आठवणीतली नवरात्र
आठवणीतली नवरात्र
गावात नवरात्र म्हटलं की माझ्या डोळ्यांसमोर अजूनही लहानपणीची अनेक चित्रं जिवंत होतात.आमच्या वाड्यात सगळ्या मुला-मुलींची, आजी-आजोबांची, शेजाऱ्यांची किती धावपळ असायची. झेंडूच्या माळा, लाल फुलं, केशराचे तोरण सगळं गाव देवीच्या रंगात न्हाऊन निघायचं. पहिल्या दिवशी मातीच्या कुंडीत लावलेली जोंधळ्याची पेरणी हे आमचं खास आकर्षण. आम्ही सगळे मुलं रोज उत्सुकतेने पाहायचो हिरवी कोवळी पाती किती उगवलीत ते. जणू देवीच्या आशीर्वादाचा तो हळूहळू वाढणारा चमत्कार होता.
रोज संध्याकाळी आरतीचा गजर, ढोल-ताशांचा गडगडाट, ताशांच्या तालावर नाचणारे तरुण आणि आजीच्या ओठावर असणाऱ्या देवीच्या ओव्या या सगळ्यांनी वातावरण अगदी दैवी व्हायचं.आमच्यासाठी खास दिवस असायचा नववा दिवस. त्या दिवशी गावभरून लोक देवीला नमन करायला यायचे. कुणी गोडधोड प्रसाद आणायचं, कुणी आरतीत झोकून द्यायचं.
माझ्या लहानपणीची एक गोड आठवण म्हणजे एकदा मी लहानसा होतो, आरतीत उभा असताना मला घंटा वाजवायला दिली होती. त्या आनंदात मी इतक्या जोराने वाजवली की सगळेच हसू लागले. पण आजीने माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं होतं अरे बाळा, देवीच्या भक्तीत प्रामाणिकपणा हवा, आवाज मोठा की लहान याला काही महत्त्व नाही. ते वाक्य अजूनही आठवणीसारखं मनात घुमतं.
आज मोठा झाल्यावरही त्या दिवसांची आठवण हृदयात गोड शहारे निर्माण करते. शहरात मोठमोठ्या मंडपांत देवी बसते, सजावटही झगमगती असते, पण गावातल्या नवरात्रीची ती साधी, भक्तिमय, प्रेमळ आणि कुटुंबाला एकत्र आणणारी जादू कुठेच मिळत नाही.म्हणूनच माझ्या आयुष्यातील सर्वांत सुंदर क्षण म्हणजे मनात कोरलेले गावाकडच्या नवरात्र उत्सवाचे सोनेरी दिवस.
योगेश खालकर
