संकटातील देवदूत
संकटातील देवदूत
कठीणसमय येता कोण कामास येतो ? ही उक्ती खोटी ठरवणारे आणि मला संकटकाळात मदत करून अनमोल भेट देणारे दिनूकाका हे खरोखर एक आदर्श व्यक्तीमत्त्व आहे. आमच्या घरची परिस्थिती हालाखीची होती. निसर्गाने दगा दिला आणि शेतातलं पीक हातचं गेलं. मला चांगला आठवतंय मी त्या काळामध्ये बारावीची परीक्षा देणार होतो. नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा काळ होता. शेतातले पीक हातचे गेल्याने घरात खूप हालाखीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच कॉलेजमध्ये नोटीस आली, बारावी बोर्डाच्या परीक्षेचे फॉर्म भरायचे आहे. बोर्ड परीक्षेच्या फॉर्मची फी अडीचशे तीनशे रुपयाच्या आसपास होती. पण घरातली परिस्थिती पाहून पैसे मागण्याचे धाडस होत नव्हते. परीक्षा फॉर्म भरायचा की नाही या विचारात काही दिवस निघून गेले.
बघता-बघता परीक्षा फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस उजाडला. आज जर फॉर्म भरला नाही तर बारावीच्या परीक्षेला बस
ता येणार नाही यामुळे काय करावे हेच सुचत नव्हते. शेवटी दिनू काकांकडे जायचे ठरवले. मनाचा हिय्या करून त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली. त्यांनी माझी परिस्थिती शांतपणे ऐकून घेतल्यावर मी तुझी परीक्षा फी भरतो असे सांगितले आणि त्याच मिनिटाला ते माझ्याबरोबर कॉलेजमध्ये यायला निघाले. कॉलेजमध्ये जाऊन आमच्या प्राचार्यांना भेटले आणि मला माझ्या बारावीच्या परीक्षेचा फॉर्म भरता आला.
खरोखर त्यांनी परीक्षा फॉर्म फी भरण्याची मदत वेळेवर केली नसती तर माझ्या शिक्षणाची दारे कदाचित बंद झाली असती आणि शेतावर मोलमजुरी करण्यासाठी जावे लागले असते. पण त्यांच्या या मदतीमुळे मला माझे शिक्षण चालू ठेवता आले. खरोखर काकांकडून मिळालेली ही एक अविस्मरणीय भेट आहे.
योगेश खालकर
पंचवटी नाशिक