ओढ घालवाडची
ओढ घालवाडची
मला निवृत्ती नंतरही आजही आठवतो तो मुळगाव 'घालवाड' चा आनंददायी उन्हाळा सुट्टीचा सुवर्णकाळ.परीक्षा संपताच कधी एकदा गाव गाठतोय असं व्हायचे.
स्टँडवर एसटी शिरताच गरम शेंगदाणे भडंगची आरोळी आली की समजायचे आलं जयसिंगपूर. तेथून टांग्याने किंवा कुरुंदवाड एसटीने शिरोळात उतरायचे. विठ्ठल मंदिराच्या आडाचे रहाटाने पाणी ओढून हातपाय धुवून पाणी पिऊन घालवाडची वाट धरायची. शिरोळातून कोणाची बैलगाडी मिळाली तर ठीक नाहीतरकच्च्या रस्त्याने पायीच रपेट सुरू करायची. वेशीवर थोडासा विसावा घेऊन मग गावात पोहोचायचं. घरी पोहोचताच पितळी तांब्यातील पाण्यानें हातपाय धुवायचे .मग आजोबा आजींना नमस्कार करून विसावले की तेथून पुढे उन्हाळा सुट्टी कशी संपते हेच कळायचे नाही.
सकाळी चुलीतल्या शेंनकुटावर थोडे पाणी व मीठ टाकरायचे अन त्यानेच घसासा दात घासायचं.मग म्हशीच्या आकरी दुधातला वाफाळलेला कप बशीने हळूहळू चहा पितांना मजा यायची.मग लागलीच खुरपे व टॉवेल घेऊन आमची पावले मळीच्या शेताकडे वळायची.काळवाटचा हा रस्ता शेजारच्या शेतातून रात्री दारं फुटून चिखलमय झालेला असायचा.
रस्त्याच्या दुतर्फा विशेषतः बाभळीच्या झाडावर एकसुरात ऐकू येणारी 'भोरड्या' पक्ष्यांची टॅव-टॅव कानावर पडायची. रस्त्यालगत झाडाच्या खोडावर खालीवर मान डोलवनारा सरडा उगाचच दहगडाने टीपायचा प्रयत्न करायचो.पण चलाख सरडा झटकन खोडाआड पळायचा.रमत गंमत शेतात पोहोचताच पहिल्यांदा थंडगार ऊसाच्या २-३ टिपऱ्या खाऊन मगच आमच्या कामाला सुरुवात व्हायची.सावलीत थोडावेळ सुरपारंब्या खेळून घरी परतताना म्हशींसाठी ऊसाचा पाला,कोंबऱ्या किंवा वाड्डयाची वैरण घेऊन जायचे हे ठरलेलं असायचं. गोठ्यात वैरण टाकून लगोलग नदीला पोहायला जायचे.डोळे अगदी लालभडक होईपर्यंत पोहून घरी येऊन भरपेट जेवून माडीवर गार फरशीवर निवांत विश्रांती घ्यायची.
दुपारी पिपाणी वाजवत गारेगारवाला आला रे आला की वाटीभर धान्य देऊन लालभडक बर्फ गोळा जीभ रंगवत चोखताना परमोच्च आनंद मिळायचा. सायंकाळी मात्र शेतात काकानां चहा घेऊन जायला लागायचे. तांबरी शेताच्या टोकाला नदीच्या खोल पात्रालगत उतारावर शेवरी व आंब्याची झाडं असायची. शेवरीची वैरण कापायला व न्ह्यायला तुलनेत सोपी वाटायची. संध्याकाळी घरी येवून हातपाय धुऊन 'घोलेश्वर' देवळा जवळ गोटणावर कवठाच्या झाडाखाली आमच्या गप्पांचा फड जमवायचा.
गावात 'हनुमान' व 'बाल शिवाजी'अशा दोन तालमी; पण 'हनुमान'व 'शिव जयंती' मात्र एकत्रच साजरी केली जायची. गावच्या तालमीत कसलेले पैलवान पंचक्रोशीतली मैदानं गाजवायचे.
रात्री जेवण करुन कधी गच्चीत किंवा तालमीत झोपायला जायचे. कोणत्याही शुभ-कार्याची वरदी लाऊड स्पीकरच्या पोवाड्याने साऱ्यांना लागायची. लग्नानंतर वराती साठी बैलगाडीच्या हौदाच्या दांडीवर लोखंडी कॉट ठेऊन करवल्यासह नवरा-नवरी बसत. वराती समोर तरुण मंडळी हलगी,घुमक्याच्या तालावर लेझीम खेळायचे.खरं स्फुरण चढायचे ते सुकवास फडतारे किंवा शंकर भाऊ फडतारे यांनी 'हलगी' तर आप्पू खोंदऱ्यानी 'घुमके' हातात घेतल्यावरच. खणखणीत 'माना' म्हणत चौफेर दांडपट्टा फिरवला जायचा. लाटी फिरवणे,कसरत करीत थाळी फिरवणे,लाटी फिरवत डोक्यावर ठेवलेला नारळ अलगद फोडने,दांड पट्टयाने टाचे खालील लिंबू अचूक कापणे असे शिवकालीन साहसी खेळ सादर व्हायचे.उ न्हाळा सुट्टीचा अत्यानंद देणारा काळ भुर्रकन संपायचा. कृष्णामाईच्या कृपेने बागायती व काळ्याभोर मातीने समृद्ध असलेल्या या घालवाडची ओढ निवृत्ती नंतरही टिकून आहे.
