तरीही तो थिरकला
तरीही तो थिरकला
मानवी जीवनात अनेक माणसं अशी भेटतात की ती सहज विसरता येत नाही. ते आपल्या कार्याने आणि त्यासाठीच्या ध्यासाने लक्षात रहातात. त्यांचे स्मृतिचित्र आपल्या मनावर कायमचे उमटते. अर्जुन हा तसाच मुलगा ज्याने जिद्द व आत्मविश्वास या जोरावर अशक्य ते शक्य करून दाखवलं.
गावाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या लहानशा झोपडीत तो राहत होता. पायात जन्मत:च वाकडेपण, पण डोळ्यांत एक वेगळी चमक. लहानपणापासूनच गाणी लागली की त्याच्या शरीरात नकळत ताल भरायचा. पाय वेडेवाकडे, पण मनाला लय माहिती होती गावात सण-समारंभात नाच सुरू झाला, की अर्जुन धावत यायचा व नाचायचा प्रयत्न करायचा. लोक हसायचे, काही उपहासाने पाहायचे, पण काहीजण त्याच्या डोळ्यांतील झळाळी ओळखायचे. त्याचं नाचणं म्हणजे जणू आकाशात उडण्याचा प्रयत्न अपूर्ण का होईना, पण खरा.
शाळेत असतानाच एका सांस्कृतिक कार्यक्रमात त्यानं एका गीतावर नाच केला. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद, प्रत्येक हालचालीतून उमटणारी जिद्द, आणि अपंगत्वालाही लज्जास्पद करणारी ऊर्जा पाहून शिक्षकही डोळे पुसत होते. पुढे शहरी कॉलेजात प्रवेश घेतल्यावर अर्जुनला आणखी संधी मिळाल्या. अनेक स्पर्धा, अनेक टाळ्या, पण तितक्याच अडचणी. काही परीक्षक म्हणायचे, नृत्य म्हणजे संपूर्ण शरीराची अभिव्यक्ती असते, आणि तू...? पण तो थांबला नाही.
आंतरमहाविद्यालयीन नृत्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यानं स्वतःची एक कथा सादर केली — एक अपूर्ण शरीर, संगीत सुरू झालं आणि त्याचं नृत्य म्हणजे एक शौर्यगाथा झाली. पायांनी थरथरणाऱ्या जमिनीवर, त्यानं मनाने आकाश गाठलं. स्पर्धा संपली. टाळ्यांचा कडकडाट, लोक उभे राहून त्याला सलाम करत होते. त्याच्या डोळ्यांत पाणी होतं पण ते दुःखाचं नव्हतं.
अर्जुनची ही आठवण स्मृतिचित्रासारखी कोरली गेली कारण अर्जुनची ही गोष्ट प्रत्येकाला शिकवते अडथळे आले तरी मन थांबू नये.यशापयश न पाहता प्रयत्न कधी सोडू नये.
योगेश खालकर
