STORYMIRROR

Sanjay Phadtare

Others

3  

Sanjay Phadtare

Others

स्टोव्ह

स्टोव्ह

3 mins
180

  सत्तरच्या दशकाआधी पासून बऱ्याच घरात स्टोव्ह दिसू लागला. वास्तविक घरोघरी मातीच्या चुली असल्या तरी त्याकाळात एक स्टेटस सिम्बॉल म्हणून स्टोव्हकडे पाहिलं जायचं.मुलीच्या लग्नात रुकवतात मांडलेला तीन पायी पितळी स्टोव्ह अगदी भाव खाऊन जायचा. चाकरमानी किंवा नोकरदारांना सकाळी झटपट डबा बनवून द्यायचा तर स्टोव्ह शिवाय पर्याय नसायचा. ऐनवेळी आलेल्या पाहुण्याला चटकन चहा देण्यासाठी आदण ठेवले जायचे ते स्टोव्हवरच. घरभर धूर करून फुंकर मारून चूल पेटवण्यापेक्षा स्टोव्हवरच आया बहिणीची भिस्त असायची.आलेला पाहुणा हातपाय धुवून येईपर्यंत इकडे चहाला उकळी फुटलेली असायची.नोकरीसाठी एकटे दुकटे रहाणाऱ्या बऱ्याच जणांना हाताने स्वयंपाक करायची उमेद तर स्टोव्हमुळेच यायची.

  स्टोव्ह सुरु करायचं तंत्रज्ञान तसं अवघड नसलं तरी चूल पेटवण्या एवढंही सोपं नव्हतं.साधारण एक दीड लिटर रॉकेल मावेल इतकी स्टोव्हला पितळी टाकी असायची. त्याचे तीन पाय म्हणून बर्नरच्या दिशेने तोंड असलेल्या लोखंडी कड्यावर तबकडी असायची.ज्यावर भांडे किंवा तवा आरामात बसायचा. टाकीच्या एका बाजूला हवा भरण्यासाठी पंप तर दुसऱ्या बाजूला टाकीत रॉकेल भरण्यासाठी फिरकीचे टोपण अन त्याला लगत हवा कमी करण्यासाठी किंवा स्टोव्ह विजवण्यासाठी कानासारखी चावी असायची. बर्नरला अंगाबरोबर खालील बाजूस वाटी असायची ज्यात बर्नर तापवण्यासाठी रॉकेल साठत असायचं.काहीजण ऑइलपेंटच्या छोट्या डबीत रॉकेलमध्ये बुडालेला काकडा देखील वापरला जायचा.बर्नरचा जाळ एकसारखा व निळी ज्योत यावी म्हणून पत्र्याच्या पातळ पट्टीवर एकाटोकाला बारीक तार असलेली 'पिन' जी बर्नरची निपल साफ करण्यासाठी वापरली जायची. टाकी भरलेला स्टोव्ह पेटवण्यासाठी काडेपेटी,काकडा अन पिन एवढी सामग्री पुरेशी व्हायची.स्टोव्हच्या टाकीची चावी बंद करून एक दोन पंप मारताच बर्नर खालच्या वाटीत रॉकेल येताच चावी सोडायची अन त्याला पेटती काडी लावून पून्हा चावी बंद करायची.जेणेकरून बर्नर तापताच स्टोव्ह फुरफुरायला लागायचा.मग पुन्हा गरजेनुसार दोन चार पंप मारताच निळसर ज्योतीसह स्टोव्ह स्वयंपाकासाठी तयार व्हायचा.गरजेनुसार भांड्यास किंवा तव्यास ताव कमी करायचा असल्यास चावी सोडावी लागायची. गरजेनुसार प्रसंगी पंप मारून ताव वाढवताही यायचा.कधीमधी गडबडीच्या वेळी अचानक बर्नर मध्ये काही अडकून स्टोव्ह हमखास विझायचा. सोबत रॉकेलच्या वासासह पांढरा शुभ्र धूर बर्नरमधून सुटायचा.मग मात्र लगबगीने स्टोव्हवरचं भांडं किंवा तवा खाली उतरायला लागायचा.मग बर्नरला पिन करून पुन्हा काडेपेटी लावताच स्टोव्ह परत चालू लागे;पण काही प्रसंगी त्याचा भडका देखील उडत असे. त्या काळात बेसावध महिलांच्या साडी किंवा केसाने पेट घेऊन काहीजनींना भाजून जीवितहानी देखील व्हायची.काही वेळेस पेटता स्टोव्ह कमी जास्त दाबाने व आवाजाने फूर्र-फुर्र करायला लागला की समजावे टाकीतले रॉकेल संपत आलंय.अशा प्रसंगी सरळ स्टोव्ह बंद करून टाकीत रॉकेल भरण्याशिवाय गत्यंतर नसायचे.पण गडबड न करता हळुवारपणे योग्य हातळणी केल्यास चुटकीसरशी उपयोगी पडणारा स्टोव्ह हाच पर्याय योग्य ठरायचा.

  कालांतराने स्टोव्हच्या रुपात देखील स्थित्यंतरे घडली.मोठ्या टाकीचा पितळी स्टोव्ह तर काही काळाने चौकोनी आकारात बाजूला भली मोठी टाकी असलेला लोखंडी स्टोव्ह आला.विशेषतः हॉटेल व चहावाल्याची या स्टोव्हला सर्रास पसंती होती.याशिवाय बिन आवाजाचा आणि पंप मारायची गरज नसणारा वातीचा स्टोव्ह देखील होता.पण का कोण जाणे या स्टोव्ह महिलांच्या म्हणावा असा पसंतीस उतरला नाही.मात्र बरशेन गॅस उपलब्ध झाल्यापासून ध्वनी व धूर प्रदूषण टाळण्यासाठी भगिनींकडून स्टोव्ह कोनाड्यात किंवा अडगळीत पडल्याने तो आता जवळपास हद्दपार आलाय.नव्या पिढीला तर स्टोव्ह म्हणजे काय? अन तो कसा पेटवावा? हे ज्ञान देखील दुर्मिळ झालंय हे मात्र नक्की.काही दिवसांनी अँटिक पीस म्हणून स्टोव्ह दिसला तर नवल वाटायला नको.


এই বিষয়বস্তু রেট
প্রবেশ করুন