Jairam Dhongade

Abstract

3  

Jairam Dhongade

Abstract

'शब्दाटकी'

'शब्दाटकी'

4 mins
164


मराठमोळ्या काव्य रसिकांच्या हाती "शब्दाटकी" हा माझा पहिलावहिला मराठी गझल संग्रह सुपूर्द करतांना माझ्या अंतरंगात 'आनंदाचे डोही, आनंद तरंग' उठताहेत. माणूस वेड्यागत करू लागला की त्याला भुतानं झपाटलंय असे म्हणतात. अंधश्रद्ध याला भुताटकी म्हणतात. मलाही शब्द झोपू देईनात. निवांत डोळे मिटून थोडा कुठे पडलो की हे शब्द छान फेर धरून डोक्यात नाचतात. शब्दांची ओळ... ओळींचा 'मिसरा'... मिसऱ्याचा शेर... मतला... असे करीत गझल कधी प्रसवते, कळतच नाही. अक्षरशः शब्दांनी मला झपाटलंय म्हणाना आणि म्हणून माझी शब्दाटकी आज साकारली आहे. या संग्रहात माझ्या निवडक 75 गझलांचा मी समावेश केला आहे. प्रत्येक गझलेचे वृत्त आणि लगावली (लक्षणे) अनुक्रमणिकेत नमूद करण्याचा एक नवा पायंडा अभ्यासक रसिकांना आवडेल असा विश्वास वाटतो.

मी गणितीय विज्ञानाचा पदवीधर! मला साहित्याची आवड आहे परंतु मी स्वतः चे असे काही लिहण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. विज्ञान आणि साहित्य निर्मिती? त्यातही कविता, गझल, अभंग, हायकू इ. लिहणे म्हणजे तसा माझ्यासाठी भीमपराक्रमच! कारण आयुष्याच्या उत्तरार्धात काही लिहावं असं वाटणं, मग खरंच लिहितं होणं, त्यासाठी परत मराठी व्याकरणाचा मागोवा घेणं, हे ओघाने आलंच! ज्या वयात हे लिहायला पाहिजे होतं त्या वयात ते लिहता नाही आलं.. पोटाची खळगी भरण्यासाठी छोट्यामोठ्या नोकरीत आणि भाकरीच्या फिकीरीत उमेदीचा काळ गेला.

आजच्या सारखे तेंव्हा सोशल मीडियाचे जाळे नव्हते, असले तरी ज्ञात नव्हते आणि तेंव्हा ते मिळवण्याची कुवतही नव्हती. स्मार्टफोनमूळे जग मुठीत आलं, फेसबुक-व्हाट्सएप जीवनाची मुख्य नाडी ठरली. खूप वाचायला, शिकायला आणि समजायला लागलं आणि लिखाणाची इच्छाशक्ती जागृत होऊ लागली. 20-2500 च्यावर फेसबुक मित्रांचा गोतावळा, साहित्यिक मंडळींचे अनेक पेज आणि व्हाट्सएपवरचे अनेकानेक ग्रुप आणि मित्र परिवार यामुळे लिहण्याची प्रेरणा झाली. माझ्या अनेक पोस्टला भरभरून प्रतिसाद मिळायचा. छान लिहायचो. कवी मित्रांच्या कवितेच्या पोस्टला कवितेत अभिप्राय देऊ लागलो. त्याला इतरांच्याही 'लाईक' आणि 'कॉमेंट्स' मिळू लागल्या आणि माझ्यातला कवी आकार घेऊ लागला.

मी ' विश्व इन्स्टिट्यूट युरॉलॉजी व किडनी सेंटर', या महाराष्ट्रातील नामांकित मूत्ररोग, किडनीरोग आणि डायलिसिस सारख्या सुविधा देणाऱ्या आणि मूत्रसंस्थेच्या आजाराच्या निवारणार्थ निस्सिमपणे स्वतःला वाहून घेतलेल्या हॉस्पिटलचा प्रशासक म्हणून कार्यरत आहे. हॉस्पिटल खाजगी असल्याने कामाचा प्रचंड व्याप आणि ताण आहे. परंतु 20 मार्च 2020 नंतर व्याप-तापाच्या व्याख्याच बदलल्या. कोरोनामुळे सारे विश्व स्तब्ध झाले आणि प्रत्येकाला आपापले आयुष्य जगण्याचे, सिंहावलोकन करण्याचे आणि विरंगुळ्याचे काही क्षण उपभोगता आले. या कोरोनाने मला कवी बनविले! माझ्यातला कवी जागा झाला... लिहता झाला!

माझ्या लिखाणाला साथसंगत देणारे या हॉस्पिटलचे संचालक, माझे मार्गदर्शक डॉ.उमेश भालेराव आणि डॉ. सुशील राठी यांचे तसेच माझ्या सहयोगी कर्मचारी वृंदाचे आभार मानणे हे मी माझे इतिकर्तव्य समजतो.

रसिक मित्र हो! या संग्रहातील माझ्या गझल लिहतांना मी अनेक वृत्ते हाताळण्याचा प्रयत्न केला. 'एक कविता रोज' करण्याच्या छंदात विपुल लेखन झाले. अनेक मित्रांनी कविता- गझला छान झाल्यात, संग्रहच प्रकाशित करावा असं सुचवले आणि आज ते सृजन पुस्तकरूपाने आपल्या हाती देतांना 'आनंदची अंग, आनंदाचे' झाले आहे.

या एक-दीड वर्षाच्या काव्य प्रवासात मला लिहण्यासाठी प्रवृत्त करणारे माझे मित्र तथा जेष्ठ बंधू श्री शैलेष पसलवार, वरिष्ठ पो.नि., वडाळा, मुंबई यांच्या मी स्नेहात आहे. हाताला धरून शिकविणे म्हणजे काय? हे मी गझल करतांना शिकलो, असे माझे मार्गदर्शक से.नि.अभियंता, कवी-गझलकार-लेखक श्री उदयजी बरडे, माझ्या गझल प्रवासात मला मोलाचे मार्गदर्शन करणारे, ज्यांच्या ' पाकळ्या' काव्यसंग्रहास आणि 'गझल नामाची' गझल संग्रहास कविश्रेष्ठ, गझलसाम्राट स्व.सुरेशदादा भटांनी प्रस्तावना लिहिली असे पितृतुल्य आदरणीय श्री नामदेवराव आबने बाबा, पुणे यांच्या कायम ऋणात आहे.

या गझलसंग्रहाची पाठराखण करणारे आणि माझ्या विनंतीला होकार देऊन प्रस्तावना देणारे माझे गझलगुरू, मार्गदर्शक प्रसिद्ध कवी- गझलकार आणि खुमासदार निवेदक श्री बापू दासरी यांचा मी ऋणी आहे.

आपल्या व्यस्त रेकॉर्डिंग शेड्युलमधून, माझ्यावरील स्नेह आणि प्रेमापोटी आपला वेळातला वेळ काढून मला कौतुकाची थाप आणि मलपृष्ठासाठी भरभरून शब्दरूपी आशीर्वाद देणारे गझलगंधर्व आदरणीय श्री सुधाकरराव कदम सरांचे आभार मानणे ही माझ्यासाठी केवळ औपचारिकता असू शकणार नाही.

कवितेला एकांत प्रिय असतो... नव्हे विचारांची शृंखला खंडित होऊ नये, एवढी माफक अपेक्षा कवीची असते. मी काही लिहितांना दिसलो की काहीही आकस्मिक आले तरी परस्पर 'सेटल' करणारी माझी सौ. बबिता धोंगडे.... मुले चि. सोमेश व कु. राधिका ... भाऊ श्री विठ्ठल धोंगडे, त्याची अर्धांगिनी सौ.रेणुका ... माझ्या कविता, माझ्या रचना ऐकून सद्गदित होणारी माझी आई... आज ती आमच्यात नाही राहिली परंतु माझ्या बहुतांश गझला ऐकून कधी ती हसली, कधी रडली... तिच्या कौतूक भरल्या शब्दाचे, माझ्या प्रत्येक रचनेला पुरस्कार मिळाले. मी कृतार्थ झालो! हसतखेळत सदैव प्रेमाने पाठीशी उभ्या राहणाऱ्या माझ्या परिवारातील सदस्यांना जाहीर धन्यवाद देतांना आज मला धन्यता वाटते!

या संग्रहाला आकर्षक रूप देऊन ते प्रकाशित करण्याची आनंदमयी भूमिका आणि जबाबदारी लिलया पेलणारे स्वयं प्रकाशन, पुण्याचे प्रकाशक- मालक आणि स्वतः गझलकार असणारे माझे मित्रवर्य श्री शुभानन चिंचकर आणि त्यांचे सहकारी या सर्वांचा मी कायम ऋणी आहे.

गोतावळा (बालमित्रांचा W/A समूह), तेजकट्टा (महाविद्यालयीन मित्रांचा समूह), पैनगंगातीर (पैनगंगेच्या उगमापासून संगमापर्यंतच्या प्रतिष्ठित मान्यवर, गुरुजन व स्नेहींचा समूह), आमची माती, आमची माणसे (सनदी अधिकारी मित्रांचा समूह) अनेक डॉक्टर्स, फेसबुकवरील मित्रमंडळी या सर्वांनी मला प्रतिसाद देऊन लिहिते ठेवले, नव्हे माझ्या लिहण्याची ऊर्जा बनले, अशा सर्व रसिक मित्र-मैत्रिणींचे मी हृदयापासून आभार मानतो! या माझ्या गझल संग्रहावर मराठमोळे रसिक भरभरून प्रेम करतील याची खात्री वाटते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract