Avanee Gokhale-Tekale

Inspirational Others

3  

Avanee Gokhale-Tekale

Inspirational Others

Best Friend Forever..!!

Best Friend Forever..!!

3 mins
499


बाबी आणि सुधी.. (वय वर्ष ७५ )

संध्याकाळी अचानक फोन खणाणतो.. सुधी मावशी गेली.. आजी आधीच आजारी म्हणून तिला झालेली गोष्ट न कळू देता आई बाबा वैकुंठावर.. ते बाहेर पडल्यावर आजी म्हणते..तुम्ही जेऊन घ्या अरे.. त्यांना यायला आता रात्रच होईल.. सुधी गेली म्हणून बाहेर पडले ना ते..

अग पण आजी तुला कसं कळलं? तुला तर कोणी काही सांगितलं पण नाही..

बालमैत्रीण होती ना रे माझी.. मग मला सांगायला कशाला पाहिजे.. आतून कळतं!! म्हणजे कसं, काय ते कळायला अजून लहान आहात तुम्ही खूप.. !!

आणि मग काय.. जुन्या आठवणीत पोटभर रडणं, मनभर बोलणं आणि आभाळभर हसणं.. !!


मी आणि नेहा.. (वय वर्ष ३० )

एक निसर्ग वर्णन करणारी कविता वाचून नेहा चा फोन..

नेहा - काय ग, काय झालंय? any problem? तुझी कविता वाचली..

मी - मला काय धाड भरणारे.. मस्त मजेत.. आवडली का कविता? खूप like आलेत त्याला..

नेहा - like करणारे फक्त कविता वाचतात आणि मला त्याच्या मागच्या तुला पण वाचता येत एवढाच काय तो फरक.. बोला आता, काय झालंय..

आणि मग काय ..पोटभर रडणं, मनभर बोलणं आणि शेवटी आभाळभर हसणं..!!


तात्या आणि नानी.. (वय वर्ष ९० )

तात्या आणि नानी म्हणजे खरंतर दीर आणि जाऊ.. पण संसाराच्या उतार चढावांचे त्याच्या पिढीतले आता हेच दोघे साक्षीदार राहिलेले.. आताच्या पिढीला त्यांच्या बोलण्यातले अर्धे संदर्भ कळत नाहीत.. सणावाराच्या निमित्ताने सगळे कुटुंब एकत्र आले कि हे दोघे तासंतास हातात हात घेऊन बसतात.. जुन्या आठवणींना उजाळा देत.. आणि मग काय.. पोटभर रडणं, मनभर बोलणं आणि शेवटी आभाळभर हसणं..!!


वश्या आणि राजा.. (वय वर्ष ५५ )

निवांत रविवार दुपार.. सगळे घरातले पाय पसरून दिल चाहता है पाहत होते.. picture संपल्यावर बाबा अचानक उठले आणि कपडे बदलायला गेले.. शर्ट चे बटण लावता लावता पायात चप्पल सरकवली देखील.. अहो, आत्ता कुठे अचानक?

आलोच राजेंद्र कडे जाऊन.. म्हणत गाडीला किक मारून निघाले देखील..

आणि मग काय पोटभर बोलणं आणि आभाळभर हसणं..!!


शकू आणि शोभा (वय वर्ष ६० )

सासूबाईंची माजलगावची बालमैत्रीण खूप वर्षांनी contact झाला.. आणि कुठे आहे काय करत करत लक्षात आले कि ते पण आता नवी मुंबईत रहातात.. मग काय mobile नंबर दिले घेतले.. आणि एक दिवस त्या मावशींचा फोन.. या श्रावणी शुक्रवारी ये ग सवाष्ण म्हणून.. नातवंड शाळेत जातात, मुलं कामावर.. मग आपण दोघीच घरात.. सणाचं निमित्त आणि आपल्या निवांत गप्पा होतील साठलेल्या.. आणि मग काय.. नव्या जुन्या गप्पांमध्ये पोटभर रडणं, मनभर बोलणं आणि आभाळभर हसणं.. !!


गार्गी आणि काव्या.. (वय वर्ष ३)

गार्गी - मला बाऊ झालाय ना तर आज teacher नी सांगितलं class मध्ये.. don't touch her.. पण मी काव्या ला हात लावू दिSSलाSS.. ती माझी best friend आहे ना म्हणून.. तिनी हळूच हात लावला.. आणि मला दुखलं पण नाही..

खरंय आपल्या हळव्या जागेवर हात लावायचा हक्क फक्त best friend चाच.. चला, म्हणजे हे best friend प्रकरण पोचलंच तर पुढच्या पिढीपर्यंत..


कोण म्हणत लग्नानंतर मित्र वगैरे काही रहात नाहीत.. हे best friends नंतर कुटुंबाचाच एक भाग होतात आणि आपण त्यांच्या कुटुंबाचा एक भाग.. ते फॅमिली फ्रेंड्स का काय म्हणतात तसे.. आणि भरभरून वाढत रहात आपलं कुटुंब.. वय बदलत जाईल त्याप्रमाणे भेटायची निमित्त बदलत जातात.. बोलायचे विषयही.. पण ओढ मात्र तीच..


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational