Jairam Dhongade

Abstract

3  

Jairam Dhongade

Abstract

बंदिस्त रुणझुण

बंदिस्त रुणझुण

4 mins
225


डॉ. शशिकांत गंगावणे... सोशल मिडियाच्या माध्यमातून आमची ओळख झाली ती फेसबुकमुळे... ओळखीचे रूपांतर एकमेकांच्या लिखाणाला प्रतिसाद देत सुरू राहिलं... मग ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं... पुढे लिखित शब्दाला वाचा फुटत फुटत... फोनवर बोलणे सुरू झालं... भावबंध जुळता जुळता, दिलखुलास चर्चा करीत करीत, आम्ही कधी व्हिडीओ कॉलिंग पर्यंत आलो कळलं नाही. डॉ. शशिकांत गंगावणे सर पेशाने वैद्यकीय अधिकारी... ते दमा व क्षयरोग तज्ञ... तसा मी ही एका हॉस्पिटलचा प्रशासक... त्यामुळेही आमची गट्टी जमली असावी. आमची एकमेकांची प्रत्यक्ष भेट अद्याप जरी झाली नसली तरी फार दिवसापासून ओळखीचे स्नेही असल्यासारखे आमचे भावविश्व बनले आहे. एकमेकांच्या प्रकाशित पुस्तकांची देवाण घेवाण झाली आणि त्यांनी त्यांच्या प्रेमाने पाठविलेल्या हायकू संग्रह 'बंदिस्त रुणझुण' वर आज लिहिण्याचा योग आला आहे.


आपल्या माय मराठीची कुसच उबदार... तिने मराठी अभंग, कविता, ओव्या, गण-गवळण-लावणी, पोवाडे असे अस्सल मराठी काव्यप्रकार जन्माला घातले, पोसले, जपले, जोजवले तसे परकीय काव्यप्रकारही आपल्या कुशीत वाढविले. फारशीतून आलेली गझल मराठीत जोमाने बहरली... झपाट्याने लोकप्रिय होऊ लागली. तसाच एक जपानी काव्यप्रकार 'हायकू' मराठी मातीत रुजतो आहे. तीन ओळीत सतरा अक्षरांची मनाला भुरळ घालणारी शब्दचमत्कृती म्हणजे हायकू! स्व.सुरेश भटांनी गझलेला सोन्याचे दिवस दाखवले तसे शिरीष पै यांनी हायकू हा जपानी काव्यप्रकार मराठीत पहिल्यांदा आणला. गझलकाराएवढे हायकुकार नसतीलही परंतु आहेत त्यात डॉ.शशिकांत गंगावणे यांचे नाव घ्यायला भाग पडेल अशा सशक्त, आशयघन, वैचारिक आणि संवेदनशील मनाची अनुभूती देणाऱ्या त्यांच्या 'हायकू' रचना काबिले-तारीफच अशा मला वाटतात... त्यांचा हाच हायकू किती बोलका आहे पहा,

          

तीनच ओळी

कवींच्या साम्राज्यात

अबोल टाळी


हिंदू धर्माने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे माणसाचे चार वर्ण मानले आणि त्यात अस्पृश्य तर या वर्णव्यवस्थेच्याही बाहेर ठेवले होते. अस्पृश्य म्हणजे ते लोक की ज्यांच्या स्पर्शाने किंवा त्यांच्या सावलीने मनुष्य अपवित्र होतो किंवा बाटतो....वर्णभेद हा भारतामध्येच नव्हे तर पश्चिमात्य राष्ट्रांमध्ये होता. परंतु अस्पृश्यतेसारखी अत्यंत भयानक गुलामगिरीची प्रथा भारतात होती. परंतू २६ जानेवारी १९५० रोजी स्वतंत्र भारताचे संविधान लागू झाले आणि अस्पृश्यता कायद्याद्वारे नष्ट करण्यात आली. ती प्रथा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मोडीत काढली त्यामूळे वाचा असून मुका आणि कान असून बहिरा झालेला अस्पृश्य माणूस घटनादत्त अधिकारांमुळे ऐकायला, बोलायला, शिकायला, संघटित व्हायला आणि संघर्ष करून न्याय्य-हक्क मिळवायला लागला, म्हणून डॉ.गंगावणे लिहितात की...


मूक बधिर 

बोलू ऐकू लागला 

न्याय मिळाला 


आणि हीच बाबासाहेबांविषयीची कृतज्ञता अधोरेखित करताना डॉ.शशिकांतजी लिहितात...


एका सहीने 

माणूस बनविले

मला भिमाने 

 

भारत लोकशाहीप्रधान देश आहे. येथे लोकं लोकांसाठी लोकांकडून शासन चालवतात. दर पाच वर्षांनी सार्वत्रिक निवडणुकांतून लोकंचं लोकांचे प्रतिनिधी निवडतात. कालौघात हे राजकारण समाजकारण न राहता व्यापार झाला. समाजसेवा करणारे लोकप्रतिनिधी आता शासकीय मानधन घेऊ लागले. सत्ता आणि खुर्चीच्या लोभामुळे घराणेशाही आणि त्यातून बोकाळलेले संघर्ष आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय. एकदा निवडून आले की निवडलेले लोकप्रतिनिधी आता लोकांना पाच वर्षे भेटेनासे झाले. ही राजकीय स्थिती डॉ. गंगावणे विषद करतांना हायकू लिहतात...


एक कावळा 

पाच वर्षांनी आला 

बगळा झाला 


शिक्षणाने माणूस शहाणा झाला. भारत कृषिप्रधान देश आहे परंतु शेतीत राबण्यास आजची तरुणाई धजत नाही. प्रत्येकाला नोकरीची ओढ लागली आहे. पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी अशी सामाजिक स्थिती होती. चित्र पालटले... उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती झाली... बेकारी वाढली. इतरांना मोठं करण्यात आपलं बौद्धिक कौशल्य वापरणारा बुद्धिजीवी घाण्याचा बैल झाला... 'टार्गेट अँचिव्ह' करण्यात धन्यता मानत हयात संपविणारा आजचा नोकरदार वर्ग पाहता, चपखल बसणारा हायकू डॉ. गंगावणे लिहितात...


ओझे वाहते

कुंभाराचे गाढव

रमून जाते


लेखन कौशल्य आणि साहित्य सृजनास प्रतिभेची नितांत गरज असते. प्रतिभावंत साहित्यिकांचे लेखन वाचून वाचक विस्मयचकित होतात, त्यात नवल ते काय? परंतु एखाद्याच्या साहित्यकृतीस, त्याचे नाव खोडून त्याखाली आपले नांव घालून, त्यात किरकोळ बदल करून आपल्या नावावर खपविणाऱ्या साहित्यचोरांचा सुळसुळाट झाला आहे. सोशल मिडियामुळे, अनेकानेक समूहामुळे समूहात फिरणारे मेसेज लवकर सर्वांना समजतात. कोणाची गझल, कविता, लेख इ. आपल्या नावाने प्रकाशित करणाऱ्या महाभागांसाठी त्यांचा प्रस्तुत हायकू प्रकाश टाकणारा वाटतो...


भेटले थोर

साहित्यसमूहात

आशयचोर


'भले लाख मरोत, पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे'... तो जगला पाहिजे. परंतु तोच अकाली गेला तर त्याच्या जाण्याने जी वाताहत होते त्याचे चित्रण करणारा हा एक हायकू...


विशाल झाड

उन्मळून पडले

पक्षी उडाले


स्त्री क्षणाची भार्या परंतु अनंत काळाची माता असते. कुटुंबाला एकसंघ बांधून ठेवण्यात तिचे कसब पणाला लागते. लेक, बायको, आई, बहीण, काकू, मावशी, आत्या, जाऊबाई, नणंद अशा वेगवेगळ्या नात्यातून तिचा प्रवास आजन्म सुरू राहतो. 'परक्याचे धन' म्हणून जन्मताच लागलेला ठप्पा तिला जन्मभर नात्यात बंदिस्त करून टाकतो, ही स्त्री जन्माची गाथा तीनच ओळीत बंदिस्त करणारा हायकू पहा....


घरात आली

उंबरा ओलांडून

बंदिस्त झाली


असे एक दोन नाही तर तब्बल दोनशे चाळीस हायकूंनी सजलेला, संवेदना प्रकाशन, पुणे यांनी आकर्षकरित्या प्रकाशित केलेला 'बंदिस्त रुणझुण' हा हायकू संग्रह वाचकाला खिळवून ठेवतो. विचार करायला भाग पाडतो. डॉक्टर असूनही मनाने हळवे, संवेदनशील असणारे डॉ. शशिकांत गंगावणे वेळ काढून लिहितात. हायकू सोबत 'अलक' म्हणजे बोधप्रद लघुकथा लिहिण्यात त्यांचा हातखंडा आहे. उत्कृष्ट गीत गायन आणि गायनाच्या कार्यक्रमात ते हिरीरीने भाग घेतात. असे बहुआयामी व्यक्तित्वाचे धनी असलेले डॉ.शशिकांत गंगावणे मला आपला मित्र मानतात, याचा मला नेहमीच अभिमान वाटतो. त्यांच्याकडून विपुल असे लेखन घडावे आणि मराठी साहित्य समृद्ध व्हावे.. यासाठी मी त्यांना सुयश चिंतितो आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देतो!



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract