Avanee Gokhale-Tekale

Others

4.5  

Avanee Gokhale-Tekale

Others

दीड दिवसाचे माहेर..

दीड दिवसाचे माहेर..

2 mins
493


रोजच्या routine मध्ये एक हक्काचं विसाव्याचं ठिकाण आहे.. तीन तास अंतरावर माझं दीड दिवसाचं माहेर आहे.. 

तशी मी जाते एक दोन महिन्याला.. शनिवारी सकाळी उठायचं.. बॅगेत सापडतील ते दोन ड्रेस घालायचे आणि निघायचं.. एक रात्र राहायचं आणि रविवारी संध्याकाळी परत.. येताना एक बॅग एक्स्ट्रा हातात.. (कारण काय सांगायचे वेगळे.. आठवा फक्त तुमचीही माहेरून निघताना सामानाची कथा.. ) तर हि कहाणी या दीड दिवसाची.. तुमची माझी नावं वेगळी.. गावं वेगळी.. पण ही कहाणी थोडी फार तुमचीही तितकीच जितकी माझी..!! ही जेवढी एका लग्न झाल्यावर दुसऱ्या गावीसासर असणाऱ्या मुलीची तितकीच मूळ गाव सोडून नोकरीला दुसऱ्या गावी गेलेल्या मुलांची सुद्धा.. 

फक्त माय चे घर म्हणजे माहेर एवढी सोपी सरळ व्याख्या नाही ती.. फारच कंगोरे आहेत याला.. लहानाचे मोठे झालो ते घर, तिथल्या आठवणी, सगळे माहेरचे नातेवाईक, सासरचे खूप सारे नातेवाईक, भरपूर मित्र.. सगळेच आहेत इथे माहेरच्या गावाला.. शाळा, कॉलेज, ऑफिस, क्लास आणि गप्पांचे कट्टे सगळेच आहे इथे.. इथल्या हॉटेल मधील जेवण चविष्ट कि गप्पा चविष्ट हा एक जागतिक चर्चेचा विषय आहे.. जी कथा हॉटेल ची तीच शॉपिंग ची.. एवढंच काय माझा शिंपी, डेंटिस्ट, पार्लरवाली आणि असे बरेच "वाले" अजूनही इथेच आहेत.. या सगळ्यांना बसवायचं असत दीड दिवसात.. काही भेटतात, काही रुसतात, काही समजून घेतात.. कोणाला भेटायचं असा प्रश्न आयुष्यात पडण्यापेक्षा वेळ कमी पडला म्हणून भेटता आलं नाही हे जास्त छान.. कशाला अली भेटायला असं वाटण्यापेक्षा भेटायला आली नाही म्हणून रुसणारे आहेत हे जास्त छान.. आपण जमेल तेवढं जमवत रहायचं.. बाकीच्यांना next time म्हणत राहायचं.. दीड दिवसाचं माहेर मिरवत राहायचं.. 

आपला जीव सगळीकडेच अडकतो.. हेही सोडवत नाही आणि तेही.. सासरचे पण इतके आहेत माहेरच्या गावात कि कधी कधी गावी जाऊन पण "घरी" जायलाच होत नाही.. घरचे उलट खुश होतात म्हणतात रुळली सासरी अजून काय हवं.. तरीही मन हुरहूर लावतच.. अशावेळी डोळ्यातला चुकार थेंब जाताना गल्लीत सोडून जायचं.. तीन तास मनात घर आठवत राहायचं.. अशावेळी माहेरच्या गल्ल्या सुद्धा आधार देतात.. जुने क्षण आठवून उगाच हसवून जातात..

इथले रस्ते सांगताना मी नेहमी गोंधळात पडते.. सगळे चिडवतात कि इतकी वर्ष गेली तुझी इथे, इतकी फिरलीस बाईकवर पण तुला रस्ते कसे सापडत नाहीत.. काय सांगू इथल्या रस्त्यावर ढीगभर आठवणी सोडल्या आहेत.. त्या आठवणींच्या पाठीमागे जाताना चार गल्ल्या पुढे गेलेले असतो आणि मग सगळंच हरवल्यासारखं वाटत.. रस्ताही आणि आठवणीही.. आणि मग मी एकच पुणेरी वाक्य बोलते फक्त.. पुणे फार बदललं ना अशात.. 

आपलं म्हणजे कसं दीड दिवसाच्या गणपती सारखं.. एकच आरती.. त्यातच सगळ्यांना बोलवायचं.. तेव्हाच वाटायचा प्रसाद, तेव्हाच दाखवायची आरास, बाप्पाला मनात साठवायचं ते पण तेव्हाच आणि पुढच्या वर्षीची आरतीची स्वप्न रंगवायची ती पण तेव्हाच.. 

तसं सुखासुखी चालू असतंच कि सासरी.. काही तक्रारी करायला जायचं नसतं, माहेरी.. महत्वाचं असं काहीच काम नसतं.. पण उगीच थोडं पाय पसरून सुस्त व्हावं असं वाटत.. हातातलं घड्याळ थोडं काढून ठेवावं वाटत.. तेवढंच समाधान वाटत मनाला कि रोजच्या routine मध्ये एक हक्काचं विसाव्याचं ठिकाण आहे.. तीन तास अंतरावर माझं दीड दिवसाचं माहेर आहे.. 


Rate this content
Log in