Avanee Gokhale-Tekale

Others

3  

Avanee Gokhale-Tekale

Others

माझ्यासाठी श्रावण म्हणजे...

माझ्यासाठी श्रावण म्हणजे...

3 mins
757


माझ्यासाठी श्रावण म्हणजे.. आसमंतात पौर्णिमेचा चंद्र असावा आणि त्याच्या छातीवरच्या शौर्यपदकांप्रमाणेच तिची राखी त्याच्या पोलादी हातात चमकत राहावी.. ही गोष्ट याच दोघांची आणि त्यांच्या श्रावण सरींची..


हा ऊन सावल्यांचा खेळ त्यांच्या आयुष्याला जोडला गेला तेव्हाच.. जेव्हा त्याने मिलिटरीमध्ये जॉईन होण्याचा निर्णय घेतला.. वाटतो तितका सोपा नाही हा खेळ.. काळजीने अधीर झालेलं तिचं मन आणि भक्कम कणखर उभा तो.. त्याच्यावर मायेची बरसात करणारी ती आणि तिच्या डोक्यावर छत्र धरून स्वतः पाऊस झेलणारा तो.. 


हा सोमवार खास होता.. घरातलं आवरणं, श्रावणी सोमवार त्यामुळे तिची आणि आईची पूजेची लगबग चालू होती.. सगळं पटपट आवरून तिची ऑफिस ला निघायची घाई होती.. उपास करायचा का नाही हे अजून ठरत नव्हतं तिचं.. पण गडबडीत खायला वेळ नाही झाला म्हणून दूध पिऊन निघाली होती ती.. बघू खाऊ ऑफिस मध्ये काहीतरी उपासाचं मिळालं तर ते, नाहीतर जे मिळेल ते.. असं मनाशी ठरवत निघाली ती.. बाहेर चालू असणाऱ्या श्रावणसरी तिचं मन प्रसन्न करत होत्या.. पूर्वी बायकांना या निसर्गाच्या कुशीत शिरता यावं म्हणून तर सुरु झाले असणार हे सणवार त्यांच्या मागे.. आजची स्त्री रोजच बाहेर पडत आहे.. हा श्रावण रोजच अंगावर झेलत आहे.. भरलेलं आभाळ, रिमझिम पाऊस.. हिरव्या रंगाला पण किती वेगळ्या छटा असतात.. नाजूक पोपटी पानांपासून ते गर्द हिरव्या झाडीपर्यंत.. नकळत निसर्ग न्याहाळत तिचे विचार मोकळे धावत होते.. ऑफिस ला जाताना प्रवासातला तिचा आवडता छंद म्हणजे बातम्या ऐकणे.. तिने कानात हेडफोन घातला आणि बातम्या ऐकायला सुरवात केली.. आणि ती ऐकतच राहिली.. मन एकवटून त्याला आठवत राहिली.. 


लहानपणापासून मैदानी खेळाची आवड असणाऱ्या त्यानी जेव्हा मिलिटरीमध्ये जायचा निर्णय सांगितला तेव्हा तिला जाणवलं.. खूप मोठा झाला आपला भाऊ.. तो पर्यंत ती एक अल्लड, हट्टी लाडावलेली छोटी बहीण होती.. पण या एका निर्णयाने ती नकळत समजूतदार झाली.. आई वडिलांबरोबरीनी तीही खंबीर झाली.. घराची जबाबदारी घ्यायला शिकली.. कोणाच्या नकळत डोळ्यातलं पाणी पुसायला शिकली आणि तेव्हाच भेटला तिला हा श्रावण खऱ्या अर्थाने.. कधी काळजी तर कधी आनंदाला उधाण असा त्यांचा श्रावण बहरू लागला.. त्याची शौर्य पदक वाढत होती.. बढती मिळत होती.. आणि घरावर सुखाची बरसात होत होती.. पावसासारखाच यायचा तो अचानक प्रसन्नता घेऊन.. सुखाने भरून जायचे घर.. आणि निघायच्या दिवशी डोळ्यात भरला मेघ फक्त बरसायचा बाकी असायचा..या वर्षीही असाच निघाला तो सुट्टी संपवून.. "दरवषी पोस्टाने येते राखी तुझी.. यावेळी मी नक्की येतो सुट्टी काढून घरीच" असं सांगून मागे न बघता निघाला होता तो.. तो दिवस आणि आजचा दिवस.. या मधल्या दिवसात त्यांचं काहीच बोलणं झालं नव्हतं.. 


आज बातम्या ऐकून परत थरारली ती.. परत एकदा काळजी, अभिमान सगळंच मनात दाटून येत होत.. परत परत तिचा हात फोनकडे जात होता.. लागणारही नाही आणि उचलणारही नाही हे माहित असूनही.. दिवसभर बातम्याच बघत राहिली ती.. जेवायचं पण भान नाही राहिलं.. घरी आली तर आईचं ताट पण झाकून ठेवलेलं.. आई डोळ्यातलं पाणी लपवत म्हणाली अगं श्रावणी सोमवार ना आज.. ताट वाढताना लक्षातच नव्हतं बघ.. कडकडीत उपास घडला होता त्यांना त्यांच्याही नकळत.. तेवढ्यात बाबा महादेवाचा प्रसाद घेऊन आले आणि दोघींना एकच वाक्य सांगितलं..

"आकाशात इंद्रधनुष्य तेव्हाच दिसतं जेव्हा ऊन पावसाचा खेळ चालू असतो" 


कुठूनतरी आतून बळ आलं तिला बाबांच्या वाक्याने.. आणि दरवर्षीप्रमाणेच भावासाठी घेतलेली राखी पोस्टात टाकायला निघाली ती.. आपल्यासाठी भाऊ सुट्टी घेऊन यावा एवढ्या कोत्या मनाची ती कधीच नव्हती.. 


मेघ भरला, झुरला, ओघळला अंगणी!

मल्हार थिरकला, सर आली ही श्रावणी!!


बहिणीची राखी बघून इकडे त्याचा जीव तळमळत असतो.. हातात पिस्तूल, डोक्यात जोश, मनात घरच्यांना आठवत असतो.. त्यांच्या आठवणीने तोही तितकाच हळवा झालेला असतो.. फार प्रयत्न करून शेवटी घरी संपर्क करण्यात तो यशस्वी होतो.. दर वर्षी प्रमाणेच याही वर्षी सुट्टी रद्द झालेली असते.. मोठ्या उत्साहात सांगितलं होतं बहिणीला कि राखी या वर्षी पोस्टाने पाठवू नको आता तिची समजूत कशी घालायची या विचारात तो शब्द जुळवत असतो..


तिच्या कणखर आवाजात सगळा संयम वहात असतो..

"मी लवकरच परत येईन", त्याचा निःशब्द श्वास सांगत असतो..

शांत करारी चेहरा ठेऊन तो बोलायचा प्रयत्न करत असतो..

त्या दोघांच्याही डोळ्यात मेघमल्हार बरसत असतो..


ती कोण तर तुमच्या माझ्यासारखीच एक महिला.. आणि तो सीमा भागात लढणारा एक जवान.. बाकी नावामध्ये काय आहे? माझ्यासाठी श्रावण म्हणजे.. आसमंतात पौर्णिमेचा चंद्र असावा आणि त्याच्या छातीवरच्या शौर्य पदकांप्रमाणेच प्रत्येक वर्षी तिची राखी त्याच्या पोलादी हातात चमकत रहावी.. !!!


Rate this content
Log in