Jyoti gosavi

Classics Inspirational

4.5  

Jyoti gosavi

Classics Inspirational

सतीचं वाण

सतीचं वाण

3 mins
544


कि घेतले व्रत न हे आम्ही -अंधतेने

लब्ध-प्रकाश -इतिहास निसर्गमाने

जे दिव्य दाहक म्हणुनी असावयाचे

बुद्ध्याची वाण करी हे -धरिले सतीचे 

........स्वातंत्र्यवीर सावरकर..!!


माननीय तात्यारावांचे हे शब्द मला अगदी काल तंतोतंत पटले. अर्थात त्यांची आणि माझी कोणत्याही अँगलने बरोबरी होत नाही. ती मी करत देखील नाही. त्यांनी केलेल्याच्या एक टक्का देखील माझे योगदान नाही.

(यावरून कृपया कोणाच्या कमेंट नको आहेत, वाद करणाऱ्या, कारण मी फक्त ते उदाहरणासाठी घेतलेले आहे तात्याराव म्हणजे जगामधील एकमेवद्वितीय अद्वितीय मनुष्य फक्त उदाहरणासाठी घेतलेले आहेत) 


  गेले दोन-तीन दिवस झाले वादळ आणि पाऊस याने सगळेच मुंबईकर हैराण, पण त्यातही आम्ही, जे डोळे उघडून पत्करले असे ते परिचारिका प्रोफेशन. आता मात्र खरोखरी ते दाहक जाणवते. पूर्वी परित्यक्ता, निराधार, विधवा यांच्या मदतीला धावणारे हे प्रोफेशन नंतर मात्र चांगल्या चांगल्या घरातील मुली नर्सिंगला आल्या आणि हळूहळू प्रोफेशनचा दर्जा उंचावत गेला. 


तरीही लोकांना आजदेखील परिचारिकांचे ट्रेनिंग म्हणजे काहीच नाही जमले तर जाण्याची गोष्ट वाटत होती. त्यांचीही चूक नाही म्हणा! कारण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सहा महिन्याचे ट्रेनिंग दिले की झाली नर्स तयार. या प्रोफेशनमध्ये डिग्री, पीएचडी, डॉक्टरेट या साऱ्या गोष्टीपर्यंत शिक्षण घेता येते हे काही लोकांना माहिती नसते. असो हे झाले विषयांतर.


माझ्या सांगण्याचा मुद्दा वेगळाच आहे. गेले दीड दोन वर्ष झाले संपूर्ण जगभरात करोना नावाच्या विषाणूमुळे हाहाकार माजवला आहे. पण आम्ही एक असे फ्रन्टलाइन वर्कर आहोत की आम्हाला त्यातून जराही सुटका नाही. माझ्यासारख्या अशा पन्नाशीच्या पुढच्या कितीतरी परिचारिका असतील, की ज्यांना विविध आजार आहेत परंतु कामावर जावेच लागते.


इतर सरकारी ऑफिसेस, कार्यालय, इतर विभाग याठिकाणी पंधरा टक्के उपस्थिती, तीस टक्के उपस्थिती ,पन्नास टक्के उपस्थिती चालते ,पण आम्हाला मात्र खरोखरी जीवावर उदार होऊन जावे लागते. आता डायबेटिस ब्लडप्रेशर कोलेस्ट्रॉल हे पन्नाशीनंतर बऱ्याच लोकांच्या शरीरामध्ये वस्तीला आलेले असतात, परंतु आम्हाला कोणतेही एस्क्युज नसते. पूर असो, वादळ असो, भूकंप असो, 


आत्ताच बघाना तीन दिवस वादळाचा हायअलर्ट, शिवाय मी कामावर जाते "ठाणे ते मालाड मालवणी" तीस किलोमीटरचे अंतर. परंतु मी जर कामावर गेले नाही तर माझी रजा मांडली जाईल. बाकीच्या लोकांना शासन सुट्टी जाहीर करते. शिवाय सध्या तर कन्सेशन आहेत. पण आम्हाला मात्र काय वाट्टेल ते झाले तरी कामावर हजर रहावेच लागते. कालचा दिवस तर खूपच वाईट गेला. सकाळी निघताना थोडासा पाऊस म्हणून कामावर निघाले, मात्र रस्त्यातच कपडे सगळे ओले होईपर्यंत पाऊस आला. 


जातानाच रस्त्यामध्ये  झाड आडवे पडलेले, खूप ट्राफिक देखील लागले. आणि कामावरून परत येताना तीन तास पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत भिजलेल्या अवस्थेमध्ये प्रवासात होते. जोरदार वारा, छत्री उलटी, पावसाचा इतका धुवाॅधार मारा, की बस स्टॉप च्या आत मध्ये देखील चारी बाजूने पाऊस लागत होता. अक्षरशः वाऱ्याबरोबर पावसाच्या लाटा लाटा दिसत होत्या. म्हणजे एखाद्या सिनेमात किंवा सिरीयलमध्ये पाहतो ना! तसे चारी बाजूंनी काळोख करून आलाय, आजूबाजूला कोणी म्हणजे कोणी नाही. एकटीच मी 🙋 बस स्टॉप मध्ये उभी पाऊस झोडपतोय, झोडपतोय ,आणि अशावेळी लाईट लावलेली मालाड डेपोची बस आली, ती खालीदेखील होती. बस रोरावत आली, पण त्या धुवाधार पावसात बस स्टॉपच्या आडोशाला उभी मी त्याला दिसलेच नाही. आणि बस तेवढ्याच स्पीडमध्ये पुढे निघून गेली. माझा आरडाओरडा, हात उंचावणे, त्याच्यापर्यंत गेलेच नाही. 


त्यानंतर संपूर्ण एक तास दीड तास ओली चिंब मी बसस्टॉपमध्ये उभी. कधीतरी पाच मिनिटात पाऊस उघडतो, पुन्हा तेवढ्याच जोराने सुरू होतो. त्यानंतर जी बस आली ती आली मालवणीवरून, त्यामुळे ती त्यांच्या नियमाप्रमाणे पुरेशा सीट घेऊन चाललेली, सध्या कोरोनामुळे एका सीटवर एकच माणूस, अक्षरशः मी आणि एकच माणूस स्टॉपला, आम्ही चालू चालूमध्ये ती बस पकडली, आणि कंडक्टरशी पार वादविवाद स्पर्धा करून बसमध्ये शिरले. काल नशीबच एवढे खराब होते की, ही बस मजास डेपो पुढे बंद, आता पुन्हा दुसरी बस शोधा आणि घरापर्यंत या म्हणजे घरी येईपर्यंत जीव पार रडकुंडीला आला आणि खरंच जाणवले म्हणावं एवढं नर्सिंग सोपं नाही हो! हे लोकांना सांगावे. खरोखर हातामध्ये सतीचे वाण घेऊन चालावे लागते. कोणत्याही साथी होवोत, कितीही रोग, आजार, येवोत, आम्ही थांबत नाही, थांबू शकत नाही. स्वतःचे शरीर आजाराने भरलेले असतानादेखील आम्ही लोकांचा विचार करीत असतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics