Jairam Dhongade

Abstract

3.5  

Jairam Dhongade

Abstract

तिपेडी

तिपेडी

2 mins
85


तुळशीचे बनीं ।

जनी उकलिते वेणी ॥

हातीं घेऊनियां लोणी ।

डोई चोळी चक्रपाणि ॥

प्रत्येक स्त्रीचे सौंदर्य हे तिच्या केसांवर अवलंबून असते. जेंव्हा स्त्रीच्या सौंदर्यावर बोलले जाते तेंव्हा आपसुकच लक्ष तिच्या लांबसडक केश आणि घातलेल्या वेणीकडे जाते. आता वेण्यांचे प्रकारही बरेच आहेत. त्यात दोन तीन प्रकार फार प्रसिद्ध आहेत. एक वेणी, दोन वेण्या तर तिसरी पाच पेडाची, सहा, नऊ पेडाची अशी एक किंवा दोन-दोन वेण्या बायका घालतात. पेड म्हणजे दाट केसांचे वेणी करण्यासाठी केलेले भाग. वेणी घालताना नेहमीच केसांचे तीन भाग करतात. हे असे तीन पेड... म्हणजे तिपेडी!

मी लिहिण्याच्या ओघात लिहित गेलो. एक कविता रोज हा माझा संकल्प म्हणा, शब्दप्रेम म्हणा परंतु नित्यनेमाने माझी लेखणी लिहिती राहिली. या लिहिण्याच्या झपाटलेपणातून माझा पहिला मराठी गझलसंग्रह ‘शब्दाटकी’ साकारला गेला. रसिकांनी भरभरून प्रेम केले. महाराष्ट्रभरातील अनेक साहित्य मंडळांनी त्याची दखल घेत राज्यस्तरीय पुरस्कारावर माझे नाव कोरले. माझे ‘जय बोले’ हा अभंग-काव्यसंग्रह आणि ‘कोरोनायण’ हा कवितासंग्रह; दोन्ही एकदाच ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, उदगीर येथे प्रकाशित झाले. तद्नंतरही बरेच लेखन झाले. कविता, अभंग, गझला, चारोळी, हायकू, सुटे शेर असे बरेच काही लिहिल्या गेले... हा लेखन पसारा म्हणजे केस विस्कटलेल्या ललनेसारखाच... मी रोज माझ्याच वह्या चाळतांना हा पसारा बघत होतो. गझला, अभंग आणि कविता यांना एकत्र कसे गुंफावे असा विचार मनात असतांना ‘तिपेडी’ हा शब्द मनात रुंझी घालत होता. आणि मग ह्या अस्ताव्यस्त पडलेल्या रचनेचे तीन ‘पेड’ करीत साकारलेली ‘तिपेडी’ आज रसिक मायबापांच्या हाती देतांना मला मनस्वी आनंद होत आहे.

'तिपेडी' हा मिश्र काव्यसंग्रह असला तरी यामध्ये बहुतांश गझला आहेत. दोन्ही मात्रावृत्त आणि अक्षरगणवृत्तात लिहिलेल्या गझलांसोबत कविता आणि अभंगांना समाविष्ट केल्यामुळे हा संग्रह मराठी काव्यरसिकांना आनंद देणारा ठरेल अशी आशा नव्हे तर मला खात्री वाटते. 

या गझलसंग्रहाची पाठराखण करणारे आणि माझ्या विनंतीला होकार देऊन प्रस्तावना देणारे माझे श्रद्धेय, मार्गदर्शक, प्रसिद्ध व्यासंगी कवी- गझलकार- लेखक जेष्ठ साहित्यीक श्री अशोकजी बागवे यांचा मी ऋणी आहे. 

माझे जेष्ठ बंधू, मार्गदर्शक, नवी मुंबई येथे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून सेवारत असलेले श्री शैलेशजी पसलवाड मला नेहमीच लिहिते ठेवण्यासाठी प्रयत्नरत असतात. कठीण परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेऊन पोलिसीसेवेत आपला लौकिक आणि दबदबा निर्माण केला. अकाली त्यांचे पितृछत्र हरवले. काकासाहेब स्व. दिगंबरजी पसलवाड यांना हा माझा संग्रह मी समर्पित करीत आहे.

या संग्रहाला आकर्षक रूप देऊन ते प्रकाशित करण्याची आनंदमयी भूमिका आणि जबाबदारी लिलया पेलणारे अष्ठगंध प्रकाशनचे प्रकाशक आणि पेशाने शिक्षक, स्वतः कवी, गझलकार, नाट्यदिग्दर्शक आणि बहुआयामी व्यक्तित्वाचे धनी असणारे माझे मित्रवर्य श्री संजय शिंदे आणि त्यांचे सहकारी या सर्वांचा मी कायम ऋणी आहे.

माझ्या काव्य रचना आवडीने वाचणारे आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे रसिक मायबाप, ज्यांनी ज्यांनी मला लिहिण्याची सतत ऊर्जा दिली असा शुभचिंतक आणि मित्रांचा भलामोठा गोतावळा अशा सर्वांचा मी कायम ऋणी आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract