ती वाट बघत्येय-७
ती वाट बघत्येय-७


महाराजांनी केलेल्या विधीने पिशाच्च प्रकट न होता बोलायला लागले. ते एक स्त्री पिशाच्च होते. लीलावती आणि महाराज कान देऊन शांत चित्ताने ऐकू लागले...
मी शिवानी. माझ्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी. त्यामुळे सर्वांचीच अतिशय लाडकी. एकुलती एक असले तरी घरच्या बिकट परिस्थितीमुळे शिक्षणाची इच्छा अपूर्णच राहिली असती. पण नशीब थोर माझे, शेजारीच राहणाऱ्या पाटलाच्या सुरजसोबत शाळेत जायला मिळाले. सुरजची आई शांताबाई मातृवत्सल बाई, मला मुलीप्रमाणेच जीव लावायची. घरची गरिबीची परिस्थिती, मी लहान असतानाच वडील वारलेले, आईच माझ्यासाठी दोन्ही भूमिका निभावत होती. स्वतःचा आणि माझा उदरनिर्वाह सांभाळण्यासाठी आई त्यांच्या शेतात कामाला जायची. मिळेल ते काम करून, मिळेल तेवढ्या मजुरीत आमचा उदरनिर्वाह भागवायची. त्यांच्या शेतीशिवाय आईला कधीही कुणाच्या बांधावर जायची गरज शांताबाईंनी पडू दिली नाही. स्वतःच्या मुलाबरोबर मलाही त्यांनी शाळेत घातलं. त्याच्याच पुस्तकांवर माझा अभ्यास व्हायचा.
सूरज आणि मी वर्गात जवळ जवळ बसायचो. माझ्याकडे पुस्तक नसल्याचे शिक्षकांनाही माहीत असल्यामुळे तेही काही हरकत घेत नव्हते. सोबत अभ्यास करत करतच आम्ही दहावीत पोहोचलो. एवढंच वर्ष आम्हाला सोबत राहता येणार होते, या नंतरच्या शिक्षणासाठी दुसऱ्या गावच्या शाळेत जावे लागणार होते, जे माझ्या आवाक्याबाहेर होते. अभ्यासाबरोबर तेथे वेगवेगळे खेळही घेतले जायचे. कधी खो खो, कबडी, हुतुतू, लंगडी, दोरीवरच्या उड्या इत्यादी नेहमीचे खेळ व्हायचे. वर्षाच्या शेवटी शेवटी मात्र एक वेगळाच खेळ घेतला. वर्गातील सर्व मुलींच्या नावाच्या चिठ्ठ्या एका बॉक्समध्ये टाकल्या आणि मुलांना एक एक चिठ्ठी उचलायला सांगितली. मुलांच्या प्रमाणात मुलींची संख्या कमी असल्यामुळे चार पाच मुलांना चिठ्ठ्याच मिळाल्या नाहीत. प्रत्येकाला चिठ्ठीतले नाव वाचायला सांगून 'ही तुझी बायको' म्हणून जोड्या बनवल्या. विधिलिखिताचा खेळही असाच असतो का? खेळ खेळ खेळताना माझ्याच नावाची चिठ्ठी सुरजच्या हातात का निघावी? कदाचित भविष्यातील घटना तर सूचित करत नव्हती ना विधी? तसेच असावे बहुतेक. घरी जेव्हा मी आईला आणि शांताबाईंना या खेळाबद्दल सांगितले तेव्हा सर्व जण खळखळून हसले. शांताबाईंच्या डोळ्यात तर पाणीच आले. माझ्या लहानपणीचे त्यांचे बोल त्यांना आठवले असावेत बहुतेक. त्या म्हणायच्या, "किती सुंदर दिसतेस गं तू एखाद्या नाजुकशा बाहुलीसारखी. तू जर नात्यातील, जातीतील असतीस ना तर तुला कधीच या घरातून बाहेर जाऊ दिलं नसतं. माझ्या घरात एकुलती एक सून म्हणून तुलाच ठेऊन घेतलं असतं."
शाळेत ज्यांच्या जोड्या बनवलेल्या होत्या, त्यांना चिडवणे हा एक नवीनच खेळ विद्यार्थ्यांसाठी झाला होता. मला आता सुरजच्या जवळ बसायचीही लाज वाटायला लागली होती, दुसरीकडे मनात गुदगुल्याही व्हायच्या. कदाचित सुरजच्या मनातसुद्धा माझ्याबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली असावी. पुस्तकांसाठी का होईना मी जवळ बसावे असा भाव त्याच्या नजरेत दिसायचा. एकदाचे वर्ष सरले. दहावीची परीक्षा संपली. निकाल लागला. दोघेही चांगल्या मार्कांनी पास झालो. पाटलांनी दोघांचेही पेढे वाटले. पास झाल्याचा आनंद होताच, परंतु दुःखही वाटत होते, पुढील शिक्षणाच्या निमित्ताने आता आमची ताटातूट होणार होती. माझ्या चेहऱ्यावरचे भाव पाटलांनी ओळखले. सुरजबरोबरच पुढील माझ्याही शिक्षणाचा भार उचलायचा ठरवले. कॉलेजला माझेही नाव घातले गेले. कॉलेजला जाण्यासाठी सुरजला एक बुलेटही घेऊन दिली.
सुरजसोबत बुलेटवर बसून कॉलेजला जायला लागले. कॉलेज चांगले दहा-बारा किलोमीटर अंतरावर होते. सुरुवातीला बुजत बुजत सुरजच्या पाठीमागे थोडे अंतर ठेऊन बसणारी मी हळू हळू त्याला खेटून बसायला लागले. खड्ड्यातून चालताना बसणारे धक्के गोड वाटायला लागले. ज्वानीचा रंग चढू लागला होता बहुतेक. आम्ही दोघेही वयात येत होतो. चालता बोलता, धक्के खाता खाता कॉलेजची वर्षे केव्हा संपली कळलेच नाही. या प्रवासाने आमच्या जीवनाच्या प्रवासाची दिशाच बदलून गेली होती.
एक दिवस पाटलाच्या घरी सुरजच्या लग्नाच्या विषयावरून वातावरण चांगलेच तापले होते. पाटील जोरजोरात बोलत होते. कधी नाही ते सुरजही जोराने बोलत होता. मी ओळखले, नक्कीच सूरज माझ्याबद्दलच वडिलांना बोलत असणार. माझी छाती धडधडत होती. आपल्यामुळे पिता-पुत्रात वाद होऊ नये असे वाटत होते. हळूहळू आवाज बंद झाला. सारे काही शांत झाले असे वाटायला लागले. मात्र का कुणास ठाऊक मला ती शांतता स्मशान शांतता वाटत होती. रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. आई घरी नसल्यामुळे तिला यातले काहीच माहीत नव्हते. मी रात्रभर तळमळत होते. जे घडू नये ते माझ्यामुळे घडत होतं. ते तसं घडू नये, मलाही वाटत होतं. पण सुरजचा सहवास मलाही हवाहवासा वाटू लागला होता, किंबहुना त्याच्याशिवाय जगणे मलाही शक्य वाटत नव्हते. 'रात्रीतून पाटलाच्या मनात काहीतरी सकारात्मक बदल घडू दे' मी देवाला प्रार्थना करत होते. मला खात्री होती, 'तिकडे सूरजही झोपलाच नसणार रात्रभर.'
कधी नाही ते पाटील सकाळीच आमच्या घरी आले. पाटील सकाळीच दारात आल्याचे बघून आई गडबडली. पाटलांनी स्वतःच एक सतरंजी ओढून घेतली आणि बसले. मी पटकन मागच्या खोलीत जाऊन बसले होते. मी घरात नसावी असे समजून पाटील आईला म्हणाले...
"सरस्वती, मी एका नाजूक विषयावर बोलायला आलो आहे. तुला एक विनंती करायला आलोय. शिवानीला मी माझीच मुलगी मानत होतो, माझ्या मुलाप्रमाणे सांभाळत होतो..."
"पाटील, हे का मला माहित नाही? तुमचे किती उपकार आहेत माझ्यावर. माझ्या चामड्याचे जोडे करून तुमच्या पायात घातले तरी ते फिटणार नाहीत." आई म्हणाली.
"त्याची गरज नाही. सोबत राहून राहून मुले एकमेकांच्या प्रेमात पडलीय, लग्न करायचं म्हणताहेत. दोघेही सज्ञान झालेली आहेत. त्यांना नकळत एकमेकांपासून दूर ठेवले गेले तरच आपले भले आहे. तू काही दिवसांसाठी इथून निघून जा. मी लगेच सुरजच्या लग्नाची व्यवस्था करतो. तूही शिवानीचे लग्न करून टाक. पैशाची काळजी करू नकोस, मी मदत करीन. त्यानंतर तू परत आलीस तरी काही हरकत नाही." पाटलांनी शांत डोक्याने विचार करून सांगितले.
"पाटील, तुम्ही म्हणता तसंच होईल. पण दो
न दिवसांनी त्यांचा निकाल आहे. तेवढा निकाल लागू द्या, मी लगेच तिला घेऊन निघून जाते." आईने विनंती केली. खरेतर आई हे सारे ऐकून हादरून गेली होती.
"ठीक आहे. पण या दोन दिवसात ती सुरजला भेटली नाही पाहिजे. काळजी घे." पाटील इशारा देऊन निघून गेले.
पाटील गेल्यावर आईने मला जवळ बोलावले. मी जवळ येताच फाडकन एक मुस्काटात ठेऊन दिली. माझ्या डोळ्यासमोर काजवे चमकले. "एवढ्यासाठीच जात होतीस का त्याच्यासोबत?" आई गरजली. स्वतः मात्र रडायला लागली. आज पहिल्यांदा माझ्या पाठीवर आईचा हात पडला होता. आजवर कधीच माझ्या आईने मला पाच बोटं लावली नव्हती. माझी काहीच चूक नव्हती, तरी मला ही शिक्षा मिळाली होती. मी रडायला लागले. आई मला समजावत होती.
"बेटी, आपण लहान माणसं, लहान तोंडी मोठा घास घेऊ नये. मोठमोठी स्वप्नं पाहणं हे आपलं काम नाही." आई रडत रडतच प्रेमळ स्वरात समजावत होती.
"पण आई, माझी काय चूक यात? त्याला मी आवडते, तो मला आवडतो. आम्ही लग्न केले तर काय बिघडणार आहे?" मी माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होते.
"बेटी, तू स्वतःपुरताच विचार न करता, सर्वांच्या सुखाचा विचार कर, त्याच्यापासून दूर हो. त्याला भेटू नकोस. यातच त्याचं, तुझं नि माझं भलं आहे." आई.
"आई, या सर्वांच्या सुखासाठी मी का माझ्यावर दुःख ओढून घेऊ?" मी रडत रडत माझी बाजू मांडत होते.
"अगं, पण तुझ्या सुखासाठी त्या पिता-पुत्रात वितुष्ट यावं असं तुला वाटतं का?" आईचा प्रश्न रास्त होता.
"आई, मलाही तसं वाटत नाही. परंतु माझाही जीव त्याच्यात गुंतला आहे. माझं प्रेम बसलंय त्याच्यावर. मी माझ्या प्रेमाचा बळी का म्हणून देऊ?" मी हार मानायला तयार नव्हते.
"माझं ऐक बेटी, तुझं खरंच प्रेम आहे ना त्याच्यावर? तो सुखी राहावा यासाठी तुझा स्वार्थत्याग हा अतिशय आदर्श मार्ग आहे. तो तू स्वीकार. त्याच्या मार्गातून बाजूला हो. तुझा निकाल आला की आपण येथून दूर निघून जाऊ. तोवर तू त्याला बिलकुल भेटायचं नाहीस." आई मला सांगत होती.
आईचे सांगणे मी मनात नसतानाही मान्य केले. मला लहानचं मोठं करण्यात पाटलांचे माझ्यावर अनंत उपकार झालेले होते. कुठल्याही प्रकारचे नाते नसताना, संबंध नसताना माझ्यासाठी त्यांनी खूप काही केलेले होते. त्यांना दुःख होईल अशी कुठलीही गोष्ट माझ्या हातून घडू नये अशी माझी इच्छा होती. त्यासाठी मनाविरुद्ध मी माझ्या प्रेमाचाही त्याग करायला तयार झाले होते. निकाल लागेपर्यंत मी सुरजला भेटणार नव्हते, बोलणार नव्हते. आणि खरोखर दोन दिवस मी मला सुरजचे दर्शनसुद्धा झाले नाही.
निकालाचा दिवस उजाडला, तो जणू आमच्या आयुष्याचाच निकाल लावण्यासाठी! निकाल बघायला कॉलेजला जावे लागणार होते. 'आज गाडीवर दोघे नाही गेले तर लोकांमध्ये चर्चा झाली असती, काही तरी बिघडलं म्हटले असते. सोबत जाऊ देण्यात धोका होता.' पाटलाच्या मनात खळबळ माजली होती. त्यांचे मन द्विधा मन:स्थितीत गुरफटले होते. बराच वेळ विचार करून पाटलांनी आम्हा दोघांना एकत्र जाऊ देण्यास परवानगी दिली.
आम्ही निकाल बघायला गाडीवर निघालो, एकमेकांशी बोलण्याची मन:स्थिती दोघांचीही नव्हती. दोघांच्याही मनात खळबळ माजली होती. बोलावं की नाही? काय बोलावं? असे असंख्य प्रश्न मनाला डसत होते. आजूबाजूला आमचे लक्ष नव्हते. एका झाडाखाली गाडी थांबली. आम्ही खाली उतरलो, एकमेकांकडे बघितले. अनावर ओढीने एकमेकांना आलिंगन दिले. आम्हाला कुणी बघतंय हे आमच्या ध्यानी-मनीही नव्हतं. आम्ही चर्चा केली. मी सुरजला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. 'काही झाले तरी मी तुला सोडू शकत नाही, मी तुला घेऊन जाणारच' म्हणाला. आमची चर्चा कुणीतरी ऐकत होतं, आम्हाला त्याची कल्पना नव्हती. आम्ही आमच्याच धुंदीत होतो. आमचा बेत पाटलाच्या कानावर गेला होता. आम्ही तेथून निघालो, जोरात निघालो होतो. आम्ही कॉलेजचा रस्ता सोडून दुसऱ्या रस्त्याने निघालो होतो. आहे त्याच परिस्थितीत आम्ही पळून चाललो होतो. आमचा पाठलाग होतोय याची आम्हाला कल्पना नव्हती.
आमची गाडी किती तरी धूम वेगाने पळत होती. मागे पाठलाग होतोय हे सुरजच्या लक्षात आले होते. त्याने गाडी परत कॉलेजच्या रस्त्याला लावली होती. तो जितक्या जोरात पळवता येईल तेवढ्या जोरात गाडी पळवत होता, आणि अचानक क$र्र$र्र$र्र कच्चकन ब्रेक दाबल्या गेला. माकडांचा कळप अचानक रस्त्यावर आला होता. गाडी गचकन थांबली मी जोरात सुरजच्या पाठीवर आदळले. आम्ही गाडीच्या खाली उतरणार तेवढ्यात दोन गाड्या आमच्या दोन्ही बाजूला येऊन थांबल्या. आम्हा दोघांच्याही डोक्यात कशाचा मार लागला आम्हाला समजलेच नाही. आम्ही दोघेही जखमी होऊन खाली पडलो होतो. आम्ही पाणी मागत होतो तोच पुन्हा एकेक फटका आमच्या मस्तकावर पडला. आम्हाला उचलून बाजूच्या तलावात फेकलं, गाडीही घासत, ओढत तलावात लोटून दिल्या गेली.
क्षणार्धात बातमी गावात पोहोचली. लोक धावून आले. आमचा शोध घेऊ लागले. सुरजचे प्रेत हाती लागले, गाडी काठालाच सापडली. माझे प्रेत मात्र कुणालाच सापडले नाही, तिथेच पाण्यात होते तरी सापडले. ते सापडायचेच नव्हते तर. सापडू नये असेच ते फेकलेले होते. त्याच दिवशी गाडी घसरून तलावात गेल्याची, पाटलाच्या मुलाच्या मृत्यूची बातमी पेपरला होती. सुरजसोबत असलेली मुलगी सापडलीच नव्हती, शोध सुरू होता.
सुरजची अंत्य:क्रिया यथासांग दु:खावेगात पार पडली. तो मुक्त झाला. मला मात्र पिशाच्च योनीत सडत पडावे लागले. मी या योनीतून मुक्त होण्यासाठी धडपडत आहे. माझी इच्छा पूर्ण होण्याचा काळ जवळ आला आहे. माझा सुरज आता शुभमच्या रुपात जन्म घेऊन आला आहे. त्याच्यासोबत माझी कामेच्छा पूर्ण झाल्याशिवाय मी मुक्त होऊ शकत नाही. मी स्वतःहून शुभमला सोडून देईन. त्यानंतर मी पुन्हा येऊ नये यासाठी त्या तलावाच्या काठावर असलेली माझी हाडं गोळा करून त्याचा अंत्यविधी कराल तर मी मुक्त होईल, आणि शुभमलाही पुन्हा कधीच त्रास होणार नाही.
असे सांगून आवाज बंद झाला. लीलावती आणि महाराज एकदम सुन्न झाले होते.