करडू
करडू
संजू ऐक,"त्या रस्त्याने एकटं बिलकूल जायचं नाही.तिकडं पोरानां धरून नेतात.पोरं धरून न्यायची टोळी फिरतेय, एकटं न सांगता कुठंही पळायचं नाही.त्या विहिरीकडं फिरकायचं नाही.आडाजवळ जायचं नाही, डोकावुन तर पहायचंच नाही.खाली पडलं की वर येतच नाही.मसनवाटच्या रस्त्याला तर जायचं नाहीच पण तिकडं बघायचंही नाही.कारण तिथं भुतं फिरत्यात".अशा एक ना अनेक दटावण्या व धमक्या आम्हाला मिळायच्या.यामुळे त्या ठिकाणांची आम्हाला चांगलीच दहशत बसलेली असायची.एवढं असूनही कधी चुकून आम्ही गेलोच तर कान पिळून घेत खणखणीत मुस्काडीत किंवा पाटीत रट्टा बसणारच.एवढा सारा धाक असूनही या साऱ्या ठिकाणी संधी मिळताच सावधगिरीने व घाबरत का होईना आम्ही जाऊन यायचो.पण ह्या पराक्रमाचा दुर्दैवाने कोणाकडून तरी घरच्यांना कसा सुगावा लागायचा देव जाणे.मग तेथे प्रत्यक्ष अनुभवलेल्या भीती पेक्षा मिळणाऱ्या माराची भीती भयान असायची.
आम्हा एवढी काळजी आसपास दिसणारे प्राणी किंवा पक्षी त्यांच्या पिलांची काळजी कशी घेताना दिसत नाहीत याचं मला नेहमी अप्रूप वाटायचं. कोरडवाहू क्षेत्रात माझं सारं बालपण गेलं.तिकडं सर्रास घरटी एक दोन तरी शेळ्या दिसायच्या.कधीही अचानक जरी पाहुणा आला तरी चहासाठी दुधाचा प्रश्न कोणाला पडायचा नाही.गरजेनुसार वाटेल तेंव्हा ग्लास मध्ये शेळीचं दूध पिळून काढलं जायचं.शेळीच्या आसपास दोन तीन करडं हमखास नजरेस पडायची.करडांचं तर मला फार कौतुक वाटायचं.जन्माला आल्यावर काही तासातच ते धडपडत इकडे तिकडे पळायचं. त्याच्या किंजळ्या बारीक आवाजाला त्याची आई ब्या-ब्या आवाजात प्रतिसाद द्यायची.पण एवढयाशा त्यांच्या संभाषणात ती शेळी पिलांस काय वळण लावत असेल देव जाणे. शेळी पिलांच्या चुकीबद्दल कशी कान उघडणी करत असेल कोणास ठाऊक?आमच्या वाट्याला आलेलं कान पिळून घेत कानफाड नाही की पाटीत रट्टा त्याला मिळायचा नाही.मला तरी याचा खरोखर हेवा वाटायचा. मोठया डालग्याखाली किंवा बांधून ठेवलेली कोकरं सोडली की थेट ती शेळीच्या कासेत शिरायची. पुढची दोन पाय गुडघ्यात टेकत कासंच्या सडातनं दूध प्यायला पळायची. मधी-आधी उगाचच कासंला डोक्याने ढूसनी मारत ती दूध पीत असत.एकदा पोट भरलं की मग तोंड वाकडं करत ओरडत कशाही आडव्या-तिडव्या उड्या मारायला लागायची.लुसलुशीत व चकचकीत केस,खाली पडलेले कान अन आटोपशीर कोवळं खुर पहाण्यासारखे असते.गळ्याखालीं दोन लोंबकळत असलेली लिबलिबित गलुल बोटाने चाचपायला मजा यायची.हे सारं न्याहाळत करडास गोंजारायला मला फार आवडायचं.
एके दिवशी असंच दुधानं गरगरीत पोट भरलेलं करडू उड्या मारत बाहेर आलं अन कानात वारं शिरल्यावाणी पाळायला लागलं.मीही त्याच्या मागं नकळतपणे धावू लागलो.तसा त्याला लईच चेव चढला.माझ्या पाठलागाने ते कसंही हुंदडत होतं.त्याला मागं फिरवावं म्हणून मीही धावत होतो.पण अचानक ते वाट सोडून डाव्या बाजूच्या गल्लीतनं पडक्या विहिरीकडं पळालं.तशी माझी पाचावर धारण बसली.कारण त्या विहिरीची दहशत मला लहानपणापासून होती.एकतर त्या विहिरीचा काठ व काही पायऱ्या ढासळल्या होत्या. कडेची भिंतही भेगाळून कधीही ढासळेल अशी स्थिती होती.शिवाय बऱ्याच वर्षापासून खोल असूनही त्यात थोडेसेच पाणी होते.या विहिरीकडे कोणाचीही वर्दळ वहिवाट नसायची.पण या साऱ्या गोष्टीचं त्या करडास ना गांभीर्य वा भीती बिलकूल नव्हती.
बिचारे करडू कसलीही भीती न बाळगता बिनधास्तपणे पडक्या पायरीकडे जाऊ लागले.माझ्या काळजात तर धस्स झालं.ते कधीही विहिरीत कोसळेल असेच वाटलं.मी सारं हतबल होऊन पहात होतो.मी नुसते हुसकले तरी ते पुढेच जाईल याची भीती होती. आसपास मदतीलाही कोणी दिसत नव्हते.मी तर श्वास रोखून त्याकडे पहातच राहिलो. काहीही सुचत नव्हते.केवळ माझ्या पाठलागामूळे हे सारे घडतंय अन या परिस्थितीला मीच जबाबदार असे वाटू लागले.इतक्यात त्या कोकराने उडी घेतली ती केंव्हाही कोसळेल अशा कडेच्या भीतीवरच.आतां तर ते वाचत नाहीच अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कारण त्याच्या खुरामुळे माती व दगड खाली ढासळू लागले.मात्र ते कोकरू बिनधास्त उडी मारत काटावरून बाहेर पडून रस्त्याला लागले.मी तर फारच आचंबीत झालो.त्या कोकराला तर भीतीचा लवलेशही दिसत नव्हता.फिरून ते शेळीच्या आवाजाच्या दिशेने धावत जाऊन अंग घासू लागले.शेळीही निवांत रवंथ करत उभी होती.पिल्लाच्या पराक्रमावर ना तिचा ओरडा की जाब विचारणे नाही.धन्य त्यांचं ते असे बिनधास्त जीवन.निसर्गाने प्राण्यांना उपजतच कड्या कपऱ्यातून निर्धास्तपणे जगण्याचे वरदान लाभलेले आहे.
