Sanjay Phadtare

Tragedy

3  

Sanjay Phadtare

Tragedy

वियोग

वियोग

2 mins
20


मित्राने ऐकवलेला एक अनुभव आठवून आजही मन हेलावून जाते.तो बेळगावहुन ऑफिस कामानिमित्त हुबळीला गेला होता त्यावेळी शालेयमित्र भेटला. बऱ्याच वर्षांनी भेटल्यावर इकडच्या-तिकडच्या गप्पाअंती निरोप घेताना त्याने गावी कारवारला आवर्जून येण्याचे निमंत्रण दिले.तरीही कामाच्या व्यापामुळे जवळपास एकदीड वर्ष त्याला त्याचेकडे जाणे जमले नव्हते.तदनंतर ठरवून एका रविवारी सपत्नीक सकाळी येत असल्याबाबत त्याला फोनवरुन कळविले.त्यानुसार सकाळी घरी चहा-नास्ता करुन गाडीने निघाले. 

      बेळगाव पासून पुढे काही अंतरानंतर त्याकाळी उजवीकडे कारवारचा एकेरी रस्ता होता.रस्त्यावरची वहातुक तशी विरळ होती.दुतर्फा जंगलातून जाणारा अधेमधे कच्चा रस्ता होता.हवेत उष्मां जाणवायला लागला होता.जंगलातील वाट असली तरी बरीच पानगळीमुळे रखरखीतपणा वाढला होता.तुरळक रहदारीसह निवांत प्रवास सुरु होता.तशी कोणतीच गडबड नव्हती.मित्राकडे दुपारचे भोजन करुन निवांत गप्पा मारुन सायंकाळी ते परत येणार होते.

     जंगल रस्त्याचे आजूबाजूला विविध अनोळखी पक्षी,मोर,काही हरणं दिसत होते. अचानक रस्ता संपता-संपता त्याच्या समोरची २-३ वाहणे थांबली.तसे तेही रस्त्याकडेला वाहन घेऊन थांबले.वाहणे पुढे का जात नाहीत म्हणून काहीजण खाली उतरुन पाहू लागले.तसे तेही उतरुन पुढे पायी जाऊन पाहू लागले.रस्त्यावरच एका वानराने दुसऱ्या निपचित वानरास दोन्ही हाताने कवेत धरलेले दिसत होते.त्यामुळे रस्ता एकेरीच असल्याने दोन्ही बाजुची वाहणे थांबलेली होती.पण कोणीही वानराजवळ जायला धजत नव्हते.चौकशी करता समजले की,सर्वात पुढच्या ट्रकसमोरुन दोन वानरे पळत असताना पाठीमागच्या वानरास जोरदार धडक बसून ते जायबंदी होऊन निपचित पडले होते.त्यामुळे जोडीदार वानर मागे फिरुन जायबंदी वानरास दोन्ही हाताने उठवण्याचा जोरदार प्रयत्न करत होते.सारे दृष्य हृदयद्रावक व अंगावर काटा आणणारे होते.त्यामुळे सारेजण जागेवर थांबले होते.अशा परिस्थितीत वानरास बाजूला हाकलण्यास कोणी धजावत नव्हते.थोडयावेळाने त्याचे जवळ जाऊन पहाण्याचा व हुसकावण्याचा एकाने प्रयत्न केला.तरीही जीवंत वानर मृत वानरास कवेत घेऊन स्तब्ध बसलेले दिसत होते.कदाचित ते रागाने अंगावर येईल म्हणून काहीकाळ सारे तसेच थांबले.मात्र रस्त्याचे दोन्ही बाजूस वाहनांची गर्दी वाढू लागताच वहातुक सुरु करण्यासाठी दोन्ही बाजूने लोक हळूहळू पुढे आले.तरीही ते वानर मृत वानरास घट्ट पकडुन कोणतीही हालचाल न करता स्तब्ध बसले होते.नाइलाजाने काहीजण त्यांचे जवळ गेले व एकाने धाडसाने जीवंत वानरास हात लावला.तसे दोन्हीही वानरे जमीनीवर कोलमडून पडले.सारे सुन्न होऊन पहात होते. काही वेळापूर्वी जिवंत असलेल्या वानराच्या डोळ्यातुन अश्रू ओघळलेले दिसत होते. अन जोडीदाराच्या तीव्र दु:ख वियोगाने त्यानेही जीव सोडलेला होता .ट्रकच्या धडकेने मरण पावलेले नर-वानर तर दुःख वियोगाने जीव सोडलेले मादी वानर होते.ही घटना हृदयद्रावक व मनाला चटका लावणारी होती.जोडीदाराच्या मृत्यूनंतर दुःख, वेदना होणे साहजिक आहे.पण केवळ जोडीदाराच्या विरहाने जीवाला जीव अर्पण करणे धक्कादायक होते.प्राण्यांत देखील मानवाप्रमाणे इतके उत्कट प्रेम व वियोग असू शकतो याची प्रचिती येत होती.हतबल लोकांनी नाइलाजाने दोन्हीं कलेवर हळुवारपणे रस्त्याकडेला बाजूच्या झाडांच्या फांद्या अंथरून त्यावर दोन्ही कलेवर ठेवले अन वाहतूक सुरु झाली.

   सारेजण दुःखी मनाने हळहळत मार्गस्थ झाले.यामुळे मित्राकडे पोहोचायला उशीर झाला.घरी पोहोचल्यावर हातपाय धुऊन उशीर का झाला? याचा वृत्तांत मित्राला सांगताच साऱ्यांची मने हेलावून गेली. याचा साऱ्यांच्या जेवणावर अक्षरशः विरजण पडले.आजही ही घटना आठवली की माझे मन व्याकुळ होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy