Jairam Dhongade

Drama Horror Inspirational

4.7  

Jairam Dhongade

Drama Horror Inspirational

स्टोरीमिरर- पारदर्शी पुरस्कार!

स्टोरीमिरर- पारदर्शी पुरस्कार!

4 mins
419


'स्टोरी मिरर - ऑथर ऑफ द इयर अवॉर्ड २०२२' हा डिजिटल साहित्य आणि प्रकाशन क्षेत्रातील भारतातील एक सर्वात मोठा पुरस्कार आहे. या पुरस्कारासाठी मला नामांकन मिळाले होते, हे सांगतांना मला आनंद होत आहे. माझ्या साहित्यिक प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि वाचक / लेखकांसाठी भारतातील सर्वात मोठ्या बहुभाषिक व्यासपीठाद्वारे ओळखल्या जाणाऱ्या २% लेखकांमध्ये मी असल्याचा मला अभिमान आहे.

 

'स्टोरी मिरर’ साहित्यिक जगतातील प्रतिभावान आणि कल्पक लेखकांच्या अतुलनीय कामगिरीचा उत्सव साजरा करते. जे साहित्यिक आपल्या प्रभावी शब्दांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात, आपल्या साहित्य कलाकृतींची अमिट छाप सोडतात त्यांचा गौरव, सत्कार आणि कौतुक सोहळा व्हावा यासाठी वेगवेगळ्या लेखनस्पर्धा घेऊन त्यांना कायम लिहिते ठेवण्याचे कार्य 'स्टोरी मिरर’ अविरतपणे करते. अधिकाधिक लोकांनी लिहिण्यासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान त्यांच्या वाचकांना वाटावा हा स्टोरी मिररचा उद्देश असून अशा प्रकारच्या प्रतिभेची ओळख साहित्यक्षेत्रातील जाणकार रसिकांना करून देणे आणि साहित्यिकांना पुरस्कार देण्यात त्यांना धन्यता वाटते.


‘टाळी’ देणे- नामांकन मिळालेल्या साहित्यिकाचे साहित्य 'स्टोरी मिरर’च्या वेबसाईटवर प्रकाशित करून ते वाचकांसाठी उपलब्ध करून दिले जाते. आपल्या आवडीच्या साहित्यिकाला ‘टाळी’ म्हणजे ‘वोट’ मिळवण्यासाठी एक ‘लिंक’ निर्माण केली जाते. ती लिंक त्या त्या साहित्यिकांनी आपल्या वाचकांना पाठवून ‘टाळी’साठी आवाहन करीत पसंती मिळवायची! 


या पुरस्कार प्रक्रियेतला एक महत्वाचा भाग – वाचकांची पसंती आणि 'स्टोरी मिरर’च्या संपादक मंडळाची पसंती हा दुसरा भाग ! या दोन्ही कसोटीवर अग्रक्रमी राहणारा साहित्यक या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचा मानकरी ठरणार. अशी पारदर्शी स्पर्धा एक महिना सुरु होती आणि त्या महिन्याभरात वाचकांच्या टाळ्या मिळवत साहित्यिक लिडरबोर्डच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेतील क्रमिक स्थितीवर लक्ष ठेवून मार्गक्रमण करीत होते. या टाळ्या मिळवण्यासाठी प्रत्येकजण आपल्या जीवाचा आटापिटा करीत होता. मित्र, मित्रांचे मित्र, परिचित, नातलग, सहकारी इ. लोकांना लिंक पाठवित 'टाळी'ची याचना करीत आपल्या स्नेहबंधाला बळकट करण्याचा प्रवास सुरु होता. 


ठाकलोसे द्वारी । उभा याचक भिकारी ॥

मज भीक काही देवा । प्रेमभातुके पाठवा ॥

याचकाचा भार । घेऊ नये येरझार ॥

तुका म्हणे दान । सेवा घेतल्या वाचून ॥


या समर्पक अभंगाची याप्रसंगी मला आठवण येते.


मी एका सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रशासक म्हणून सेवारत आहे. गेली २५ वर्षे या क्षेत्रात असल्यामुळे असंख्य डॉक्टर्स, रुग्ण, त्यांचे नातेवाईक, फार्मासिस्ट, मेडिकल सेल्स प्रतिनिधी, रुग्णालयातील कर्मचारी, मी स्वतः प्लेसमेंट सेंटर चालवितो त्यामुळे मी सेवेत रुजू केलेले मनुष्यबळ, माझे मित्र, नातेवाईक, शेजारी असा भलामोठा गोतावळा पाठीशी आहे. मला 'स्टोरी मिरर' च्या 'ऑथर ऑफ द इअर'चे नामांकन मिळाले आणि एक उत्साहवर्धक प्रवास सुरु झाला. २१ फेब्रुवारी ते २३ मार्च २०२३ या महिनाभराच्या काळात मी एक 'याचक' म्हणून 'टाळी'साठी सर्वांना बिनधोक 'याचना' करीत राहिलो. या निमित्ताने प्रत्येकाशी प्रत्यक्ष भेटलो, सोशल मिडीयाच्या फेसबुक, व्हाट्सअप्प, मेसेंजर या सारख्या माध्यमातून संवादसत्र सुरू झाले. काहींना फोनवरून बोललो. 'मी लिंक पाठवितो आहे, मला आपले अमूल्य वोट द्या!' ते कसं करायचं... त्यातील तांत्रिक अडचणी, प्रसंगी स्क्रीनशॉट पाठवून वोटिंग प्रक्रिया समजावणे असा गंमतीदार प्रवास सुरु झाला. २२ मार्चला ७८८ वोट घेत मी लिडर बोर्ड तालिकेत दुसऱ्या स्थानावर आलो. 


२३ मार्च २०२३... या स्पर्धेचा अंतिम दिवस उजाडला... सकाळी उठल्याबरोबर स्टोरी मिररची साईट उघडली... दुसऱ्या स्थानी कायम होतो... हे स्थान कायम राखण्याचे आव्हान होते. पहिल्या स्थानाचा स्पर्धक १९०४ वोट घेऊन होता... तो पल्ला गाठणे अवघडच होते कारण वोटची प्रक्रिया क्लिष्ट होती... प्रत्येकाला भेटणे शक्य नाही, फोनवर सांगून वोट प्रकिया सांगून कळणाऱ्यांची संख्या फार कमी... सायंकाळी ७ वाजेपर्यंत ७८८ वरून ८३४ वर पोहचलो... माझ्यानंतरचे तिसऱ्या-चौथ्या स्थानावर असलेले स्पर्धक ३०-४० टाळ्यानी पिछाडीवर होते. ऑफिसमधून ७.३० ला घरी आलो. माझ्याच गल्लीत एका मित्राच्या वास्तुशांती व गृहप्रवेश कार्यक्रमात निमंत्रित होतो. तिथे गेलो... जेवणानंतर मग चार शेजारी, मित्र भेटले... आणि मग वोटिंग प्रपंच थाटला.


८३४ ते ९६४ असा १३० टाळी दानाचा प्रवास रात्री ८ ते १२ या चार तासात १२-१५ मित्रांच्या साह्याने झाला. ज्यांनी त्यांनी जिकडे तिकडे फोन लावण्याचा सपाटाच सुरू केला. ३ नंबरवाल्या स्पर्धकाने दोनदा मुसंडी मारीत मला १०-१२ वोटनी मागे लोटले परंतु आता ही माझी चुरस राहिली नव्हती... रात्री बारापर्यंत माझ्या सोबतच्या मित्रांनी सगळीकडे फोनाफोनी करून माझी आघाडी कायम राखली आणि Voting time out पर्यंत मला ९६४ टाळ्यांचे दान मिळवून दिले... ९५२ वर तिसरा तर ८७५ वर चौथा स्पर्धक राहिले. फटाक्यांची आतषबाजी झाली... ते कोणी, कधी आणि कुठून आणले हे कळले पण नाही. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या माझ्या सहस्पर्धकांनी स्पर्धेतील चुरस कायम राखली... मी त्यांचे अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो.


या माझ्या महिन्याभराच्या प्रवासात मला साथ देत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या आणि मला या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी विजेता बनविणाऱ्या या ९६४ शिलेदारांचा मी कायम ऋणी आहे. तांत्रिक अडचणीमुळे प्रबळ इच्छा असूनही जे 'टाळी' नोंदवू शकले नाही असे जे दानशूर, त्यांचाही मी मनस्वी आभारी आहे. ज्यांनी 'लिंक' पाहिली परंतु आणखी खूप वेळ आहे म्हणत, टाळी द्यायचे विसरले त्यांचा तसेच माझ्यासाठी वोट करणाऱ्या मित्रांचे मित्र... ज्यांना मी किंवा मला ते ओळखतही नाहीत अशा सर्वांचा मी आभारी आहे. एकाचे नाव नमूद करून दुसऱ्यास नाराज करणे माझ्या तत्वात बसणारे नाही, म्हणून कोणाचाही नामोल्लेख न करता... स्टोरी मिरर प्रस्तुत, ' ऑथर ऑफ द इयर २०२२' या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचा मला विजेता / उपविजेता बनविण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साथ करणाऱ्या तमाम स्नेहीजनांचा मी कायम ऋणी राहीन.


संपूर्ण पुरस्कार प्रक्रियेचे पारदर्शकपणे आयोजन व नियोजन करीत भारतभरातील एकूण १० भाषेतल्या साहित्यिकांचा गौरव आणि त्यांच्या लेखणीस बळ देणाऱ्या 'स्टोरी मिरर' या नामांकीत साहित्य संस्थेचे मनःपूर्वक आभार... या स्पर्धेच्या निमित्ताने काही नवे ऋणानुबंध जुळले... जुन्या संबंधाला उजाळा मिळाला... या अनुषंगाने संवाद साधता आला... विजेता कोणीही होवो परंतु मी केलेली प्रामाणिक मेहनत आणि माझ्या गोतावळ्याचे माझ्या सोबत असणे मनाला उभारी,आनंद आणि ऊर्जा देऊन गेले, हे नमूद करतांना मला मनस्वी अभिमान वाटतो. सर्व स्पर्धक साहित्यिकांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama