Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!
Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!

Avanee Gokhale-Tekale

Others


3  

Avanee Gokhale-Tekale

Others


उध्दवा.. शांतवन कर जा.. !!

उध्दवा.. शांतवन कर जा.. !!

3 mins 671 3 mins 671

मध्वमुनीश्वरांची ही कविता वाचताना घडलेला प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभा राहतो.. श्रीकुर्ष्णाच्या वियोगाने धैर्य खचलेले गोकुळ वासी, गोकुळात जीव गुंतलेला असताना अपरिहार्य कारणाने तेथून निघालेला कृष्ण आणि गोकुळवासी जनांची समजूत घालायला निघालेला उद्धव..


खरेतर हे आपल्या आसपास कायम घडत असणारे प्रसंग आहेत.. आपल्या रोजच्या जगण्यात खूप वेळा आपल्या प्रिय व्यक्तींचा विरह सहन करायची वेळ येते.. आणि तो सहन करण्याची ताकद आपल्यामध्ये येते ती आपल्याला वेळोवेळी भेटणाऱ्या उद्धवांमुळे.. पण होते असे कि आपण तो विरह सहन करून खूप पुढे जातो पण या उद्धवाची आठवण काढणे कधीतरी राहून जाते..


तो आणि ती.. एक अतिशय खंबीर आणि कणखर जोडपे.. त्याचे पोस्टिंग काश्मीर बॉर्डरवरती झाले.. सीमा भागामध्ये घर परिवार नेणे सुरक्षित राहणार नाही म्हणून ती काही दिवस मुलाला घेऊन आपल्या माहेरी येऊन राहिली.. एक नाजूक मनस्थिती.. सतत वाटणारी नवर्याबद्दल काळजी, त्यातून आलेले हळवेपण, जीवाची होणारी तगमग आणि त्यातून झालेली चिडचिडसुद्धा.. पण तिच्या घरच्यांनी तिला खूप समजून घेतले.. तिच्यामधल्या कलागुणांना वाव दिला.. तिचे मन कसे चांगल्या गोष्टींमध्ये रमेल हे पहिले.. तिच्या भावाने तर घरी सगळ्यांना सांगितले होते कि आपल्यासाठी तिच्या मनाला उभारी देणे हीच देशसेवा.. पुढे दोन वर्षांनी त्यांची पोस्टिंग परत दुसऱ्या शहरात झाली जिथे पूर्ण फॅमिली घेऊन राहणे शक्य होते.. कधी बोलून दाखवले जाते तर कधी मनातच राहते.. पण त्या दिवसांची आठवण सगळ्यांनाच येते हे नक्की.. ते एक देशसेवेला वाहून घेतलेले जोडपे बाकी नावात काय आहे..


तो आणि ती.. सख्खे बहीण भाऊ.. भाऊ मल्टीनॅशनल कंपनीमध्ये.. करिअरसाठी भावाचे परदेशात जायचे ठरले.. आणि आई वडिलांसाठी खंबीर उभी राहिली ती.. मुलाच्या प्रगतीचे कौतुक आई वडिलांना होतेच पण मुलगा, सून, नातवंडे सगळ्यांचा विरह सहन करणे सोपेही नव्हते.. त्यात वयामुळे तब्बेतीच्या कुरबुरी चालूच असायच्या.. पण ती शेजारच्याच बिल्डिंग मध्ये राहायला होती.. त्यामुळे तिचा आधार होताच.. सासरच्या माणसांना जीव लावताना तिचे एक काळीज शेजारी आई वडिलांच्या भोवती पण घुटमळत असायचे.. भावाच्या मनात तिचे स्थान तितकेच भक्कम जितके आई वडिलांच्या मनात.. पण आपल्याच माणसाला बोलून काय दाखवायचे म्हणून कोणी व्यक्त केले नाही एवढाच काय तो फरक..


तो आणि ती.. आई आणि मुलगा.. मुलाच्या नकळत्या वयात अचानक वडील देवाघरी गेले त्याचे.. नेमके कोणी कोणाचे सांत्वन करायचे हा प्रश्न सतत भेडसावायचा त्यांना.. हा विरह तर आयुष्यभराचा.. खचले तर दोघं होते आणि धीर तर दोघांना द्यायचा होता.. आई आणि वडिलांचा प्रेम विवाह.. त्यामुळे सगळे नातेवाईक दुरावलेले.. शेवटी ते दोघंच उभे राहिले एकमेकांच्या पाठीशी.. आणि घर बाहेर काढले त्यांनी दोघांनी मिळून.. दोघे उद्धव एकमेकांचे जन्मभरासाठी..


आयुष्यात एखाद्या टप्प्यावर आपल्या जवळच्या व्यक्तीचा विरह सहन करावा लागतो.. कधी तो क्षणिक असतो.. कधी तो काही वर्षांसाठी असतो.. तर कधी आयुष्यभरासाठी.. या प्रत्येक प्रसंगात आपल्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी असे उद्धव भेटत असतात.. त्यांच्या परीने सांत्वन करत असतात.. यथावकाश आपण त्या परिस्थितीमधून बाहेरही येतो.. पण कृतज्ञता कधी व्यक्त केली जाते तर कधी करायची राहून जाते.. पण मनात प्रत्येकाच्या राहते हे तेवढेच खरे..Rate this content
Log in