Jairam Dhongade

Inspirational

2  

Jairam Dhongade

Inspirational

वैचारिक....

वैचारिक....

3 mins
100


क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ही केवळ हाडामांसाची माणसे नव्हेत तर ती एक विचारधारा आहे. माणसाला माणसासम वागणूक मिळावी यासाठी जीवाचं रान करणारी, अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी आणि प्रस्थापितांसोबत न्याय्य हक्कांसाठी लढा देणारी ही लढवय्यी माणसे होती. ती खरी नररत्ने होती. 'स्वार्थ'शून्य जीवनशैली, प्रज्ञा-शील-करुणा या गुणांनी ओतप्रोत भरलेलं मन आणि बुद्धी, त्यामुळे अन्यायाविरुद्ध मनातून पेटून उठणारी ही माणसे आभाळाएवढी मोठी झाली.


आज आपलं कोणी ऐकलं नाही की चीड येते... 'माझं तेच खरं' असा अहंभाव बाळगत समाजसेवक म्हणून मिरवणारी माणसं घाणेरडं राजकारण आणि समाजकारण करतांना आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो. सामान्य माणसाला जे चाललंय ते पाहण्याशिवाय पर्याय नसतो... तेंव्हाही नव्हता आणि पुढेही नसेल.  


भारत लोकशाहीप्रधान देश आहे. माणूस समाजशील प्राणी आहे. गांव, वाडी, तांडे, वस्त्या, गल्ली, वार्ड, प्रभाग ते नगरे, शहरे आणि महानगरे माणसांनी भरली. घराचा कारभार घरातील कर्ता पुरुष पाहतो... त्याच्या इशाऱ्यावर घर चालते. घरातील बाकी मंडळी त्याच्या निर्देशानुसार चालतात. हा कर्तेपणाचा मान त्या कर्त्याला त्याच्या वयानुसार, ज्ञानानुसार आणि कर्तबगारीमुळे मिळतो. कुटुंबाचा उत्कर्ष करणे, कुटुंब जोडून ठेवणे हे जसं त्याचं कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारीचे काम असतं तसंच गावा-नगरा-महानगराच्या बाबतीत असतं, त्यासाठी इथे लोकं आपल्यातील एका कर्तबगार लोकाला सर्व लोकांच्या कल्याणासाठी निवडून देतात आणि त्याला पाठिंबा देऊन बळकटी देतात. कर्तेपणा म्हणजे सत्ता! आणि मग कालौघात या सत्तेसाठी कुरघोडी करण्याचे नवे नवे फंडे जन्माला येत गेले. स्वार्थासाठी, सत्तेसाठी माणूस माणूसपण विसरत चालला. माणसाचे कोतेपण अधोरेखित होतांना आपण पाहतो आहोत. सत्तेसाठी माणूस कुठल्याही थराला जात आहे. 


फुले, शाहू, आंबेडकर यांनी काय केले? सारा इतिहास आपण जाणतोच. एखादा व्यक्ती फुले- शाहू- आंबेडकरवादी आहे म्हणजे नेमके काय? याचा विचार, अभ्यास आणि आचरण होणे गरजेचे आहे. 


नवरा मेला की बायको सती जायची... स्त्रीने शिक्षण घेणे म्हणजे घोर पाप आणि अपराध मानला जायचा... विधवा विवाह म्हणजे महाभयंकर कृत्य समजलं जायचं, अस्पृश्यांची सावलीही अंगावर पडणे म्हणजे विटाळ मानला जायचा... सार्वजनिक पाणवठ्यावरून त्यांना पाणीसुद्धा घ्यायची मुभा नव्हती... अशा भयानक समाजरचनेत दलित, अस्पृश्य आणि स्त्रिया जिवंतपणी नरकयातना सहन करीत लाचारवाने जगणे जगत होत्या. हे या जाणत्या महापुरुषांना पिडादायक वाटायचे कारण त्यांची हृदये अपरिमित करुणेने भरलेली होती. या वंचितांसाठी काहीतरी केलं पाहिजे असं या प्रज्ञावंतांना वाटायचं कारण या शिलवंतांना हे दैन्य, दुःख पाहवत नव्हते. फुले दाम्पत्यांनी पहिली मुलीची शाळा काढली. त्यांच्या वाड्यातील हौद अस्पृश्यांना खुला करून दिला. सहचरिणीला शिकवून शिक्षिका केलं... मानवतेचा महामार्ग प्रशस्त केला. शाहू महाराज रयतेचे राजे होते. शिष्यवृत्या, आरक्षण ही त्यांची देण... बाबासाहेबांनाही त्यांनीच उच्चशिक्षणासाठी मदत केली. 


भारत पारतंत्र्यात होता... १९४७ ला तो स्वतंत्र झाला परंतु सामाजिक आणि आर्थिक विषमतेची खोलावत गेलेली दरी स्वातंत्र्यानंतरही रुंदावतच होती आणि रंग, जात, धर्म, पंथ, भाषा यातच समाज गुरफटत राहिला. जाती-धर्माच्या भिंती मजबूत करण्यात आणि आपली पोळी शेकून घेण्यात तरबेज राजकारण्यांच्या पिढ्या घडल्या... बहुजन दलितांकडे वोट बँक म्हणून पाहणारे राजकारणी केवळ निवडणुकापुरता कळवळा दाखवतात हे सत्य आजही कायम आहे. पैसेवाल्याकडे पैसा आणि सत्ताधीशाकडे सत्ता कायम पाणी भरते आहे. हे चित्र बदलण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिली... जातीनिहाय आरक्षण... आणि मानवाच्या कल्याणासाठी लिखित नियम केले. शिक्षण, नोकरी आणि सत्तास्पर्धेत सामान्य माणसाला पुढे आणणारा हा मानव आणि त्यांची दूरदृष्टी केवढी प्रगल्भ होती याची प्रचिती येते. १९५० ला प्रजासत्ताक भारताचे संविधान आणि त्याबरहुकूम कारभार सुरू झाला. या ७-८ दशकात सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक अमुलाग्र बदल झाले. दलित, वंचित, भटके आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग मुख्य प्रवाहात सामील झाले.


परंतु इथेही दुर्दैव म्हणतात ते आडवं येते आहे. शिकलेला हा समाज अद्यापही संघटित होत नाही... झाला तरी टिकत नाही... छोट्यामोठ्या आमिषाला बळी पडून संघटनेच्या उपसंघटनांचे पीक जोमात वाढते आहे... कुटुंबातल्या निदान एकाने शिकून संपूर्ण कुटुंब आणि पर्यायाने समाज सुधारावा हा बाबासाहेबांचा मूलमंत्र समाज विसरत चालला आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा... ताकतीचा हा मंत्र! परंतु स्वार्थासाठी संघर्ष आणि संघटन हे शिक्षणाला गालबोट लागण्याचा उपक्रम जिकडेतिकडे राबतांना दिसतो आहे.


या महामानवांना हे सर्वकाही असंच सहजासहजी नाही मिळालं... प्रचंड संघर्ष करून, प्रस्थापितांचा रोष पत्करून त्यांनी हे बदल घडविण्यासाठी आपलं उभे आयुष्य पणाला लावले. त्यांनी केलेल्या क्रांतीच्या झाडाची गोड फळे आज आपण चाखतो आहोत... त्यांनी वैयक्तिक स्वार्थ साधला नाही... त्यांचा वारसा चालविणाऱ्या स्वतःच्या पिढ्या निर्माण केल्या नाही... वंशपरंपरागत गादी निर्माण केली नाही. 


इतरांचे दुःख पाहून ज्यांचं हृदय हेलावतं... त्या दुःखातुन बाहेर काढण्यासाठी जो तन-मन-धनाने सहाय्य करतो... इतरांच्या न्याय्य हक्कासाठी प्रसंगी लढा देतो... इतरांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून जो आनंदी होतो... 'स्वार्थ' हा शब्द ज्याच्या शब्दकोशातच नसतो, असा निस्सीम मानवतेचा पुजारी म्हणजे खरा 'फुले-शाहू-आंबेडकरवादी' ओळखावा असे सर्वार्थाने मला वाटते!


बाकी सर्व मिथ्या....!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational