि. वि.
तुझा अन माझा प्रथम परिचय झाला तो तीन चाकी सायकली पासून.साधारण पंचावन्न वर्षापूर्वी निळ्या रंगातील तीन चाकी सायकलवर पुढे अशोकदादा व मागे मी अन शेजारी धाकटी बहीण उभी असा वडिलांनी काढलेला कृष्णधवल फोटो आजही मला स्पष्ट आठवतो. कालांतराने चौथीपासून दोन चाकी सायकल चालवायला मिळू लागली.एका हातात हँडल तर दुसऱ्या हातात बार पकडत पॅडल मारत,धडपडत सायकल शिकताना मला परमोच्च आनंद मिळायचा.हाफ पॅडल मारत सायकल चालवताना हमखास चेन पडायची. पडलेली चेन बसवताना होणाऱ्या काळ्या हाताची मला पर्वा नसायची.दहा पैसे प्रतितास भाड्याने सायकल फिरवताना अगदी दमछाक होत असे. पण दुकानदाराच्या धाकाने तास संपायच्या आधीच तुला दुकानात परत करून यायचो. सर्वसामान्याकडे वाहतुक व कामासाठी विना इंधन व विनाखर्च तूच हजर असायचीस.घंटी,चेन व सीटकव्हर, कॅरिअर,साईड स्टँड,कुलुप तर सुरक्षेसाठी पुढच्या चाकाला बसवलेले बार अशी आभूषणे तुला अगदी शोभायची. एखादा हौशी तुला डायनामा लाईट बसवायचा तर कॉलेजकुमार हँडलवर वह्यासाठी तिरके कॅरिअर बसवत. लहान मुलांसाठी हँडलला लोखंडी पट्ट्याची बैठक सीट असायची. हँडलला वेगवेगळ्या रंगाच्या मुलायम मुठी लावणे आणि त्या मुठीतूनच काही तुरे खाली लोंबकळत सोडणे.शिवाय वेगवेगळ्या प्रकारची बेल बसवणे आणि तिच्या आवाजात तालात सायकल चालविणे हा काहींचा छंद होता. सायकलच्या पाठीमागे सायकल सोडून बोला असं लिहून फुशारकी मरणारे देखील असत.पूर्वीच्या काळी लग्नात हुंड्यात सायकल आणि रेडिओ ज्याला मिळायचा तो नवरदेव नशीबवान समजला जायचा. त्या सायकलवर ,रेडिओ गळ्यात घालून खणखणीत आवाजात गाणी ऐकत गावातून चक्कर मारणारे बरेच असत.हाफ किंवा फुल चेन कव्हरवर पेंटरकडून नांव-गाव आवर्जून तोऱ्यात लिहीले जायचे.
तुझी उपयुक्तता मला तर कामधेनू सारखी वाटायची.कच्च्या सडकेवर किंवा पाऊल वाटेने कधी डबल तर कधी ट्रिपल सीट वहातुकीला तू कधीच डगमगली नाहीस. सायकलच्या कॅरिअर व दांडीच्या त्रिकोणात ऊसाचा पाला,वाडे भरून येताना दिवसांची वैरण आणल्याने कृतार्थ वाटायचं.गावागावात सायकल दुरुस्ती व्यवसाय तुझ्यामुळेच उपलब्ध झाला. सायकलस्वारास चाकात हवा भरण्यास कधी पैसे मोजावे लागत नसत. खेड्यापाड्यात विद्यार्थ्यांना नजीकच्या गावात शाळेत वेळेत पोहोचवून शिक्षित करण्यात तुझा मोलाचा वाटा होता.एवढ्यावरच न थांबता अगदी नोकरी धंद्याला जाण्यासाठी तूच उपयोगी पडायचीस.तुझा शोध ज्या मॅकमिलनने लावला त्यालाही सायकल इतकी उपयोगी पडेल असे कदाचित वाटले नसेल.मागील अनेक पिढ्यांनी तुझा पुरेपूर वापर करून घेऊन उन्नती साधली आहे.पुणे शहराने तर केवळ तुझ्याच वापराने वेगळी ओळख निर्माण केलेली होती.
पण का कोण जाणे तू हळूहळू दुर्लक्षित राहू लागलीस.आर्थिक सुबत्ता वाढल्याने मोटर सायकलीचे प्रमाण वाढले आहे.वाढत्या रहदारीमूळे अपघाताच्या भीतीने पालक मुलांना शाळेत जाण्यासाठी तुझी सोबत देण्यास धजावत नाहीत.मात्र आजही कष्टकरी व चाकर मान्यांनी तुझी साथ सोडलेली नाही.सध्यातरी घराजवळ लहान मुलांना छोट्या सायकल शिकण्यास देण्याचा कल आहे.पण हे केवळ अल्प काळासाठी असल्याने माझ्या मनाला नेहमी खंत वाटते.तुझे पारंपरिक रुपडं बदलून व्यायामासाठी गिअरसहित बोडकं बनवले आहे. व्यायामासाठी सौरभने घेतलेली नव्या रूपातील महागडी सायकल कधीतरी मी आवर्जून चालवतो.पण खरं सांगू तुझ्या मूळ रूपाचा रुबाब यात मला तरी गवसत नाही.पाश्चात्य देशाप्रमाणे लोकांना तुझे महत्व पटल्यावर तू पुन्हा कार्यरत होशील असे मला नक्की वाटते.ते दिवस लवकर येवोत मात्र तोपर्यंत तू धीर सोडू नयेस,हीच अपेक्षा.
तुझाच सायकलप्रेमी,
