मी डॉक्टर प्रतिभा बोलतेय..
मी डॉक्टर प्रतिभा बोलतेय..
मी स्वतः स्त्री रोग तज्ञ.. शहरातील नामांकित डॉक्टर.. डॉक्टर प्रतिभा बोलतेय.. मास्टर्स पूर्ण झाले आणि मग लग्न होऊन या घरात आले.. नवऱ्याची भक्कम साथ आणि मला इथेच या शहरात practice करायची होती म्हणून नवऱ्याने माझ्यासाठी मुंबईतून इकडे राहायला यायचा निर्णय घेतला.. आणि मी मनापासून रमले.. दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये कधी डे शिफ्ट कधी नाईट शिफ्ट करत होते.. माझा स्वतःच्या हॉस्पिटल आणि घरासाठीचा साठीचा प्रवास हळूहळू सुरू होता.. तिथल्याच क्वार्टर मध्ये आमचा संसार फुलायला लागला होता..
मोठे होत चाललेले पोट सावरत, कधी दुसऱ्याच्या delivery करत, कधी ओपीडी सांभाळत मध्येच स्वतःच्या सोनोग्राफीची स्वतःलाच आठवण करून देत होते.. दुसऱ्याला व्यायाम आणि आहार याबाबत सांगत असताना मध्येच बाळ आतून भूक लागल्याची जाणीव करून देत होते.. माझ्या डिलिव्हरी च्या थोडा वेळ आधी मी दोन डिलिव्हरी केल्या होत्या.. आणि मग मला पण टेबल वर घ्यायची वेळ आली..
चैतन्य .. माझ्या मुलाचे नाव.. जन्म झाल्यास त्याला पाळण्यात ठेवले ते आत्ता पर्यंत.. त्याच्या पाठीचा कणा विकसित झाला नव्हता.. आणि त्यामुळे तो चालू शकणार नव्हता.. खूप लोकांनी मला अडून अडून विचारले.. तुम्हाला डॉक्टर असून आधी समजले नव्हते का? पण मी काहीच बोलत नव्हते.. रडत नव्हते.. व्यक्त होत नव्हते.. कोशात जाणे म्हणजे हेच ते.. आज सांगते सोळा वर्षानंतर.. हो आम्हाला कळले होते.. आम्ही स्वीकारले होते.. त्याला त्याच्या शरीरा सहित, त्याच्या बुध्दी सहित, त्याच्या मर्यादित हालचाली सहित.. आम्ही त्याचे अस्तित्व जपले त्याच्या मर्यादित भावनांसहित.. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधी ना कधी दुःखाची झालर येते.. दुःखापासून पळ काढायचा का त्याच्याशी समर्थपणे लढाई करायची यामध्ये आम्ही दुसरा मार्ग निवडला.. आपल्या शरीराच्या अस्तित्वासारखीच ही झालर आम्ही स्वीकारली.. मनापासून.. आणि आमचा लढा सुरु झाला स्वतःशी.. समाजाशी.. कष्टांशी.. मनाशी.. पैशाशी.. भावनांशी..
हे स्वीकारणे इतके सोपे नव्हते.. मेंदू पोखरून निघायचा.. एका आईची आशा आणि एका डॉक्टर चे प्रयत्न यांचे अविरत द्वंद्व चालू राहायचे.. एक आई म्हणून, एक स्त्री म्हणून काळीज पोखारायचे.. अजूनही पोखरते.. सुरवातीला विश्वास असो नसो कोणी सांगतील ते उपाय केले.. अगदी नवस सायास पण केले.. एक आई तेव्हा एका डॉक्टर वर भारी पडत होती.. एक काळ आला जेव्हा खोल नैराश्येच्या गर्तेत गेले..नवरा आणि मी एका नावेचे प्रवासी.. पण मग काही सहकारी डॉक्टर, घरचे कुटुंबीय सगळ्यांनी सावरले.. आम्ही दोघांनी एकमेकांना सावरले.. आणि पुढचा अध्याय सुरू केला चैतन्य सहित..
प्रॅक्टिस सुरूच होती.. स्वतःचे हॉस्पिटल, स्वतःचे घर या स्वप्नांनी झपाटले होतेच.. त्यामुळे पायाला भिंगरी लावून काम चालू होते.. नवऱ्याची व्यवसायाची घडी पण बसत चालली होती.. आई, सासूबाई आलटून पालटून येऊन राहायच्या.. कधी चैतन्य ला घरी घेऊन जायच्या.. आमची डोळ्याखालची काळी वर्तुळ कमी होत होती.. काही नातलग आता अडून अडून परत चान्स घ्यायला सुचवत होते.. पण आता मात्र हिम्मत होत नव्हती पुढे पाऊल ठेवायची.. आणि मग खूप विचार करून आम्ही दत्तक मुलीसाठी अर्ज केला.. थोडा विरोध, थोडी साथ असं करत करत ऊर्वी चे पाऊल घरात पडले.. आणि खूप वर्षांनी आम्ही खरेखरे हसलो.. मनापासून प्रसन्न झालो.. कुठली तरी निर्वात पोकळी भरून निघाल्या सारखे भरून पावलो आम्ही.. उर्वी आणि चैतन्य दोघांनी स्वीकारलं एकमेकांना.. जमेल तसे माया व्यक्त करू लागले..
आता आमच्या स्वप्नांना वेग आला.. विचारांना वेग आला.. कृतीला कष्टाला वेग आला.. आणि आज आम्हाला स्वतःचा अभिमान वाटेल तेवढी वाटचाल केली आहे.. स्वतःच्या नावाची पाटी असलेला तीन मजली दवाखाना.. त्यावर दोन मजली घर.. आमच्या स्वप्नांना "आकार" आला.. आजही संध्याकाळी गच्चीत निवांत बसून चहा पिताना कातरवेळ म्हणजे काय त्याचा अनुभव येतो.. रात्रीची झोप अजूनही सलग शांत लागत नाही.. पण मन गुंतवत राहतो.. घरात कामात छंदात.. माझ्यातली प्रतिभा अजूनही अभ्यास करत रहाते.. नवीन नवीन उपचार पद्धती शिकत रहाते.. परीक्षा देत राहते.. स्वतःला अद्ययावत ठेवते.. मैत्रिणी आणि घरचे म्हणतात.. "हिला इतके व्याप सांभाळून कसा काय इतका वेळ मिळतो आवडी निवडी जोपासायला.. फिरायला जायला.. आणि तरीही कधी पण बघा आनंदी असते.." मी आजही त्यांना काहीच सांगत बसत नाही.. भावना मनाच्या गाभाऱ्यात स्वतः पुरत्या बंद करून जगासाठी खळखळत व्यक्तिमत्व घेऊन आम्ही सज्ज आहोत.. कायम..
आज चैतन्यचा सोळावा वाढदिवस आहे.. मित्रा त्याला शोडशवर्षे असं म्हणतात.. खरंतर या मित्रासमोर मन व्यक्त करायचं होत.. पण त्याच मन हळवं आहे खूप.. म्हणून आरशासमोर व्यक्त होतेय.. मी आई बोलतेय.. मी डॉक्टर प्रतिभा बोलतेय..