Jairam Dhongade

Inspirational

2.8  

Jairam Dhongade

Inspirational

'वर्दी'तला 'दर्दी' माणूस: श्री शैलेष पसलवाड

'वर्दी'तला 'दर्दी' माणूस: श्री शैलेष पसलवाड

4 mins
188


2018 चा बारावीचा निकाल जाहीर झाला. माझा पुतण्या कृष्णा विठ्ठल धोंगडे हा विज्ञान शाखेत पास झाला. तसा तो बौद्धिक पातळीवर खूप हुशार परंतु गुणपत्रिकेवर फार विशेष टक्केवारीची मोहोर उमटवू शकला नाही. आता पुढे काय? हा इतर पालकांना पडणारा यक्ष प्रश्न माझ्यापुढे उपस्थित झाला नाही. आपल्या लेकराला सामान्य पदवीधर बनविणे आजच्या काळात तसं जोखमीचंच म्हणावे लागेल. माझा निर्णय पक्का होता, पुढे नेमकं काय शिकायचं, कुठलं क्षेत्र जोखायचं याची त्यालाही कल्पना दिली होती. मी त्याच्यासाठी डायलिसिस टेक्नॉलॉजी चे तंत्रशिक्षण (त्याच्यावर न लादता) देण्याचे ठरविले. उद्देश हा की निदान त्यामुळे त्याला जीवनात स्वावलंबी होण्यासाठी बळकटी मिळेल. उच्च दर्जा व गुणवत्तेचे हे शिक्षण मुंबई-पुण्याशिवाय उपलब्ध नाही. पुण्यातसूद्धा पदवी शिक्षण नाही, तिथे डिप्लोमाच करता येणार होता. तसं वर्दळ आणि लोकलचा प्रवास या दृष्टीने पुणे म्हणजे सुरक्षितता वाटत होती. मुंबईत डिग्री मिळणार परंतु मुंबईत हा टिकेल का? लोकल ट्रेनचा प्रवास त्याला होईल का? कुठे हरवला तर? असे एक नाही अनेक प्रश्न माझी झोप हराम करत होते. पुणे असो की मुंबई त्याच्या या दोन्ही ठिकाणी कोर्सला प्रवेश मिळवण्याबद्दल मी निर्धास्त होतो कारण या दोन्ही ठिकाणी मी कमावलेली माझी स्नेहाची माणसे होतीच पण नेमका कुठे प्रवेश द्यावा यासाठी मनाची घालमेल सुरू होती. 

मुंबई का पुणे? डिग्री का डिप्लोमा? मुंबईला श्री शैलेषदाला फोन केला. माझी घालमेल कानी घातली. "तू त्याला माझ्याकडे आणून सोड, माझ्याकडे राहील, मी पाहून घेतो काय करायचं ते" बसं, त्यांच्या धीराच्या एवढ्या बोलण्यावर माझी कृष्णाला मुंबईला शिकवण्याची मानसिक तयारी झाली आणि आम्ही तिकीटे बुक केली. आणखी एक मित्र स्व. श्री आर. के. पुरी सर उपचारासाठी तिथे मुंबईलाच होते. त्यांना बोललो. ते म्हणाले, मी इकडे महिनाभर तरी आहे, त्याच्याकडे लक्ष देईन आणि इतरही आवश्यक मदत करता येईल. शैलेषदाला मी नांदेडहुन निघत असल्याची कल्पना दिली. त्यांनी माझ्यासाठी त्यांचा कॉन्स्टेबल आम्हाला घेण्यासाठी पाठविला, त्यांचा संपर्क नंबर दिला, मला राहण्यासाठी हॉटेलमध्ये रूम बुक करून ठेवली, मुंबईत पोहचेपर्यंत आमची काळजी वाहणारे दादा, माझ्या मनात खोलखोल शिरत होते. 

दादा अंधेरी एमआयडीसीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून होते. तिकडेच एका हॉटेलला आम्ही थांबलो होतो. दुसरे दिवशी शैलेष दादांनी हॉटेलला कारच पाठवून दिली. त्यांनी आम्हाला घरी बोलावून घेतले. मी, पुतण्या व पुरी सर असे घरी गेलो. हॉटेलहुन निघाल्यापासून त्यांच्या घरी पोहचेपर्यंत दादांचे सतत फोन... कुठवर आहात, वेळ का लागतोय म्हणून! चेंबूरच्या उच्चभ्रु वस्तीत जिमखाना परिसरात दादांचा फ्लॅट... फ्लॅटमध्ये टेरेस ब्लॉक मिळणं हे स्वप्न असतं... दादांची या स्वप्नाची पूर्ती झाली. त्यांच्या टेरेस फ्लॅटमधील अलिशान घरी आम्ही पोहचलो. सौ. वहिनींनी कांदेपोहे, तुपाचा शिरा बनविला होता. म्हणायला ब्रेकफास्ट पण जेवल्यासारखा ताव मारला.

मी तसा सौ. वहिनींसाठी नवागत होतो. श्री पुरी सर म्हणजे त्यांच्या कुटुंबातील सदस्यच होते. दादा वहिनींना माझा परिचय करून देत होते. मी चातारीचा...वडील काय करीत... मी कसा शिकलो... कोण्या परिस्थितीतुन आलो... नांदेडला कसा स्थायिक झालो... कसा कुटुंबासह एकत्र राहतो... आणि माझ्याबद्दल शैलेषदांच्या तोंडून ऐकतांना रोमांचित होत होतो. कधी आमच्या फारशा गाठीभेटी नसतांना, क्वचित संपर्कात असतांना दादांना माझ्याबद्दल एवढी माहिती कशी? ‘घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलांपाशी’ म्हणतात तसे गावाकडच्या मंडळींची एवढी माहिती आणि त्यांच्याप्रती स्नेहभाव पाहून, अनुभवून मी कृतार्थ झालो.

आम्ही घरी आलेल्याच कारच्या ड्रायव्हरला मला संबंध मुंबई फिरून दाखवण्याच्या सूचना करून, ऍडमिशनचे काम निपटून अंधेरीच्या हॉटेलला आम्हाला आणून सोडण्याचे त्यांनी सांगितले. सारी कामे आटोपून आम्ही रूमवर आलो. पो.कॉ. श्री संतोष राठोड यांनी आमची शाही बडदास्त ठेवली. तारांकित हॉटेलमध्ये जेवणखाण झाले. राठोड सांगत होते, साहेबांची बदली झाली... अंधेरीवरून ओशिवरा पो. स्टे. ला... त्याचे डोळे पाणावले... साहेबांसोबत मी पण बदली करून घेणार म्हणून सांगत होते... असा साहेब होणे/मिळणे नाही... खूप बोलक्या प्रतिक्रिया चेहऱ्यावर होत्या.

शैलेषदादा प्रारंभापासून आजतागायत केवळ मुंबई शहरात पोलीसी सेवेत आहेत... पी.एस. आय. म्हणून रुजू झालेले दादा आज आता वडाळा पो. स्टे. चे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत... अवघी मुंबई आणि मुंबईच्या जवळजवळ सर्वच पोलीस स्टेशनमधून त्यांनी सेवा बजावली! कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून कार्य करतांना सहकारी पोलीस मित्रांचा अफाट गोतावळा त्यांनी जमवलाय. जिथे जिथे शैलेषदाने नोकरी केली तिथला हवालदार, सहकारी कर्मचारी आजही त्यांना त्यांचा साहेबच मानतो. त्यांच्या सुखदुःखात धावून येतो... दादांची प्रशासकीय बदली वा पदोन्नतीमुळे बदली झाली तर ते आपल्यातून दुसरीकडे जाणार म्हणून अश्रू ढाळणारा सहकारी वर्ग हीच त्यांची जीवनभराची कमाई... चातारीच्या संस्कारांचा आणि पावन मातीचा जणू वारसाच तो! कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय, अजातशत्रू, सहकारी वर्गात प्रिय, मित्रांसाठी सच्चा मित्र आणि अडल्या-नडल्यांना आपला वाटावा असा खाकी 'वर्दी' तला हा 'दर्दी' पोलीस अधिकारी! 

     पावन मंगल आचरण, निर्मल निर्मित मान

      मित्र साथ कर सके, हर दुविधा आसान

आज सात ऑगस्ट! 

श्री शैलेष दिगंबरराव पसलवाड 

यांचा जन्मदिन! 

माझे स्नेही, जेष्ठ बंधू आणि मार्गदर्शक अशा शैलेषदाला त्यांच्या वाढदिवशी कोटी कोटी शुभेच्छा देतो! आपणास उज्ज्वल यश, अपार कीर्ती आणि उदंड आयुरारोग्य लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना!! 



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational