"ससा.."
"ससा.."
त्यांच्या घरात एक ससा आहे.. कापडाचा शिवलेला.. निळ्या रंगाचा.. त्या सश्या नी चार पिढ्या पहिल्या आहेत आत्ता पर्यंत.. तीन घरे पहिली.. आणि बरेच खण कोनाडे पाहिले.. पण त्याचा रंग कोणी विटू दिला नाही आज पर्यंत हे महत्त्वाचे..
आत्ता आत्ता पर्यंत त्या घरात एक लांब पांढरी दाढी वाले आजोबा फिरायचे.. त्यांना म्हणे पहिली बायको आणि छोटी मुलगी होती.. नाव काही माहीत नाही पण त्या मुलीचा होता तो ससा.. पुढे बायको आणि मुलगी मागे आठवणी ठेवून देवाघरी गेल्या आणि काही काळ गेल्यावर आजोबांचे लग्न झाले आजी सोबत.. भाऊबीज आली तसे त्या "सश्याचे मामा" आजी समोर येऊन बसले ओवाळ म्हणून.. नात्यांची वीण उकलावी तितकी घ
ट्ट बसते.. नवऱ्याच्या पहिल्या बायको चा भाऊ ओवाळणी घेऊन बसलेला आणि ताम्हणातले निरांजन मंद तेवत होते.. समाधानाने.. त्यानंतर आजी हयात असेपर्यंत मामांची भाऊबीज आणि आजीची राखी चुकली नाही कधी.. आजीने वड सुधा पुजला नाही कधी वटपौर्णिमा असताना.. म्हणायची "तिनेही" काही वर्ष वड पुजला असेल ना.. देवाला कशाला कोड्यात पाडू पुढच्या जन्मी.. सगळी कर्तव्ये पार पाडून एक दान तिने राखून ठेवले कायम "तिच्यासाठी".. आजी नी तो ससा सांभाळून कोनाड्यात जपून ठेवला यातच सगळे काही आले..
नंतर घरे बदलली, furniture बदलले.. पिढी बदलली .. जुने सामान गेले नवीन सामान आले.. पण निळाशार ससा तसाच राहिला आहे अजून कोनाड्यात..