आनंदवारी
आनंदवारी
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पंढरपूरपासून दूर एका छोट्याशा खेड्यात एक लहानसा मुलगा राहत होता – त्याचं नाव होतं राजू. त्याचे वडील दरवर्षी वारीत जायचे. विठोबावर त्यांची अपार श्रद्धा होती. पण त्या वर्षी वडील आजारी होते. म्हणून त्यांनी राजूला म्हटलं - बाळा, यंदा माझ्या ऐवजी तू वारीला जा. विठोबाचं दर्शन घेऊन ये. राजूला आनंद झाला आणि वडिलांनी आपल्यावर मोठी जबाबदारी दिली आहे असे वाटले. तो पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रवासाला निघणार होता. आईने झोळीत सुकामेवा आणि भजनपुस्तक ठेवून दिलं. राजूने टोपी घातली, झोळी घेतली, टाळ घेतले आणि तो मोठ्या आनंदाने वारीत सामील झाला.
प्रवास सुरू झाला. रस्त्यावर उन्हं होती, काही वेळा जोराचा पाऊसही आला. पण राजू मात्र थांबला नाही. तो वारकऱ्यांसोबत ग्यानबा तुकाराम म्हणत चालत राहिला. कधी थकवा यायचा, पण तेवढ्यात वारीतली आजीबाई त्याला प्रसाद देत म्हणायची,बाळा, विठोबा बघायला चालला आहे ना? मग थकलास का? एका गावात त्याला एक म्हातारा वारकरी भेटला. त्याच्या पायाला जखम झाली होती. बाकीच्यांनी त्याला मागे सोडून दिलं. राजू मात्र थांबला. त्याने झोळीतला सुकामेवा त्याला दिला, पाण्याची बाटली दिली आणि त्याच्या पायावर औषध लावलं. म्हाताऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, तू केवळ वारीत चालत नाहीस रे, तू तर विठोबाचं रूप आहेस.
राजू त्याला मदत करून पुढे निघाला. दिवस गेले. शेवटी तो पंढरपूरला पोहोचला. गर्दीत विठोबाचं दर्शन घेण्यासाठी सगळे वाट पाहत होते. राजूनेही रांग धरली. त्याला वाटलं, विठोबा मला ओळखेल का? पण जेव्हा तो देवळात पोहोचला – त्याच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. विठोबा मूर्तीमध्ये नव्हता, तो तर समोर उभा होता – त्या म्हाताऱ्या वारकऱ्याच्या रूपात. विठोबा हसून म्हणाला - राजू, तू माझ्या भेटीला नुसताच आला नाही, तर रस्त्यात मला ओळखून मदतही केलीस. खऱ्या भक्तीचं हेच रूप असतं – सेवा, श्रद्धा आणि समर्पण.
राजूच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याला कळून चुकलं – वारी म्हणजे केवळ चालणं नव्हे, तर माणुसकी, मदत आणि प्रेमाचा प्रवास आहे. त्या दिवसापासून राजूची वारी ही केवळ विठोबापर्यंत नव्हती – ती प्रत्येक माणसाच्या हृदयापर्यंत पोहोचणारी आनंदवारी झाली होती.
योगेश रामनाथ खालकर
