सस्पेंडेंड ॲनिमेशन - भाग २
सस्पेंडेंड ॲनिमेशन - भाग २
”आता तुम्ही बिनधास्तपणे आपली हकीकत कुठलीही माहिती न लपवता पुर्णपणे मला सांगा. जेणेकरुन तुमच्या आयुष्यातील अडचण दुर करण्यास मी मदद करेन”.
संभाने तिला आश्वासन दिले.
“मी मुळची अमेरीकेत असलेल्या कैलिफोर्नियातील कॅमरेल गावची. माझ्या वडिलांचे नाव जॅक्सन. खुप प्रेमळ आणि कष्टाळु होते. मी लहान असताना ह्रदय विकाराच्या आजाराने माझ्या आईचे निधन झाले. तेव्हा पासुन वडिलांनीच माझे संगोपन केले. शेती हा आमचा मुख्य व्यवसाय,त्यातुनच थोडेफार उत्पन्न मिळत असे. पण तरिही डॅड मला हव्या असणार्या बहुतेक गोष्टी पुरवीत असत. स्वभाव जरी प्रेमळ असला तरी ते कुणाशी जास्त बोलत नव्हते, त्यामुळे गावामध्ये त्यांचे मित्रही फारच कमी होते. कैलिफोर्नियातील जेम्स मैक हे त्यांचे चांगले मित्र. बर्याच वेळेस ते डॅड ला आणि मला भेटण्यासाठी येत असत. आणि तासनतास गप्पा मारण्यात रंगुन जात असत. त्यांचा स्वभाव अगदी मनमिळावु होता. ते आल्यानंतर मला नेहमी गोष्टी सांगत असत. शेतीतील उत्पन्न कमी असल्यामुळे पैशांची नेहमी गरज पडत असे. ही गोष्ट डॅड अनेक वेळेस जेम्स अंकल ला सांगत असत. आणि अंकल त्याना शहरात नोकरी मिळवुन देण्याचे आश्वासन देत असत. एके दिवशी जेम्स अंकल ने डॅड साठी एक नोकरी शोधली. मि. रोनाल्डो यांच्या बागेची आणि घराची निगरानी ठेवण्याची. रोनाल्डो हे पुर्वि सुप्रसि्द्ध अश्या रिपब्लिक बँकेचे मँनेजर होते, परंतु अाता ते रिटायर्ड झालेले होते. एकदम टोलेजंग घरामध्ये ते त्यांच्या मुलीसोबत राहत होते. घराच्या सभोवताली मोठे गार्डन होते. घराची आणि बागेची निगरानी ठेवण्यासाठी त्यांना काळजीपुर्वक काम करणारा होतकरु माणुस हवा होता. पगार जरा ठिक होता म्हणुन जैम्स अंकल ने डॅडला त्यासबंधी कळवले. डॅडला पण ते काम आवडले आणि त्यांनी ते काम करण्यास समत्ती दर्शवली.
डॅड मला सकाळी सायकल वरुन गोल्डन स्विट हर्ट ह्या कैलिफोर्नियाच्या नजीक असलेल्या स्कूलला पोहचवत असे अाणि त्यांच्या कामासाठी पुढे जात असत. रोनाल्डो यांचा स्वभाव हा फार कडक असे,त्यांना जराही उशीर झालेला मुळीच आवडत नसत. उशीर झाल्यास ते त्याची शिक्षा म्हणुन एका दिवसाचा पगार कमी करत असत. बागेचा परीसर आणि घराची जागा फार मोठी असल्यामुळे डॅडला तेवढी कामे करणे होत नव्हते. त्यामुळे त्यांनी दुसरा व्यक्ती कामावरती ठेवण्याची विनंती रोनाल्डो यांस केली. रोनाल्डो यांनी होकार दिल्या नंतर जैम्स अंकलनेही काही दिवसांनतर तिथे कामास जाणे चालु केले. त्यानंतर डॅड खुष असायचे. दररोज मला खाण्यासाठी खुप सारे पदार्थ आणायचे. नंतर त्यांनी मला सायकल पण घेवुन दिली. नविन कपडे आणायचे.असे बरेच दिवस गेलेत. हळू हळू आर्थिक परिस्थितीतीमध्ये सुधारणा झाली.काही दिवसांनी डॅड ने कैलिफोर्नियात स्वताचे घर घेतले. अाता आम्ही गावातुन शहरात राहण्यासाठी गेलो होतो.
डॅडच्या पगारातील बढती मुळे ते पण नेहमी आनंदी असायचे. परंतु एके दिवशी डॅड घरी आले तेव्हा त्यांचा चेहरा खुप चिंताजनक दिसत होता. कामावरून आल्यानंतर ते नेहमी माझी चौकशी करायचे, स्टडी बद्दल विचारायचे, आणि दररोज खाण्यास काहीतरी नवीन घेऊन यायचे. पण त्या दिवशी त्यांनी यासर्व गोष्टींपैकी काहीच केले नाही. त्यान्हा नक्कीच कसले तरी टेन्शन आलेले असणार हे माझ्या लक्षात आले. मी त्यांना नाराजीचे कारण विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले की,
“रोनाल्डो आणि आमच्यात काही कारणावरून भांडण झाले आणि त्याने आम्हाला दोघांना कामावरुन काढुन टाकले".
डॅड त्या रात्री बराच वेळ काहीतरी विचार करत जागीच होते. त्यांना मी बराच वेळ समजावले की दुसरे कुठेही काम मिळेल पण तुम्ही आता चिंता करत बसु नका. तेव्हा उगाच माझे ऐैकायचे म्हणुन अंथुरणावकरती पडले. ज्या ठिकाणी दहा वर्ष प्रामाणिकपणे काम केल्यानंतर तिथून जर काढून टाकले तर कुणालाही अश्या घटनेमुळे वाईट वाटेलच. त्यामुळे ते पण खूप नाराज झाले असावेत.
एक दिवस मला सुट्टी असल्यामुळे व डॅड पण सद्ध्या नाराज असायचे म्हणून त्यांना त्या नाराजी पासून दूर करण्यासाठी मी डॅड सोबत फिरायला जायचा प्लॅन केला, त्यांनी पण जास्त टाळाटाळ न करता संमती दर्शवली. आम्ही त्या दिवशी सकाळी सकाळीच घरातून बाहेर पडलो.डॅड नेहमी बोलायचे 'आयुष्यातील अनेक दुःख क्षणभरासाठी जर थांबवायचे असतील तर ते काम फक्त निसर्गच करू शकतो'. म्हणून मी पण त्या दिवशी निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. कलिफॉर्निया मध्येच एलिफिंस्तेन रस्त्याला लागूनच खूप सुंदर आणि मनमोहक फुलबाग आहे. तिथे आम्ही गेलो. ते वातावरण इतकं काही सुंदर आणि मनमोहक होत की, तिथल्या झाडांना, वेलींना, फुलांना फक्त बघत राहावं आणि इथून कुठेच जाऊ नये असे वाटायचे. शेजारीच असलेल्या फुलझाडाच्या फांदिकडे बोट दाखवून डॅड सांगू लागले,
"ते बघ त्या फांदीला तीन फुले किती सुंदर लागलेली आहे. त्यापैकी दोन फुले बघ कशी टवटवीत शेजारी शेजारी आहेत,आणि कुण्याएकेकाळी टवटवीत असलेले ते तिसरे फुल बघ, त्या दोन फुलांच्या वरती कसे मान टाकून कोमेजून पडलेले आहे. सुकलेले असूनही बघ ते किती प्रेमळ आहे. जेव्हा उन पडते तेव्हा ते स्वतःवर घेऊन दोघांवर सावलीचा वर्षाव करते, आणि जेव्हा पाणी त्यावर पडते तेव्हा दोघांनाही पुरवते. जेव्हा ते गळून पडेल तेव्हा मात्र त्या खालील दोन्हीही फुलांना पाण्याचा वोलावा जरी मिळाला तरी आयुष्यभर उन्हाच्या झळां सहन कराव्या लागतील ".
डॅडचे पाणावलेले डोळे आणि भारावलेले शब्द जणु हेच काही सांगत होते की,ते तिसरे कोमेजलेले फुल हे माझी स्वर्गवासी आई आहे.
काही वेळ तिथे घालवल्यानंतर आम्ही तिथून निघालो. त्या बागेपासून थोड्याच अंतरावर जेम्स अंकलचे घर होते,तर आम्ही त्यांना भेटून जायचे ठरवले. थोडा वेळ चालल्या नंतर आम्ही अंकल च्या घरी पोहचलो. परंतु अंकलच्या घराला बाहेरून कुलूप लावलेले होते. डॅड आणि मी थोडं वेळ तिथेच थांबून त्यांची वाट बघण्याचे ठरविले. जेम्स अंकलच्या घराच्या पाठीमागील बाजूस छानशी फुलबाग होती. जेम्स अंकल आम्हाला भेटण्यासाठी जेव्हा येत असत तेव्हा ते ह्याच बागेतील छानशी फुले मला घेऊन येत असत. मी त्या बागेतील काही फुले आणण्यासाठी गेली. तिथे एक छानसे मांजराचे पिल्लु बसलेले होते. ते मला फार आवडले,त्याला पकडण्यासाठी मी त्याच्या दिशेने हलके हलके पाऊले टाकु लागली,आता मी अगदी त्याच्या जवळ पोहचली होती. हात पुढे करून त्याला पकडणार तितक्यात त्याचे लक्ष माझ्याकडे गेले आणि ते तिथून पळायला लागले. मला ते खुप आवडले होते म्हणून मी त्याचा पाठलाग केला. आता ते पिल्लू जेम्स अंकलच्या घराच्या पाठिमागील खिडकीवर जाऊन बसले. मी पण त्याच्या मागे जाऊन खिडकी पर्यंत पोहचले. खिडकीला आतून जाळी असल्यामुळे त्याला आतमध्ये उडी मारणे शक्य नव्हते. पळण्यासाठीचा कुठलाच मार्ग शिल्लक राहिलेला नाही हे लक्षात येऊन ते तिथेच स्वताला थोडेसे फुगवून डोळे मोठे करून गुरगुरत थोड्याश्या आक्रमकतेने माझ्याकडे बघू लागले. मी पण घाईमध्ये त्याला लगेच पकडले नाही. हळुवारपणे एक हात पुढे नेऊन त्याच्या डोक्यावरून आणि पाठीवरून फिरवला. आता त्याचे गुरगुरने बंद झाले होते. मी त्याला खिडकीतून उचलून घेतले. माझ्या चेहऱ्यावर आनंदाने हसू फुटणार इतक्यात माझे लक्ष खिडकीतून आत असलेल्या दृष्याकडे गेले,मी जोरात किंचाळले.
“डॅड डॅड जेम्स अंकल ".
(क्रमशः)
