संकटातील देवदूत
संकटातील देवदूत
दिवाळी सण म्हटला की आनंद आणि उत्साह यांचे मिश्रण असतं. दिवाळी सण मोठा || नाही आनंदाला तोटा || असे जे म्हटले जाते ते उगाच नाही. दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये घरातील लहान थोरांपासून सगळ्यांची आनंदाची लयलूट चाललेली असते. दिवाळीच्या दिवसात रात्रीच्या वेळेस वाजवले जाणारे फटाके म्हणजे आनंदाचा एक अवर्णनीय ठेवा असतो. रॉकेट, सुरसुऱ्या आणि फुलबाजा यासारखे फटाके मनाला मोहून टाकतात तर लक्ष्मी बॉम्ब आणि सुतळी बॉम्ब यासारखे फटाके कानाला कानठिळ्या बसवतात.
पण दोन-तीन वर्षांपूर्वीची दिवाळी मला चांगलीच लक्षात राहिली. लक्ष्मीपूजनाचा तो दिवस होता, घरातील पूजा वगैरे आटपून आम्ही फटाके वाजवण्यासाठी अंगणात आलो होतो. कोणी रॉकेटचा बॉक्स घेतला होता तर कोणी बॉम्बची लड लावण्यात व्यस्त होतं. माझा मित्र राकेशने रॉकेटचा बॉक्स उघडला, तो रॉकेटचा प्रकार काहीतरी नवीनच वाटत होता. नेहमीच्या आकारापेक्षा ते रॉकेट थोडे मोठे होते. राकेशने रॉकेटची वात पेटवली आणि ते रॉकेट आकाशात उंच गेले. र
ॉकेटने खूपच आतिषबाजी केली होती. ते दृष्य पाहण्यात आम्ही सगळे व्यस्त होतो. घरातील सहा वर्षाच्या असलेल्या अनुजकडे कोणाचेही लक्ष नव्हते. त्याने आमचा सर्वांचा डोळा चुकवून लक्ष्मी बॉम्बच्या बॉक्समधील एक - दोन लक्ष्मी बॉम्ब स्वतःकडे लपवून ठेवले.
तो ते लक्ष्मी बॉम्ब घेऊन घराच्या मागे असलेल्या गवताच्या गंजीजवळ गेला. गवताची गंजी वाळलेली होती. त्या गवताच्या गंजीच्या मागे लपून तो लक्ष्मी बॉम्ब फोडणार होता. पण यामुळे गंजी पेटण्याचा धोका होता आणि ती आग पसरत घरापर्यंत आली असती. आमचे कोणाचेही लक्ष नव्हते मात्र त्याच वेळेस आमच्या शेतावर राहणारे रामा काका आमच्या घरी येत होते. त्यांनी अनुजला लक्ष्मी बॉम्ब गंजी जवळ पेटवताना पाहिले आणि त्यांना समोर काय होणार हे कळले होते. ते पळतच तिथे गेले आणि त्यांनी अनुज कडचे लक्ष्मी बॉम्ब हस्तगत केले. आता धोका टळला होता. मग रामा काकांनी पुढे येऊन आम्हाला सगळं सांगितलं. रामा काकांमुळे एक संकट थोडक्यात टळलं होतं. हे नक्की!