Jairam Dhongade

Abstract

3.5  

Jairam Dhongade

Abstract

आंबेडकरी विचारगाठी - समतेच्या डोहाकाठी

आंबेडकरी विचारगाठी - समतेच्या डोहाकाठी

4 mins
78


चातुर्वर्ण्य व्यवस्थेत केवळ ब्राह्मण वर्गालाच शिकण्या-शिकवण्याचा आणि लिहिण्याचा अधिकार होता. त्यांनी निर्माण केलेल्या ब्राह्मणी साहित्याशी अर्थात प्रस्थापितांच्या साहित्याशी विद्रोह करून अन्याय, अत्याचार, विषमता आणि शोषणाच्या वेदना जगापुढे मांडणारे साहित्य म्हणजे विद्रोही साहित्य! विद्रोही साहित्य म्हणजे निव्वळ विरोधाला विरोध नव्हे.. विद्रोह म्हणजे आक्रोश, आकांडतांडव, शिवराळ भाषेचा सर्रास वापर, जुन्याच गोष्टींचा दाखला देत नव्या पिढीपुढेही तेच ते विचार मांडणे आणि व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणे म्हणजे विद्रोह असाच अनेकांचा समज आहे; पण हा शुध्द गैरसमज आहे. विद्रोह परिवर्तनासाठी असतो. तर्कशुद्ध विद्रोह नवनिर्मिती करतो. तंत्रशुद्ध, अभ्यासपूर्ण विद्रोह समाजाचा मित्र असतो. विद्रोही कधी-कधी आक्रमक होतो; ती नैसर्गिक अशी प्रतिक्रिया असते. ती तात्कालिक असते. 


श्री चंद्रकांत कदमांनी हाच विद्रोहाचा वारसा शालेय जीवनापासून सोबत घेऊन प्राप्त परिस्थितीशी चार हात करीत कविता, गीत, गायनाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचा वसा घेतला. ते पेशाने शिक्षक आहेत. त्यांना गझलेने वेड लावले. 'सन्मित्र' या टोपण नावाने ते गझला लिहतात. वर्ध्यात झालेल्या ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात त्यांनी मला त्यांचा गझलसंग्रह 'समतेच्या डोहाकाठी' भेट दिला. त्यांचा हा गझलसंग्रह वाचतांना त्यांच्या रचना मला आंबेडकरी विचारांनी ओतप्रोत, जुलुमी व्यवस्थेशी द्रोह आणि संविधानाशी प्रामाणिक राहात समाजाला मानवी मुल्ये, नीती- अनितीचा पाठ शिकवणाऱ्या वाटल्या... परंतू 'पालथ्या घड्यावर पाणी' या उक्तीप्रमाणे... समाज काही सुधारत नाही. कित्येक थोर संत, समाजसुधारक आणि महात्मे आले नि गेले... त्यांनी समाजप्रबोधन केले... पण मेंढरागत असलेला समाज कुणाचेही ऐकत नाही... हे पाहून कदमजी लिहून जातात.....


"नवा मनू इथे सदा नवाच राग छेडतो,

सुरात एक गायचे खरेच काम जोखमी!"


डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये धम्मचक्र प्रवर्तन करून सामाजिक क्रांती घडवून आणली. ते आयुष्यभर अस्पृश्य आणि मागासलेल्या लोकांच्या उद्धारासाठी लढले. गरीब, पिडीत, मागासलेल्या लोकांना धर्माची आवश्यकता आहे. या लोकांचा उत्कर्ष बौद्ध धर्मच करेल आणि एक दिवस उच्च-निच व जाती-भेदामध्ये जीवन जगणाऱ्या विस्कळीत लोकांना स्वातंत्र्याची, समानतेची गोडी लागेल आणि पुन्हा एकदा भारत बौद्धमय होईल, असा त्यांना विश्वास होता. त्यांनी कुटुंबामधील आणि समाजामधील विषमता, द्वेष, असमानता व जातीभेद नष्ट करण्यासाठी बौद्ध धम्माचा सोपा व सरळ मार्ग निवडला. परंतु हा मार्ग आणि धर्म भारतामधील स्पृश्य हिंदूंनी स्विकारला नाही. याउलट या देशातील स्वार्थी, श्रेष्ठत्वाला आणि संपत्तीला हपापलेले लोक मोठया प्रमाणामध्ये सत्ता व संपत्तीचा वापर करून या देशामध्ये असमानता, अस्थिरता व जातीभेद कायम ठेवण्याचा अतोनात प्रयत्न करू लागलेत. बुद्ध धर्मातील अनुयायांमध्येही गटातटाचे राजकारण सुरू आहे. हे पाहून कदम यांच्यातील विद्रोही गझलकार आपल्या एका शेरात सल मांडतांना लिहितो...


तुझ्या अथांगशा निळ्या नभास सोडुनी

घरात भांडतात पाखरे अजूनही


समानतेच्या डोहाकाठी केवळ असमानता दाटून आलेली आहे. पैशाकडेच पैसा जात आहे... श्रीमंत अधिक श्रीमंत होतो आहे... राजकारण्यांचा मुलगाच राजकारणी होतो आहे... वारसा हक्काप्रमाणे सत्ताकारण एकाच घरात स्थिरावत आहे... घराणेशाही पुन्हा जोमाने रुजते आहे... संस्थानिके खालसा करून भारत स्वतंत्र झाला... आता नव्याने संस्थाने बनू पाहत आहेत... त्यासाठी इतिहास पुरुषांची जातीनिहाय वाटणी होऊ घातली आहे. दलितांचे आंबेडकर... मराठ्यांचे छत्रपती शिवराय... माळ्यांचे फुले... कोणाचे शाहू, कोणाचे बसवप्पा... हे पाहून श्री चंद्रकांतजी कदम लिहितात....


"हयात घालवली त्याने मानवतेसाठी

स्वार्थापोटी झाला आपापला शिवाजी" 


स्वार्थासाठी राजकारण करणारे सोज्वळतेचा आव आणून अडल्यानडल्या गोरगरिबांना लुटून त्यांना अधिकच गरिबीच्या गर्तेत लोटण्याचे काम बेमालूमपणे होतांना आपण पाहतो. टेबलावरच्या फाईली वजन ठेवल्याशिवाय पुढे सरकत नाहीत. 'हे पहा, तुमचंच काम हातावर आहे' म्हणत खाजणारे हात लपून राहत नाहीत. पाच वर्षानंतर तेच हात याच गरीबाच्या पायांना लागताना, त्या धडावरील शिराला कशाची म्हणून लाजही वाटत नाही, अशा कावेबाज लोकांना पाहून श्री कदम लिहितात... 


ओठात वेगळा अन् पोटात एक कावा

जनतेस भाबड्या का घेतोस रोज चावा?


या देशात आज अबला आणि दुबळा सुरक्षित नाही. एकटी स्त्री आणि गरीब-गरजू यांना कोण आणि कसे लुटेल याचा काही नेम नाही. स्त्रियांवरील अत्याचार, बलात्कार यासारख्या बातम्यांनीच अर्धेअधिक वृत्तपत्र भरलेले असते. कायद्याच्या पळवाटा मोठ्यांना धार्जिन असतात. चोर सोडून संन्याशाला फाशी होतांना पाहायला लागू नये म्हणूनच की काय न्यायदेवता डोळ्यावर पट्टी बांधून असते. छोटे मासे मोठ्या माशांचे भक्ष्य म्हणूनच जन्माला येत असावेत आणि ते कसे फाश्यात गावतील यासाठी टपून बसलेल्या या प्रवृत्तीचा समाचार घेताना सन्मित्र शेर लिहून जातात...


"जन्मभर पारध कराया सावजाची

पारधी वाटेवरी टपलेच होते"


परंतु काहीही असले तरी भारत हा जगातला सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश आहे. अनेक जाती, पोटजाती, धर्म, पंथ, वेश, रंग, रूप, भाषा, सण, उत्सव आणि संस्कृती इ.ने नटलेला भारत अखंड आहे. कित्येक राजकीय पक्ष, त्यांच्या विचारधारा आणि त्यातून माणसाचा आणि पर्यायाने राष्ट्राचा विकास साधण्याची प्रक्रिया अविरत सुरू ठेवणारी प्रणाली म्हणजे सार्वभौम भारताचे एकमेव 'संविधान'! स्वतंत्र भारत प्रजासत्ताक झाला... लोकंच लोकांकडून लोकांसाठी लोककल्याणकारी राज्यकारभार करण्यासाठीची संहिता अर्थात नियमावली म्हणजे 'भारतीय राज्यघटना'... या घटनेचे शिल्पकार म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर! यांच्या सन्मानार्थ भावना व्यक्त करताना गझलकार कदम अभिमानाने सांगतात....


समस्त देश चालतो तुझ्या दिल्या पथावरी

उन्हास आज लाभते तुझ्यामुळेच सावली


तब्बल ७६ गझलांचा हा संग्रह गझलकाराच्या नानाविध भावभावनांचा आविष्कार असून यामध्ये प्रेम, प्रणय, भक्ती, नितीपाठ, कळवळा अशा विषयाला त्यांनी हात घातला आहे पण त्यातून बुद्धाचे तत्वज्ञान आणि आंबेडकरी विचारांचा प्रभाव मात्र प्रकर्षाने जाणवतो. समतेची कास धरणारा 'सन्मित्र' समतेच्या डोहाकाठी त्याची तृष्णा भागविण्यासाठी, प्रसंगी विद्रोह करण्यासाठी जणू बाह्या सरसावून तयार आहे असे संग्रह वाचतांना रसिक वाचकांना वाटल्याशिवाय राहणार नाही.


अक्षर प्रकाशन संस्था, आजरा (कोल्हापूर) यांनी आकर्षकरित्या प्रकाशित केलेल्या या संग्रहाला प्रा. संजयकुमार बामणीकर यांचे मुखपृष्ठ, इचलकरंजीचे प्रसिद्ध गझलकार श्री प्रसाद कुलकर्णी यांची सर्वांगसुंदर प्रस्तावना तसेच जेष्ठ साहित्यिक श्री राजाभाऊ शिरगुप्पे यांची पाठराखण लाभलेला ८८ पृष्ठांचा हा बहारदार संग्रह केवळ ₹ ६०/- मध्ये रसिकांना आपली वाचनतृष्णा भागविण्यासाठी उपलब्ध आहे. सकस, सुंदर आणि गझलेच्या आकृतिबंधाला न्याय देणाऱ्या या विद्रोही संमित्राला भावी साहित्यिक वाटचालीसाठी अनकोत्तम शुभेच्छा!


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract